मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग १८

हि कथा एका शूर वीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..

हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..

भाग १८

मार्तंडला हतबल झालेलं पाहून खानाला असुरी आनंद मिळत होता. खान तिच्या दिशेने झेप घेणार इतक्यात मागून एक आवाज आला.

“रुक जाये हुजूर..,”

खानासहित तिथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या माना आवाजाच्या दिशेने वळल्या. सावित्रीने पटकन लुगड्याचा पदर अंगावर घेतला आणि ती एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. लगेच शिपायांनी तिला घेराव घातला. अमीनाबाई आपल्या साथीदारांसह संथ चालीने येत होती. डोळ्यांत सुरमाँ, ओठांवर नुकताच खाल्लेल्या विड्याचा लाल चुटूक रंग पसरला होता. दोन बोटं आपल्या ओठांवर ठेवून तिनं सेवकांने समोर धरलेल्या पिंकदाणीत पचकन पानाची पिचकारी मारली आणि आपल्या उजव्या हातांची बोटं कपाळावर लावून सलाम करत खानाकडे पाहत म्हणाली.,

“हुजूर, आदाब.. यहाँ ‘मलिका ए हुस्न’ आपकी इक नजर के लिए बेकरार है और आप ये कहाँ उलझे है?”

“कौन हो तुम? हमारे इजाजत के बिना हमारे छावनीमें कैसे दाखिल हो गई? किसने इजाजत दी?”

खान अमीनाबाईला दरडावत बोलला.

“गुस्ताखी माफ हो हुजूर, हम विजापूरके रंगमहल कोठेसे आये है| इस नाचीजको अमीनाबाई कहते है| आपके खिदमतमें हाजीर हुये है|”

अमीनाबाई स्मित हास्य करत म्हणाली. खानाच्या कपाळावर किंचितशी आठी पडली. तो विचार करू लागला. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी तो फक्त दोन तीन वेळा रंगमहालात गेला होता. त्यानंतर तो कायम मोहिमेवरच असायचा त्यामुळे तिकडे त्याचं फारसं जाणं व्हायचं नाही. तो अमीनाबाईला आठवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला तिचा चेहरा अजिबातच आठवत नव्हता. खानाच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. तिच्याकडे रोखून पाहत तो म्हणाला.,

“लेकिन अब इस वक्त यहाँ क्यूँ आयी हो? किसने बुलाया?”

“हुजूर, जहाँपनाह आदिलशहा का हुकूम था| रंगमहलके सिपाही आपके मदद के लिए यहाँ आपकी छावनीमें तैनात हो जाये| हमने सोचा आपकी खिदमत का हमे मोका मिलेगा और हमारे नाचगानेसे आपका और आपकी सेना का मन भी बहल जायेगा..”

खानानं त्याच्या मुख्य सरदाराला, अंबरखानाला विचारून या गोष्टीची शहानिशा करून घेतली. त्याच्याकडून खात्री करून घेतल्यावरच खानाचा अमीनाबाईच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्याने मैफिल सुरू करण्याचा आदेश दिला तसं अमीनाबाईनं तिच्या साथीदाराला आवाज दिला. तिच्यासोबतचे साथीदार आणि संगीतवादक आपल्या वाद्यांसह तिथे येत होते. इतक्यात पालखीतून एक स्त्री खाली उतरली. तिच्या पायातल्या घुंगरांचा आवाज चोहीकडे पसरला. नाजूक पावलांनी ती खानाच्या दिशेने येत होती. तिच्या मागोमाग तिच्या सहकलाकार ललनाही येत होत्या. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या. मोतीया रंगांचा मोगलाई पेहराव तिनं परिधान केला होता. गळ्यात मोत्यांच्या माळा तिच्या सौन्दर्यात अजूनच भर घालत होत्या. हातातले हिऱ्याचे कंगण रात्रीतही चमकत होते. चेहऱ्यावर तलम मलमली पर्दा होता. ती खानासमोर येऊन उभी राहिली. जणू स्वर्गातून एखादी हुस्नपरी अवतरली होती. निशाण्याच्या स्तंभाकडे तिची नजर गेली. दोरखंडानी बांधलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत उभा असलेला मार्तंडला, आपल्या प्रेमाला असं रक्तबंबाळ, जखमी अवस्थेत पाहून जीवात तिच्या कालवाकालव झाली. आसवांनी पापण्याचा उंबरठा कधीच ओलांडला होता. तरीही ती शांत उभी होती. तिने अलगद चेहऱ्यावरचा पर्दा दूर केला. आपली नाजूक बोटं कपाळावर लावत तिने सर्वांना सलाम केला.

“वाह्ह! सुभानअल्लाह..!”

तिचं ते आरस्पानी सौन्दर्य पाहून उत्स्फूर्तपणे खानाच्या तोंडून उदगार बाहेर पडले आणि त्याच्याही नकळत त्याची पाऊले जागीच थबकली. तो मुग्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला. मार्तंडने तिच्याकडे पाहिलं. समोर मेहरला पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित आनंदाची लकेर उमटली. दोघांची नजरानजर झाली. मार्तंडच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटू लागले.

“कावेरी..? इथं..?”

तिला पाहताच त्याच्या काळजात धस्स झालं.

“कावेरी, कशाला आलीस इथं? ह्यो खान हैवानाची अवलाद.”

खानाची वखवखलेली नजर मेहेरच्या सर्वांगावरुन फिरत होती. पण इकडे मार्तंडाच्या काळजात क्षणाक्षणाला चिरे पडत होते. शरीरावर झालेल्या घावांपेक्षा तिच्या सर्वांगावरुन फिरणाऱ्या खानाच्या नजरेनं होणाऱ्या दुःखाची तीव्रता त्याला कैक पटींनी जास्त भासू लागली. पण एक आनंदाची चमक त्याच्या डोळ्यांत तरळली. मरण्याच्या अगोदर एकदा कावेरीला पाहण्याची इच्छा त्याची पूर्ण झाली. दोघांची नजरानजर झाली. डोळ्यांनीच शब्दांची आणि मुक्या भावनांची देवाणघेवाण झाली. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू दाटले. डोळ्यातून ओसंडू पाहणारे अश्रुंचे दोन थेंब कुणाच्याही लक्षात येण्याआधी मेहेरने पटकन बोटांनी टिपले. मेहरने नजर फिरवली. खानाकडे मादक नजरेने पाहत म्हणाली.,

“हुजूर, इस नाचिज मेहर का सलाम कबूल करे| आप की खिदमतमें कुछ पेश करने की तमन्ना है अगर आपकी इजाजत हो तो..”

आपल्या जागेवर जाऊन बसत खानानं मान डोलावली आणि हात वर करून परवानगी दिली. मेहरने उजवा हात कानावर ठेवत उंच आलाप घेतला. सूर इतका गोड लागला होता की सारे मंत्रमुग्ध होऊन तिचं गाणं ऐकत होते. घुंगरांच्या तालावर, वाद्यांच्या सुरावर मेहरची पावलं थिरकत होती. मेहरच्या मोहक अदानी, नृत्यअविष्कारांनी सर्वजण घायाळ झाले होते. सरबताचे प्यालेच्या प्याले रिचवले जात होते. सारं वातावरण मदहोश झालं होतं. काही सरदार झोकांड्या घेत होते. काहीजण जागीच आडवे होऊ लागले. खानही सरबताच्या धुंदीत जाऊ लागला. डोळ्यावर सरबताची धुंदी चढू लागली. थोड्याच वेळात मैफिलची सांगता झाली. खानानं मेहरकडे पाहत सेवकांना आदेश दिला.

“हम आराम करना चाहते है| इस हुस्न ऐ मलिकाको हमारी खिदमतमें पेश की जाय..”

सेवकांच्या मदतीने खान आपल्या शामि्यान्याच्या दिशेने जाऊ लागला पण सरबताच्या धुंदीमुळे त्याला धड चालताही येत नव्हतं. कसाबसा खान आपल्या शामियान्यात पोहचला.

आपली बहीण आणि कावेरी शत्रूच्या गोटात अडकलेल्या आणि आपण काहीच करू शकत नाही. या ना त्या असंख्य विचारांनी मार्तंडचं डोकं भानाणून सोडलं. काय करावं, काही कळेना. तोच मेहरला खानाच्या शामियान्यात बोलावल्याचं त्याच्या कानावर पडलं. खानाचा आदेश ऐकताच मार्तंडच्या काळजाचं पाणी झालं. खानाच्या हुकूमाचं पालन करण्यात आलं. मेहरला खानाच्या शामियान्यात आणलं गेलं. सेवकांनी खानाला त्याच्या पलंगावर बसवलं आणि ते बाहेर निघून गेले. आता शामियान्यात मेहर आणि खान दोघेच होते. मंचकावर ठेवलेल्या तबकातील सरबताची सूरई उचलून मेहरने सरबताचा प्याला भरला आणि त्याच्या जवळ गेली. तिच्या ओठांवरच्या खट्याळ हसण्यात खान गुंतून गेला. तिने सरबताचा प्याला तिच्या नाजूक गुलाबी नरम ओठांना लावून तिने मादक नेत्रांनी खानाकडं पाहिलं आणि तो प्याला पुढे केला. खानाने तिच्या हाताने सरबताचा एक घोट रिचवला. त्यानंतर मात्र अनेक प्याले भरले गेले. खान हळूहळू निद्रेच्या आधीन होऊ लागला.

इकडे सावित्री शिपायांच्या नजरकैदेत होती. फाजलखान तिच्याकडे पाहून म्हणाला.,

“अब ये शिकार तो हमारा हुआ| आब्बाजान ने तो तुम्हे बक्श दिया| हमारे गिरफ्तसे कौन तुम्हे छुडायेगा?”

फाजलच्या हसण्याचा गडगडाट झाला. त्याने टाळी वाजवून शिपायांना बोलवलं आणि सावित्रीला त्याच्या शामियान्यात घेऊन जाण्याचा हुकूम दिला. सावित्री जिवाच्या आकांताने विरोध करत होती. पण त्या दणकट शिपायांसमोर तिची शक्ती अपुरी पडत होती. ती त्वेषाने ओरडत होती पण सावित्रीची कोणाला दया आली नाही. मार्तंडच्या डोळ्यांदेखत सावित्री आणि मेहरला फाजल आणि खानाच्या शामि्यांन्यात घेऊन जाण्यात आलं. मार्तंड शिपायांना ओरडत होता. हाताच्या मुठी वळल्या जात होत्या. स्वतःच्या सुटकेसाठी तो धडपडत होता जेणेकरून तो सावित्री आणि मेहरची रक्षा करू शकेल पण तो हतबल होता. त्याची या नरकयातनेतून सुटका होणं निव्वळ अशक्य होतं. मार्तंडच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

रात्र दाटू लागली तसं वातावरण भकास वाटू लागलं. सगळीकडे एक निरव शांतता पसरली होती. कुंद वातावरण, त्यात वाराही शांत होता. आकाशात मात्र विजांचा लपंडाव नि काळ्या ढगांची गर्दी. ठिकठिकाणी पहाऱ्यावरचे सैनिक नि पेटत्या मशाली भुरभुरत होत्या. अचानक, विजेचा कर्णकर्कश्य आवाज घुमला नि लक्खकन सारा आसमंत त्या प्रकाशाने उजळून गेला. कडाडत्या विजेचा लोळ समोरच्या डोंगरात नाहीसा झाला. त्यापाठोपाठ एका मोठ्या विस्फोटाचा कानठळ्या बसवणारा नि छातीत धडकी भरणारा आवाज. त्या आवाजाने छावणीतले पहारेकरी मात्र घाबरून गेले. तोच आकाशात ढगांचं गडगडाटी आक्राळ विक्राळ हास्य घुमू लागलं. झोपलेल्या सैनिकांची डोळ्यांवर आलेली झोप खाडकन उतरली. जो तो बाहेर येऊन आकाशाच्या दिशेने पाहू लागला. इतक्यात सोसट्याचा वारा सुरू झाला. वाऱ्याने पालापाचोळा उडू लागला. जमिनीवरची माती वाऱ्यानं आपल्यासोबत घेतली नि साऱ्या छावणीभर धुळीचे लोट उडवत हैदोस घालू लागला. सैनिकांसाठी केलेली पालं, निवारा वाऱ्यामुळे अस्ताव्यस्त होऊ लागली. पलिते, मशाली केव्हाच्याच विझून गेल्या होत्या. सगळीकडे अंधार नि फक्त अंधार. सैनिकांची पळापळ होऊ लागली. आपले ढेरे, सामान, घोडे वाचण्यासाठी एकच धांदल उडाली.

वाऱ्याचा एक जोरदार झपकारा स्तंभाला बांधलेल्या मार्तंडाच्या चेहऱ्यावर आदळला. चेहऱ्यावर आलेले केस बाजूला झाले. मार्तंड किलकिल्या डोळ्यांनी निसर्गाचं रौद्र रूप पाहण्याचा प्रयत्न करू लागला. विजेच्या लखलखाटात सारी छावणी उध्वस्त झालेली दिसत होती. जो तो इकडे तिकडे पळतांना दिसत होता. सुटण्यासाठी हीच योग्य वेळ होती पण त्याचे हात पाय स्तंभाला करकचून बांधल्यामुळे त्याला काहीच हालचाल करता येत नव्हती. दिवसभराच्या मारामुळे नि उपवासामुळे त्याच्या अंगात आता त्राणही उरले नव्हते. फक्त समोर चालली धांदल तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता. पुन्हा एकदा विजेचा लखलखाट झाला नि, त्याला समोरून त्याच्या दिशेने येणारे चार पाच हशम दिसले. हातात नंग्या तलवारी. जवळ येताच दोघांनी त्याचे बांधलेले हात पकडले. समोरच्याने त्याच्यावर तलवार उगारली. आता आपला काळ आला आहे, मार्तंडने ओळखले. डोळे बंद करून त्याने एकवार शंभू महादेवाचं नामस्मरण केलं नि राजांना उद्देशून म्हणाला,

"राजं... माफ करा मला. खबर आपल्यापातुर न्हाय पोहोचवू शकलो. मार्तंडाचा ह्यो शेवटचा मुजरा." म्हणत त्याने मान खाली झुकवली नि होत्या नव्हत्या शक्तीनिशी त्याच्या कंठातून आवाज आला,

"हर हर महादेव."

तलवारी सपकन फिरल्या. स्तंभाला एक जोरदार दणका बसला. गळ्यात अडकवलेली डोक्याच्यावर स्तंभाला बांधलेली दोरी तुटली. हातही मोकळे झाले आणि मार्तंड "हर हर महादेव.." म्हणत खाली कोसळला.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all