मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग ७

ही एक ऐतिहासिक प्रेमकथा.. ही कथा एका शूरवीर मावळ्याची..



मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.


भाग ७


मेहर आपल्या अदा, नृत्याविष्कारांनी सर्वांना घायाळ करत होती. सर्वांच्या हृदयांवर तिच्या मादक नयनाचे तीर चालवत होती. आपले सारे गायन कौशल्य पणाला लावून ती गाणं गात होती. मैफिल छान रंगात आली होती. सारेजण मेहरच्या सौन्दर्याचं, तिच्या नृत्यकौशल्याचं कौतुक करत होते. मोठमोठे नजराणे पेश केले जात होते. तिच्यावर सुवर्णमुद्रा, हिरे जवाहर उधळले जात होते पण मेहरची नजर मात्र मार्तंडच्या आसपासच घुटमळत होती. मनाचा ठाव घेऊ पाहत होती. तिच्या डोळ्यांत त्याच्याबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. ती आपल्या गाण्यातून तिचं त्याच्यावरचं प्रेम मार्तंडच्या हृदयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत होती.

“एक जू हुतो सो गयो स्याम संग
को आरंधै हस||”

“ऊधो, मन न भये दस-बीस..”

तिच्या गाण्याने सर्वांवर अगदी बेहोष होण्याची पाळी आली होती. गाणं संपलं सारेजण भानावर आले. सर्वजण मेहरची प्रशंसा करत होते. मैफिलीला रंग चढत होता. मेहरने त्याच्याकडे आशेनं पाहिलं. त्याच्या एका प्रेमळ कटाक्षासाठी तिचं मन आतुर झालं होतं. त्याच्या एका नजरेसाठी ती व्याकुळ झाली होती. पण मार्तंडचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. मेहरच्या नाचगाण्यापेक्षा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे तो बारकाईने पाहत होता. तो सर्वांच्या हालचालींना सूक्ष्मपणे न्याहाळत होता. बरीच रात्र उलटून गेल्यानंतर केव्हातरी मध्यरात्री मैफिल संपली. एकेक करत सर्वजण रंगमहालाच्या बाहेर पडू लागले. अमीनाबाई सर्वांकडून नजराणे स्वीकारत सर्वांना निरोप देत होती. काही शिपाई आणि सरदार मागे थांबले होते. का कोणास ठाऊक! ते आपल्यावर पाळत ठेवून आहेत असं मार्तंडला वाटलं. अधून मधून तिरप्या नजरेनं ते त्याच्याकडे पाहत होते. एकमेकांना खुणावत होते. ही गोष्ट मार्तंडच्याही लक्षात आली. त्याला मेहरचे शब्द आठवले. तिने त्याला आधीच दिलेला सावधगिरीचा इशारा आठवला. त्याच्या जीवाला धोका होता. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मार्तंडही जायला निघाला. त्याला जाताना पाहून एका सरदारने अमीनाबाईला डोळ्यांनी इशारा करून त्याला थांबवायला सांगितलं. पटकन पुढे येत तिने मार्तंडला आवाज दिला.

“सुनिए हुज़ूर..”

मार्तंडने मागे वळून पाहिलं.

हुज़ूर, एक दरख्वास्त थी, मेहर चाहती है की आप थोडे दिन और हमारे यहाँ रुक जाएं.. और हमें मेहमान नवाज़ी का मौका दें..”

अमीनाबाई मार्तंडला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात मेहर तिथे आली तसं अमीनाबाईने तिला खुणावलं.

“रुक जाएं हुज़ूर, आपकी खिदमत का मौका दीजिये..”

मार्तंडने तिच्याकडे पाहिलं. मेहर त्याला विनंती करत होती. तिच्या डोळ्यांत त्याला त्याच्याबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. तो मनातल्या मनात विचार करू लागला.

”तसं बी या वक्ताला अमीनाबायच्या महालात मागं घुटमळनाऱ्या शिपायात काय कावा चाललाय ते कळाय पायजेल. इथली खबर काढायची हाय तर मुक्काम कराया लागंल. या समद्या लोकांसंगट आन मेहरबायसंगट ग्वाड बोलाया लागंल. तिच्यासंग गोडीनंच राहाय पायजेल..”

मार्तंड तिथे रहायला तयार झाला. ते पाहून मेहरला खूप आनंद झाला. काय करू अन काय नको असं तिला झालं. मनातला आनंद कसोशीने लपवण्याचा प्रयत्न करूनही तिला ते जमत नव्हतं. तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.

“बहुत शुक्रिया हुज़ूर, चलीये हम आपको आपका कक्ष दिखाते हैं..”

असं म्हणून तिने अदबीनं मार्तंडला बाहेर जाण्याच्या दिशेने हात केला. मार्तंड पुढे चालू लागला. अमीनाबाईने मेहरला नजरेनंच त्याच्या मागे जाण्यासाठी खुणावलं. होकारार्थी मान डोलावत मेहर त्याच्या मागून चालू लागली. ती त्याला शेजारच्या दालनात घेऊन आली. मेहरने शेजारच्या दालनात मार्तंडची राहण्याची सोय केली आणि त्याच्या जेवणाची व्यवस्था पहायला ती मुदपाकखान्यात गेली. मार्तंड दालनात विश्राम करत होता. डोक्यात विचारचक्र सुरू होतं. इतक्यात त्याला बाहेर काही लोकांची कुजबुज ऐकू आली. त्याने कानोसा घेतला. काही सरदार मंडळी आपापसात बोलत होती.

“अब सीवा जिंदा नही बचेगा.. खान उसको मार देगा. अफजलखान बहुत बेरहम है..”

“व्हय जी, बाजी सरकार बी निगाल्यात नव्हं त्याला भेटाय.. खानाला मात देनं लई अवघड हाय..”

“इन शा अल्लाह.., खान सीवाका खात्मा कर देगा.. उसका गुरुर तोड देगा.. एक बार बाजी और खानने मिलकर उसके बापको कैद करके जहाँपना के सामने हाजीर किया था| ये बात शायद ‘सिवा’ भूल गया है| अब खान उसे जरूर याद दिला देगा|”

आणि ते मोठ्याने हसू लागले. अफजलखानाच्या मोहिमेच्या गप्पांचा ओघ वाढत चालला होता. अफजलखान शिवाजी महाराजांना जीवे मारण्याचा कट रचत होता. मार्तंड विचारांत गढून गेला. इतक्यात मेहर आणि सायरा दासींसोबत मार्तंडसाठी शाही भोजन घेऊन आली. समोर ठेवलेल्या मंचकावर तिने सर्व पदार्थ मांडून ठेवले आणि त्याच्याकडे पाहून त्याला जेवण्यास विनंती केली. मार्तंड पहिल्यांदाच इतकं स्वादिष्ट जेवण पाहत होता. चांदीच्या ताटात वाढलेल्या पदार्थावर ताव मारणार इतक्यात त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“काय घातपात तर नसंल. बेईमान लोकं हाईत ही. कदी बी डाव करतील. गाफिल राहून चालायचं नाय.”

मार्तंड मनातल्या मनात बडबडला. त्याने मेहरच्या दिशेने एक कटाक्ष टाकत म्हणाला,

“मेहरबाय, तुमीबी आमच्यासंगट जेवा की.. ”

“नही हुज़ूर, आप हमारे मेहमान हैं.. पहले आप बिस्मिल्लाह किजीए.. उसके बाद हम खायेंगे..”

“नाय.. तुमास्नी आमच्यासंगटच जेवाय लागल. नायतर आमी येक घासबी खानार नाय..”

त्याने निक्षुन सांगितलं. मेहरने मार्तंडच्या डोळ्यात पाहिलं. तिच्याबद्दल त्याच्या मनात असलेला अविश्वास तिला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. त्याच्या मनात आलेली शंका मेहरने अचूक ओळखली. टचकन तिच्या सुंदर घाऱ्या डोळ्यांत पाणी आलं. मनात आलेला संताप आवरत ओठांवर हसू आणत ती मार्तंडला म्हणाली,

“हुज़ूर, आप हमपर शक कर रहे हैं.. कोई बात नही.. चलीए, आपका शक हम दूर कर देते है लेकिन हमारी भी एक शर्त है की आप इस थाली से अपने हाथों से हमे निवाला खिलाएं तो ही हम खाना खायेंगे..”

मार्तंडच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“तसलं काय बी आमी करत नस्तू..”

“तो फिर हम भी आपका कहना क्यूँ सुने? आप हमारी मेहमान नवाज़ी पर शक कर रहे हैं.. अगर आपको तसल्ली करनी है तो अपने हाथों से आपको हमे खिलाना पडेगा..”

तीही तिच्या शब्दांवर ठाम होती. मार्तंडने थोडा विचार केला.

“मेहरबायचा डाव असता तर ती सवता जेवाय तयार झाली नसती. भ्याली असती. पर ह्यी तर जेवाय तयार हाय.. मंजी खरं बोलत आसल. तरी बी इकाची परीक्षा नगं.."

मार्तंड ताटातला प्रत्येक पदार्थाचा एकेक घास उचलून तिला भरवू लागला. जवळ असलेल्या तांब्यातलं पाणी पाजलं. काही क्षण राग विसरून मेहर लाजेनं चूर झाली होती. काही घातपात नाही हे लक्षात आल्यावर मार्तंडने जेवायला सुरुवात केली. मेहरने छान व्यवस्था केली होती. जेवणं आटोपली. मेहरने विड्याचं तबक मार्तंड समोर ठेवलं. मार्तंडने पानाचा विडा उचलून तोंडात टाकला. पानाचा लाल रंग त्याच्या ओठांवर चढू लागला तशी मेहरने बोलायला सुरुवात केली.

“हुज़ूर, आप हमे इतनी शक की निगाहसे क्यूँ देखते है? क्या माजरा है?”

“हितं आमचा कुणावं बी इस्वास न्हाई. आन त्यात तुमी नाचकाम करणाऱ्या. कसा ईस्वास ठेवायचा आमी?"

मार्तंड अविश्वासने म्हणाला.

“क्यूँ..? तवायफो का कोई इमान नहीं होता? वो किसीके भरोसे के काबील नही होती?”

तिच्या डोळ्यांतून अंगार बरसत होता. एक जळजळीत कटाक्ष टाकत मेहर पुढे बोलू लागली.

“जनाब, इतनी नफरतसे ना देखीए.. हर नाचनेवाली लडकी बेईमान नही होती.. कोई भी लडकी जनमसे या अपने शौक़ से तवायफ नही बनती..”

बोलता बोलता तिच्या कंठात उमाळा दाटून आला. आवंढा गिळून ती बोलू लागली.

“सरकार, मी पण त्या दख्खनच्या मुलुकाची बेटी..”

मार्तंडने एकदम चमकून तिच्याकडे पाहिलं. मेहर रडू लागली. तिच्या डोळ्यांत आसवं पाहून मार्तंडला गलबलून आलं. त्याने पाण्याचा तांब्या पुढं केला. मेहरनं तांब्यातलं थोडं पाणी प्यायलं.

“तुमी दख्खनची बेटी? मग इथं कश्यापाई? काय गोडबंगाल हाय मेहरबाय? मनात आसल आन तुमचा इस्वास आसल तर सांगा आमास्नी..”

मार्तंडने आस्थेने विचारलं. मेहरने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत अनेक प्रश्न होते.

कोण होती ही मेहर? दख्खनची पोर असताना ती इथे कशी आली होती? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all