मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग २१

हि कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २१


हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २१

रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. रात्रीच्या दोन एक घटका सरल्या होत्या. तुळसा सावित्री आणि इतर बायकांना घेऊन झाडाझुडपातून मार्ग काढत पुढे चालली होती. किर्र अंधारात वाटेचा अंदाज बांधत त्या पुढे सरकत होत्या. जंगलातून जाताना वाटेत श्वापदांचीही भीती होती. पावसामुळे वाट पूर्णपणे चिखलाने माखली होती. इतक्यात सावित्रीने सर्वांच्यापुढे भरभर जाणाऱ्या तुळजाला मागे खेचलं. साऱ्या बायका जागीच थांबल्या. समोर झुडपातून काहीतरी सरपटत गेलं. त्यांनी त्याला जाऊ दिलं. ते गेल्यावर पुन्हा त्या चालू लागल्या. खरंतर जंगलात जंगली श्वापदांपासून बचाव करणं फारच कठीण होतं पण तरीही गनिमाच्या तावडीतून स्वतःची आणि आपल्या सोबत असलेल्या बायकांची सुटका करणं इतकंच त्यांच्या डोक्यात होतं. पावसानं साऱ्याजणी चिंब भिजल्या होत्या. थंडीने कुडकूडत होत्या. थंडी,पाऊस, वाऱ्याची कशाचीही पर्वा न करता त्या निघाल्या होत्या. लवकरात लवकर नदीकाठी पोहचणं हेच ध्येय त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा चालण्याचा वेग अजून थोडा वाढवला.

इकडे फाजलखानाची माणसं सावित्रीच्या शोधात छावणीबाहेर पडली. पाच सहा घोडेस्वारांची एक तुकडी वाऱ्याच्या वेगाने जंगलाच्या दिशेने धावू लागली. पुढे निघालेल्या दोन घोडेस्वारांच्या हातात पेटलेली कंदीलं होती. कंदीलाच्या मिणमिणत्या प्रकाशात ते पुढे निघाले होते. मागून घोडदौड करत येणारे दोन तीन घोडेस्वार मध्येच आडव्या येणाऱ्या झाडांच्या वेली कापत पुढे निघाले होते. पळून गेलेल्या बायकांचा शोध घेत होते. अजून कोणाचाही मागमूस लागला नव्हता. घोडेस्वार वेगाने धावत होते.

भरभर पावलं टाकत जाणाऱ्या तुळसा आणि इतर बायकांना घोड्यांच्या धावण्याचा आवाज कानी ऐकू आला. आता मात्र त्या खूप भयभीत झाल्या. तुळसा चालता चालता बोलू लागली.

“आजाबात भ्यायचं नाई बायांनो, लय हिमतीच्या हाईसा तुमी.. शिपाई आपल्या पातूर येइसतवर आपुन समदी नदीकाठी असू. आपली मानसं हाईत तिथं..नदीचा काठ नजीकच हाय. थोडं अंतर ऱ्हायल हाय.. चला बिगीनं.”

नदीचा काठ थोड्याच अंतरावर उरला होता. चालण्याचा वेग वाढवून अक्षरशः त्या धावू लागल्या. इतक्यात मागे वळून खानाच्या घोडेस्वारांना पाहत पुढे धावणाऱ्या सावित्रीचा पाय वाटेतल्या दगडात अडकला. सावित्री धापकन जमिनीवर कोसळली. साऱ्याजणी जागीच थांबल्या पुन्हा माघारी सावित्रीजवळ आल्या. तुळसाने तिला उचलून बसवलं. सावित्रीच्या पायाला खूप जोरात लागलं होतं. वाटेवरच्या दगडाला अडखळून पडल्याने पायाला खूप मोठी जखम झाली होती. जखमेतून रक्त वाहू लागलं. पायातून प्रचंड वेदना येत होत्या. तुळसाने सावित्रीला उठून उभं करण्याचा प्रयत्न केला पण वेदनेने ती कळवळली. सावित्रीला जागेवरून उठताच येईना. ती पुन्हा मटकन पायाला धरून खाली बसली. अगतिकपणे तुळसाकडे पाहत म्हणाली.,

“तुळसाक्का, माजं काय बी खरं नाय.. तू यांस्नी घिवून म्होरं जा.. म्या थांबती. माज्यापाई या समद्या बायांचा जीव कशापाई धोक्यात टाकताय? तुमी जावा,. म्या बघती यांस्नी.. जावा बिगीनं..”

सावित्रीच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. तुळसाने क्षणभर विचार केला आणि तिच्या साथीदाराकडं पाहून म्हणाली.,

“यस्वदे, तू बायांस्नी घिवून म्होरं जा.. म्या सावित्रीला घिवून येती. तू पुढं जा आणि ही खबर सरकारास्नी सांग.. म्या येतीच.. जा लवकर..खानाची मानसं गाठत्याल समद्यास्नी..”

तुळसाच्या जोडीदारीनीचा पाय तिथून निघेना. तुळसा आणि सावित्रीला अशा अवस्थेत सोडून जाणं तिच्या जीवावर आलं पण तुळसाचा हुकूम ऐकणं तिचं कर्तव्य होतं. नाही.. हो.. करत ती बायकांना घेऊन पुढे जाण्यास तयार झाली. इतक्यात घोड्यांचा टापांचा आवाज जवळ ऐकू येऊ लागला. मोठ्या जड अंतःकरणाने साश्रू नयनांनी त्यांनी तुळसा आणि सावित्रीचा निरोप घेतला आणि त्या नदीच्या दिशेने धावू लागल्या. तुळसाने सावित्रीला उठवून एका हाताने सावित्रीच्या कमरेला धरलं आणि तिचा हात आपल्या खांद्यावर घेऊन तिला उभं केलं. तुळसाच्या आधारानं सावित्री कशीबशी उभी राहिली आणि हळूहळू एक एक पाऊल टाकत चालू लागली.
त्यांचा चालण्याचा वेग मंदावला होता. सावित्रीने तुळसाकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज तिला भासत होतं. मायेनं पाहत सावित्री तिला म्हणाली.

“तुळसाक्का, खरं सांग कोन हाईस तू?”

तुळसाने सावित्रीकडे पाहिलं आणि स्मित हास्य करत म्हणाली.,

“सावू, म्या स्वराज्याची राखणदार.. शिवबा राजं देव हाय आमच्यासाठी..”

सावित्रीने कौतुकानं तुळसाकडे पाहिलं आणि ती तिच्या आधारानं चालू लागली.

इकडे तो म्होरक्या मार्तंडला सोबत घेऊन आपल्या साथीदारांसोबत नदीच्या दिशेने चालत होते. थोड्याच वेळात ते नदीकाठी पोहचणार होते. नदीचं पात्र त्यांच्या दृष्टिक्षेपात होतं. पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत होती. तो म्होरक्या आणि त्याचे साथीदार आजूबाजूचा अंदाज घेत पुढे सरसावत होते. मार्तंडला त्यांच्या वेगानं चालणं शक्य होत नव्हतं. मेहरच्या आधारानं तो कसाबसा चालत होता. अंगावरच्या जखमांमुळे सारं अंग ठणकत होतं. खरंतर त्याला उपचाराची, आरामाची खूप गरज होती पण इथे थांबून चालणार नव्हतं शक्य तितक्या लवकर इथून बाहेर पडणं गरजेचं होतं. त्याची ती अवस्था पाहून म्होरक्या साथीदाराला म्हणाला.,

“त्येला उचलून खांद्यावर टाकून घिवून चला.. येळ नाय ज्यादा..”

त्याच्या साथीदारनं मान डोलावली. मार्तंडला पाठीवर घेतलं आणि भरभर पावलं उचलू लागला. थोड्याच वेळात ते सर्वजण चंद्रभागेकाठी पोहचले. साथीदारनं मार्तंडला पाठीवरून खाली उतरवलं. आधीच त्या म्होरक्याचे अन्य साथीदार त्यांची वाट पाहत तिथे थांबले होते. दोन होड्या नावाडयांसकट येऊन थांबल्या होत्या.

“चला बिगीनं.. नदी पार करून तुमास्नी पल्याड जायचं हाय. खानाची माणसं इथं येण्याआधी निघाय पायजेल..”

असं म्हणत ते सर्वजण नावेच्या दिशेने जात होते. इतक्यात समोरून बुरखेधारी बायका येताना दिसल्या. त्या जवळ येताच म्होरक्याच्या साथीदारांनी बायकांना दुसऱ्या नावेत बसवलं सारं काही ठरल्याप्रमाणे घडत होतं. घाईघाईने म्होरक्याच्या जवळ येऊन यशोदेने त्या म्होरक्याला मुजरा केला आणि म्हणाली.,

“सरकार, तुळसा मागं ऱ्हायली.. एका बाईला घिवून येतीय. सावित्री नाव हाय तिचं. तिच्या पायाला लागलंय चालता येईना म्हनून वकूत लागतुय..नजीकच हाय.. येतील..”

तिचं बोलणं ऐकून म्होरक्या तिथे असलेल्या साथीदारांकडे पाहत म्हणाला.,

“ती लोकं जवळच असत्याल. त्या जखमी माऊलीला पाठीवर टाकून घेऊन या..खानाचे शिपाई त्यांच्यापातूर पोहचण्याआधी तुमी तिकडं जावा. येळ दवडू नगां.. जावा लवकर..”

म्होरक्याचा आदेश मानून त्याचे साथीदार यशोदेने दाखवलेल्या दिशेने पुढे सरसावले. आपल्या दुसऱ्या साथीदारांकडे पाहून उभी असलेल्या नावेकडे बोट दाखवत तो म्हणाला.,

“आन तू, यशोदे, सगळ्यांना घेऊन नदी पलीकडे पोहोचा. तिथून कुठं आणि कसं जायचं? ते तिकडं गेल्यावर कळेलच! चला निघा. हर हर महादेव..”

तिनेही मान डोलावली. हर हर महादेव म्हणत ती त्या इतर बायकांसह पुढे निघून गेली. आतापर्यंतची एकंदरीत परिस्थिती मार्तंडच्या लक्षात आली होती. ती जखमी स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आपली बहीण सावित्रीच आहे हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.

“सावू….”

मार्तंड अतीव दुःखाने मोठ्याने ओरडला. तळहाताने त्याचं तोंड दाबत म्होरक्या म्हणाला.,

“काय करतुयास..गप बस.. खानाचे शिपाई याच दिशेने येत आहेत.. आपली माणसं गेलीत त्या दोघीस्नी आणाय.. गप ऱ्हा..”

मार्तंडने दाटून आलेला हुंदका कंठातच आवरला. आपल्या तोंडावर हात ठेवून त्याने डोळ्यातली आसवं मोठ्या मुश्किलीने आवरली आणि तो सावित्रीची वाट पाहू लागला.

इकडे तुळसा सावित्रीला घेऊन हळूहळू नदीच्या दिशेने चालत होत्या. इतक्यात खानाच्या सैनिकांनी त्या दोघींना वर्तुळाकार वेढा घातला. त्यातला एकजण मोठ्याने हसत म्हणाला.,

“कहाँ भागकर जा रही थी काफर लडकी..? आखिर हमारी गिरफ्त मे फंसही गई.. अब कौन है जो तुम्हे बचायेगा?”

सावित्रीला पकडण्यासाठी त्यातले दोघे घोडेस्वार घोड्यावरून खाली उतरून तिच्याजवळ येऊ लागले. तुळसाने सावित्रीला खाली बसवलं आणि तिने कमरेला लावलेली तलवार बाहेर उपसली.

“आरं भेकडांनो, तिला हात लावन्याआदी दम आसल तर माज्यासंगट दोन हात करून दावा. नाय एकेकाला माय याद आली तर नावाची तुळसा नाय..”

तुळसा सावध पवित्रा घेत तिच्यावर चाल करून येणाऱ्या शिपायाच्या अंगावर धावून गेली. दोघांच्या तलवारी एकमेकींना भिडल्या. तुळसाने गर्रकन वर्तुळाकार फिरून सपकन त्याच्यावर वार केला. तलवारीचं पातं आरपार गेलं. तो जागीच गतप्राण झाला. तितक्यात दुसरा शिपाई सावित्रीला धरून ओढत घेऊन जाऊ लागला. तुळसाचं तिकडे लक्ष गेलं ती वाऱ्याच्या वेगानं धावत आली आणि सावित्रीला फरफटत ओढून घेऊन जाणाऱ्या हातावर तलवारीचा जोरदार वार केला. त्याचा हात धडावेगळा झाला.

“या अल्लाह!”

तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला. पंजा तुटलेला हात दुसऱ्या हातानं पकडून तो घोड्यावर स्वार असलेल्या शिपायांच्या दिशेने पळून जाऊ लागला. समोरचं ते दृश्य पाहून बाकीचे शिपाई भयभीत झाले. त्या सर्वांनी एकदम तिच्यावर हल्ला केला. ती एकटी मर्दानी झुंज देत होती. त्यांचे प्रहार चुकवत होती. पण ती झुंज, तिची शक्ती त्या तिघा सैनिकांसमोर अपुरी पडत होती. तुळसा रक्तबंबाळ झाली होती पण मरणाच्या दारात असूनही तिने हार पत्करली नव्हती. लढून लढून तिचा श्वास फुलला होता. तिला दम लागला होता. इतक्यात एका शिपायाने मागून तिच्यावर हल्ला केला तलवारीचं पातं तिच्या पाठीत खुपसणार इतक्यात क्षणाचाही विलंब न करता सावित्री विद्युलतेसारखी आपल्या पायाच्या जखमेची पर्वा न करता वेगाने धावत तुळसाच्या मागे येऊन उभी राहिली आणि तुळसावर झालेला वार तिने तिच्या अंगावर घेतला. तलवारीचं टोक सावित्रीच्या पोटात आरपार गेलं. सावित्री तलवारीसकट जमिनीवर कोसळली.

“सावित्री..”

तुळसा दुःखाने किंचाळली.

“मागून वार करतो व्हय नामर्द कुठंचा..”

असं म्हणत तुळसाने त्या शिपायाच्या मानेवर सपकन वार केला. तो खाली कोसळला. तुळसा पटकन सावित्रीजवळ बसली. तिच्या पोटात आरपार गेलेली तलवार उपसून बाहेर काढली. रक्ताची चिळकांडी उडाली. सावित्री वेदनेने जोरात किंचाळली. इतक्यात तुळसाचे साथीदार तिथं पोहचले. त्यांनी खानाच्या सैनिकांचा खात्मा केला. त्यातला एक शिपाई तिथून पळून गेला. जाता जाता ओरडला.

“काफर, खान हुजूर तुम्हे नही छोडेंगे| हम फिर आयेंगे.. इसका बदला जरूर लेंगे..”

“जा रं कुत्र्या,..”

तुळसा त्याच्या अंगावर धावून जात ओरडली. तिचे साथीदार त्यांच्या जवळ आले. सावित्री खूप जखमी झाली होती. त्या जखमी अवस्थेत ती तुळसाला म्हणाली.,

“तुळसाक्का, माज्या भावाची काळजी घे.. लई जीव हाय त्येचा माज्यावर.. सांभाळ त्येला..”

तुळसाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

“गप सावे, तुला काय बी व्हायचं नाय. म्या काय होऊ द्यायची नाय. चला रं पाठकुळी घ्या हिला. नदीकाठी जाऊ..”

तुळसा तिच्या साथीदाराला म्हणाली. तिच्या साथीदारानं सावित्रीला पाठीवर घेतलं आणि ते सर्वजण नदीच्या दिशेने चालू लागले.

पुढे काय होतं? मार्तंड आणि सावित्रीची भेट होते का पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all