मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा भाग २०

ही कथा एका शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..



मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग २०


हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.

भाग २०

फाजलखान खाली जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला लागलं होतं. तो उठून बसेपर्यंत त्या स्त्रीने सावित्रीचा हात हातात धरला आणि त्या दोघी त्याच्या शामियान्यातून निसटल्या. पावसामुळे छावणीतल्या मशाली, शामदाण्या विझल्या होत्या. पाल, डेरे अस्ताव्यस्त झाले होते. सर्वत्र दाट अंधार असल्याने पुढचं काहीच दिसत नव्हतं. छावणीतले शिपाई पडझड झालेली पालं उभी करण्यात, छावणीतल्या मशाली, शामदाण्या पेटवण्यात गर्क होते. गर्द अंधाराचा फायदा घेऊन सावित्री आणि ती स्त्री तिथून निसटून गेल्याचं शिपायांच्या लक्षातही आलं नाही. त्या दोघी मोठ्या शिताफीने सर्वांची नजर चुकवून फाजलखानाच्या शामियान्यातून बाहेर पडल्या. डोक्याला हात लावत फाजलखान धडपडत उठला. आपल्या सेवकांना आवाज देऊ लागला. सर्वत्र अंधार झाल्याने छावणीत गदारोळ झाला. घाबरून बायका आरडाओरडा करू लागल्या त्यामुळे त्या गोंधळात फाजलखानाचा आवाज शिपायांच्या कानावर पडला नव्हता त्यामुळे शामियान्यात कोणीच आलं नाही. फाजलखान शामियान्याच्या प्रवेशद्वारापाशी आला आणि जोरात ओरडून म्हणाला,

“कौन है वहाँ?”

त्याच्या आवाजाने पालिते पेटवणाऱ्या सैनिकांचं लक्ष त्याच्याकडं गेलं. शिपाई धावतच त्याच्याजवळ आले आणि मान खाली घालून उभे राहिले.

“वो काफर लडकी यहाँसे भाग गयी है| ज्यादा दूर नही गयी होगी| जाओ उसका पिछा करो. भागने ना पायें..”

डोकं चोळत फाजलखानाने शिपायांना हुकूम सोडला.

“जी हुजूर..”

सैनिक तातडीने सावित्रीला शोधण्यासाठी निघाले. सावित्री आणि ती स्त्री बाहेर पडल्या. ठरल्याप्रमाणे  त्या स्त्रीचे इतर साथीदार बंदी बनवलेल्या बायकांना सोडवून त्यांच्या सोबत  झुडपात लपून त्यांची वाट पाहत लपून बसले होते. सावित्री आणि ती स्त्री तिथे  पोहचताच त्यातल्या एकीनं हातातलं गाठोडं समोर धरलं आणि म्हणाली,


“जनानखान्यातनं उचलल्यात.. बुरखे हाईत..”


“झ्याक काम केलंस. आत जा बायास्नी घालायला दे आन चला बिगीनं. येळ दवडू नगं.. नदीवर जायचं हाय.. जा लवकर..”

तिनं मान डोलावली आणि पटकन  झुडपात आली. तिने त्यांना बुरखे चढवायला सांगितलं.

“चला लवकर.”

त्या साऱ्याजणी बाहेरच्या दिशेने झपाझप पावलं टाकत निघाल्या. सावित्रीला काहीच समजत नव्हतं. ती फक्त त्यांच्यामागे जात होती. छावणीपासून आता त्या बऱ्याच दूर गेल्या होत्या. पावसानं निसरडी झालेली पायवाट तुडवत त्यांनी बरंच अंतर कापलं होतं. पुढं गेल्यावर घनदाट जंगल लागलं. गर्द झाडीतून मार्ग काढणं तसं कठीणच होतं. जंगली श्वापदांपासून स्वतःचा बचाव करत त्या चंद्रभागा नदीच्या दिशेने चालल्या होत्या. चालून चालून दमल्यावर सावित्री आणि बाकीच्या बायका एका वडाच्या झाडाखाली थांबल्या. सावित्रीच्या मनात बरेच प्रश्न साचले होते. न राहून सावित्रीने त्या अनामिक स्त्रीला प्रश्न केला.

“कोन हायसा तुमी? आक्शी भवानीआय आली राखन करायला तुमच्या रूपानं.. लई उपकार झालं बघा पर तरी बी तुमी का आलात मदतीला? का म्हनून तुमी आमच्यापाई ही जिवाची जोखीम घिटली?”

सावित्रीच्या प्रश्नांसरशी ती स्त्री हसून म्हणाली,

म्या तुळसा, तुमा समद्यास्नी सुखरूप नदीकाठी घिवून यायचा हुकूम हाय..”

“कोणाचा हुकूम? माज्या शिवबा राजाचा? की आणखी कुणाचा?”

सावित्रीनं गोंधळून प्रश्न केला.

“अगं बाय, किती सवाल ते? समदं सांगती. आतापतूर आपुन निसटल्याची खबर खानाला लागली असंल तवा आधी आपल्याला हिथनं निसटाय पायजेल. खानाची मानसं आपल्या मागावर असत्याल. नदीकाठी मानसं वाट बघत हाईत.. चल लवकर..”

थोडं थांबून तिच्याकडे पाहत तुळसा म्हणाली.

आन तसं बी तू जिजाऊची लेक, राजाची भन हाय नव्हं का? मंग तुजी रक्षा कराय नगं?”

तिच्या बोलण्यावर सर्वांना हसू फुटलं. सावित्री लाजून गोरीमोरी झाली. थोडा वेळ थांबून त्या पुन्हा चालू लागल्या.

पावसाचा जोर थोडा ओसरला होता. हळूहळू रात्र सरत होती. तांबडं फुटू लागलं होतं. कोंबड्याने बाग दिली. कालचं ढगाळ वातावरण निवलं होतं. आकाश स्वच्छ निरभ्र दिसत होतं. सूर्यनारायणाने डोंगराआडून दर्शन दिलं होतं. पाखरांच्या किलबिलाटानं सारं वातावरण प्रसन्न झालं होतं. त्यासोबतच खानाच्या छावणीतला गोंधळही हळूहळू कमी झाला होता. पावसानं सारं उध्वस्त केलं होतं. सैनिकांसाठी बनवलेली पालं, अस्ताव्यस्त झालेले निवारे सगळे मिळून ठीक करण्याचे काम सुरूच होतं. अर्धी अधिक पालं पुन्हा ठोकण्यात आली. जनानखान्यातल्या स्त्रियांना दुसऱ्या डेऱ्यात हलवण्यात आलं. अंबरखान स्वतः प्रत्येक डेऱ्यात जाऊन शहानिशा करत होता. इतक्यात एक शिपाई तिथे धावत आला. त्यानं त्याला वाकून कुर्नीसात केला आणि भीतभीत म्हणाला,

“हुजूर, इक बुरी खबर है| वो काफर मार्तंड भाग गया.. हमने पूरे छावनीमे उसे ढुंढा लेकिन वो कही नही मिला|”

त्याने मान खाली घातली.

“क्या.. ये कैसे मुमकीन है? इतना कडा पहरा होने के बावजूद भी वो कैसे भाग सकता है? हमारे सिपाही क्या घोडे बेचकर सो रहे थे? अब हम हुजूर क्या जवाब देंगे?”

अंबरखान चिडून म्हणाला. हुजऱ्या खाली मान घालून उभा होता. काय करावं या विचारात असतानाच अजून एक शिपाई धावत आला. धापा टाकत म्हणाला,

“हुजूर, वो लडकी जिसे हमने हुजरके सामने पेश किया था वो हमने कैद की गई सारी औरतों को लेकर भाग गई|”

“या अल्लाह!!”

कपाळावर हात मारून घेत अंबरखान मटकन खाली बसला. काय करावं त्याला काहीच समजेना.

“अब हुजूर को क्या मुंह दिखाये? अब किसी की खैर नही| लेकिन खबर भी तो देनी होगी..”

तो मनातल्या मनात पुटपुटला. ही खबर अफजलखानाच्या कानावर घालावी या विचाराने खानाच्या शामियान्याच्या दिशेने जाण्यास निघाला. खान झोपेतून नुकताच उठला होता. रात्रीच्या सरबताची धुंदी उतरली होती. इतक्यात हुजऱ्याने अंबरखान आणि फाजलखान येण्याची वर्दी दिली. खानानं आत येण्याची परवानगी दिली. आत येताच अंबरखानानं मुजरा करून भीतभीत बोलायला सुरुवात केली.

“हुजूर.. वो.. दरअसल बात ये है की.. इक बुरी खबर है| कल रातके बारिश का फायदा उठाके वो काफर मार्तंड और वो लडकी बाकी लडकियों के साथ हमारे कैदसे भाग गये| हमारे सिपाही अपनी छावनीमे उन्हे ढुंढ रहे हैं| बहुत जल्दी वो दोनो अपनी गिरफ्तमे होंगे..|”

चाचपडत अंबरखानाने बातमी सांगून टाकली. खानाच्या कपाळावर आठी पडली. आपली दाढी कुरवाळत त्याने फाजलखानाकडे पाहिलं. फाजल खजिल झाला आणि त्याने मान खाली घातली.

“फाजल, इतने मामुलीसे मामलेमे भी अब हमे ध्यान देना होगा? एक छोटेसे सिपाहीको ढुंढनेके लिए अब हमे दखलअंदाजी करनी पडेगी? इस माजरे को तुम तुम्हारे तरिकेसे सुलझाओ| अंबरखान तुम फाजलके साथ रहकर उसकी मदद करोगे| हमे और भी बहुत काम है| ”

खान गरजला.

“जी अब्बाजान..”

असं म्हणून फाजलखान आणि अंबरखान यांनी खानाचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडणार इतक्यात अमीनाबाई ऊर बडवत खानाच्या शामियान्याबाहेर येऊन दाखल झाली. ती खूप मोठमोठ्याने आक्रोश करत होती. बाहेर कलकलाट ऐकून खान चिडून म्हणाला,

“ये कैसा शोर है अंबरखान? क्या माजरा है?”

“हुजूर, अभी देखता हुं|”

अंबरखान शामियान्याबाहेर पडणार इतक्यात अमीनाबाईने शिपायांना न जुमानता खानाच्या कक्षेत प्रवेश केला.

“रहम हुजूर.. रहम.. हम लुट गये.. तबाह हो गये..”

ती मोठमोठ्याने रडत बोलू लागली.

“खामोश.. क्यूँ शोर मचा रही हो? हमारे सामने उंची आवाज में बात करना हमे बिलकुल भी पसंद नही? और हमारे इजाजत के बिना तुम अंदर कैसे आयी? अंजामों का डर नही लगता तुम्हे?”

खानाचा आवाज संपूर्ण शामियान्यात पसरला. सगळीकडे शांतता पसरली. अमीनाबाई हमसत बोलू लागली.

“गुस्ताखी माफ जहाँपनाह, लेकिन बातही ऐसी है..”

“क्यूँ क्या हुआ? कौनसा आसमान टूट पडा? या तुफान आया है? जो तुम इतनी चिल्ला रही हो..”

खान तिच्यावर डाफरत म्हणाला. ती खाली मान घालून सांगू लागली

“हुजूर, वो काफर मार्तंड हमारे मेहरको भगाकर ले गया.. हमारी रोजी रोटी उसने छिन ली.. अब हम किसके सहारे जिये? कौन हमे संभालेगा? अब आपही बताईये हुजूर.. हम क्या करे?”

अमीनाबाई विलाप करू लागली. खान उठून उभा राहिला. त्याने सर्वत्र एक नजर टाकली. थोडा वेळ विचार करून ताडामाडाचा तो विशाल देह मोठ्याने गरजला.

“फाजल, इस मामलेकी पुरी तरहसे जांच हो.. हमे ये कोई बहुत बडी साजिश लग रही है.. वो काफर मार्तंड हमारे लिए मुश्किले पैदा कर सकता है.. वो दोनों हमे किसीभी हालत मे मिलने चाहिये उन्हे हमारे सामने पेश करो जिंदा या मुर्दा?”

“जी अब्बाजान..”

फाजलखान खानाने मान डोलावली. तिथे उभे असलेल्या सेवकाकडे पाहत खान म्हणाला,

“अब हम आराम करना चाहते है.. थोडी देरमे घोरपडे और परतापराव इनको यहाँ आनेका का संदेशा भेज दो| हमे बहुत जरुरी गुफ्तगू करनी है|”

सेवकांने मान डोलावली आणि तो बाजींना बोलवण्यासाठी तिथून निघून गेला. फाजलखान आणि अंबरखान तिथून तडक बाहेर पडले. सैनिकांनी संपूर्ण छावणी धुंडाळून काढली पण मार्तंड आणि मेहर कुठेच सापडले नाहीत. मग सैन्याची एक तुकडी मार्तंड आणि सावित्रीच्या मागावर पाठवण्यात आली.

इकडे मार्तंड आणि मेहर त्या शिपायांबरोबर चालत होते. गर्द झाडीतून मार्ग काढत ते पुढे जात होते. हळूहळू चंदभागा नदीचा तीर जवळ येऊ लागला. नदीच्या वाहण्याचा आवाज कानी पडू लागला. लवकरच ते इच्छित स्थळी पोहचणार होते.

पुढे काय होतं? मार्तंड आणि सावित्री यांची भेट होऊ शकेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all