मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..
भाग २४
हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..
भाग २४
मार्तंडच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले. शिवा आणि शिवाच्या बायकोचं बोलणं त्याला आठवत होतं. त्या विचारांच्या तंद्रीतच त्याला डोळा लागला. कावेरी तिथेच त्याच्या शेजारी बसून होती. त्याचं निरागस रूप एकटक न्याहाळत होती. मनात मार्तंड विषयीचं प्रेम उफाळून आलं. मनाशीच मूक संवाद सुरू झाला.
“हमारी मंजिल, हमारा इश्क तो सिर्फ आप हो मार्तंड.. और ये इश्कही हमारा सबकुछ, हमारा खुदाह बन चुका है| आपने हमे मेहरसे कावेरी बना दिया| उस जिल्लतभरी जिंदगीसे छुटकारा देकर इक नयी जिंदगी बक्श दी| कावेरीका दुबारा जनम हुआ| तो फिर हमारी ये तमाम जिंदगी सिर्फ और सिर्फ आपकीही देन हुई| अब आपही हमारी जिंदगी हो| अब ये जिंदगी आपसेही शुरू और आपके कदमोंमे खत्म.. हमारी इन बहती सांसोपे भी सिर्फ आपका नाम.. हुजूर, हम आपसे बेपनाह इश्क करते है.. मरते दम तक करते रहेंगे..”
विजापूरची मेहर तिथेच मागे राहिली होती आणि आता समोर होती ती फक्त कावेरी.. लहानपणीची अल्लड निरागस कावेरी.. फक्त मार्तंडची कावेरी.. कावेरीचा पुन्हा एकदा नव्याने जन्म झाला होता. कावेरी त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. इतक्यात मार्तंड झोपेतून जागा झाला. समोर कावेरीला त्याच्याकडे पाहताना थोडा गोंधळला. तीही थोडी लाजली.
उन्हं आता खाली उतरू लागली होती. दिवसभर आग ओकणारा सूर्यदेव हळूहळू शांत होऊ लागला.सूर्य मावळतीला निघाला होता. मावळतीच्या सोनेरी छटा आकाशात पसरल्या होत्या.. चंद्रभागा नदी त्या सोनेरी किरणात न्हावून निघाली होती. बाहेर रानात चरायला गेलेली जनावरं घराकडे परतत होती. दिवसभर शेतात काम करून दमून भागून आलेली शेतकरी मंडळी ओसरीवर विसावा घेत होती. गप्पा रंगत चालल्या होत्या. संध्याकाळच्या आरतीसाठी काही भक्तजण मंदिराच्या दिशेने जात होते. मार्तंड वामकुक्षी घेऊन नुकताच उठला होता. सकाळचा विचार अजून डोक्यातून गेला नव्हता. कावेरीकडं पाहत मार्तंड म्हणाला.,
“कावेरी, आपुन जरा येळ देवळात जाऊन याचं का? उंद्या निघाय पाहिजेल. येशीबाहेर पोहचाय लागंल.. पुन्यांदा कवा हिथं येऊ देवालाच ठावं.. मनात येक गोष्ट हाय.. ती बी पुरी करू..”
“कौनसी बात हुजूर?”
कावेरीने प्रश्न केला..
“तिथं गेल्यावं कळलच की..”
हसून मार्तंडने उत्तर दिलं. इतक्यात शिवाची बायको त्या दोघांसाठी गुळाचा चहा घेऊन आली. तिचं आभार मानत दोघांनी चहा घेतला आणि मंदिरात जाऊन येण्याची इच्छा तिला बोलून दाखवली. थोड्याच वेळात मार्तंड आणि कावेरी मंदिरात आले. आरती झाली. सर्वांनी आरती घेतली. त्यानंतर पुजाऱ्याने दोघांना आशीर्वाद देत गूळ खोबऱ्याचा प्रसाद हातावर ठेवला त्याचबरोबर देवीच्या दर्शनाला आलेल्या सर्व भक्तांना प्रसाद दिला. मार्तंडने मोठ्या भक्तीभावाने तो प्रसाद कपाळाला लावून नमस्कार केला आणि प्रसाद तोंडात टाकला. कावेरीनेही मार्तंडचं अनुकरण केलं. आरती, भजन झालं आणि सर्वजण आपल्या घरी परतू लागली. सर्व माणसं तिथून पांगली.
मार्तंड आणि कावेरी मंदिराच्या पायरीवर बसले होते. समोर चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत होती. कावेरी नदीकडे एकटक पाहत होती. नदीचं खळाळतं रूप डोळ्यांत साठवत होती. चंद्रभागेला डोळे भरून पाहत असताना तिच्या मनात एक विचार आला.
“काश हम इस नदीके जैसे होते..! जब जीमे आया बहते रहे| खुशियाँ पिरोंते हुए, लहराते हुए.. अपने दायरों को संभालते हुए सारी ज़िदगी यूँही बहते रहते.. सारे रस्मों- रिवाज़, सारे बंधन तोडकर किसी की भी परवाह किये बगैर हसते-खेलते.. कुदते हुए.. अपनी राह तलाश करते हुए.. समंदर को मिलनेकी तड़पसे अपनी मंजिल की ओर पागल हवाकी तरह दौड़ते रहे.. सिर्फ दौड़ते रहे..”
कावेरी विचारात गुंगून गेली. मार्तंड तिचं ते निरागस, लोभसवाणं रूप न्याहाळत होता.
“किती ग्वाड दिसतीय कावेरी.. समदं सोडून आली माज्यासाठी.. कुणाची बी परवा न करता..आपला जीव जोखीममधी टाकून माज्या संगट आली..”
मार्तंडच्या मनात कावेरीविषयी कौतुक, आश्चर्य, आनंद असे सारे भाव दाटून आले होते. मार्तंडने कावेरीला सकाळचं शिवा आणि त्याच्या बायकोचं झालेलं संभाषण सांगितलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला.,
“कावेरी, त्या आक्का जे म्हणल्या, त्ये काय बी चूक नाय.. खरं बोलल्या.. कावेरी, येक इचारू? ”
“जी हुजूर..,”
“माज्यासंगट लगीन करशील? आता लगीच.. माजी कारभारीन हुशील?”
कावेरी लाजली. डोळ्यांच्या पापण्या खालीच ठेवत तिने त्याला मान हलवून होकार दिला. मार्तंडने कमरेची तलवार उपसली. तलवारीवर बोट ठेवलं बोटातून बाहेर आलेल्या रक्ताचा टिळा त्यानं कावेरीच्या भाळी टेकवला आणि जन्मोजन्मीचं एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. देवीच्या ओटीच्या सामनातलं देवीचं डोरलं मार्तंडने कावेरीच्या गळ्यात घातलं आणि खऱ्या अर्थाने कावेरी मार्तंडची कारभारीन झाली. मोठ्या भक्तीभावाने त्यांनी देवीला खाली वाकून नमस्कार केला. कावेरी खूप आनंदी होती. आता मार्तंड आणि कावेरीच्या नात्याविषयी कोणालाच शंका घेण्याचं कारण नव्हतं.थोड्याच वेळात अंधार पडू लागला. अंधाराचं साम्राज्य पसरू लागलं. झोपड्यातून, घरातली कंदीलं पेटलेली दिसू लागली. दारात पेटत्या मशाली दिसू लागल्या. मार्तंडला पुढचा मार्ग लवकरच निश्चित करायचा होता. वेळ घालवून चालणार नव्हतं. ते दोघे शिवाच्या झोपडीकडं आले. कावेरीच्या गळ्यात काळ्या मण्याची पोत पाहून शिवाच्या बायकोची कावेरी मार्तंडची कारभारीन असल्याची खात्री पटली. रात्रीचं जेवणं आटोपली. आणि ते झोपण्यासाठी आपल्या झोपडीत आले. मार्तंड बाजेवर येऊन बसला. सावित्रीच्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले होते. इतक्यात कावेरी पाण्याचा तांब्या घेऊन तेथे आली. मार्तंडच्या शेजारी पलंगावर येऊन बसली. मार्तंडच्या डोळयातलं पाणी तिच्या नजरेतून सुटलं नाही. तिने अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
“माझी सावू..मला कायमची सोडून गेली गं कावेरी..”
मार्तंडच्या गळ्यात दाटून आलेला उमाळा ओसंडू लागला. तो कावेरीच्या गळ्यात पडून रडू लागला. कावेरीनं त्याला कुशीत घेतलं आणि अगदी लहान मुलासारखं त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. त्याला गोंजारत होती. तिनं त्याला मनसोक्त रडू दिलं आणि मग ती समजावणीच्या सुरात म्हणाली.,
“हुजूर, आप सोचते हो. आता सावू नाही राहिली. पर वो है.. हमेशा रहेगी हमारे बीच.. हमारे दिलमे.. पता है? वो है आपकी मुस्कुराहटमें.. तुमी असं दुःखी राहिलात तर तिला आवडेल का? उसकी आत्मा को कैसी शांती मिलेगी?”
कावेरीनं त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. मार्तंडला कावेरीचं म्हणणं पटलं. कावेरीच्या बोलण्याने मार्तंड हळूहळू शांत होऊ लागला. कावेरीविषयीचं प्रेम आता डोळ्यांत दाटू लागलं. कावेरीनं अलगद त्याला खाटेवर लोटलं आणि त्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवलं. तलवारीच्या पातीनं मार्तंडच्या छातीवर झालेल्या जखमेवर तिनं अलगद आपले ओठ टेकवले. तो शहरला. कोणीतरी आपल्या जखमेवर थंडगार लेप लावावा असा त्याला भास होतं होता. कावेरी आवेगाने त्याला बिलगली. आता मात्र त्याला तो पाश सोडवता येत नव्हता. त्याचे डोळे मिटले जाऊ लागले. त्याचा संयम सुटू पाहत होता. एक आवंढा गिळत कापऱ्या आवाजात तो म्हणाला,
“कावेरी आता तू माजी कारभारीन झालीस. माजी कावेरी झालीस..”
कावेरी लाजली. तीने लाजून मार्तंडला म्हणाली.,
“हमने कभी सपनेमे भी नही सोचा था की आप हमे कबूल करेंगे.. हमसे निकाह करेंगे. आपने हमे सबसे बेहतरीन तोहफा दिया है.. हम बहुत खुश है हुजूर..आता जनमभर तुमच्यासंगटच.. हर दुखमें.. हर सुखमे सदाके लिए.. ”
मार्तंडने तिला कवेत घेतलं तशी ती शहारली. त्याने तिच्या भाळावर अलगद चुंबन केलं. तीही त्याच्या बाहुपाशात विसावली. तिच्या नाजूक ओठांच्या पाकळ्यावर आपले ओठ टेकवून मार्तंडने साखर पेरणी केली. कावेरी मोहरली. ती त्याच्यात विरघळून जात होती. तिच्या अंगावरची वस्त्रे तिच्या नकळत दूर होत होती. तिच्या ओठांवर दीर्घ चुंबन घेत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. श्वासात श्वास मिसळून गेला. तिची काया थरथरली. गात्रे सैल झाली. तिने स्वतःला मार्तंडच्या स्वाधीन केलं. दोन देह एक झाले. जन्मजन्मांतरीचे मिलन झालं. एक तृप्ततेची भावना दोघांच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिची रेशमाची मिठी सैल झाली. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती झोपी गेली. मार्तंडही कितीतरी दिवसांनी शांत निजला होता.
पहाट झाली. कावेरी जाग आली ती बाहेर ऐकू येणाऱ्या घोड्यांच्या टापांच्या आवाजानं. तो आवाज जवळ येऊ लागला तसं तिनं हलकेच हलवून मार्तंडला उठवलं.
“शायद दुश्मनोके सिपाही? वो लोग यहाँ आनेसे पहले फौरन यहाँसे निकलना होगा|”
मार्तंडला तिचं म्हणणं पटलं. त्याने अंगावर सदरा चढवला. कावेरी तिचं आवरून तयार झाली. कावेरीने काढून ठेवलेले स्वतःच्या अंगावरचे दागिने खाटेखाली शिवा आणि त्याच्या बायकोसाठी ठेवले आणि कोणालाही न सांगता काळोखात ते तिथून बाहेर पडले.
पुढे काय होतं मार्तंड आणि कावेरी खानाच्या सैनिकांच्या तावडीत सापडतील का? तो शिवाजी महाराजांना निरोप देऊ शकेल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा