मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग ३०

ही कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग ३०

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग ३०

आणि अखेरीस शिवरायांचा विजय झाला. सत्याचा विजय झाला. अफजलखानाचा वध झाला. महाराजांनी खानाचा वध करून स्वराज्यावर आलेलं खूप मोठे संकट परतवून लावलं होतं. बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. राजगडावर आनंदाचं, उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं. मोहीम फत्ते करून शिवाजी महाराज राजगडावर परतले. त्यांच्या आधी पोहचलेले जिवा आणि संभाजी कावजी यांनी जिजाऊंच्या कानी आधीच सारा वृत्तांत सांगितला होता. आपला मुलगा सुखरूप आहे हे ऐकून एका आईचं काळीज सुखावलं होतं. त्यांची चिंता मिटली होती. जिजामाता आपल्या सुनांसह महालाच्या प्रवेशद्वारापाशी थांबल्या होत्या. पायरीवर गरम पाण्याचा उदक ठेवण्यात आला होता. शिवराय पायऱ्या चढून वर आले जिजाऊंनी राजे महालाच्या दारात येताच त्यांचं औक्षण केलं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. त्यांनी वाकून जिजाऊंना नमस्कार केला. मशालींच्या उजेडात उजळून निघालेला शिवरायांचा चेहरा पाहून त्यांच्या आनंदाला सीमा उरली नव्हती.

“शिवबा..”

त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. वाकून नमस्कार करणाऱ्या शिवरायांच्या खांद्याना धरून वर उचलून छातीशी घट्ट पकडत जिजाऊ सद्गदित होऊन म्हणाल्या.

“कधी एकदा तुम्हाला डोळे भरून पाहीन असं झालं होतं राजे..”

“आई जगदंबेच्या कृपेनें आणि आपल्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप आलो आहोत माँसाहेब.. काळजी करण्याचं काहीच कारण नाही.”

शिवाजीराजे हसून म्हणाले.

“आपणास लागले नाही नां? कपटी खानाच्या नुसत्या विचाराने आमच्या जीवाचा थरकाप होत होता. एका माऊलीच्या काळजाची तुम्ही कधी पर्वा केलीत? तुम्ही गेलात मोहिमेवर पण आमचा जीव टांगणीला लागला होता. मनात भलते सलते विचार येत होते पण राजे, तुम्ही मात्र त्या कपटी खानाचा खात्मा करून आलात. आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो आहे. बरं ते जाऊ दे.. आधी तुम्ही माता जगदंबेचं दर्शन घ्या. तिचे आशीर्वाद घ्या. मग आपण बोलू सावचित्ताने..”

त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या. शिवरायांनी मान डोलावली. आत येऊन त्यांनी समईची वात प्रज्वलीत केली. भक्तीभावाने हात जोडून देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर ते जिजाऊंसोबत बाहेर सदरेवर आले. राजे येताच जिवाने त्यांना लवून मुजरा केला. विश्वासराव, येसाजी कंक, संभाजी कावजी असे बरेच मातब्बर सरदार हजर होते. सर्वांनी आनंदाने शिवरायांचं स्वागत केलं. शिवराय स्थानापन्न झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अफजल खानाच्या वधानं स्वराज्यावरचं खूप मोठं संकट दूर झालं होतं. सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. शिवरायांनी सर्वांची आपुलकीने चौकशी केली. राजगडावर सर्व कुशल मंगल आहे हे ऐकून शिवरायांना हायसं वाटलं. महाराजांसोबत असलेला जिवा बोलू लागला. रात्रीचा तिसरा प्रहर उलटून गेला तरी कोणालाही झोप येत नव्हती. जिवाच्या तोंडून शिवरायांचा प्रताप जिजाऊं आणि सर्वजण थक्क होऊन ऐकत होते. त्याचं सांगून झाल्यावर शिवबा राजे उठून उभे राहत हसून म्हणाले.

“माँसाहेब, तुम्हांला ठाऊक आहे? सारे काय म्हणताहेत?”

“काय राजे?”

जिजाऊंनी विचारलं.

“होता जिवा म्हणून वाचला शिवा.. आणि ते अगदी रास्त आहे. जिवा होता म्हणूनच आम्ही बचावलो नाहीतर सय्यद बंडाच्या पट्टयानं नक्कीच आमचा प्राण घेतला असता. जिवा, आता तुम्ही नौबतीचे मानकरी आहात. भररात्री तुमच्यासाठी दार उघडले जाते, नौबत झडते. हे काय थोडं आहे?”

महाराज मिश्किलपणे म्हणाले तसा जिवा संकोचला. हास्याचे कारंजे उडाले. त्याच्याकडे पाहून साऱ्यांनी हसून जीवाचं अभिनंदन केलं. इतक्यात जिजाऊ म्हणाल्या.

“चला शिवबा.. पहाट होत आली. थोडा विश्राम करा.”

“नाही माँसाहेब, विश्रांती करून कसं चालेल? जेंव्हा यश चालून येतं तेंव्हा उसंत घेऊन चालत नाही. आता अफजलखानाच्या वधानं आदिलशहा पेटून उठेल. स्वराज्यावर हल्ला करेल म्हणून आपणच सावध रहायला पाहिजे. म्हणूनच पन्हाळगडाची मोहीम आखूनच आम्ही तुमच्या भेटीला इथे आलो.आता आम्हाला निघायला हवं.”

शिवरायांनी जिजाऊंकडे पाहिलं. त्यांचे डोळे पाण्यानं गच्च भरले होते. थरथरत्या स्वरात त्या म्हणाल्या.,

“राजे.. इतक्या तातडीनं लगेच दुसरी मोहीम?”

“होय माँसाहेब, गनिमाने चवताळून पाऊल उचलण्याआधी आपण आपला मुलुख आपल्या ताब्यात घेतला पाहिजे. आम्हाला निघावंच लागेल.”

शिवराय निर्धाराने म्हणाले.

“मग तोपर्यंत आम्ही काय करावे? जगदंबेसमोर सदैव घोर करत बसावे? उपासतपास करावे हेच ना..”

जिजाऊंचा गळा भरून आला. त्यांचा हात हातात घेत शिवराय म्हणाले,

“नाही माँसाहेब, तुम्हांस इतका आता वेळ कुठे आहे? खानाच्या छावणीत मिळालेली दौलत, दारुगोळा घेऊन आपले सरदार येतील. त्यांची तुम्हास नीट व्यवस्था करायची आहे. आपल्या बारा गडांवर दारुगोळा, तोफा चढवा. आपले बारा गड मातब्बर बनवा. खानाच्या लढाईत जे कामी आले. त्या वीरांच्या कुटुंबियांना मायेचा हात द्या. जातीनं त्यांची व्यवस्था पहा. शिवाजी राजे पराक्रमी असतील पण त्यांच्या मावळ्यांखेरीज हे निव्वळ अशक्य. म्हणूनच त्यांच्या पाठीवर तुमचा मायेचा हात असू दया. हा मायेचा हात कायम त्यांच्या सोबत असेल ही भावनाही त्यांना उभारी देईल. माँसाहेब, आता आम्हाला निघायला हवं.”

असं म्हणत शिवरायांनी जिजाऊंना वाकून नमस्कार केला. त्यांनी शिवरायांच्या हातावर दही साखर ठेवली. महाराजांनी दही साखर प्राशन केलं आणि त्यांनी जिजाऊंचा निरोप घेतला.

शिवरायांनी जराही उसंत न घेता पन्हाळगडाची मोहीम आखली होती आणि ते त्या कामगिरीवर निघून गेले. आता मोघल सत्तेत ‘शिवाजी भोसले’ या नावाची दहशत निर्माण झाली आणि तोच दरारा कायम टिकून राहावा म्हणून शिवाजीराजांनी पन्हाळगडाच्या दिशेने घोडदौड सुरू केली. शिवराय गडउतार झाले. जाण्याआधी त्यांच्यासोबत गेलेल्या विश्वासरावांनी खानाच्या लढाईत कामी आलेल्या त्यांच्या तुकडीतील वीरांची यादी जिजाऊंच्या हाती सोपवली आणि ते राजांसोबत मोहिमेवर निघून गेले. जिजाऊंनी शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. बारा गडांवर तोफा, दारुगोळा चढवण्यात आला. सैनिक, किल्लेदार नेमण्यात आले. गडांची व्यवस्था पाहण्याचं काम सुरू झालं. दुसरीकडे सैनिकांकरवी जिजाऊंनी लढाईत कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना राजगडावर बोलावणं धाडलं. प्रत्येक कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यायची होती. जिजाऊंच्या हुकुमावरून सैनिकांकरवी त्यांच्या घरी निरोप धाडण्यात आला. मानानं त्यांना घेऊन येण्यात आलं.

विश्वासरावांच्या यादीत मार्तंडच्या कुटुंबाचंही नाव होतं. मार्तंडच्या घरी, सुर्वेवाडीला पालखी पाठवण्यात आली त्याचबरोबर कावेरीच्या घरीही  तिला घेऊन येण्यासाठी पालखी सज्ज करण्यात आली. घोडेस्वारांची एक तुकडी आणि खांद्यावर पालखी घेऊन निघालेले भोई मार्तंडच्या अंगणात दारासमोर येऊन थांबले. मार्तंडच्या दारात महाराजांची माणसं आणि महाराजांनी धाडलेली पालखी पाहून आजूबाजूचे गावकरी त्यांच्या अंगणात जमा होऊ लागले होते. सारे गावकरी कौतुकानं मार्तंडच्या आईकडं पाहत होते.

“कुनी हाय का जी? मार्तंड सुर्वेचं घर हाय नव्हं का हे?”

मार्तंडची आई बाहेर आली. फिकट रंगाचं लुगडं नेसलेली, डोईवर कापड गुंडाळलेली, पांढरं फटफटीत कपाळ घेऊन ती समोर आली. तिला पाहून तिथल्या परिस्थितीचा त्यांना अंदाज यायला वेळ लागला नाही. मोठ्या आदराने त्यातल्या एकाने बोलायला सुरुवात केली.

“मावशे, आमी शिवबा राजेंचे मावळे.. मार्तंड आमच्या संगटच..”

शिवबा राजांचं आणि मार्तंडचं नाव ऐकताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली त्याचं बोलणं अर्धवट तोडत मार्तंडची आई म्हणाली,

“आरं मंग आत या की.. आसं भाईर का उभं?”

तिनं त्यांना आत यायला सांगितलं आणि ती बाहेरच्या दिशेने पाहू लागली. तिचे डोळे मार्तंड आणि सावित्रीचा वेध घेत होते पण त्यांना न पाहून ती निराश झाली. तिनं घाईघाईनं विचारलं.

“माजा मार्तंड कुठं दिसत न्हाई.. दुसऱ्या कामगिरीवर गेलाय का आपल्या राजासंगट?”

तिचा प्रश्न ऐकून मावळ्यांना गलबलून आलं. मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी मार्तंड आणि सावित्रीच्या बलिदानाची खबर सांगितली. ती बातमी ऐकताच मार्तंडच्या आईला भोवळ आली. ती खाली कोसळणार इतक्यात तिथे जमलेल्या पैकी एका स्त्रीने तिला पकडलं. तिला सावरू लागली. मार्तंडच्या आईने एका गगनभेदी टाहो फोडला. ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते.

“मार्तंडा.. माजं लेकरू.. धनी.. तुमच्या माघारी तेवढाच येक आधार हुता. तुमी गेलासा आन त्यो बी मला सोडून गेला. तरनीताठी ल्येक बी सोडून गेली. कसं जगू धनी..”

मार्तंडची आई विलाप करू लागली. आजूबाजूच्या आयाभनी गोळा झाल्या. मार्तंडच्या आईचं सांत्वन करू लागल्या. इतक्यात एक वृद्ध व्यक्ती समोर आली.

“कश्यापाई रडती बाय? तुजी पोरं सवराज्याच्या कामी आली. राजाचं, सवराज्याचं रक्षण करण्यापाई त्यांनी आपल्या जीवाची बी पर्वा केली न्हाय. तू एका वीराची माय हाईस.. तुला ह्ये शोभत न्हाई. पूस डोळं.. कशापाई टिपं गाळतीस? समद्या गावाला मार्तंड आन सावूचा लई आभिमान वाटतूय.. लई नशीबवान हाईस बाय तू.. अशा थोर वीर पोरांची माय झालीस तू.”

त्याच्या बोलणं ऐकून मार्तंडच्या आईनं आपल्या पदरानं
डोळे पुसले. मार्तंड आणि सावित्रीने राजाच्या, देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या मुलांना वीरमरण प्राप्त झालं. अशी तिनं मनाची समजूत काढली. चेहऱ्यावर हलकेच समाधान झळकलं. मार्तंडची आई शांत होताच शिपायांनी तिला जिजाऊंचा निरोप सांगितला. मोठ्या सन्मानानं पालखीत बसवून महालात आणायला सांगितलं होतं. जिजाऊंच्या हुकामाचं पालन करण्यात आलं.


पुढे काय होईल? पाहूया पुढच्या भागात..


क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all