Feb 29, 2024
ऐतिहासिक

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २८

Read Later
मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २८


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २८

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २८


विश्वासराव आपल्या कक्षेत बसले होते. आपल्याच विचारात ते गर्क होते. जाता जाता मार्तंडने स्वराज्यासाठी खूप मोलाची कामगिरी केली होती. एका चाणक्ष नजरबाजाचं काम त्यानं चोख बजावलं होतं. त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नव्हतं. एव्हाना विश्वासरावांच्या लक्षात आलं होतं. त्यांचं तर्क लावणं सुरू झालं.

“मार्तंडच्या सांगाव्यानुसार हाथी म्हणजे अफजल खान फलटणच्या दिशेने निघाला आहे. शेकडो सैन्यानिशी तो पुढे चाल करून येत आहे. देसी सुरमाँ भेडिया म्हणजे बाजी घोरपडे आणि प्रतापराव मोरेही त्यांच्यासोबत आहेत. फलटणचा शेर म्हणजे बजाजी निंबाळकर यांच्या जीवाला धोका आहे. लवकरच उपाययोजना करायला हवी.”

विश्वासरावांनी निकष लावला. सैनिकांना बजाजी निंबाळकरांच्या मदतीसाठी धाडलं. खानानं अटक करण्यापूर्वी बजाजींना सावध करून एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी सैनिकांवर सोपवली आणि हि खबर स्वतः शिवाजी महाराजांना देण्यासाठी प्रतापगडावर जाण्यासाठी निघाले.

इकडे खान पंढरपूरहुन आपल्या लव्याजम्या सकट फलटणच्या दिशेने निघाला. सोबत बारा हजार सैनिकांची घोडदळ,फौज, शंभर हत्ती, शेकडो उंट, काबाडीचे बैल, शंभर मोठ्या तोफा, मोठ्या संख्येनं कुऱ्हाडी, बेलदार घेऊन खान वेगानं पुढं येत होता. वाटेत रयतेला दहशत बसावी म्हणून तो लूट करत मंदिरं जमीनदोस्त करत चालला होता. एखाद्या उन्मत पिसाळलेल्या हत्तीप्रमाणे तो वागत होता. त्याच्या वागण्याने रयत खूप त्रासली होती. मजल दरमजल करत तो फलटणला पोहचला आणि तिथे त्यानं आपला मुक्काम ठोकला. खानाच्या छावणीत पुन्हा एकदा मसलती सुरू झाल्या. कट कारस्थानं शिजू लागली. खानाच्या शामियान्यात सर्व सुरमाँ सरदार जमले होते. आपलं महाकाय अजगरासारखं असलेलं शरीर आसनावर विराजमान झालं होतं. एका बाजूला प्रतापराव मोरे, बाजी घोरपडे आपल्या जागी बसले होते आणि दुसरीकडे खानाचे विश्वासू सरदार, हसनखान, अंबरखान फाजलखान सय्यद बंडा विराजित झाले होते. शिवरायांचे मेव्हणे बजाजी निंबाळकरांना कैद करायची हि योजना आधीच ठरली होती त्याच विषयावर मसलत सुरू झाली. शिवरायांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी डाव रचला जात होता. हिंदवी स्वराज्यातला माणूस स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या व्यक्तीच्या वेदना पाहू शकत नाही हि गोष्ट खानाला बरोबर माहीत होती तरीही आपल्या विश्वासातल्या माणसांशी मसलत करावी त्यांचं मत जाणून घ्यावं असं त्याला वाटलं.

“क्या किया जाय? आपको लगता है की बजाजीको कैद करेंगे तो सिवा काबूमें आयेगा?”

खानानं आपल्या धारदार स्वरात प्रश्न केला. बाजींनी उत्तर दिलं.

“बिल्कुल.. खानसाब, नाक दाबलं की बरोबर तोंड उघडतं. हमे पुरा यकिन है, हम बजाजीको कैद करेंगे तो शिवाजी अपनी नाक घिसते हुए चला आयेगा..”

सर्वांनी बाजीच्या बोलण्याला दुजोरा दिला. खानानं बजाजीना अटक करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच दिवसात खानानं ठरलेल्या योजनेप्रमाणं शिवरायांना वेठीस धरण्यासाठी बजाजी निंबाळकरांना कैद केली. हातापायात, गळ्यात साखळदंड अडकवले. बजाजी निंबाळकरांना पुन्हा एकदा धर्मांतर करण्याची सक्ती करण्यात आली आणि तसं नाही केल्यास हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्याची धमकी देण्यात आली. या निमित्तानं का होईना शिवाजी शरण येईल. असं खानाला वाटलं. होतं.

विश्वासरावांनी बजाजी निंबाळकरांच्या मदतीसाठी जे सैन्य पाठवलं होतं ते हात हलवत फिरून माघारी आलं. सैन्याच्या मुख्य सैनिकाने बोलायला सुरुवात केली.,

“सरकार, तुमी सांगितल्याप्रमानं आमी बजाजी राजांच्या मदतीला गेलू हुतो पर आमी जाईपातूर खानाच्या मानसांनी त्यास्नी अटक केली हुती.”

बजाजी निंबाळकरांना खानानं अटक केल्याची बातमी घेऊन सैनिक आले होते. हि खेदजनक खबर ऐकताच विश्वासरावांच्या पायाखालची जमीन सरकली.

“आता तातडीनं हि खबर शिवरायास्नी सांगाय जाया पाहिजेल. बजाजींचा जीव धोक्यात हाय. कायतरी पाऊल उचलाय पाहिजेल..”

त्यांनी विचार केला आणि लगेच शिवरायांच्या भेटीस निघाले. दऱ्या खोऱ्या, घनदाट जंगल पार करत विश्वासराव शिवरायांना भेटण्यासाठी शिवापट्टणला आले. शिवराय आपल्या महालात बसले होते. त्यांच्यासोबत जिजाऊ, मोरोपंत पिंगळे, फिरंगोजी नरसाळा, माणकोजी दहातोंडे बसले होते. मसलती सुरू होत्या.


“कुनी संन्यासी आलाय. राजांस्नी भेटायचं म्हंतुय.”

इतक्यात हुजऱ्याने वर्दी दिली. महाराजांनी आत बोलवण्याची परवानगी दिली. मुजरा घालून सेवक तिथून निघून गेला.

“जय जय रघुवीर समर्थ!!”

आत येत संन्याशानं आवाज दिला. महाराजांनी हात जोडून नमस्कार केला. त्याच्याकडं निरखून पाहत महाराज वदले.

“या महाराज..”

महाराजांनी बसायला आसन दिलं. संन्याशानं बोलायला सुरुवात केली.

आदिमाया मूळ भवानी
हेच जगताची स्वामिनी|
एकांती विवेक धरुनी
इष्ट योजना करावी||

“केवढी निर्मळ वाणी” जिजाऊ उदगारल्या.

“काय नाव बाबा तुझं?”

त्यांनी प्रश्न केला.

“मी.. मी..”

शिवरायांना हसू फुटलं.

“अहो आऊसाहेब, हे आपले विश्वासराव..”

सर्वांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. विश्वासरावही किंचित हसले. महाराज म्हणाले.,

“बोला विश्वासराव..”

“महाराज.. खबर चांगली न्हाई..”

“सांगा.. आम्ही ऐकण्यास तयार आहोत..”

“राजं., फलटणमध्ये बजाजीराजांस्नी अफजल खानानं अटक केली हाय. गळ्यात साखळदंड अडकवून बांधून ठेवलंय. हातापायात बेड्या ठोकल्यात. सक्तीनं मुसलमान होण्यास सांगत हाईत आन जर बजाजी राजांनी यासाठी नकार दिला तर हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्याची धमकी दिलीय.”

“जगदंब..”

जिजाऊंच्या मुखातून आर्त उदगार बाहेर पडला. क्षणार्धात अंगावर वीज कोसळावी. कोणीतरी कड्यावरून कडेलोट करावा असं जिजाऊंना वाटून गेलं. डोळ्यांसमोर अंधारी यावी तसं झालं. अफजल खानाचं नाव ऐकताच त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या इतकं कोणाला हे नाव परिचयाचं होतं? शिवरायांकडे पाहत थरथरल्या स्वरात म्हणाल्या

“राजे, पुन्हा नवीन संकट.. ज्यानं आमच्या पोटच्या थोरल्या मुलाला, तुमच्या बंधूना संभाजीराजांना दगाफटका करून मृत्यूमुखी पाडलं. आपल्या पिताश्रीना विजापूरच्या रस्त्यावरून फरफटत नेऊन अपमानित केलं. तो अफजलखान पुन्हा स्वराजावर संकट बनून येत आहे. ते काय कमी होतं? आता भरीस भर म्हणून त्यानं आता बजाजींना कैद केली. हे भवानी माते, आता तूच रक्षण कर..”

असं म्हणताना जिजाऊनी आपले दोन्ही कर जोडले. आणि डोळ्यांत भरून आलेलं आभाळ डोळ्यातच सावरलं. त्यांच्याकडे पाहत राजे हसून म्हणाले,

“माँसाहेब, जेंव्हा आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तेंव्हाच आम्हाला अशा अनेक संकटाची कल्पना होतीच हि संकटं आपणास नवीन का आहेत? आता आम्हांस अश्या संकटाची सवय झालीय. अफजलखान स्वारी करून आला, त्यानं बजाजींना अटक केली म्हणून का आम्ही भिऊन हातावर हात धरून शांत बसावे? नाही माँसाहेब, यावर नक्कीच काहीतरी तोडगा निघेल.”

शिवाजी महाराज जराही आपले चित्त विचलित होऊ न देता म्हणाले. त्यांच्या स्वरातला निर्धार पाहून बाकीच्यांच्याही अंगात बळ आलं.

“पुढे बोला विश्वासराव.. ”

विश्वासरावांकडे पाहून शिवबाराजे म्हणाले.

“राजं, खानाला वाटलं हुतं की तुमी साताऱ्याला असाल म्हनून तो आधी पंढरपूर पुणे मार्गे येत हुता पर नंतर त्याला तुमी प्रतापगडी असल्याची खबर लागल्यानं त्यानं त्याचा मार्ग बदलला. आता तो माणकेश्वर, करकंब, भोसे, शंभुमहादेव, मलवडी यामार्गे येतुय.”

“हम्म, खानासोबत आपले कोणकोण सरदार आहेत?”

“घोरपडे, खराटे, यादव, मोहिते, पांढरे..”

त्यांना थांबवत राजे म्हणाले.,

“पांढरे! नाईकजी पांढरे?”

“व्हय जी, सरकार..”

शिवराय विचारत पडले. क्षणभर विचार करून ते विश्वासरावांना म्हणाले.,

“विश्वासराव, आम्ही एक जोखमीचे पत्र दिलं तर ते तुम्ही पांढरे राजांना सुपूर्द करू शकाल?”

“त्या बद्दल शंका नसावी राजं.. पत्र नक्की पोहचतं हुईल. चिंता नसावी.”

विश्वासरावांनी राजांना आश्वस्त केलं. महाराजांनी नाईकजी पांढरे यांना पत्र लिहलं. कोणत्याही परिस्थितीत बजाजी निंबाळकरांची सुटका करावी अशी पत्रातून त्यांनी विनंती केली. नाईकजी पांढरे बजाजी निंबाळकरांचे स्नेही असल्यानं ते त्यांची नक्की सुटका करतील अशी त्यांना खात्री होती. शिवाजी महाराज नाईकजी पांढरेंना लिहिलेलं पत्र विश्वासरावांच्या हाती देत म्हणाले.,

“विश्वासराव, जागोजागी आपले नजरबाज पेरा. खानाच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. संन्यासी, वासुदेव, फकीर नाना वेषात माणसं हिंडू देत. खानाची शिंकेची बातमीही आमच्या पर्यंत पोहचायला हवी.”

“जीं राजं..”

असं म्हणत विश्वासरावांनी महाराजांचं पत्र घेतलं. महाराजांना वाकून मुजरा केला आणि तिथून तडक ते नाईकजी पांढरे यांच्याकडे जाण्यास निघाले. वेळ दवडून चालणार नव्हता. काहीतरी विपरीत होण्याआधी, खानानं काही दगाफटका करण्याआधी नाईकजी पांढरेना गाठणं निकडीचं होतं. घोड्यावर स्वार होऊन भरधाव वेगाने विश्वासराव नाईकजी पांढरे यांच्या छावणीत पोहचले. शिवाजी महाराजांनी दिलेलं पत्र नाईकजी पांढरे यांना सुपूर्द केलं. नाईकजी पांढरे यांनी पत्र वाचलं. खानाच्या छावणीत पुन्हा मसलती सुरू झाल्या आणि एक निर्णय घेण्यात आला.

बऱ्याच दिवसांनी महालात इतक्या अप्रिय समाचारामधून एकच समाधानाची वार्ता येऊन धडकली. शिवाजी महाराजांनी नाईकजी पांढरे यांना लिहलेल्या पत्राचा चांगला उपयोग झाला होता. पत्र सार्थकी लागलं होतं. खानाला साठ हजार होन भरून बजाजी निंबाळकरांची सुटका करण्यात आली होती. बऱ्याच दिवसानंतर आलेल्या या शुभ समाचारामुळे साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली पण महाराज मात्र पुढची योजना आखत होते. गडावर खलबतखान्यात खलबती सुरू झाल्या. घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. राजांना क्षणभरही उसंत नव्हती. सैन्याची बांधणी सुरू झाली. दारुगोळा, शस्त्रात्रे यांची जमवाजमव सुरू झाली. अखंड कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता गडाच्या दिशेने घोडी धावत होती.

आता अफजलखान आपल्या फौजेनिशी माणकेश्वर, करकंब, भोसे, शंभुमहादेव, मलवडी यामार्गे रहिमतपूरला आला आणि त्याने वाईच्या दिशेनेने रोख वळवला होता.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//