मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २३

ही कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २३

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २३

सावित्रीचं कलेवर शांतपणे सरणावर जळत होतं. साऱ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आता चितेच्या त्या अग्नीच्या ज्वाळा मार्तंडच्या डोळ्यात अंगार बनून उतरू लागल्या.

“नाय सोडनार.. येकाला बी जिता नाय सोडनार.. माज्या भनीचा जीव घिटला.. सावे, तुजं बलिदान वाया नाय जाऊ देनार.. नाय येकेकाच्या नर्डीचा घोट घिटला तर मार्तंड नाव लावनार नाय..”

मार्तंडच्या डोळ्यातून अश्रूरुपी अंगार बरसू लागले. रागाने त्याच्या हाताच्या मुठी वळू लागल्या. मेहर त्याला सांत्वन करत होती. सर्वांनाच खूप वाईट वाटत होतं. पण आता दुःख करत बसण्याची वेळ नव्हती. म्होरक्याने पुढाकार घेतला आणि बोलायला सुरवात केली.

“मार्तंड.. भावा.. ह्यो अंगार असाच जपून ठिव.. कामी येल.. आरं आपल्या राजांनी किती मोठं दुःख मनात ठिवलंय बघ. याच अफजलखानानं त्यांच्या मोठ्या बंधूना, संभाजीराजांना कपटानं मारलं.. शहाजी राजांना बंदी बनवून हातापायात बेड्या ठोकून विजापूरच्या रस्त्यावरून फरफटत नेलं. आरं लेका, ते नसतील का पेटून उठले? त्यास्नी बी राग येत आसल का नाई? रागाचा, अपमानाचा एक एक घोट ते मुकाट्याने, हिंमतीने पचवत असत्याल. आपलं राजं लय संयमी हाईत. त्यो राग त्यांनी मनात जपून ठिवलाय. येळ आल्यावर निघंलच.. आन त्या रागात गनिम भस्म हुईल. आता आमास्नी पुढच्या कामगिरी वर जावं लागंल. समदे हातावर हात ठिवून इथं बसून नाय चालायचं..”

त्याने साथीदारांना निघण्यासाठी खूणवलं. सर्वांनी मुजरा केला आणि ते तिथून निघून गेले. तुळसा मेहरला घेऊन मंदिराच्या मागे गेली. तिथे तुळसाने आपलं लुगडं चोळी तिला नेसायला दिली आणि मेहरचा मोगलाई पेहराव आपल्या अंगावर चढवला. स्वतःच्या हातातल्या चार बांगड्या तिच्या हातात घालत ती मंद हसत म्हणाली.,

“किती ग्वाड दिसती गं.. आता तुला कुनी बी वळीखनार नाय.. जपून ऱ्हा.. काळजी घी..”

मेहरने तिला कडकडून मिठी मारली. पुन्हा कधी भेट होईल दोघींनाही माहीत नव्हतं. डोळ्यांत पाणी आलं. तुळसाने मेहरचा निरोप घेतला. मेहर पुन्हा मंदिरात आली. मेहरचं ते मराठमोळं रूप पाहून मार्तंड तिच्याकडे पाहतच राहिला. इतक्यात म्होरक्याच्या आवाजानं त्याची तंद्री भंग पावली. म्होरक्या मार्तंड आणि मेहरकडे पाहत म्हणाला.,

“मार्तंड.., तुला बी लवकरच इथनं निघावं लागेल. खानाची माणसं चारी दिशांना विखूरल्यात. कदी बी हमला करत्याल. पर तुज्या जखमा अजून ताज्या हाईत. वाईच आराम कर आन निघ. गावाच्या वेशी बाहीर आपली माणसं भेटत्याल. घोड्याची सोय करत्याल. मंग तू यांस्नी त्यांच्या ठिकाणावर सोडीव आन तू बी घरला जा..”

मार्तंडने आपले डोळे पुसले.

“नाई जी.. म्या माजी कामगिरी पुरी करणारच.. जीव गेला तरी बेहत्तर..

त्याने मनाशी पक्का निर्धार केला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. त्या म्होरक्याने मार्तंडला आलिंगन दिलं आणि त्याचा निरोप घेऊन तिथून निघणार इतक्यात त्यांच्याकडं निरखून पाहत मार्तंडने प्रश्न केला.

“पर कोन हाईसा तुमी?”


गालात किंचित हसत आणि उजवी भुवई वर घेत तो म्हणाला,

"ह्या देहाला आता तरी बडेखान म्हत्यात. तुझ्यासाठी एवढं बास हाय."

त्याने हाताची बंद मुठ दाबत वर उंचावली आणि निरोप देत मोठयाने गर्जना केली.

"हर हर महादेव"..”

मार्तंडनेही त्याला तसाच प्रतिसाद दिला. त्याच्या आवाजात वेगळीच जरब होती. त्यानं स्वतःकडची तलवार मार्तंडला भेट म्हणून दिली आणि किंचित हसून त्याने मार्तंड आणि मेहरचा निरोप घेतला.

“ह्यो चेहरा कुठंतरी बघिटलाय.. कुठं बरं?”

मार्तंड तो चेहरा आठवण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला आठवलं. विजापूरच्या दरबारात एकदा दोनदा पाहिलं होतं. विजापूरात असताना त्याच्या घराच्या खिडकीतून डोकावणारा, बाजींच्या कक्षेत, घोडदौड पतकात, अमीनाबाईच्या रंगमहालात त्याच्या मागावर असणारा हाच तर तो चेहरा होता. मार्तंडला सारं आठवत होतं.

“ह्ये बहिर्जी नाईक सरकार तर नसत्याल?”

त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत असताना त्याच्या तोंडून उदगार बाहेर पडले आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. भारावून गेल्यासारखा तो दुरवर जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. मार्तंडने मोठ्या कृतज्ञपणे भक्तीभावाने त्या देवमाणसाच्या आकृतीला लवून मुजरा केला.

आता वेळ दवडून चालणार नव्हतं.

‘खान मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने जाणार आहे आणि शिवाजी महाराजांचे मेव्हणे बजाजी निंबाळकरांना फलटण मध्ये बंदी बनवणार आहेत’

हि बातमी लवकरात लवकर शिवाजी महाराजांपर्यंत पोहचवणं गरजेचं होतं. मंदिरातून बाहेर पडून गावच्या वेशीबाहेर पोहचायचं होतं. तो उठून उभा राहणार इतक्यात त्याला ग्लानी आली आणि शुद्ध हरपून तो खाली कोसळला. मेहर त्याला खाली कोसळलेलं पाहून घाबरून गेली.कोणा गावकऱ्यांची मदत घ्यावी म्हणून मंदिराबाहेर पडली. बाहेर पडण्याआधी तिने देवीच्या पायाशी असलेलं कुंकू भाळी लावलं. मेहरचा चेहरामोहराच बदलून गेला. मेहर आता मराठमोळी कावेरी झाली होती. मेहरचा नवीन जन्म झाला होता.

अजून तांबडं फुटायला अवकाश होता. देवींची पूजा करण्यासाठी येणारा पुजारीही अजून आला नव्हता.
ती मार्तंडला मंदिराच्या आवारात झोपवून मंदिराबाहेर आली. थोडं अंतर चालून गेल्यानंतर आजूबाजूला दोन चार घरांची वस्ती दिसली. एका घराजवळ ती आली. तिनं दार ठोठावलं. थोड्या वेळात त्या घरातल्या एका स्त्रीने दार उघडलं.

“म्या कावेरी, माजं धनी..”

ती इतकंच बोलू शकली किंबहुना कोणी तिला ओळखू नये म्हणून ती इतकंच बोलली. ती स्त्री कावेरीला तिथेच थांबवून आत गेली आणि तिच्या नवऱ्याला घेऊन बाहेर आली.,

“आवं बिचारीला कायतर नड हाय जनू.. बघून आलू अस्तू..”

तिच्या नवऱ्याने मान डोलावली आणि दोघेही ते कावेरी सोबत मंदिरात आले. मार्तंड बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला होता. त्याच्या अंगावरच्या जखमा पाहून त्या स्त्रीचा जीव हळहळला.

इतक्यात मंदिराचे पुजारी समोरून येताना दिसले. मार्तंडला बेशुद्ध अवस्थेत पाहून त्यांनी हातातल्या तांब्यातलं पाणी मार्तंडच्या तोंडावर शिंपडलं. मार्तंडने डोळे किलकिले करत त्यांच्याकडे पाहिलं. मार्तंड उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला थांबवत तो व्यक्ती म्हणाला.

“थांबा वाईच.. नगा उठू.. लय लागलंय तुमास्नी..”

असं म्हणत त्या व्यक्तीने पुजाऱ्याच्या मदतीने मार्तंडला एका कोपऱ्यात बसवलं. कावेरीने पाण्याने
त्याच्या जखमा पुसून घेतल्या. ती व्यक्ती आपल्या बायकोकडे पाहून म्हणाली.,

“कारभारने, यांस्नी आपल्या घरला घिवून जाऊ.. दोन चार दिस आराम करत्याल आन खडखडीत बरं बी हुत्याल.”

तिनं मान डोलावली. त्या व्यक्तीने मार्तंडला त्यांच्या घरी राहण्याची विनंती केली. नाही होय करत शेवटी मार्तंड आणि कावेरी त्यांच्या घरी जायला तयार झाले. त्यानं मार्तंडला आधार देत घरी आणलं. त्याच्या घराच्या शेजारी झोपडी वजा राहायला जागा होती तिथे खाट टाकून मार्तंडला त्यावर झोपवलं.

“म्या औषीध घीवून येतू..”

असं म्हणत ती व्यक्ती बाहेर गेली आणि झाड पाल्याचं वाटलेलं औषध घेऊन आली. मार्तंडच्या जखमांवर ते औषध लावत त्या व्यक्तीने विचारलं.,

“कंच्या गावचं म्हनायचं पाव्हणं तुमी? आन ह्ये काय लागलं तुमास्नी? कुठं कोनासंग दोन हात झालं काय?”

“म्या मार्तंड.. सुर्वेवाडीचा पन्हाळगडाच्या पायथ्याशी माजं गाव हाय.. तुमाला तर ठावं आसल नव्हं खानाची माणसं किती जुलूम करत्यात? आमाला बी लई हानलं.. कसाबसा जीव मुठीत धरून आलूय आन ही..”

कावेरीकडे पाहत मार्तंड तिची ओळख करून देणार इतक्यात त्याची बायको म्हणाली.,

“व्हय जी.. ही तुमची कारभारीन.. आमाला ठावं हाय.. पहाटं हिच तर आली हुती आमच्या घरला.. तुमास्नी भोवळ आली तवा..”

मार्तंडने किंचित हसून कावेरीकडं पाहिलं. त्या स्त्रीचे शब्द ऐकून कावेरी मोहरली. लाजेची लाली गोऱ्या गालावर पसरली. टोपलीत आणलेली न्याहारी मार्तंड आणि कावेरीला देत ती म्हणाली.

“घ्या.. तुकडा मोडा.. घासभर खाऊन घ्या..”

ताटात वाढलेली कांदाभाकरी पाहून तीन दिवसापासून उपाशी असलेल्या मार्तंडला खूप भरून आलं. ती दोघं अगदी देवासारखे त्यांच्या मदतीला धावून आले होते.

“लई मेहरबानी जाली जी..”

असं म्हणत मार्तंड आणि कावेरीने जेवायला सुरुवात केली. जेवता जेवता मार्तंडने त्या व्यक्तीची माहिती काढली. त्याचं नाव शिवा होतं. मेंढ्या पाळण्याचा त्याचा व्यवसाय होता. आपल्या बायको आणि वृद्ध आईवडिलांना सोबत घेऊन तो राहत होता. मार्तंड आणि कावेरी यांची न्याहारी झाली. मार्तंडचा सदरा रक्तरंजित झाला होता म्हणून मग शिवाने मार्तंडला स्वतःचा सदरा घालायला दिला. मार्तंडने त्याच्यावर केलेल्या उपकाराबद्दल आभार व्यक्त करून बोलायला सुरुवात केली.

“लई उपकार बघा तुमचं.. पर ज्यादा थांबता नाई यायचं. लई महत्वाचं काम हाय.. उंदया निघावं लागंल..”

शिवानं मान डोलावली. मार्तंडला आराम करायला सांगून तो बाजूच्या झोपडीत आला. मार्तंड खाटेवर आडवा झाला. आपले डोळे मिटून घेतले. इतक्यात त्याच्या कानावर शिवा आणि त्याच्या बायकोचं बोलणं पडलं.

“धनी.., जर ती बाय त्या मानसाची बायको हाय तर मंग त्या बायच्या गळ्यात डोरलं का नाई वं?

“पडलं आसल.. नायतर त्या जुलमी खानाच्या मानसांनी हिसकावलं आसंल. तुला की नई लय पंचायत्या लागत्यात बघ.. जेव मुकाट्यानं..मला रानात निघायचं हाय..”

शिवा आपल्या बायकोला दरडावत म्हणाला. ती खाली मान घालून मुकाट्यानं घास घेऊ लागली. त्या दोघांचं बोलणं ऐकून मार्तंड विचार करू लागला. डोक्यात विचार चक्र सुरू झालं.

इकडे अफजलखानानं फर्मान सोडलं होतं. मार्तंडला जिवंत किंवा मृत पकडून आणण्याचा हुकूम होता. आता पर्यंत ज्या ज्या घटना घडत होत्या त्यावरून मार्तंड हा नक्कीच महाराजांचा माणूस असावा हा त्याचा संशय अजूनच बळावत चालला होता. त्यामुळे मार्तंडला पकडून आणणं त्याच्यासाठी गरजेचं झालं होतं. फाजलखानाने आपली दुसरी फौज त्यांना शोधण्यासाठी धाडली होती. नदी काठच्या सर्व गावांचा कसून तपास सुरू होता. खानाची माणसं गावागावातल्या प्रत्येक घरात जाऊन मार्तंड आणि त्याच्या सोबत असलेल्या कावेरीचा शोध घेत होतं.

अफजलखानाने एकीकडे मार्तंडचा शोध सुरूच ठेवला आणि दुसरीकडे त्याच्या प्रतिज्ञापूर्तीसाठी पाऊलं उचलायला सुरूवात केली. त्याने आपला पंढरपूरमधला त्याचा तळ हटवला आणि तो पुढच्या मार्गाने शिवाजी महाराजांचा खात्मा करण्यासाठी आगेकूच करत होता.

पुढे काय होतं? मार्तंड निरोप घेऊन शिवाजी महाराजांकडे पोहचू शकेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all