मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग १०

ही कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..




मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग १०


मार्तंडच्या लाघवी बोलण्याने मेहरच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. तिने लाजून नजर खाली झुकवली. मार्तंडने बोलायला सुरुवात केली.

“मेहरबाय, उद्या आमी जाणार.. पुन्यांदा कदी भेट हुईल त्या महादेवालाच ठावं. पर तुमास्नी येक बात सांगू? आमच्या माय बा नंतर जर कुनी माजी इतकी काळजी केली आसल तर त्या तुमी हायसा. आमच्या माय नंतर तुमी जीव लावलासा. तुमास्नी इसरनं किती बी ठरीवलं तरी माज्याकडनं नाय घडायचं आन तुमास्नी कवा बी, कंची बी नड असल.. तर बिनघोर आमास्नी सांगा. आमी त्यापाई काय बी करू. तुमच्यासाठी कुटं बी असलो तरी येऊ मंग जीव गेला तरी बी हरकत नाय.”

त्याच्या तोंडावर आपला हात ठेवत त्याचं बोलणं मध्येच थांबवत मेहर म्हणाली,

“नहीं नहीं हुज़ूर.. आपको उस खुदा का वास्ता, अपनी जुबाँपे ऐसी मनहूस बातें मत लाएं.. हमारा दिल घबरा जाता है..”

तिच्या डोळ्यातलं आभाळ ओसंडून वाहू लागलं. एक दोन क्षण ते एकमेकांच्या डोळ्यांत पाहत होते फक्त.. पण लगेच भानावर येत तिने त्याच्या तोंडावर ठेवलेला हात बावरतच मागे घेतला. ती इकडे तिकडे पाहू लागली. मार्तंडदेखील थोडासा अवघडला. इतक्यात मेहरला काहीतरी आठवलं आणि पटकन तिने ओढणीच्या टोकाशी बांधलेली गाठ सोडली आणि त्यात ठेवलेला तावीज मार्तंडला दाखवत ती म्हणाली,

“हुज़ूर, हम पीर बाबा के दर्गा से आपकी सलामती के लिए, लंबी उम्र के लिए ये तावीज लाएं है.. ये तावीज जिसके लिए मन्नत मांगी है उसके बांये हाथपर बांधना होगा.. ये तावीज पास रखनेसे अल्लाह उसकी हमेशा हिफाज़त करेगा.. हर मुसीबत से सहीसलामत वापस लेके आयेगा.. तो ये तावीज आप अपनी बांये हाथ पे बांध लिजिए.. अल्लाह आपकी हिफाजत करेगा..”

मार्तंडला तावीज देण्यासाठी मेहरने हात पुढे केला. त्यावर मार्तंड शांतपणे म्हणाला,

“तुमी आनलंय नव्हं, मंग तुमीच बांदा की आमच्या दंडाव..”

मेहरला खूप आनंद झाला. तिने भक्तीभावाने डोळ्यांच्या पापण्या मिटून तावीज दोन्ही डोळ्यांना लावला. मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत मार्तंडच्या सलामतीसाठी दुवा मागितली आणि मार्तंडच्या डाव्या दंडावर तावीज बांधला. मार्तंडने दुसरा हात तावीजावर फिरवला. मेहरकडे पाहत हसून म्हणाला,

“तुमचा तुमच्या अल्लाहवर इस्वास हाय नव्हं.. आता ह्यो तावीजच आमची रक्षा करंल. जोवर ह्यो आमच्या दंडावर हाय तोवर आमाला काय बी व्हायचं नाय.”

भरलेल्या डोळ्यांनी स्मित करत मेहरने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. ती दोघं बराच वेळ बोलत बसले होते. मेहर त्याच्या सहवासातला प्रत्येक क्षण जपून ठेवत होती. आठवणींची अत्तरकुपी हृदयाच्या एका कप्यात सांभाळून ठेवत होती. मार्तंडचं निर्भीड पण तितकंच साधं स्वच्छ बोलणं, त्याची करारी नजर, त्याचं हसणं, त्याचं रुबाबदार रूप मेहर मनात साठवून घेत होती. मार्तंडचीही अवस्था फार वेगळी नव्हती. मेहरला विसरणं शक्य नव्हतं. मन तिच्याकडे ओढ घेत होतं. तिचं खट्याळ हसू, तिचे ते नशीले घारे डोळे, ओठांच्या नाजूक पाकळ्या, तिचं ते लोभसवाणं रूप त्याला मोहिनी घालत होतं. मेहरला सोडून जाण्याचा विचारही त्याला करवत नव्हता पण मार्तंडचा नाईलाज होता. माघारी जाणं गरजेचं होतं. कर्तव्यापुढे त्याच्यासाठी काहीच महत्वाचं नव्हतं. कितीतरी वेळ गप्पा रंगल्या होत्या. बोलणं संपत नव्हतं. कितीही बोललं तरी मन भरत नव्हतं. इतकं बोलूनही जे बोलायचं ते कोणीही बोलत नव्हतं. मनातली गोष्ट कोणाच्याच ओठांवर येत नव्हती. दोघांच्या मनात असलेलं प्रेम मनातच राहिलं. पहिलं कोण सांगणार? मेहरचं दिल इश्काचा इजहार करण्याचं धाडस करत नव्हतं. कदाचित तिच्या मनातलं प्रेम समजल्यावर मार्तंड कसा वागेल? तिचा स्वीकार करेल का? या अनामिक भीतीने ती घाबरली होती. मेहर बोलताना लाजत, अडखळत होती. दिल की बात जुबाँपे कशी आणावी ते तिला समजत नव्हतं. मनातली गोष्ट ओठांवर येता येता तशीच मनात राहिली. मेहर हिरमुसली. बराच वेळ झाला होता. ‘आता निघायला हवं’ असा विचार करून नाईलाजाने मेहर उठून उभी राहिली.

“हुज़ूर, बहुत देर हो गयी है.. कल सुबह आपको भी जल्दी निकलना है.. अभी आप आराम फरमायें.. आईये आपको आपकी कक्ष तक छोड़ आते हैं..”

असं म्हणत मेहर रंगमहालाच्या दिशेने वळली. काही पावलं चालते तोच मागून मार्तंडने आवाज दिला.

“कावेरी..”

त्या हाकेसरशी तिची पावलं जागीच थबकली. तिने मागे वळून पाहिलं.

“आमास्नी तुमची लई याद यिल..”

मार्तंड आपल्याही नकळत बोलून गेला.

“का?”

मेहरने कापऱ्या आवाजात प्रश्न केला.

“न्हाई ठावं.. आसं कदी कुनाला बोललो न्हाई म्या.. पर आज कायतरी येगळंच वाटाया लागलंया.. इतकं बोलल्यावर बी मन भरंना झालंय.. आसं वाटतं का ही रात संपायाच नगं.. म्हंजी न्हाई सांगटा यित काय हुतंय ते.. पन..”

मार्तंड कसंबसं बोलत होता. उभ्या आयुष्यात आज पहिल्यांदा हे सगळं तो अनुभवत होता. एकावेळी अंगावर धावून आलेल्या दहाबारा गनिमांनाही न घाबरणारा मार्तंड आज मात्र अगदी गलितगात्र झाल्यासारखा वाटत होता. त्याला घाम फुटला होता. आवंढा गिळून घशाला पडलेली कोरड शमवण्याचा प्रयत्न करू लागला.

“हुज़ूर..”

आपसूकच मेहरच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि त्याला काही कळायच्या आतच धावत येऊन ती मार्तंडच्या बाहुपाशात विसावली. मार्तंड मात्र विस्फारलेल्या नजरेने अवसान सांभाळायचा प्रयत्न करू लागला. आजवर कुण्याही स्त्रीला स्वतःच्या वाऱ्यालाही उभं न करणाऱ्या मार्तंडला आज मेहरची ही मिठी मात्र काही वेगळंच सांगत होती. तो काही बोलणार इतक्यात मिठी अजूनच घट्ट झाली. मार्तंडच्या भारदस्त छातीवर मेहरने डोकं ठेवलं. डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांनी त्याच्या छातीवर जणू जलाभिषेक केला होता. आता मात्र मार्तंडचा सगळा अभिनिवेश गळून पडला. एका गोड वेदनेने त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्याचे भारदस्त बाहु तिच्याभोवती गुंफले गेले. काही क्षण कोणीच काही बोलत नव्हतं. आता कुणालाच कोणत्याही कबुलीची गरज नव्हती. वाहणाऱ्या डोळ्यांत मनातलं गुपित उघड झालं होतं. दोघांमध्ये स्पर्शाची भाषा बोलत होती. आणि तिला भाषांतराची काही एक गरज उरली नव्हती. काही वेळाने भानावर आल्यावर मार्तंड तिच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत तिला गोंजारत म्हणाला,

“कावेरी.. जवा तुमी दरग्यात जाऊन आमच्यासाठी देवाला साकडं घालून ह्यो तावीज घिवून आल्या का न्हाई.. तवाच आमी ताडलं हुतं. तुमच्या मनानं आमाला आपलं मानलं. काळीज आमच्यासाठी धडधडत हुतं. त्याच वक्ताला मेहर मेली आन माजी कावेरी वापस आली. या वक्तापासून तू माजी कावेरी.. कावेरी, तू जिकलंस आमास्नी.. ह्यो दगडागत जीव पार इतळून गेला.. जीव जडलाय तुज्यावर..”

“हुज़ूर..”

आपली मिठी अजूनच घट्ट करत ती म्हणाली,

“न जाने कितनी मन्नतें मांगी हैं हमने इस पल के लिए.. और कितनी कोशिश की थी हमने.. ये बात जुबाँपे लाने की.. पर शर्म के मारे हम कुछ ना कह सके.. हुज़ूर.. हम आपसे बेइन्तेहा मोहब्बत करते हैं.. हम आपके सिवा जी नही सकते.. अब हमारा सब कुछ आपके लिये है.. आप ही हमारे खुदा हो..”

भरलेल्या डोळ्यांनी हुंदके देत मेहर बोलत होती. तिची ती लाडिक अदा पाहून मार्तंड अजूनच खुश झाला पण काहीतरी लक्षात आल्यासारखं तो बोलू लागला.

“पर कावेरी, आमच्या जीवाचा काय बी भरवसा नाय. जीव मुठीत घिवून फिरतुया.. कदी काय हुईल काय बी सांगता यायचं नाय. फार जोखमीचं हाय आमचं काम.. आमचं जगनं.. गनिम कवा डाव साधल काय बी सांगता येत नाय. तुजी समदी जिंदगी पडलीय. फुका आमच्यापाई वाया जायची नव्हं.. तू आमिरीत, आरामात, या आलिशान रंगमहालात राहिलेली.. ज्याचं तलवारी संगट लगीन लागलंय तेच्या संगट तुजा निभाव कसा लागल?”

मार्तंड अगदी मनापासून बोलत होता. सगळं ऐकल्यावर सारा धीर एकवटून मेहर बोलू लागली.

“नही हुज़ूर, अब आपही के नाम से हमारा जिना मरना.. जबतक साँस चलेगी आपसे ही जुडी रहेगी.. अब इस नाचीज पे सिर्फ आपका हक है.. आपकी ख़ुशी हमारी ज़िंदगी है.. हमें अपने से जुदा ना करें हुज़ूर.. हम जी नहीं पायेंगे..”

मेहरच्या शब्दांनी मार्तंड हळूहळू विरघळत चालला होता. त्याने अलगद तिचा चेहरा त्याच्या ओंजळीत घेतला. जणू आकाशीचा चाँद त्याच्या पुढ्यात स्थिरावला होता. चंद्रप्रकाशाने तिच्या चेहरा अजूनच उजळून निघाला होता. तिच्या माथ्यावर मार्तंडने अलगद आपले ओठ टेकवले. तिच्या कानाजवळ त्याच्या श्वासांची थरथर मेहरला स्पष्ट जाणवत होती. मेहरचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो हळूच तिच्या कानाजवळ येऊन कुजबुजला,

“कावेरी, माजी कारभारीन हुशील? गळ्यात माज्या नावाचं डोरलं बांधशील?”

त्या बोलण्याने मेहर मोहरली. लाजेची लाली साऱ्या चेहऱ्यावर पसरली. आपोआप लज्जेने मेहरचे डोळे बंद झाले अन् अश्रूंची अजून एक धार तिच्या गालावर ओघळून गेली. तिची खाली झुकलेली नजर पाहत मार्तंडने तिची हनुवटी हलकेच वर करून तिच्या डाळिंबी ओठांवर आपले ओठ टेकवले. मेहरला आपलं काळीज आता जणू बंद पडतंय की काय असं वाटून गेलं. मेहरच्या देहातून एक वीज वाहत गेली. सर्वांगावर शहारा फुलला. ती मोहरली. श्वासांची गाणी सुरू झाली. मार्तंडचा बाहुपाश अजूनच घट्ट झाला आणि मेहर त्याच्या त्या रांगड्या पण सच्च्या मिठीत विरघळून गेली. बराच वेळ दोन पाखरं फक्त मौनाची भाषा बोलत होती. एकमेकांच्या कुशीत भविष्याची स्वप्नं पाहण्यात गुंग झाली होती.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all