मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २

ही कथा एका शूरवीर मावळ्याची.. स्वराज्याच्या रक्षणार्थ जीवाची पर्वा न करणाऱ्या मार्तंडची..


मार्तंड.. एक अनोखी प्रेम कथा..

भाग २


शहजादी त्याच्या तरण्याबांड रूपाकडे पाहतच राहिली. साधारण बावीस तेवीस वर्षाचा. सावळा रंग, ओठांवर भरदार काळ्याभोर मिशीचे कंगोल, कानाच्या पाळ्यापर्यंत उतरलेले कानकल्ले, मजबूत भारदस्त बांधा, पिळदार शरीरयष्टी, काळेभोर डोळे, तो अगदी दणकट, राकट दिसत होता. कमरेला आवळलेला, पिंढऱ्यावर दाटणारा चुणीदार मांडचोळणा, छातीवर बंद आवळलेली, हाताच्यावर भुजापर्यंत सरकवलेली बाराबंदी, डोक्याला कंगणी, डोक्यावर लालरंगाची पगडी, कमरेभोवती फिरलेला आणि बगलेला गाठ दिलेला पांढऱ्या रंगाचा शेला, डोक्याच्या पगडीवरून कानशीलं झाकीत हनुवटीखाली गाठ दिलेला पगडपोस, मनगटावर जाड चांदीचं कडं आणि काळ्या रंगाचा गोफ, पायी जाड तळाच्या मावळी पायताण, पाठीवर बांधलेली भरघेराची काळीशार ढाल, हातात तळपती तलवार, त्याचं मोहनी घालणारं रुपडं आणि त्यात त्याचा राकट पेहराव.. पाहता क्षणी शहजादी त्याच्या रुपाला भुलली. तो तरणाबांड गडी घोड्यावरून खाली उतरून तिच्या जवळ चालत येऊ लागला. त्याने त्याची तलवार म्यान केली. हळूहळू दरोडेखोरांना घाबरून एका झाडाच्या आडोशाला लपून उभ्या असलेल्या तिच्या सहेली धावत तिच्या जवळ आल्या.

“शहजादी सब खैरियत तो है?कही चोंट तो नही आयी आपको? अल्लाह का शुक्र है की आप ठीक हो|”

त्या शहजादीला विचारू लागल्या. तिने मान डोलावली आणि ती सुखरूप असल्याचं त्यांना सांगितलं. त्या युवकांकडे पाहत शहजादी म्हणाली,

“कौन हो आप खुदा के नेक बंदे? हम आपके बहुत शुक्रगुजार है आपने हमारी रक्षा की| ये एहसान हम जिंदगीभर नही भुलेंगे| कौन हो आप?”


“मार्तंड.. नाव हाय माज.. इथं जंगलात काय करतायसा तुमी? गनिम कदी डाव साधल काय बी सांगता यायचं न्हाई. सांच्याला बायमानसानं आपल्या घरात ऱ्हावं. काळ येळ काय सांगून येती व्हय?”

खाली पडलेला ऐवज उचलून तिच्या हातात देत म्हणाला. त्याच्या आवाजात एक विशेष जरब होती. शहजादीने त्याला घडलेला सारा वृत्तांत सांगितला. ते ऐकून मार्तंडने तिला म्हणाला,

“बाकीचे शिपाई कुठं हाईत? चला म्या तुमास्नी सोडतो तिथवर.”

तिला जागेवरून उठवण्यासाठी त्याने आपला हात पुढे केला. शहजादी त्याच्या मदतीने जागेवरून उठली आणि मार्तंडला मार्ग दाखवत पुढे चालू लागली. मार्तंड एका हातात त्याच्या आवडत्या अबलक घोड्याचा लगाम पकडून चालू लागला. शहजादीच्या मैत्रिणी तिच्या सोबत दुरवर उभे असलेल्या सैन्याच्या दिशेने चालत होत्या. चालता चालता शहजादी त्याच्याकडे चोरून पाहत होती. त्याच्या बोलण्यावर, रुबाबदार चालण्यावर ती फिदा झाली होती पण मार्तंडचं मात्र तिच्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. तो फक्त शहजादी दाखवत असलेल्या रस्त्यानं पुढे पुढे जात होता. तिने विचारलेल्या प्रश्नांना तिच्याकडे न पाहताच उत्तर देत होता. ती तिच्या जहाँपना अली आदिलशाहचं, तिच्या गगन महलाचं, राज घराण्याचं, बडी बेगमचं कौतुक करत होती. तिचं बोलणं ऐकताना मार्तंडच्या लक्षात आलं की, ती आदिलशाही सल्तनतची शहजादी आहे. तो शांतपणे तिचं बोलणं ऐकत चालत होता. इतक्यात तिला दुरवर उभं असलेलं सैन्य दिसलं.

“वो देखिये हमारे सिपाही”

त्या दिशेने बोट दाखवत शहजादी आनंदाने ओरडली. हळूहळू मार्तंड शहजादी आणि तिच्या मैत्रिणींसमवेत सैन्याजवळ आला. शहजादी आणि तिच्या मैत्रिणींना सुखरूप पोहचवून परतीला निघाला. घोड्याला टाच मारून तो त्यावर स्वार झाला. इतक्यात त्याला थांबावत शहजादी म्हणाली.,

“रुक जाये मार्तंड.. आप हमारे साथ हमारे गगन महल चलिये| आपकी बहादुरी पर हमारे आदिलशहा आपको उपहारोसे नवाजेंगे| इनाम देंगे| हिरे जवाहरात देंगे| हम आपसे गुजारिश करते है की आप हमारे साथ आये|”

“आमी कंच्या बी धनाच्या मोहापायी तुमास्नी मदत न्हाई केली. आयाभनींची लाज राखणं आमचा धरम हाय. त्यांच्या पदराला कुनी बी हात लावला तर त्यो हात कोपरापास्न उपटून टाकू आमी. आन हाय त्या महादेवाची..”

तो गरजला. शहजादी त्याच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाली.

“हम ये बात जान चुके है की आपके दिलमे धन का कोई भी लालच नही है| आप जैसे सुरमाँ है इसी वजहसे तो हम औरते मेहफुज है| बहुत शुक्रिया आपका| फिर भी हमारी ख्वाईश है की आप हमारे साथ चले|”

ती त्याला आर्जवे करत होती. मार्तंडने थोडा विचार केला आणि तो तिच्या सोबत यायला तयार झाला. शहजादी खुश झाली आणि मग तिच्या मेणात जाऊन बसली. मजल दरमजल करत तो त्या सरदारांसोबत गगन महालात पोहचला. महालाचं भव्य दिव्य रूप पाहून तो थक्क झाला. अचंबित नजरेने तो महल न्याहाळत होता. अगदी नावाप्रमाणेच गगन महल आकाशासारखा भव्य होता. दोन मजल्यांचा महाल अतिशय सुरेख कोरीव नक्षीकाम केलेला. तीन शानदार कमानी होत्या. सर्वात मधली कमान त्या सर्वात अरुंद होती. खाली तळमजल्यावर दरबार होता आणि वरच्या मजल्यावर राजकीय परिवारातल्या स्त्रियांचा राहण्याचा कक्ष होता. महालाच्या खांबांवर सुंदर कोरीव काम केलं होतं. महालाच्या भिंतीवर आधीच्या राजांची, आदिलशाही घराण्यातल्या राजपुरुषांची चित्रे लावली होती. मृत शहाचा मोठा मुलगा अली नवा बादशहा झाला होता. महलाच्या मधोमध असलेल्या सिंहासनावर तो बसला होता आणि त्याच्या शेजारी त्याची आई बडी बेगम बसली होती. अन त्याच्या उजव्या बाजूला आसनावर त्याचा वजीर बसला होता. शहजादी आणि काही राजघराण्यातल्या स्त्रियां ज्यांना दरबारात हजर राहण्याची परवानगी होती त्या साऱ्या वरच्या मजल्यावर तलम रेशमी पडद्याआड बसल्या होत्या. शहजादी दुरूनच मार्तंडला पाहत होती. त्याच्या रांगड्या रूपावर जणू ती फिदा झाली होती.

शिपायांनी मार्तंडला बादशहासमोर आणलं. लांडग्यांच्या दरबारात एक ढाण्या वाघ रुबाबात चालत येत होता. त्याची ती करारी नजर सर्वांना मोहित करत होती. त्याचं रुबाबदार चाल पाहून तो काही कच्चा खेळाडू नाही हे बाकीच्या सरदारांच्या आधीच लक्षात आलं होतं. त्याने बादशाहला जरासं वाकून मुजरा केला. शहजादीसोबत असलेल्या शिपायांनी शादीहून परत येताना प्रवासातला सगळा वृत्तांत बादशहाला सांगितला. शहजादीने महाली परतल्यानंतर लगेचच बडी बेगमला सर्व खबर सांगितली होती. बडी बेगमने बोलायला सुरुवात केली.

“क्या नाम है तुम्हारा नौजवान? हम शुक्रगुजार है की तुमने लुटोरोंसे शहजादी की जान बचा ली| हम तुम्हारी इस बहादुरीसे बहुत खुश हुये|”

“म्या मार्तंड सुर्वे, पन्हाळगडाच्या पायथ्याशी सुर्वेवाडी माज गाव हाय.”

मार्तंड उत्तरला.

“मतलब दख्खन का मराठा मावला?”

तिने काहींशा नाराजीने कपाळावर आट्या पाडत म्हटलं.

“व्हय जी, आन त्याचं मावळ्यानं तुमच्या शहजादीची हिफाजत केलीय नव्हं?”

मार्तंड आदिलशहाकडे पाहून म्हणाला. बडी बेगम यावर म्हणाली.,

“बिल्कुल, सही फर्माया और इस बहादुरीके लिए हम, बडी बेगम तहे दिलसे शुक्रियादा करते है और तुम्हारे लिए ये तोहफा पेश करते है!”

असं म्हणत बडी बेगमने सोनंनाणं हिरे, जवाहरातने भरलेल्या आणि त्यावर रेशमी वस्त्राचं आवरण असलेल्या तबकाला हात लावला. दासीने ते तबक मार्तंडला देण्यासाठी तिथे उभे असलेल्या शिपायाच्या हातात दिलं. तो शिपाई त्याच्यापाशी आला. त्याला थांबवत मार्तंड म्हणाला,

“माफी करावी बेगम साहिबा, मला यातलं काय बी नको जी. पर देणार असशिला तर मंग तुमच्या हिथं चाकरी द्या. लय झ्याक हुईल बगा..”

“लेकिन दख्खनमे सिवा है ना..| सुना है वो खुदको वहाँ का बादशहा समझने लगा है| तुम उसके पास जानेके बजाय आदिलशहाके दरबारमे उनकी खिदमत करना चाहते हो? क्या वजह है? कोई दगाबाजी तो नही? ”

बडी बेगमने शंकेने मार्तंडकडे पाहिलं. मार्तंड चौफेर नजर फिरवत म्हणाला,

“दगाबाजी आमच्या रगतातच न्हाई रानी सरकार, पर कदी कदी डोस्क्यानं बी इचार करावा लागतु बेगम साहिबा! आता तुमीच सांगा आदिलशहाच्या या बलाढ्य सैन्यापुढं त्या मूठभर मावळ्यांचा कसा निभाव लागल? आन जीवावर उदार हुन आमी लढायचं त्ये बी एका नवक्या राजासाठी? आवं कदी बी बरखास्त हुईल त्ये दख्खनचं सरकार.. मंग कोणापुढं हात पसारायचं आमी? माज्या माय बानं कोणाकडं पाह्यचं? बड्या शाही बादशाहच्या दरबारी चाकरी करता करता जीव बी गेला तर माज्या माघारी ते सुखानं दोन घास तरी खात्याल. मला ठावं हाय आदिलशहा लय दयाळू हाय. त्यास्नी भल्या लोकांची पेहचान हाय. ते मला नाराज नाय करायचं. ठिवून घेत्याल आपल्या पदरी.”

दरबारात कुजबुज सुरू झाली. कोणी मार्तंडच्या साहसाचं कौतुक करत होतं तर कोणी अजून काहिबाही बोलत होतं.

“सिवा का जासूस होगा. खबर निकालने के लिए आया होगा.”

“दगाबाज होगा.. ज्यादा भरोसा नहीं.. धोका होगा.”


हळू हळू गलका वाढू लागला, गडबड अन गोंधळ माजू लागला. इतक्यात शहा जोरात कडाडला.

"खामोश..! बंद करो ये बत्तमिजी.., मार्तंड, आजसे तुम आदिलशाही दरबार के सिपाही..|”

सरदार बाजी घोरपडे यांच्याकडे पाहत अली शहा म्हणाला.,

“सरदार बाजी घोरपडेजी, इसे आपकी सेनामे शामिल किजीये| आजसे ये आपकी देखरेखमे रहेगा..| मार्तंड, अब तुम जा सकते हो|”

घोरपडेनी मान डोलावली.

“लई मेहरबानी सरकार..”

मार्तंडने आनंदाने त्रिवार मुजरा केला आणि तो तिथून निघून गेला. सर्व दरबार अवाक होऊन आदिलशहाकडे पाहत होता. शहजादी मात्र मनातून खूपच सुखावली होती. आता रोज तिला मार्तंड दिसणार होता. दरबारातले काही लोकं शहाच्या या निर्णयाने नाराज झाले होते पण शहेंशहापुढे कोणाची बोलण्याची बिशादच नव्हती. बादशहाचा शब्द अंतिम मानून सर्वांनी माना खाली घालून मुकाट्याने निर्णय मान्य केला आणि त्यानंतर इतर बाकीच्या गोष्टींची चर्चा सुरू झाली. मसलती सुरू झाल्या. दरबारातील सर्व न्यायनिवाडे झाल्यानंतर थोड्या वेळाने बडी बेगम आपल्या महालात जाण्यासाठी उठून उभी राहिली. त्याचबरोबर अली आदिलशहा आणि दरबारातले उपस्थित असलेले लोकही उठून उभे राहिले. त्यादिवशीसाठी दरबार बरखास्त झाला आणि अली आदिलशहा आणि बडी बेगम विश्राम करण्यासाठी आपापल्या निवासस्थानी निघून गेले. त्याचबरोबर शहजादी, इतर स्त्रियां आणि दरबारातील उपस्थित लोकांनी हळूहळू तिथून रजा घेतली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all