मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २६

हि कथा एका शूर वीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..
मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २६

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २६

इकडे तो गावकरी गावात एका ठिकाणी तळ ठोकलेल्या शिपायांच्या डेऱ्यात आला. त्यानं शिपायांच्या म्होरक्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

“क्या बात है? क्यूँ मिलना चाहते हो?”

हुजऱ्यानं प्रश्न केला. तो भितभीत म्हणाला.,

“नाय म्हंजी तुमी हुडकताय त्याचा ठिकाना मला ठावं हाय.. मला सरदारास्नी भेटायचं हाय..”


त्याचं बोलणं ऐकून हुजऱ्यानं ताबडतोब म्होरक्याला आत जाऊन खबर दिली. गावकऱ्याला आत बोलवण्यात आलं.

“कहाँ है वो काफर बताओ? जल्दी बोलो..”

तो जोरात दरडावून म्हणाला.

“सांगतू.. पर इनाम द्याल नव्हं?”

लालसेने त्या माणसाने प्रश्न केला. म्होरक्यानं होकार दर्शवला. आपल्या सेवकाला डोळ्यांनी खुणावलं. सेवकांने लगेच आज्ञा अंमलात आणली. मोहरांची निळ्या रंगाची मखमली पिशवी त्याच्या अंगावर फेकली. एखाद्या आधाश्यासारखं त्याने ती पिशवी झेलण्याचा प्रयत्न केला. झेलताना हातातून निसटणाऱ्या थैलीला कसंबसं सावरलं आणि त्याने बोलायला सुरुवात केली. 

“हुजूर, त्यो माज्या घरी वस्तीला हाय.. उंद्या निघलं म्हनूनशान तुमास्नी लगोलग सांगाय आलूय. चला माज्यासंगं.. म्या दावतो तुमास्नी..”

“सच कह रहे हो? दगाबाजी तो नही? याद रखो.. अगर कुछ दगा हुआ तो अपनी जान खों बैठोगे.. समझे..”

म्होरक्या गरजला. त्यानं मान डोलावली. ते सर्वजण घोड्यावर स्वार झाले आणि गावकऱ्याच्या मागे जाऊ लागले. 

कावेरी शांत साखर झोपेत होती. मार्तंड मात्र सावध होता. गावाकऱ्याच्या देहबोलीतून काहीतरी अघटित घडणार याची मार्तंडला कल्पना आली होती. थोडावेळ कावेरीला आराम करू द्यावा म्हणून त्यानं कावेरीला उठवलं नाही. घटकाभर झोपल्यावर त्यानं कावेरीला हळूच आवाज दिला.

“कावेरी, ए कावेरी.. उठ आपल्याला निघावं लागंल..”

तो तिला हलकेच हलवत म्हणाला. कावेरी डोळे चोळत उठली.

“पर हुजूर.. हम सुबह होतेही जानेवाले थे ना? तो अब रातके समय?”

अंगावर घेतलेल्या घोंगडीची घडी घालत ती म्हणाली.

“व्हय.. पर आमाला त्यो मानूस वाईच येगळा वाटला. मनात त्येच्या खोट हाय असं वाटतंय.. चल निघू.. पुढं बघू काय त्ये..”

कावेरीने होकार दिला आणि ते दोघं पडवीतून बाहेर पडणार इतक्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आला. वाऱ्याच्या वेगानं तो आवाज जवळ येत होता. मार्तंडची शंका खरी ठरली. त्या माणसाने मार्तंडची खबर शत्रूच्या शिपायांना दिली होती. मग क्षणार्धात पुढच्या दारानं न जाता ते मागच्या बाजूनं घराबाहेर पडले. घोडेस्वार त्यांच्या दारात येऊन थांबले. गावकऱ्यानं त्यांना पडवीत आणलं पण मार्तंड आणि कावेरी आधीच पसार झाले होते. हाताच्या मुठी आवळत शिपायांचा म्होरक्या दरडावत म्हणाला.

“कहाँ है काफर? झुठ बोलते हो?”

“नाई जी.. हिथंच व्हतं वस्तीला.. म्या कशापाई खोटं बोलू?”

तो काकूळतीला येऊन म्हणाला. इतक्यात एक शिपाई जोरात ओरडला.

“हुजूर, वो देखिये काफर.. भाग रहे है..”

सगळ्यांचं लक्ष त्या दिशेला गेलं. मार्तंड आणि कावेरी झाडाखाली बांधलेल्या घोड्याच्या दिशेने धावत होते.

“गद्दार.. नमकहराम.. जाओ जल्दी.. पिछा करो उनका.. भाग ना पायें..”

सर्व शिपाई त्या दिशाने धावले. मार्तंडने पटकन झाडाखाली बांधलेला घोडा सोडला. कावेरीला पटकन उचलून घोड्यावर बसवलं आणि घोड्यावर स्वार झाला. घोड्याला टाच मारली. घोडा वाऱ्याच्या वेगानं धावू लागला. सर्व सैनिक धुळीचे लोट उडवत त्याचा पाठलाग करू लागले. शिपाई आणि मार्तंडच्या घोड्यात फारसं अंतर उरलं नव्हतं. मार्तंड त्यांच्या तावडीत सापडला जाण्याची शक्यता दाट होती. मार्तंडने घोड्याचा वेग अजून थोडा वाढवला. 

इतक्या वेळात त्याच्या बायकोला सारा प्रकार लक्षात आला होता. आपल्या धन्यानं थोड्या मोहरांच्या मोहापायी खानाच्या लोकांना खबर दिली. राजाच्या मावळ्याला धरायला मदत केली. यामुळे ती रागावली होती. 

“कारभारने, हे बघ किती मोहरा हायती, आता म्या घराची जुनी कौलं उतरवतू आन नवी चढवतू. पोरास्नी नवी कापडं घितू. अगं राने.. आता बघ म्या तुला कसं सोन्यानंच मढिवतू की नाय.. राजाची रानी व्हशील.. समदं गाव तूज्याकडं बघतच राहतंय की नाय बघच..”

पिशवीतल्या मोहरा मोजता मोजता तो मोठ्या आनंदानं म्हणाला. मोहरांची पिशवी उधळून लावत ती त्वेषाने म्हणाली.,

“काडी लावा त्या मोहरांस्नी.. घाला चुलीत त्यास्नी.. काय केलंसा धनी, धनापाई इमान इकलंसा? आवं आपलं राजं सवराज्याचं सपान बघत्यात. दऱ्याखोऱ्यातनं पायाला भिंगरी लावल्यावानी फिरत्यात. मूठभर मावळ्यांस्नी घिवून एवढ्या मोठ्या बलाढ्य शाही सैन्यापुढं जीवाचं रान होईपातूर लढत्यात. मावळं शिवबाराजासाठी कश्याची बी फिकीर न करता रगात सांडत्यात. कूनासाठी वं? रयतेच्या भल्यासाठीचं नव्हं? तुमास्नी मदत करता येत नाय निदान त्यांच्या वाटेतला धोंडा तर बनू नगा..”

ती फारच उद्विग्न झाली होती.

“धनी, आयाभनीची अब्रू लुटणाऱ्या त्या खानाच्या लोकांस्नी तुमी खबर दिलीसा.. काय मिळवलंसा? ह्या मोहरा..? आन या मोहरातनं तुमी मला सोन्यानं मढीवनार? आवं धनी, ह्ये आसलं सोनं घालून मिरवन्यापरिस म्या लकेंची पारवती बनूनश्यान राहीन पर यांस्नी हात लावायची नाय.. जा त्या मोहरा माघारी दिऊन या नायतर चंदभागेमधी सोडून या पर तोपातूर घरात पाय ठीवायचा नाय आन पुन्यांदा आस काय आकरीत घडलं तर म्या इसरून जाईन की तुमी माजं धनी हाईसा त्ये.. सवराज्याच्या लेकी हाव आमी.. त्या सवराज्या इरुद्ध कुनी बी, काय बी वंगाळ केलं तर आमी आजाबात खपवून घिनार नाय. त्याची आजाबात गय करनार नाय. ह्या सवराज्यासाठी मारनार आन मरनार बी.. जावा बिगीन..”

तिचा तो अवतार पाहून तो चांगलाच वरमला. गपचूपपणे त्याने खाली सांडलेल्या मोहरा गोळा केल्या आणि घराबाहेर पडला. सैनिक सापडणं आता शक्य नव्हतं म्हणून मग मोहरा नदीत विसर्जित करण्याचं मनाशी ठरवून तो नदीच्या दिशेने जाऊ लागला.

मार्तंडचा घोडा वेगाने दौडत होता. मार्तंडच्या मनात विचार आला. 

“सवराज्याच्या येकाच छत्राखाली किती येगयेगळी मानस! एकीकडं शिवा आन त्येच्या कारभारनींनं माजा जीव वाचवला. सवताच्या घरात ऱ्हायला आसरा दिला. घासतला घास भरीवला आन दुसरीकडं त्या गावकऱ्यानं धनाच्या लोभापाई माज्या मुक्कामाची बातमी सांगिटली आन खानाचं शिपाई मागं लागलं. आपल्याच मानसांनी घात केला. पर राजं, काय बी घोर करू नगांसा.. अश्या लोकांपासनं आई भवानी तुमचं रक्षण करल आन त्यो महादेव त्यांचा नायनाट करण्यासाठी तुमास्नी बळ देईल..”

मनातल्या मनात संवाद सुरू होता. खानाच्या सैनिकांचा ससेमीरा त्याच्यामागे लागला होता. शेवटी स्वराज्यातल्याच त्या गावकऱ्यासारख्या, संपत्तीसाठी लोभी झालेल्या काही नतद्रष्ट लोकांनीच स्वराज्याला संकटात पाडले होते. त्यामुळेच शिवरायांची अर्धी निम्मी शक्ती स्वकीयांशी लढण्यातच खर्ची होत होती. खानाचे शिपाई मार्तंडच्या मागे लागले होते. घोडे वेगाने दौडत होते. मार्तंडचा आणि पर्यायाने कावेरीचा जीव धोक्यात होता. खानाचे शिपाई मागून त्याच्यावर तिरांचा वर्षाव करत होते. मागून तीर फेकले जात होते. मार्तंडच्या पाठीवर ढाल असल्याने तो प्रत्येक वार परतावून लावत होता. इतक्यात एक बाण वाऱ्याच्या वेगाने येत त्याच्या डाव्या खांद्यात घुसला. 

“राजं..”

 तो विव्हळला. कावेरीने मागे वळून पाहिलं.

“काय जालं धनी? चोट तो नही आयी?”

तिनं काळजीनं इचारलं. त्यानं एका हातानं खांद्यातला बाण उपसून बाहेर काढला घोड्याचा वेग वाढवत कावेरीला उत्तर दिलं. 

“नाय गं माजे रानी, माज्या दंडावर तू बांधलेलं तावीज हाय नव्हं? तोवर मला काय बी व्हाचं नाय बघ. मोहीम फत्ते हुनारच.”

त्यानं हसून उत्तर दिलं पण मार्तंडच्या लक्षात येत होतं. घोड्यावर दोघं बसल्यामुळे त्याचा वेग मंदावला होता. शत्रूचे सैनिक मागावर होते पण काहीही करून महाराजांपर्यंत खबर पोहचवणं गरजेचं होतं. काय करावं? तो विचार करू लागला. समोर एका मोठ्या खडकाआड त्याने आपला घोडा थांबवला.

“कावेरी, आपुन दोघं घोड्यावर बसल्यानं घोडं दमानं चाललंय. जास्त पळत न्हाई. गनिम मागावर हाय आन आपनाला काय बी झालं तरी राजांपातूर ही खबर पोहचवायची हाय. येक काम करू.. म्या इथं शिपायास्नी अडवून धरतू. तू म्होरं जा. तुला शिवथर गडाच्या पायथ्याशी पोहचायचं हाय आन ह्यो सांगावा द्यायचा हाय.”

असं म्हणत मार्तंड तिच्या कानाजवळ येत काहीतरी पुटपुटला. शिवरायांना जी खबर पोहचवायची ती कोणाला आणि कुठं द्यायची ते त्याने कावेरीला कानात सांगितलं. ज्याला भेटायचं त्याचं खुणेचं निशाण दिलं. खात्री पटल्याशिवाय कोणालाच हि खबर द्यायची नाही. त्याने तिला निक्षुन सांगितलं. 

“काय बी जालं तरी तुला तिथं जायचंच हाय. आलं का ध्यानात? आपल्या राजाचा जीव वाचीवनं ह्योच आपला धरम हाय आन धरमापायी ह्यो जीव हातात घिवून फिरावं लागलं तुला बी. तू माजी कारभारीन हाईस नव्हं? मंग ह्या मार्तंडाची कारभारीन शोभाय नगं?. 

तो तशाही अवस्थेत उसणं हसू आणत म्हणाला.

“पर धनी, आपको कुछ भी नही होगा| आपही वो खबर देंगे| हम जल्दही यहाँसे भाग जायेंगे..”

कावेरी मार्तंडला धीर देत होती.

“नाय कावेरी, तुलाच म्होरं जावं लागंल. असं दोघं गेलू तर खानाचं शिपाई आपल्याला धरून जीवे मारत्याल. त्यापरिस म्या हिथं त्यास्नी रोखून धरतू. तो जा म्होरं.. तुला ह्ये करावंच लागंल. आपल्या राजाचा जीव वाचवायचा आसंल तर ही जोखीम घ्यायाला पाहिजेल. आगं, माज्या राजासाठी असलं शंभर मार्तंड कुर्बान.. लाख मेले तरी चालतील पर जगाचा पोशिंदा जगला पाहिजेल. त्यो आसल तरच रयत सुखी हुईल. तू जा कावेरी, माजी काळजी करू नगंस. मला काय बी हुनार नाय.”

“हुजूर..”

तिच्या मुखातून अस्पष्ट आर्त शब्द बाहेर पडले. 

“कावेरी, जा तू.. येळ दवडू नगंस. आपल्या राजाचा जीव धोक्यात हाय.. निघ तू लवकर.. शिपाई येत्याल जा.. माजी काळजी करू नगंस..”

शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज नजीक येऊ लागला. कावेरीला मार्तंडला तिथेच सोडून जाणं भाग होतं. तो एकटा सैनिकांच्या टोळीशी कसा झुंज देणार? ती काळजीत पडली. मोठ्या जड अंतःकरणानं कावेरी घोड्यावर स्वार होण्यास निघाली इतक्यात मार्तंडच्या दंडावरचं तावीज गळून तिच्या हातात पडलं. तिचे डोळे पाण्याने डबडबले. तावीज पुन्हा दंडावर बांधण्यासाठी ती खाली झुकली इतक्यात तिला सैनिकांची टोळी त्यांच्याच दिशेने येताना दिसली. हातातला तावीज तिथेच टाकून तिनं मार्तंडला अलविदा केलं आणि ती घोड्याच्या दिशेने धावली. उभ्या असलेल्या घोड्यावर स्वार झाली आणि घोड्याला टाच मारून पुढे निघाली. डोळ्यात आसवं होती पण मार्तंडचं मागे राहिलेलं कार्य तिला पूर्ण करायचं होतं. खानाच्या सैनिकांनी मार्तंडला चहुंबाजूनी घेरलं होतं आणि मार्तंड जखमी अवस्थेत कमरेची तलवार उपसून त्यांच्यासमोर उभा होता.

“या कुत्र्यांनो, मागनं वार करतासा व्हय.. हिमत आसल लढून दावा नाय येकेकाला मायची याद आली तर मार्तंड नाव लावायचो नाय. या..”

मार्तंड त्वेषाने बोलत होता. शिपायांचा म्होरक्या छदमी हसत म्हणाला.

“पकडा गया है काफर, फिर भी तेवर देखे इसके.. नमकहराम.. जहाँपनाहसे गद्दारी करोगे? भुगतो इसकी सजा.. पकड लो इसे..”

त्यानं सैनिकांना आदेश दिला. सैनिक त्याच्यावर चालून आले. मार्तंडने सावध पवित्रा घेतला. जीवात जीव असेपर्यंत लढायचंच त्यानं मनाशी निर्धार केला. 
एकमेकांच्या तलवारी तळपल्या. तलवारीचा खणखणाट घुमू लागला. मार्तंड शत्रूच्या सैनिकांवर सपासप वार करत होता. दोन चार शिपायांना यमसदनी धाडत एक शूर मावळा जिवाच्या आकांताने लढत होता. लढता लढता मार्तंडच्या हातातली ढाल खाली पडली. डोक्याचा फेटा त्यानं हाताला गुंडाळला आणि तो लढत राहिला. मार्तंड जखमी झाला होता. शरीरातून रक्त वाहत होतं. तो रक्तबंबाळ झाला. आता तो खाली जमिनीवर कोसळला. त्या संधीचा फायदा घेत शत्रूच्या एका शिपायाने त्याच्या हातातली तलवार मार्तंडच्या पोटात खूपसण्यासाठी आपल्या दोन्ही हातांनी वर उंचावली. मार्तंडला डोळ्यांसमोर आपला अंतिम क्षण दिसत होता.

“राजं.. तुमच्या या मावळ्याचा शेवटचा मुजरा राजं.. हर हर महादेव..”

तो सर्व जीव एकवटून ओरडला आणि त्याने डोळे मिटले. 

“नही…ऐ खूदाह…”

तिच्या तोंडून आर्त किंकाळी बाहेर पडली. शिपायांचं लक्ष तिच्याकडे गेलं.

“पकड लो उसे.. वो काफर के साथ है.. देखो भाग ना पायें..”

म्होरक्यानं हुकूम सोडला. त्याच्या हुकमासरशी काही शिपाई कावेरीच्या मागे धावले. शिपायांना तिच्याकडे येताना पाहून कावेरीने घोड्याला टाच मारली आणि पुढच्या दिशेने कूच केली. धुळीचे लोट उडवत घोडेस्वार तिचा पाठलाग करू लागले. कावेरीने घोड्याचा वेग वाढवला आणि क्षणार्धात ती दिसेनाशी झाली.

पुढे काय होतं? कावेरी मार्तंडचा निरोप घेऊन जाईल का? मार्तंडने कोणाला निरोप द्यायला सांगितलं होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all