मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग १३

ही कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..
मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग १३

प्रतापराव आणि बाजी घोरपडे यांच्यात बराच वेळ मसलत सुरू होती. थोड्याच वेळात सेवकांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. भोजन झाल्यानंतर बाजींनी मंचकावर ठेवलेल्या रुप्याच्या तबकातील पानाचा विडा उचलून तोंडात टाकला. थोडा वेळ गप्पा मारून बाजी घोरपडे विश्रांतीसाठी आपल्या शामियान्यात निघून गेले. मार्तंडही सैनिकांच्या छावणीत गेला. जमिनीला अंग टेकले खरं, पण इतक्या दूरच्या प्रवासानंतरही त्याला झोप येत नव्हती. डोक्यात खानाचा विचार घोंगावत होता. आपलं ध्येय, ज्या कामासाठी तो इथवर जीवावर उदार होऊन आला होता ते ध्येय, ते काम पुन्हा पुन्हा आठवत होतं. काम तसं जोखमीचं होतं पण त्याची चिंता मार्तंडला नव्हतीच कधी. पन्हाळगडावरून निघताना त्या व्यक्तीने खानाबद्दल बरंच सांगितलं होतं. सावधगिरीचा इशारा देत खान किती क्रूर आहे याची कल्पना दिली होती. मार्तंडला ते सारं बोलणं आठवू लागलं. ती व्यक्ती सांगत होती. 

“अफजलखान.. आदिलशाही दरबारातील एक बलाढ्य सरदार व सेनानी.. सुरुवातीला आदिलशाही दरबारातील ‘रणदुल्लाखान’ या मातब्बर सरदाराचा एक साधारण शिपाई म्हणून अफजलखान नोकरीला लागला आणि नंतर हळूहळू त्याचा खास विश्वासू माणूस बनला. तो एवढा शूर होता की रणदुल्लाखानाच्या हाताखाली असूनही त्यानं एकट्याने स्वतःच्या बळावर राजा व्यंकटपतीकडून चिकनायकनहळ्ळी आणि बेलूरचा किल्ला भुयारांद्वारे सुरुंग पेरून बळकवला. तुंकूरचा किल्ला देखील मिळवला. कर्नाटकात सर्व हिंदू राजांचा खात्मा करून आदिलशाही सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अनेक मोहीमा करण्यात आल्या. रणदुल्लाखानाच्या नेतृत्वाखाली हिंदवी राज्य संपुष्टात आणण्याच्या या मोहिमेत बाजी घोरपडे, सरदार शहाजी भोसले आन यांच्यासारख्या बऱ्याच मातब्बर सरदारांनी आपली कामगिरी दाखवली होती. त्यात अफजलखानही सहभागी होता. पुढे त्याने जिंजीचा किल्ला जिंकला. औरंगजेबानं कुत्बशाहीवर हल्ला केला. त्यावेळेस कुत्बशाहीला मदत करण्यासाठी आदिलशाहने धाडलेल्या फौजेचं नेतृत्व अफजलखान करत होता. त्याचा तो पराक्रम आणि कर्तृत्व पाहून आदिलशहानं खानाला कर्नाटकची सुभेदारी दिली. तो मुदगल मामलतचा सरहवालदार सुद्धा होता. त्याचसोबत त्याला शिरोळे, वाई परगण्याचा मोकासा मिळाला. वाईचा मोकासा मिळाल्यावर त्याने लगेच जावळीचे खोरे काबीज करण्याचा प्रयत्न केला कारण त्या खोऱ्याचा देशमुख दौलतराव मोरे आदिलशाहीशी फटकून वागत होता. पण तो निपुत्रिक मरण पावला, तेव्हा देशमुखीसंबंधी तंटे उद्भवले. महाराजांनी मोरेना सर्वोतोपरी मदत केली परंतू अफजलखान येताच मोऱ्यांनी महाराजांशी वैर करून खानाशी संधान बांधलं. खान अत्यंत धूर्त आणि कपटी आहे. कोणतंही पाऊल उचलण्याआधी विचार कर.. काळजीपूर्वक निर्णय घे.”

त्या व्यक्तीचं बोलणं मार्तंडच्या मनात रुंजी घालू लागलं. चिंतेचं, भीतीचं सावट मनात दाटून आलं. त्याच विचारात रात्री त्याला कधी झोप लागली त्याचं त्याला कळलं नाही. 

दुसऱ्या दिवशी मार्तंड बाजींच्या सेवेत हजर झाला. बाजी खानाच्या मदतीला आलेल्या बाकीच्या मातब्बर सरदारांच्या गाठीभेटी घेत होते. शिवाजी महाराजांना कसं जेरीस आणता येईल यासाठी नवनवीन योजनांवर मसलती करत होते. सैन्यबळ वाढवत होते. मार्तंड बाजींच्या सोबत होता. प्रत्येक गोष्ट मनात टिपून घेत होता. कामाच्या नादात सर्वांशी मसलती करण्यात दिवस कधी मावळला समजलंच नाही. 

रात्री बाजी घोरपडे, प्रतापराव यासारख्या अफजलखानाच्या मदतीला आलेल्या खाश्या स्वाऱ्यांच्या पंगती उठल्या. सर्वांचं भोजन झालं. थोड्याच वेळात बाजींनी आपल्या वकील आणि मार्तंडसोबत अफजलखानाच्या शामीयान्यात प्रवेश केला. मार्तंड खानाला पहिल्यांदाच पहात होता. भरजरी वस्त्र परिधान केलेला त्याहूनही रुबाबदार त्याचा किमाँश त्याच्या डोक्यावर शोभून दिसत होता. गळ्यात हिरे मोत्यांच्या माळा त्याच्या भारदस्त धीप्पाड छातीवर रुळल्या होत्या. कानात हिऱ्यांचे लोलक शोभून दिसत होते. उंच पर्वतासारखा दिसणारा साडे सहा- सात फुटाचा तो धीप्पाड देह आपल्या बैठकीवर असलेल्या तक्याला कलून बसला होता. अगदी सुस्तावलेल्या अजगराप्रमाणे तो आसनावर विराजमान होता. रौप्य तबकात ठेवलेल्या काजू, खारीक, बदाम, जर्दाळूचा आस्वाद घेत होता. समोरच्या मंचकावर तबकात रत्नजडीत सुरई आणि सरबत्यांचे प्याले ठेवले होते. त्या प्याल्यातल्या सरबताने आपली तृष्णा भागवत होता. सर्वत्र निरनिराळ्या अत्तरांचा सुगंध दरवळत होता. अफजलखानानं बाजी घोरपडेना शेजारी ठेवलेल्या आसनावर बसायला सांगितलं. मार्तंड त्याचा चेहरा न्याहाळत होता. अफजल खानाच्या चेहऱ्यावर धूर्त कपटी भाव.. उन्मत, कावेबाज नजर.. वागण्यात बोलण्यात एक वेगळीच गुर्मी.. खानानं बोलायला सुरुवात केली.

“बोलिये, बाजी राजे.. विजापूरमे सब खैरीयत..”

“जी खान साहब, सगळं नीट आहे. विजापूरात तुमच्याच मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाजीचा पुरता खात्मा झाला ही बातमी ऐकण्यास बादशहा आणि बडी बेगम यांचे कान आतुर झाले आहेत. मोहीम तशी जोखमीची म्हणूनच बडी बेगमने या कठीण कामासाठी आपली निवड केली आहे. आणि आम्हाला तुमची सहायता करण्यासाठी इथे पाठवले आहे.”

बाजी उत्साहाने म्हणाले.

“अफजल को किसीकी मदद की जरुरत नही| हम ही काफी है खुदकी सहायता करनेके लिए..”

छदमी हसत मोठ्या ताठ्यात अफजलखान बोलला.

“अगदी खरंय. नुसतं तुमचं नाव ऐकलं तरी गनिमांचा थरकाप होतो. आम्ही फक्त तुमच्या सोबत राहणार आहोत. तुमचं सैन्यबळ वाढवणार आहोत. बाकी आमचा काहीही वेगळा मनसुबा नाही. तुमच्या कोणत्याही कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पण मनापासून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, शहाजीचा फर्जंद शिवाजी भोसले फारच चाणाक्ष, धूर्त आहे. निडर आहे. त्याला घाबरवणे इतके सोप्पे नाही. तुम्ही तुळजापूरात हिंदूंची मंदिरं उध्वस्त केलीत. आमच्या श्रद्धास्थानांना हानी पोहचवलीत. हे करण्याची काहीच गरज नव्हती. त्याने तुमचा मनसूबा बरोबर हेरला. तो तुमच्या कोणत्याही चालीस बधला नाही. तुम्ही वेगळी खेळी खेळायला हवी होती. तुमची काही हरकत नसेल तर आम्ही आपणास काही सुचवू इच्छितो.”

खानानं बाजींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. बाजींनी मार्तंड आणि बाकीच्या लोकांना नजरेनेच बाहेर जाण्यास सांगितलं. सर्वजण तिथून बाहेर निघून गेले. पण मार्तंड मात्र शामीयान्याबाहेर घुटमळत राहिला. शामियान्याच्या चहूबाजूनी कडक पहारा होता. डोळ्यात तेल घालून पहारेकरी पहारा देत होते. मार्तंड एका कोपऱ्यातल्या पहारेकऱ्याजवळ येऊन त्याच्याशी गप्पा मारत उभा होता. बाजी घोरपडे आणि अफजलखान चालू असलेली चर्चा त्याच्या कानावर पडत होती. 

“खानसाहेब,देवस्थानांना नुकसान पोहचवून काहीही उपयोग नाही. त्यापरीस दुसरा रस्ता निवडू. विजापूरहून निघताना तुम्हांला वाटलं होतं की शिवाजी वाईला आसल पर त्यो तर प्रतापगडावर पळून गेला. आता आपण मार्गच बदलू. आपण दहिवडी, शंभुमहादेव, मलवडी मार्गे वाईला जाऊ आन त्याला तिथं बोलवून त्याचा नायनाट करू. तसंबी तुम्ही वाईचे सुभेदार होता तवा तुम्हांला त्या भागाची खडानखडा माहिती आहे. त्याला वाईला बोलवून त्याचा खात्मा करणं जास्त सोईचं राहील. आन तिथं अजून काही मातब्बर सरदार आपल्याला भेटतील. जे आपणाला या कामात मदत करतील. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं गेल्यावर आपल्याला शिवाजीच्या मुसक्या आवळता येतील. ऐसी चाल चलेंगे की वो चुहा बराबर अपनी गुंफासे बाहर निकलेगा.”


या वाक्यावर बाजी खानाला काही सूचित करत गालातल्या गालात हसले. बाजींचं बोलणं ऐकून अफजलखान विचारत पडला. विचारांती तो म्हणाला,

“ठीक है, आप का कहना बिल्कुल सही है| हमारे लिए यही मुनासीब रहेगा| हम अपनी रस्ते का रुख बदल देते है| वाई का चप्पा चप्पा हम जानते है| हमे इस बात का जरूर फायदा होगा|”

खानाला बाजींचं म्हणणं पटलं आणि त्याने तुळजापूरचा मुक्काम हलवून वाईला जाण्याचा निर्णय घेतला. बाहेर पहारेकऱ्यासोबत गप्पाचं सोंग करत उभं असलेल्या मार्तंडच्या कानावर अफजलखान आणि बाजींचं सारं बोलणं पडलं. खानाचा पुढचा गनिमी कावा समजला पण वाईला गेल्यावर शिवरायांना कोणता मोठा धक्का बसणार होता. हे त्याला समजलं नाही.

“बाजी सरकार म्हणत हुत की तिथं गेल्यावर शिवबाराजांच्या मुसक्या आवळता येतील म्हंजी काय हुनार हाय? काय करणार हाय गनिम? काय डाव आसल ह्या कपटी लोकांचा? नजर ठिवाय पायजेल. खबर पोहचवली पायजेल. सरकार वाट पाहत असत्याल.”

मार्तंड मनातल्या मनात बडबडला आणि हळूच त्याने तिथून काढता पाय घेतला. 

पुढे काय होतं? काय असेल खानाची पुढची खेळी? मार्तंड पुढे काय करेल? पुन्हा त्याची आणि मेहरची भेट होईल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all