मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..भाग ३१ (अंतिम )

ही कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग ३१ (अंतिम भाग)

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग ३१ ( अंतिम भाग)

अफजलखानाच्या वधाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. या बातमीने शिवापट्टण गावात जणू आनंदोत्सव साजरी होत होता. दिवाळीच्या सणासारखा आनंद घरोघरी दिसत होता. घरोघरी गोडधोडाचे पदार्थ बनवणं सुरू होतं. प्रत्येक दारात रांगोळ्या सजत होत्या आणि अंगणात दिव्यांची आरास मांडणं सुरू होतं. शिवरायांनी खानाचा वध करून साऱ्या रयतेला सुखी केलं होतं. कावेरीला तिच्या वडिलांकडून ही बातमी समजली होती. मार्तंडचे, अवघ्या रयतेचे राजे सुखरूप आहेत हे समजल्यावर कावेरीला हायसं वाटलं. तिचे डोळे आपोआप मिटले गेले. मनातल्या मनात संवाद सुरू झाला. 

“धनी..तुमी बघतायसा ना? आपलं राजं सुखरूप हाईत. त्यास्नी काय बी झालं न्हाई. जो चिंता आपको खाये जा रही थी वो खत्म हो गयी| अफजल खान मारा गया| आपका, सावूका बलिदान व्यर्थ नही गया| हमारे खाविंद, शिवबाराजे मेहफुज है| ये खुशी का दिन देखनेके लिए आप यहाँ होते तो कितना अच्छा होता| क्यूँ चले गये हुजूर? इस भरी दुनियामे हमे इस तरह अकेला छोडकर क्यूँ हुजूर?”

कावेरीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. मार्तंडच्या आठवणीने ती व्याकुळ झाली होती. कावेरी विचारात गुंग असतानाच अचानक तिला भोवळ आली आणि ती जमिनीवर कोसळत असतानाच तिच्या आईने तिला सावरलं. तिचे बाबा धावतच बाहेर आले. शेजारच्या डेऱ्यातलं पाणी कावेरीच्या तोंडावर शिंपडलं तशी ती शुद्धीवर आली. तिच्यापुढं पाण्याचा तांब्या धरत ते म्हणाले. 

“काय झालं गं पोरी? बरं वाटत नाय काय? थांब वैद्यास्नी बोलीवतो. कशापाई भोवळ आली?“

तिचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारत होते.

“काई नाई वं.. काहिबाही, आंबटचिंबट खाल्लं आसल. थांबा वाईच तिला थंडगार ताक करून देती मंग बरं वाटल तिला.”

आईने उत्तर दिलं.

“नाय तरी बी आपुन वैद्यास्नी बोलवू.”

असं म्हणून ते लागलीच घराबाहेर पडले आणि वैद्याना घेऊन आले. त्यांनी कावेरीचा हात हातात घेतला. नाडीचे ठोके मोजले. कावेरीला काही प्रश्न विचारले. गालातल्या गालात हसत ‘कावेरी आई होणार’ असल्याची गोड बातमी सांगितली. कावेरीला तब्बेतीची काळजी घेण्यास सांगून ते निघून गेले. कावेरीला दिवस गेले होते. कावेरीचे आई वडील चिंतेत पडले.

“तरनीताठी पोर, इवल्याश्या जीवाला घिवून कशी जगंल? आपल्या माघारी समदा जनम कसं काढील?”

वैद्याच्या तोंडून ती बातमी ऐकून आईला चिंतेने ग्रासले होते. काय करावं उमजत नव्हतं. कावेरीच्या डोळ्यात मात्र पाणी तरळलं. मार्तंडचा अंश तिच्या उदरात अंकुरत होता. आताशी कुठेतरी तिच्या आयुष्यात इवलासा आनंदाचा झरा दिसला होता. ती काहीशी सुखावली होती.

‘म्या या जीवाला वाढीवणार.. मेरे हुजूर की छबी उसमे दिखेगी.. उसेभी मै मेरे हुजूर की तरह शूर सिपाही बनाऊंगी| वो भी सवराज्य के लिए लडेगा| अपने पिताकी तरह शूरवीर कहलायेगा|’

कावेरीने मनाशी पक्का निर्धार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी अंगणात बसली होती. समोरून मावळ्यांच्या सैनिकांची एक तुकडी तिच्या घराच्या दिशेने घोड्यावरून येताना दिसली. सैनिकांच्या मागून भगवा ध्वज फडकवत शिपायांसमवेत खांद्यावर पालखी घेऊन भोई येत होते. सारेजण तिच्या घरासमोर येऊन थांबले. कावेरीच्या नावाची चौकशी करत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“माँसाहेबांचा सांगवा हाय. तुमास्नी राजगडावर बोलवलं हाये.”

माँसाहेबांनी बोलवलं आहे म्हटल्यावर कावेरी आपल्या आईवडिलांना घेऊन शिपायांसोबत निघाली. साक्षात शिवरायांसारख्या शूरवीर पराक्रमी, रयतेच्या राजाच्या जन्मदात्री पाहण्याचा योग आला होता. जिजाऊंना डोळे भरून पाहण्याची तिची इच्छा आज पूर्ण होणार होती. मजल दरमजल करत कावेरी आपल्या आई वडिलांसोबत राजगडावर आली. लाल पांगाराच्या फुलांच्या गर्दीत, आम्रवृक्षानी वेढलेला, उगवतीच्या माळावर राजांचा चारचौकी वाडा उभा होता. वाड्याला वेढलेली चिरेबंदी कूस डौलदार कमानीने नजरेत भरत होती.

कावेरीने राजगडाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. राजगडाचं ते भव्यदिव्य रूप ती भान हरपून पाहत होती. जवळपासच्या गावातली बरीच लोकं राजगडावर जमली होती. जिजाऊंनी खानासोबतच्या लढाईत ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती त्यांच्या कुटुंबियांना राजगडावर बोलावलं होतं. ज्यांनी लढाईत विशेष कामगिरी केली होती. त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. हळूहळू दरबारातली इतर मातब्बर मंडळी जमू लागली. इतक्यात जिजाऊं सदरेवर येत आहेत अशी घोषणा झाली. सर्वांच्या नजरा त्या दिशेने वळल्या.

‘किती तेजस्वी ते रूप!’ निडर चाल, करारी डोळे, देहबोलीतून क्षणाक्षणाला जाणवणारा प्रचंड आत्मविश्वास, हिरव्या रंगाची पैठणी त्यांच्या अंगावर खुलून दिसत होती. नाकात नथ, भाळी चंद्रकोर, दंडावर बाजूबंद, हातात हिरवा चुडा त्यात मधोमध असलेल्या सोन्याच्या पाटल्या, गळ्यात शोभून दिसणारा चंद्रहार त्यांच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होता. त्यांनी त्यांच्या अंगावर भगव्या रंगाची शाल लपेटली होती. जिजामाता आपल्या स्थानावर येऊन विराजमान झाल्या. कावेरी त्यांच्याकडे पाहतच राहिली. जिजाऊंनी बोलायला सुरुवात केली.

“माझ्या बंधु भगिनींनो आणि माझ्या लेकीनो.. तुम्हां सर्वांस इथे खास कारणासाठी बोलवण्यात आलं आहे. आपणास माहित असेलच की, आपल्या शिवबा राजांनी ‘हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ असे मानून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन एक मोठं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता राजे आणि आपले मावळे अहोरात्र झटत आहेत. अफजलखानाचा वध करून स्वराज्यावरचं एक संकट टळलं खरं पण अजून बरीच संकटं दबा धरून बसली आहेत आणि आपणा सर्वांना मिळून त्या संकटाशी सामना करायचा आहे. मोगलाई सत्तेचा समूळ नायनाट करून चारी दिशांना हिंदवी स्वराज्याचा डंका वाजला पाहिजे हे राजांचं स्वप्न आहे पण स्वराज्य प्रस्थापित करण्याचे हे महान कार्य कोण्या एकट्याचे असू शकत नाही. ते आपल्या सर्वांचे आहे. हिंदवी स्वराज्यातली प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. इथे कोणी लहानथोर नाही. कोणी राजारंक नाही सारेच एकसमान. इथे रयतच सर्वेसर्वा आणि त्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्याच्या रक्षणार्थ आपले रक्त सांडणाऱ्या आमच्या सर्व मुलांचे आम्ही त्यांच्या जिजाऊ, कायम ऋणी आहोत.”

जिजाऊंच्या बोलण्याने सारे भारावून गेले होते. किंचित थांबून दीर्घ श्वास घेत त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. त्यांचा गळा भरून आला होता.

“माझ्या आयाभनीनो, जिजाऊच्या लेकीनो, खूप मोठ्या धीराच्या तुम्ही.. स्वराज्यासाठी तुम्ही आपल्या पोटच्या पोरांची, धन्याची आहुती दिलीत. अफजलखानाचा वध करून राजांनी विजय मिळवला खरा पण यात तुम्हा सर्वांचं योगदान खूप मोलाचं आहे. आपल्या सैनिकांचं बलिदान वाया गेलं नाही तर राजांनी विजयश्री खेचून आणली. हे हिंदवी स्वराज्य कायम तुमच्या ऋणात.. याची कधीच उतराई होऊ शकत नाही पण तरीदेखील फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुम्हा सर्वांस सन्मानित करत आहोत. तुम्ही सर्वजण आमची जबाबदारी आहात. पोटच्या लेकराप्रमाणे आम्ही तुम्हावर माया करतो. त्यामुळं तुमच्या शहीद मुलांचं राहिलेलं कर्तव्य तुमचा दुसरा मुलगा, बंधू शिवबा पार पाडील. तुमच्या पालनपोषणासाठी संपूर्ण जबाबदारी राजांची असेल. त्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यातून दरम्हा काही ठराविक रक्कम देण्याची तजवीज करण्यात येईल.”

जिजाऊंनी आपलं बोलणं थांबवलं. सर्वजण सद्गदित झाले. सर्वांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. माँसाहेबांच्या बोलण्याने कुणीतरी मायेनं पाठीवरून हात फिरवावा आणि ‘आम्ही आहोत तुमच्यासंगट’ हा आत्मविश्वास, एक आधार देत आहेत असंच प्रत्येकाला वाटत होतं. जिजाऊंनी नजरेनेच सरदारांना इशारा केला. यादीप्रमाणे नाव पुकारून सन्मान करण्यात येत होता. बायकांना साडी खणनारळ देऊन आदरतिथ्य करण्यात येत होतं. पुरुष मंडळींना वस्त्र आणि काही मोहरा देण्यात येत होत्या. मार्तंडच्या आईचं नाव पुकारण्यात आलं. कावेरीचे डोळे त्यांचा शोध घेत होते. मार्तंडची आई समोर आली. माँसाहेबांनी त्यांना साडीचोळी देऊन सन्मान केला. आपल्या धन्याला आणि पोटच्या दोन्ही मुलांना गमावलेल्या एका निराधार स्त्रीला पाहून जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. 

“धन्य आहेस तू माऊली.. तुझ्या बलिदानाची कशासही तोड नाही. तुझा एकलूता एक मुलगा, सोन्यासारखी लेक गमावूनही तू धीरानं उभी आहेस.. सलाम तुझ्या हिंमतीला.. आज सावित्री आणि मार्तंड आपल्यात नाही..”

“नाही माँसाहेब, मार्तंड कुठं बी गेलेला न्हाई. त्यो हिथंच हाय..”

त्या आवाजासरशी सर्वांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. कावेरीच्या डोळ्यात पाणी होतं पण तरीही तिचा आत्मविश्वास स्पष्टपणे झळकत होता.

“कोण आहेस तू पोरी?”

जिजाऊंनी प्रश्न केला.

“म्या कावेरी, मार्तंडची, माज्या धन्याची कारभारीन.”

जिजाऊंच्या पुढ्यात यादी पहात असलेल्या सरदाराने कावेरीचं नाव यादीत तपासलं आणि त्याने तसं जिजाऊंना सांगितलं. कावेरीला पुढं बोलवण्यात आलं. कावेरी आपल्या आईवडीलांसमवेत पुढे आली. मार्तंडची आई आणि कावेरी आता समोरासमोर उभ्या होत्या. मार्तंडच्या आईने साशंक नजरेने तिच्याकडे पाहिलं.

“कोन हाईस बाय तू? माज्या लेकाचं लगीन झालं नव्हतं बाय. आन त्याने कवा लगीन केलं? कश्यावरनं तू त्याची कारभारीन?”

मार्तंडच्या आईने प्रश्न केला. जिजाऊंनीही कावेरीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. विश्वासरावांनी दिलेल्या यादीत मार्तंडच्या कुटुंबियांच्या नावात कावेरीचा स्पष्ट उल्लेख होता पण हिच मार्तंडची कावेरी कशावरून? हा प्रश्न पडला. सर्वांच्या साशंक नजरा पाहून कावेरीने तिच्याकडे असलेलं मार्तंडच्या गळ्यात त्याच्या वडिलांनी मार्तंडच्या लहानपणी बांधलेला त्यांच्या कुलदेवतेची प्रतिमा असलेला काळ्या दोऱ्यातला तावीज जिजाऊंच्या समोर धरला. ते तावीज पाहताच मार्तंडची आई पटकन पुढे आली. तिच्या हातातून तो तावीज घेतला. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.

“व्हय जी.. ह्ये माज्या मार्तंडचं तावीज हाय. मार्तंडा..”

मार्तंडची आई धाय मोकलून रडू लागली. मग कावेरीने विजापूर पासून ते दख्खनपर्यंतचा सारा प्रवास, तिची आणि मार्तंडची विजापूरमधली भेट, खानानं सावित्री आणि मार्तंडची केलेली अटक, त्याच्या तावडीतून सुटताना सावित्रीने मार्तंडच्या कुशीत घेतलेला अंतिम श्वास, देवीच्या मंदिरात त्या दोघांचं झालेलं लग्न, सैनिकांच्या हातावर तुरी देऊन निसटून जाताना त्यांच्या हाती लागलेला मार्तंड आणि शिरवळपर्यंतचा तिचा खडतर प्रवास, घडलेला सारा वृत्तांत त्यांना सांगितला. सर्वजण थक्क होऊन तिचा चित्तथरारक प्रवास ऐकत होते. मार्तंड आणि तिच्या धाडसाचं सर्वांनाच कौतुक वाटत होतं. 

कावेरीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. मार्तंडच्या आईने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. तिला जवळ येत डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, 

“व्हय पोरी, तूच माजी सून हाईस गं.”

“आईई..”

कावेरीच्या मुखातून शब्द बाहेर पडले. मार्तंडच्या आईला घट्ट मिठी मारत ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. सर्वजण स्तब्ध होऊन समोरचं दृश्य पाहत होते. साऱ्यांनाच गलबलून आलं. थोडा वेळ त्यांना शांत होऊ देत जिजाऊंनी कावेरीकडे पाहून बोलायला सुरुवात केली.

“पोरी, तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तितकं थोडंच. जिजाऊंची लेक शोभतेस. तुझ्यासारख्या लेकी या हिंदवी स्वराज्यात आहेत म्हणूनचं आपले शिवबाराजे हे अवजड शिवधनुष्य पेलत आहेत. आम्हाला तुमचा खूप आभिमान वाटतोय. कावेरी, तूझ्या धन्याच्या, मार्तंडच्या जाण्याची उणीव भरून निघणं कठीण आहे पण..”

“माँसाहेब माजं धनी हिथंच हाईत. त्येंचा अंश माज्या पोटात वाढतोय. देशाच्या, आपल्या राजाच्या रक्षणासाठी एक मार्तंड कामी आला पर त्यो आमाला सोडून न्हाई गेला. त्यो जिता हाय त्येच्या अंशाच्या रूपानं. त्यो पुन्यांदा ईल महाराजांसाठी.. सवराज्यासाठी..”

कावेरीचा गळा भरून आला. तिच्याही नकळत तिने तिचा हात तिच्या पोटावर ठेवला. आता कोणत्याच शब्दांची गरज नव्हती. अश्रुंची भाषा बोलत होती. जिजाऊंनी सर्वांचा सन्मान केला. कावेरी आणि तिच्या घरच्यांना आपल्या सैनिकांकरवी मोठ्या सन्मानाने त्यांच्या घरी पाठवणी केली. कावेरीने आपल्या सासूसोबत म्हणजेच मार्तंडच्या आईसोबत कायमचं राहण्याचा निर्णय घेतला. आता दोघीच एकमेकींना आधार होत्या. कावेरीने आपल्या आईवडिलांचा निरोप घेतला आणि मार्तंडच्या आईसोबत ती पालखीत बसून पन्हाळाच्या दिशेने आपल्या सासरी निघाली. मार्तंडच्या आठवणीने डोळे बरसत होते.

पालखीचा पडदा दूर सारून तिने आकाशात पाहिलं.. दुरवर मावळतीचे रंग पसरले होते आणि आकाशात दुरून मार्तंड स्मितहास्य करत प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. तो आता कायम तिच्यासोबत तिची सावली बनून राहणार होता. सावली बनून तिचं रक्षण करणार होता.. 

समाप्त..
© निशा थोरे (अनुप्रिया)

नमस्कार मित्रामैत्रिणींनो,

“मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. या कथेचा आजचा शेवटचा भाग लिहताना फारच गलबलून आलं. कथा लिहत असताना लेखकही त्या कथेत इतका समरस होऊन जातो की तोही त्या कथेचा एक भाग होतो. तो ती कथा जगत असतो असाच काहीसा अनुभव ‘मार्तंड’ लिहताना आला. खरंतर ऐतिहासिक कथा लिहण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. तरीही माझ्या वाचकांनी या कथेवर भरभरून प्रेम केलं. प्रतिसाद देऊन मला आशीर्वाद दिला. मी खरंच त्या सर्वांची खूप ऋणी आहे. ही कथा लिहताना माझ्या काही चुका झाल्या असतील तर तुम्ही वाचक मायबाप सांभाळून घ्याल. मोठ्या मनानं माफ कराल अशी आशा बाळगते. शत्रूच्या गोटात सापडलेल्या मार्तंडचं पुढे काय झालं? तो मृत्यूमुखी पडला असेल की तो वाचला असेल? अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं घेऊन मी लवकरच आपल्या भेटीला ‘मार्तंड पर्व दुसरे’ घेऊन येईन तोपर्यंत रजा द्यावी.. तुम्हा सर्वांना आपली शब्दसखी निशा थोरे (अनुप्रिया) हिचा मनाचा मुजरा..

लोभ असावा
आपली शब्दसखी,
©निशा थोरे (अनुप्रिया)..🎭 Series Post

View all