मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २५

ही कथा शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..



मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २५

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..


भाग २५

मार्तंड आणि कावेरी शिवाच्या झोपडीतून बाहेर पडले. लवकरात लवकर त्यांना गावची वेस गाठायची होती. ते भरभर पावलं टाकत होते. इकडे खानाचे शिपाई प्रत्येक घरात जाऊन मार्तंड आणि कावेरीचा शोध घेत होते. प्रत्येक घरात घुसून तपास करत होते. काही सैनिक शिवाच्या घरासमोर आले आणि त्यांनी दार ठोठवायला सुरुवात केली. शिवाची बायको घाबरून बाहेर आलीच नाही. ती आतल्या माजघरात दडून बसली. शिवा अंगावर सदरा चढवत दार उघडण्यासाठी बाहेर आला.

“आरं आलू की.. वाईच दम धीर काय हाय का नाय..”

तो बाहेर येता येता ओरडला. त्यानं दरवाजा उघडला. तसं खानाचे सैनिक तडक आत घुसले. त्यांच्या म्होरक्यानं चौकशी करायला सुरुवात केली.

“हिथं कुनी बाई आन बाप्या आसऱ्याला आला हुता का?

शिवा विचार करू लागला.

“म्हंजी त्यो जखमी झालेला गडी खरं सांगत हुता. त्या जुलमी खानाची मानसं त्येच्या मागावर हायती तर.”

शिपायाने पुन्हा दरडावून विचारलं.

“नाय बा, कुनी बी आलं नाय.”

म्होरक्याने त्यांना शिवाच्या घराची झडती घ्यायला सांगितलं. शिपायांनी झडती घेतली. घरात कोणीही सापडलं नाही. शिपाई तिथून निघून गेले. शिवा विचार करू लागला. त्याने आपल्या बायकोला आवाज दिला.

“कारभारने, त्यो आपल्या राजाचा मानूस तर नसलं? म्हणून ही खानाची मानसं त्येच्या मागावर असत्याल. आई अंबाबाई, त्यांचं राखण कर गं माय..”

त्यानं हात जोडले.

“धनी, ह्ये बघा काय हाय?”

शिवाची बायको त्याला आवाज देत होती. शिवा पटकन शेजारच्या झोपडीत शिरला. त्याच्या बायकोच्या हातात एक मलमलच्या वस्त्रात दागिने होते. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित आनंद होता.

“धन्य ती माऊली.. आपल्या करता ह्ये समदं ठिवून गेली पर ह्ये आपुन कसं काय घ्याचं? ह्ये सवराज्याचं धन हाय. त्ये राजस्नी परत करायला पाहिजेल.जा जपून ठिव.”

शिवाच्या बायकोनं मान डोलावली. उतरंडीच्या एका गाडग्यात तिनं ते दागिने ठेवून दिलं. शिवा आपल्या कामाला लागला.

इकडे मार्तंड आणि कावेरी आडरानातून मार्ग काढत पुढे पुढे जात होते. आता चांगलंच उजाडलं होतं. घराघरातून बायकांचे जात्यावरच्या ओव्या कानी पडत होत्या. न्याहारीची तयारी सुरू होती. चुलीवरच्या भाकरीचा खरपूस वास येत होता. काही ठिकाणी सडाशिंपण, रांगोळी, तुळशीला पाणी घालणं सुरू होतं. दुरवर कुठंतरी वासुदेवाची भूपाळी ऐकू येत होती. काही बायका धुणं धुवायला नदीवर चालल्या होत्या. दिनक्रम सुरू झाला होता. तरी अफजलखानाच्या फौजेची दहशत होतीच. स्वतःला जपत, त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करत स्वतःचा जीव मुठीत घेऊन रयत जगत होती. आता तर नदीकिनारी वसलेल्या भोसे चिंचोळी गावात खानाचे शिपाई शिरले होते. प्रत्येक घरात जाऊन ते मार्तंड आणि कावेरीचा शोध घेत होते.

इकडे अफजलखानानं पंढरपूरातला आपला तळ हटवला आणि तो पुढच्या दिशेनं मार्गस्थ झाला. मजल दरमजल करत तो फलटणला येऊन पोहचला. बाजी घोरपडे, प्रतापराव मोरे या सारखे स्वराज्याचे हितशत्रू सोबत होतेच पण त्याच बरोबरीनं फाजलखान, अंबरखान, हसनखान आणि सय्यद बंडा सारखे विश्वासू सरदारही होते. मसलती होत होत्या. खेळी, चाल कटकारस्थानं शिजत होती. योजना आखल्या जात होत्या.

भोसे गावात खानाचे शिपाई विखूरले गेले. गावची वेस फार दूर राहिली नव्हती. मार्तंड आणि कावेरी कसेबसे वेशीपाशी पोहचले. तिथं ठरल्याप्रमाणे आधीच काही माणसं त्यांची वाट पाहत थांबली होती. मार्तंडला जेव्हा खानानं जेरबंद केलं त्यावेळीस त्याची शस्त्रे काढून घेतली होती. त्यामुळं मार्तंडकडे स्वतःच्या संरक्षणासाठी कोणतंच हत्यार नव्हतं. त्या माणसांनी मार्तंडला ढाल तलवार, खंजीर, भाला काही शस्त्रे दिली. त्यांनी मार्तंडला एक घोडा दिला. घोड्याचं खाद्य दिलं. दोघांसाठी थोडी शिदोरी दिली. आणि ते क्षणार्धात तिथून निघून गेले. मार्तंड घोड्यावर बसला. खाली उभ्या असलेल्या कावेरीच्या कमरेत हात घालून वर उचलून घेतलं. ती त्याच्या पुढ्यात बसली. त्यानं घोड्याला टाच मारली तसा घोडा वेगाने धावू लागला. आता मार्तंड आणि कावेरीचा प्रवास सुरू झाला. पोटात भुकेचा डोंब उसळला होता पण पोटाची भ्रान्त होती कोणास? लवकरात लवकर निरोप पोहचवायचा होता. पल्ला लांबचा होता. त्या दिशेने घोडदौड सुरू होती. भोसे गावाची वेस ओलांडून ते पुढच्या गावी निघाले.

मजल दरमजल पार करत ते मलवडी गावात आले. हळूहळू रात्र होऊ लागली होती. आकाशात विहार करणारी पाखरं घरट्यात विसावली. गाई गुरं गोठ्यात परतली. इतका वेळ धावून मार्तंडचा घोडाही दमला होता त्यामुळे त्याचा वेगही मंदावला. त्याला थोडा वेळ विश्रांती द्यावी आणि आजची रात्र या गावातच मुक्काम करावा या विचाराने मार्तंड थांबला. कावेरी घोड्यावरून खाली उतरली. मार्तंडने घोड्याला एका झाडाखाली बांधलं. खरंतर मार्तंड आणि कावेरीला खूप भूक लागली होती.

“कावेरी, हिथं जरा येळ थांबू.. जनावर बी दमलं आसल. आन तुला बी भूक लागली आसल नव्हं?

मार्तंडने कावेरीला विचारलं.

“नाही सरकार.. हमे भूक नही..”

कावेरीने उत्तर दिलं.

“लय शानी हाईस.. खोटं सांगती व्हय? त्वान्ड बघ वाईच कसं कोम्याजून गेलंय.. म्हनं भूक नाय..”

मार्तंड हसून म्हणाला. घोड्याला त्यानं आजूबाजूला पाहिलं. दोन चार घरांची वस्ती.. तो एका घरासमोर येऊन थांबला.

“कुनी हाय का माई?”

त्याने आवाज दिला. घरातून एक माऊली बाहेर आली. दार उघडत ती म्हणाली.

“कोन हाय जी?”

“म्या वाटसरू हाय जी.. माजी कारभारीन बी हाय संगट.. लई भूक लागलीया.. वाईच भाकरी तुकडा मिळाला म्हंजी..”

तिनं मार्तंडकडे निरखून पाहिलं. तो खरंच भुकेला होता. दुरवर झाडाखाली एक घोडा आणि एक स्त्री बसली होती.

“व्हय बस तिथं वसरीवर.. म्या भाकर घिवून येती.. तुज्या कारभारनीला बी हिथंच बोलीव. आलीच म्या..”

असं म्हणत ती स्त्री स्वयंपाकघरात गेली. दारात कोणी भिक्षा मागायला, कोणी रंजलेला, गांजलेला आला तर त्याला मोकळ्या हाताने पाठवू नये ही आपली संस्कृती आन आपल्या राजाची शिकवण मार्तंडला त्या माऊलीत दिसली तो कावेरीला घेऊन तिथे आला. त्या स्त्रीने भाजी भाकरीचं ताट आणून दिलं.

“लई मेहरबानी झाली जी..”

असं म्हणत मार्तंडने तिचे आभार मानत जेवायला सुरुवात केली. आधी कावेरीला घास भरवला. ती लाजली. आपल्या नवऱ्याचं, मार्तंडचं प्रेम पाहून मोहरली. दोघांची जेवणं झाली. त्या स्त्रीचे आभार मानून ते निघणार इतक्यात ती स्त्री म्हणाली.,

“एवढ्या रातीचं कुठं जातूस बाबा, ऱ्हा आजची रात हिथंच वस्तीला. उंद्या दिस उजाडला की जा.. तरनीताठी पोर हाय.. कशापाई जोखीम घीतूस?”

त्या बाईचं बोलणं मार्तंडला पटलं आणि तो थांबायला तयार झाला. तिनं पडवीत त्यांच्या निजण्याची सोय केली आणि ती आत निघून गेली. इतक्यात तिचा नवरा बाहेरून आला. त्याला समोरच्या झाडाखाली घोडा बांधलेला दिसला.

“आनी कोन पाव्हणं आलं म्हणायचं या वक्ताला?”

त्याला प्रश्न पडला. घरात येताच त्यानं त्याच्या बायकोला प्रश्न केला.

“कोन पाव्हणं आल्यात गं?”

“आवं वाटसरू हाय जनू.. आजची रात राहत्याल वस्तीला आन जात्याल की उंद्या..”

“काय म्हणावं तुला? कुनाला बी घरात घितीस.. कोन हाय ते तरी इचारलं का?”

त्यानं थोडं चिडूनच तिला विचारलं. तिनं नकारार्थी मान हलवली. कोणीतरी अनोळखी माणूस त्याच्या घरी थांबला आहे हि गोष्ट त्याला आवडली नव्हती. सकाळचं रामासोबतचं बोलणं त्याला आठवलं. रामा सांगत होता.

“खानाची मानसं समदया गावात एका जोडप्याला हूडकत हाईत. येक शिवबा राजाचा मावळा आन त्याच्या बरोबर एक मुसलमान बाय बी हाय. त्यास्नी हुडकून देनाऱ्याला इनाम देणार हाय म्हनं.”

त्याला शंका आली. तो पडवीत आला. मार्तंड आणि कावेरी झोपण्याच्या तयारीत होते. त्याला समोर पाहताच कावेरीने डोक्यावर पदर घेत चेहरा झाकून घेतला.

“राम राम पाव्हणं.. कंच्या गावचं म्हनायचं? आन कुणीकडं निघालासा?”

त्याने प्रश्न केला.

“म्या वाटसरू हाय जी.. पंढरपूरच्या इठ्ठलाच्या भेटीला आलंतू.. आता परत माघारी घरला. ही माजी कारभारीन..”

मार्तंडने कावेरीकडे पाहत उत्तर दिलं. कावेरीने त्याला नमस्कार केला पण नमस्कार करताना हात जोडण्याऐवजी आदाब केला आणि चूक लक्षात येताच गांगरून पुन्हा नमस्कार केला. त्याची शंका खरी ठरली.

“अस्सं हाय तर.. खानाची मानसं ज्याला शोधत्यात त्यो ह्योच हाय.. पांडुरंगाच्या भेटीला आला म्हनं मग त्याच्यापाशी घोडा? घोड्यावरनं कुनी पांडुरंगाला भेटाय येतंय व्हय? आन असा देखना घोडा फकस्त शिपायापाशीच असतूय. कुनी बी घोड्याची हौस नाय करत आन तसली हौस परवडत बी नाय.. आन त्या बायनं दोन्ही हात जोडन्यापरिस कपाळाला बोटं टेकवलं म्हंजी हि मुसलमानाची बाय तर नसल? नसली तर खानाची मानसं त्यास्नी सोडून देत्याल. आन समजा जर ह्ये त्येच असत्याल तर ह्यास्नी धरून दिल्यावं खानाचं शिपाई इनाम देत्याल.. सोन्याच्या मोहरा देत्याल. लवकरात लवकर हि खबर शिपायांस्नी सांगाय पाहिजेल.”

तो मनाशी ठरवत होता. त्याला तिथेच घुटमळताना पाहून मार्तंडने त्याच्याकडं पाहिलं. तसा तो चपापला आणि तिथून निघून गेला. मार्तंडला त्याच्या विचित्र वागण्याचा संशय आला. कावेरी खूप दमली होती म्हणून मनात आलेला संशय त्यानं झटकला आणि तिथेच घोंगडीवर आडवा झाला. कावेरी त्याच्या एका हातावर डोकं ठेवून शेजारी झोपली. तिच्या मनात अनेक संभ्रम होते. तिनं मार्तंडला विचारलं.,

“हुजूर..,हम जब छोटे थे तब हमे अगवा किया और विजापूर लाया गया.. हमारा पुरा बचपन विजापूरमें बिता.. यहाँ दख्खनमें क्या हो रहा था| मला काहीच खबर नही.. कोन शिवबा राजं हमे मालूम नही.. क्या है सवराज्य हमे पता नही.. हुजूर हमे बताईये ना..क्या है ये सवराज?”

मार्तंडने तिच्याकडे हसून पाहिलं. तिच्या भाळावर चुंबन घेत तो बोलू लागला.

“ कावेरी, तुला रामसीता, किसनदेव ठावं हाय का गं?”

तिनं आनंदानं मान डोलावली.

“हमारे बा हमे उनकी कहानियाँ सुनाते थे|”

तिचा निरागस चेहरा पाहून त्याला हसू फुटलं. आपलं हसू आवरत तो म्हणाला.

कावेरी, त्या रामाचं आताचं मूर्तरूप राज्य म्हंजी सवराज्य.. द्वारकेचं वैभव म्हंजी सवराज्य.. सुख आन समाधान जिथं घोड्यावरनं बिनघोर फिरत्यात ते म्हंजी सवराज्य.. जिथं आयाभनी बिनघोर वावरत्यात ते सवराज्य.. न्याय, शांती जिथं सुखानं नांदती ते म्हंजी सवराज्य.. आईची माया म्हंजी सवराज्य.पित्याचं छत्र म्हणजे स्वराज्य. किसनदेवाचं गोकुळ म्हंजी सवराज्य.. आन कावेरी, त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा झुकून ज्यास्नी मुजरा करत्यात, माज्या रायगडाचा, सह्याद्रीचा सिंह, देवांचा देव महादेव म्हंजी माजं शिवबा राजं.. अगं त्यो निस्ता हाडामांसाचा मानूस नव्हं तर त्यो एक इचार हाय आन इचारधारा संपत नसती.. आमच्या धमण्यामधनं वाहत राहती आन कायम अशीच वाहत राहणार.. तुला सांगतो कावेरी, त्या माज्या देवासाठी ह्यो जीव जरी गेला तरी बेहत्तर.. परवा नाय.. पर या देवाच्या, सवराज्याच्या कामी यायचं. माज्या राजाच्या पायाशी हा देह वाहून टाकायचा हिच शेवटची इच्छा हाय बघ..”

इतक्यात त्याच्या तोंडावर कावेरीने हात ठेवला.

“हुजूर, ऐसी मनहूस बातें ना करे.. खुदा आपको लंबी उम्र बक्श दे.. असं बोलू नका.. आपको हमारी कसम..”

कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं. मार्तंडशिवाय आयुष्य या कल्पनेने तिच्या जीवाचा थरकाप उडाला.

“बरं बाय नाय बोलत.. आता झोप चल.. उंद्या येरवाळीच निघावं लागलं.. गनिमाचा काय बी नेम नाय..पर आता तुला कळलं नव्हं काय हायती आमचं शिवबा राजं?”

“व्हय जी..”

कावेरीने हसून उत्तर दिलं. त्याच्या त्या राजबिंड्या रूपाकडं ती पाहत होती. कौतुकानं त्याचा चेहरा न्हावून गेला होता. तो शिवाजी महाराजांबद्दल पोटतिडकीने बोलत होता. डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आपल्या राजाबद्दल आदरभाव होता. राजासाठी जीव देण्याची तयारी होती. त्याच्याकडं पाहत पाहतच कधी तिला डोळा लागला तिलाच कळलं नाही. मार्तंड मात्र कसल्यातरी विचारात गढून गेला. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला तरी त्याला निज येत नव्हती. नंतर केंव्हातरी उशिरा त्याला झोप लागली.

पुढे काय होतं? ती व्यक्ती खानाच्या शिपायांना खबर देईल का? मार्तंड आणि कावेरी सुखरूप सुटतील का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all