Dec 05, 2021
स्पर्धा

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग ११

Read Later
मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग ११

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.

भाग ११

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून मार्तंड परत विजापूरला जाण्याची तयारी करू लागला. त्याने अंगावर पांढऱ्या रंगाचा चुणीदार मांडचोळणा, सदरा चढवला. छातीवर बंद आवळलेली, हाताच्या भुजापर्यंत वर सरकवलेली बाराबंदी, डोक्यावर लाल रंगांची पगडी घातली. कमरेला शेला आणि डोक्याच्या पगडीवरून हनुवटीखाली गाठ दिलेला पगडपोस घातला. हातातली तळपती तलवार शेल्यात खुपसली. पायात मावळी पायताण आणि पाठीवर ढाल चढवली. मार्तंड खूपच रुबाबदार दिसत होता. ओठांवर असेलेली मिशीची महिरप त्याच्या रुबाबदार रूपात अजूनच भर टाकत होती. इतक्यात मेहर त्याच्यासाठी न्याहारी घेऊन दालनात आली. त्याचं ते रांगड रूप पाहून जागीच थिजली. त्याच्याकडे पाहतच राहिली.

“कावेरी, ये.. ये आलीस?”

मार्तंडच्या आवाजाने ती भानावर आली.

“जी हुजूर..”

तिने समोरच्या मंचकावर न्याहारीचं ताट ठेवलं. मार्तंडने न्याहारीला सुरुवात केली. आज घास काही केल्या घश्याखाली उतरत नव्हता. एक विचित्र बैचेनी जाणवत होती.

“काय झालं हुजूर, खाईये ना..”

मार्तंडने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं होतं. कशीबशी न्याहारी करून झाल्यावर मार्तंड जाण्यासाठी निघाला. त्याने त्याच्या हातातलं चांदीचं कडं काढलं. कमरेला खोचलेली मोहरांची छोटी पिशवी आणि चांदीचं कडं मेहरच्या हातात देत तो म्हणाला,

“कावेरी, हे आमच्याकडनं तुज्यासाटी..”

मेहर त्याच्या हातातून चांदीचं कडं घेतलं आणि मोहरांची पिशवी परत करत म्हणाली,

“बहुत शुक्रिया हुजूर, पर फकस्त ह्ये राहू द्या माज्याकडं.. तुमची निशानी म्हनून.. इन मोहरो की जरुरत न्हाय जी..”

भरल्या डोळ्यांनी तिने मार्तंडकडे पाहिलं. मार्तंडला गहिवरून आलं. त्याने तिला कवेत घेतलं. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला,

“कावेरी, रडू नगंस, म्या परत यीन आन परत आल्यावर माजी कारभारीन बनवून तुला हिथनं भाईर दख्खनला घिऊन जाईन. तुज्या माय बांची तुजी गाठ घालून दिईन. काय बी काळजी करू नगंस. माजी वाट बघशील नव्हं..”

“हमें आखरी दम तक आपका इंतजार रहेगा हुज़ूर..”

मेहर भावुक झाली. मार्तंडचाही गळा भरून आला. त्याची मिठी अजूनच घट्ट झाली. मार्तंडने अलगद तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या नाजूक ओठांचं चुंबन घेतलं. इतक्यात त्यांना कोणीतरी आल्याची चाहूल लागली. दोघे एकमेकांपासून दूर झाले. मार्तंडचे साथीदार विजापूरला जाण्यासाठी तयार होऊन आले होते. ते सर्वजण त्या दालनातून बाहेर पडले. जाताना मार्तंडने अमीनाबाईला मोहरांची छोटी पिशवी दिली. तिने मोठ्या खुशीने स्वीकारली. रंगमहालाच्या प्रवेशद्वारापाशी मेहर आणि सायरा मार्तंडला निरोप देण्यासाठी आल्या. मेहरचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. मार्तंडने पागेत बांधलेल्या त्याच्या घोड्याला मायेने थोपटलं आणि त्यावर स्वार झाला. भरल्या डोळ्यांनी त्याने मेहरचा निरोप घेतला. घोड्याला टाच मारून तो वाऱ्याच्या वेगाने तिथून निघून गेला. धुळीचे लोट उडवीत तो क्षणार्धात दिसेनासा झाला. मेहरचा चेहरा पडला. अत्यंत जड अंतःकरणाने ती रंगमहालात आपल्या दालनात आली. मोठ्यानं आक्रोश करावा असं तिला वाटत होतं. आत येताच ती सायराच्या गळ्यात पडून रडू लागली. सायरा तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. तिचं सांत्वन करत होती.

मार्तंडच्या रंगमहाल सोडून जाण्याने हळूहळू अवघ्या रंगमहालात उदासीचं सावट पसरू लागलं. जणू काही रंगमहालाला अवकळा आली. मेहर उदास राहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचं तेज हळूहळू लोप पावत चाललं होतं. तबियत ठीक नसण्याचं कारण सांगून मेहर मैफिलीत जाण्याचं टाळत होती. खाश्या स्वाऱ्या तिचं नृत्यकला पाहण्यासाठी, गाणं ऐकण्यासाठी येत पण मेहरची प्रकृती ठीक नसल्याने नाराज होऊन निघून जात. बराच काळ लोटला तरी मेहरचं मन कशातच रमत नव्हतं. ती मैफिलीत येत नसल्याने तिच्याशिवाय मैफिल सुनी सुनी झाली होती. मैफिलीत तिच्या न येण्याने रंग चढत नव्हता. तिचं नृत्यकौशल्य पाहण्यासाठी येणाऱ्या मोठमोठ्या बड्या लोकांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे अमीनाबाईची आमदनी कमी होऊ लागली. पण असं किती दिवस चालणार? मेहरच्या अशा वागण्याने अमीनाबाईला काळजी वाटू लागली. खाश्या स्वाऱ्यांची नाराजगी पत्करणं तिला परडवणारं नव्हतं. असंच वातावरण राहिलं तर काही दिवसांनी रंगमहालाचं ऐश्वर्य संपुष्टात येईल. सर्वांवर उपाशी मरण्याची वेळ येईल अशी भीती तिला वाटू लागली.

“अब मेहर के साथ इस बारे में बात करनीही होगी..”

ती मनातल्या मनात बडबडली आणि मेहरच्या महालात आली. मेहर पलंगावर पहुडली होती. कसल्यातरी विचारात मग्न होती. डोळ्यांत उदासी स्पष्ट दिसत होती. अमीनाबाई तिच्या जवळ आली. अमीनाबाईने तिला आवाज दिला. विचारात गुंग असलेल्या मेहरचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तिच्या जवळ येऊन तिला हलवल्यावर ती भानावर आली.

“मेहर, बच्ची.. मेरी जान, ये क्या हालत बना रखी है.. छोड दे उसका खयाल.. वो यहाँसे चला गया है.. वो कभी वापस लौटके नहीं आनेवाला..”

अमीनाबाई तिला समजावत होती. मेहरचे डोळे पाण्याने भरले. तिने अमीनाबाईकडे पाहिलं.

“नही माँ, वो जरूर आयेंगे.. वो हमसे मोहब्बत करते है और हम भी उनसे.. उन्होने जाते वक्त हमसे यहाँ फिरसे लौट के आनेका वादा किया था| हमसे किया हुआ वादा वो जरूर निभायेंगे.. हमे यकीन है|”

मेहर निक्षुन म्हणाली. तिच्या डोळ्यात मार्तंडविषयी असलेला विश्वास स्पष्ट दिसत होता.

“मेहर, नादान ना बनो.. मोहब्बत, इश्क ये बेफिजूल की बाते हमारे लिए नही बनी.. हमारा काम अपने आकाओं को खुश रखना है और उसके बदले में वो हमे नजराने, तोहफोंसे हमारे हूनर की कदर करते है.. उनकी रेहम-ओ-करमपेही हम सब जी पा रहे हैं.. उनका खयाल रखना, उनकी खिदमत करना हमारा फर्ज है.. अगर उससेही तुम्हारा ध्यान हट गया तो बडी मुश्किल होगी तुम्हारे लिए और हम सबके लिए भी.. रंगमहल की शान-ओ-शौकत चली जायेगी.. सब भूखे मर जायेंगे.. खुद का नही तो कमसे कम बाकी लोगो का तो खयाल करो जो लोग यहाँ काम करते हैं..”

अमीनाबाई कधी प्रेमाने तर कधी रागाने तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मेहरचे डोळे पाण्याने गच्च भरले होते. आपल्या लोकांचा विचार मनात आला. तिच्या नाचगाण्यातून मिळणाऱ्या नजराण्यातून कित्येक कुटुंबे पोसली जात होती. त्या सर्वांचा विचार तिच्या मनात आला. स्वतःच्या भावनांपेक्षा इतरांच्या पोटापाण्याचा प्रश्न तिला जास्त महत्वाचा वाटला आणि मोठ्या जड अंतःकरणाने तिने तिच्या नाजूक पायावर घुंगरू बांधले. वादकांच्या वाद्याच्या तालावर पुन्हा एकदा घुंगरू नाद धरू लागले. पुन्हा एकदा मैफिलीत रंग चढू लागला. तिच्या अदांचा, नृत्यकौशल्याचा कैफ भिनू लागला.

इकडे मार्तंड विजापूरला पोहचला पण काळीज मात्र रंगमहालात सोडून आला होता. मेहरची आठवण त्याला बैचेन करत होती. मन तिच्याकडे धाव घेत होतं. पण कर्तव्याच्या पुढे काहीच महत्वाचं नव्हतं.

“आधी हाती घेतलेलं काम फत्ते करायचं मग जीव गेला तरी बेहत्तर..”

त्याने मनाशी पक्का निर्धार केला. स्वामीभक्ती अवघ्या देहात भिनलेला मार्तंड आपल्या स्वामींनी दिलेली कामगिरी चोख बजावत होता. आता तो बाजींच्या मर्जीतला माणूस बनला होता. बाजी घोरपडे यांच्या खास माणसांत त्याची गणना होऊ लागली. तो कायम बाजींसोबत दिसू लागला. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या मोहिमेवर आपला पराक्रम दाखवू लागला. बाजींच्या अश्वपथकात प्रमुख सैनिकाच्या पदावर त्याची नियुक्ती करण्यात आली. बाजींपासून इतर सर्व लोकांचा मार्तंडवर विश्वास बसू लागला. महालात अफजलखानाच्या मोहिमेच्या चर्चा होऊ लागल्या. अफजल खान मजल दरमजल करत दख्खनच्या दिशेने कूच करत होता. बाजींच्या महालात चर्चेला उधाण आलं होतं. अफजलखानाला कशी मदत पुरवता येईल, याची चर्चा सुरू झाली. बाजी आपल्या विश्वासातल्या माणसांसोबत मसलत करत त्यांच्या महालात बसले होते. मार्तंड तिथेच शेजारी एका कोपऱ्यात उभा होता. बाजींनी बोलायला सुरुवात केली.

“शहाजीचा फर्जंद अत्यंत धूर्त..भल्या भल्यास्नी पानी पाजलंय त्यानं. त्यो कदी काय डाव करलं याचा नेम नाही. अफजल खानसुद्धा धूर्त, कपटी कावेबाज आहे पण तरीही शिवाजी त्याच्यापरिस जादा धूर्त.. काकणभर सरसच.. आपणाला खूप सावध राहावं लागल. नीट विचार करून पाऊल टाकलं पाहिजे. खानाला सावध कराय पाहिजेल. प्रतापराव मोरे, खराटे, खंडोजी खोपडे, मसुरचे सुलतानजी जगदाळे देशमुख, यादव, घाटगे, नाईकजी पांढरे, मोहिते देशमुख आन बरीच मोठंमोठी पराक्रमी मातब्बर सरदार आधीच खानाच्या मदतीला धावून गेलेत. त्याला जाऊन मिळाले आहेत. आपल्याला देखील खानाच्या मदतीला जावं लागंल. तुम्ही सफरीची तयारी करा. आपल्या विश्वासातल्या लोकांस्नी तयार राहायला सांगा. उद्याच निघायचं आहे मोहीमेवर. मार्तंड, तू पण चल आमच्यासंगट.. ”

मार्तंडने मान डोलावली. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. थोडा वेळ चर्चा झाली आणि नंतर मसलत संपून उद्या लगेच अफजलखानाच्या भेटीला निघायचं हा निर्णय झाला. मार्तंड पुढच्या मोहिमेच्या तयारीसाठी तिथून बाहेर पडला आणि त्याच्या दालनाच्या दिशेने जाऊ लागला. पण का कोणास ठाऊक कोणीतरी त्याचा पाठलाग करतंय असा त्याला भास होत होता. त्याने मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. खरंतर तो रंगमहालातून विजापूरला आल्यापासून हे रोजच घडत होतं. विजापूरच्या दरबारातही त्या नजरा त्याचा मागोवा घेत होत्या. काय गौड बंगाल आहे हे मार्तंडलाही समजत नव्हतं. रात्री तो झोपलेला असताना कुणीतरी त्याचं दार ठोठावलं पण त्याने दरवाजा उघडून पाहिलं तर बाहेर कोणीच नव्हतं. कोणीतरी त्याच्यावर पाळत ठेवून होतं. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्याने सावधगिरीचा पवित्रा घेतला.

अखेरीस काही निवडक सैन्य, अंगरक्षकांसह काही विश्वासातली सरदार, दारुगोळा, शस्त्रे, अन्नधान्याची रसद घेऊन बाजी घोरपडे शिवाजी महाराजांचा खात्मा करण्यासाठी निघालेल्या अफजलखानाच्या मदतीसाठी निघाले. मार्तंड सोबत होताच. आताही त्या नजरा त्याच्यावर, त्याच्या बारीक हालचालीवर लक्ष ठेवून होत्या.

कोण होती ती व्यक्ती? मार्तंडवर पाळत ठेवण्यामागे काय हेतू होता? पुढे काय होतं? मेहर आणि मार्तंडची पुन्हा भेट होईल का? पाहूया पुढील भागात.

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

निशा थोरे (अनुप्रिया)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.