Feb 24, 2024
बालकथा

कोंबड्या चं लग्न

Read Later
कोंबड्या चं लग्न

     (सदर कथा ही एक काल्पनिक कथा आहे. )

   एका छोट्याशा गावात एक म्हातारी राहत होती. म्हातारीला स्वतःचं म्हणून असं कोणीच नव्हते. ना कोणी नातेवाईक, ना मूलबाळ , ना नवरा, पण तिच्याकडे होता एक कोंबडा . त्या कोंबड्या वर ती स्वतःच्या नातवा प्रमाणे प्रेम करत होती. ती त्याच्याशी बोलत होती,   त्याच्यासाठी छान छान पदार्थ करून त्याला खाऊ घालत होती , पण दिवसेंदिवस म्हातारी थकत चालली  होती म्हणून,  ती म्हातारी एक दिवस त्या कोंबड्याला म्हणाली, - \"बेटा मी आता थकली आहे,  तुझ्या साठीच काय पण मी स्वतःसाठी हि आता स्वयंपाकपाणी करू शकत नाही.  तू एक काम कर  आपल्या गावाजवळच आपल्या राज्याची राजधानी आहे.  मी असे ऐकले आहे की,  आपला राजा फार दयाळू आहे , तो तुला नक्कीच एखादं काम देईल , किंवा नोकरीला ठेवून घेईल, तुला नोकरी लागली की, तुझं लग्नही चटकन होईल , मग तू तिथे राहा आणि मला तुझ्या जवळ राहायला बोलावून घे\". म्हातारीचं  म्हणणं कोंबड्याला पटलं आणि कोंबडा लगेच राजधानीकडे जायला निघाला.

            कोंबड्याचा स्वभाव खूप छान होता . तो गावात सगळ्यांना मदत करत होता आणि त्याला मित्रही खूप होते. कोंबड्याला बाहेरगावी जाताना पाहून त्याची मैत्रीण मुंगीने त्याला विचारले , -\"कोंबडे भाऊ कोंबडे भाऊ कुठे चालले? 

कोंबडा म्हणाला , - \"लगीन करायला पोट भरायला\". 

मुंगीने त्याला विचारले, - \"मी येऊ का तुझ्यासोबत?कोंबडा म्हणाला, - हो ये .

मुंगी म्हणाली, -\"मी कुठे बसू?\"

कोंबडा म्हणाला,- \"बस माझ्या पंखात\".

            पुढे गेल्यावर कोंबड्याला त्याचा मित्र सापाचे पिल्लू भेटलं.

सापाचं पिल्लू म्हणालं,- \"कोंबडे भाऊ , कोंबडे भाऊ,  कुठे चालले?\"

कोंबडा म्हणाला, -\"लगीन करायला पोट भरयला\". सापाच्या पिल्लाने विचारलं,- \"मी येऊ का तुझ्यासोबत?\"

कोंबडा म्हणाला, - ये .

सापाचं पिल्लू म्हणालं, - \"मी कुठे बसू?\" 

कोंबडा म्हणाला , -\"बस माझ्या पंखात\".

           आणखीन पुढे गेल्यावर कोंबड्याला भेटतो विस्तव.

विस्तवाने कोंबड्याला विचारलं , - \"कोंबडे भाऊ, कोंबडे भाऊ कुठे चाललात?\"

कोंबडा म्हणाला, - \"लगीन करायला पोट भरायला!\" 

विस्तवाने त्याला विचारलं , -\"मी येऊ का?\"

 कोंबडा  म्हणाला, - "हो ये\".

विस्तवने विचारलं, "मी कुठे बसू?"

कोंबडा म्हणाला, - \"बस माझ्या पंखात\".

          त्यानंतर कोंबड्याला चालता, चालता लागते त्याच्याच गावातली नदी.

नदीतला पाण्याचा थेंब म्हणतो, - \"कोंबडे दादा , कोंबडे दादा कुठे चाललात\"

कोंबडा म्हणाला,-  \"लगीन करायला पोट भरायला\". पाण्याच्या थेंबाने कोंबड्याला म्हटले म्ह -\"मी येऊ का तुझ्यासोबत?\".

कोंबडा म्हणाला ,- \"हो ये\".

पाण्याचा थेंब म्हणाला,- \"मी कुठे बसू?\" 

कोंबडा म्हणाला -\"बस माझ्या पंखात\".

                  कोंबडा आणि त्याचे सगळे मित्र जातात राज्याच्या राजधानीत. राजवाड्याच्या तटबंदीवर बसून कोंबडा इकडे तिकडे बघत होता, तर तिथे त्याला राज्याची राजकन्या , तिच्या बाहुलीचे कपडे धुताना दिसली. कपडे धुता धुता राजकन्या तोंडाने \"सुसू\" करत होती. कोंबडा होता खोडकर,  राजकन्येने \"सुसु\" म्हंटलं की ,

कोंबडा लगेच म्हणायचा, -\"राजाची कन्या , माझी बायकोच तू!\",

   राजकन्या सुसु म्हणते आणि कोंबडा तिला बायको , बायको म्हणतो. कोंबड्याचं हे बायको,  बायको चिडवणे राजकन्येला अजिबात आवडलं नाही . तीने त्याला हुसकावून लावण्याचा खुप प्रयत्न केला , शिपायांना पण सांगीतले, पण कोबडा होता चपळ, तो लगेच इकडे तिकडे उडाला. शेवटी वैतागून राजकन्ये ने राजाकडे त्या कोंबड्याची तक्रार केली . 

राजकन्या म्हणाली, \"पिताजी,  पिताजी,  बघा ना! हा कोंबडा मला सारखं , सारखं बायको , बायको म्हणून चिडवतो  ! त्याला चांगली शिक्षा करा!\"

            राजाचं आपल्या एकुलत्या एक राजकान्येवर जीवापाड प्रेम होतं.  त्यांनी लगेच शिपायांना हुकूम दिला. 

राजा म्हणाला , - \"जा रे!  त्या कोंबड्या ला पकडा आणि गजशाळेत नेऊन हत्तीं च्या पाया खाली द्या! तिथले हत्ती याला पायाखाली चिरडून टाकतील, त्याशिवाय या कोंबड्याला अद्दल घडणार नाही!\"            शिपाई कोंबड्या ला पकडायला गेले पण,  कोंबडा कोणाच्याच हाती लागला नाही.  शेवटी शिपायांची केविलवाणी अवस्था बघून,  कोंबड्याने मुद्दामच शिपायांना स्वतःला पकडू दिले . शिपाई त्याला गज शाळेत घेऊन गेले,  ते कोंबड्याला हत्तीच्या पायाखाली देणार असतात पण , कोंबडा गजशाळेच्या उंच खांबावर जाऊन बसला. गजे शाळेतले मदमस्त हत्ती कोंबड्याला आपल्या सोंडी उंच करून, करून चिथावणी देतात. पण कोंबडा बसलेला होता उंच खांबावर , तो काही हत्तींच्या हाती  लागला नाही. हत्तींना अद्दल घडवण्यासाठी कोंबड्याने मुंगीला बोलावले.

कोंबडा म्हणाला,  -\"सऽर्रऽ सपाटा रऽरऽ रफाटा पाहुदे  मुंगी तुझा झपाटा\".

   मुंगी कोंबड्यांच्या पंखातून बाहेर येऊन,  तिच्या असंख्य मैत्रिणी बोलावून आणले. मुंगीच्या सगळ्या मैत्रिणी हत्तींच्या कानांमध्ये कडकडून चावा घेतला आणि गजशाळेतले सगळे हत्ती मरून पडले.

       दुसऱ्या दिवशी गजेशाळेचे सेवक येऊन पाहतात तर,  सगळे हत्ती मेलेले , त्यांनी राजाला हा सगळा प्रकार सांगितला.

            आता राजाला कोंबड्याचा खूपच राग आला,  ते सगळ्या शिपायांना म्हणाले,  - \"या कोंबड्या ला अश्व शाळेत नेऊन बांधा , तिथले अश्व याला पायाखाली चीरडून टाकतील\".

          कोंबडा परत कुठल्याही घोड्याच्या हाती लागला नाही.  तो अश्व शाळेतल्या उंच खांबावर जाऊन बसला.

तिथे बसून तो म्हणाला ,-\"सऽर्रऽ सपाटा रऽरऽ रपाटा पाहू दे  सापा तुझा झपाटा!\".

      साप खाली आला आणि सगळ्या घोड्यांना त्याने कडकडून चावा घेतला. सगळे घोडे मरून पडले. दुसऱ्या दिवशी सेवकांनी मेलेले घोडे पाहून ही बातमी राजाला दिली.                     

           आता तर राजाला अतीशय  राग आला.

राजा म्हणाला, - \"त्या कोंबड्याला बैलांच्या गोठ्यात बांधा , तिथले बैल याचा चांगलाच बंदोबस्त करतील\".

     पण कोंबडा त्या बैलांच्या ही हाती सापडला नाही . तो गोठ्यातल्या उंच खांबावर जाऊन बसला .

कोंबडा म्हणाला,- \"सऽर्रऽ सपाटा रऽरऽ रपाटा, पाहू दे अग्नी तुझा झपाटा!\",

                 कोंबड्याने असं म्हटल्याबरोबर कोंबड्याच्या पंखातला विस्तव,  बैलांसाठी ठेवलेल्या गवतावर जाऊन पडला , आणि सगळीकडे आग लागली. त्या आगीमध्ये संपूर्ण गोशाळा तर जाळलीच,  पण ती आग राजधानीत ही सगळीकडे पसरली. आता मात्र राजा हतबल झाला, आणि कोंबड्याला विनवणी करू लागला.

तो कोंबड्याला  हात जोडून म्हणाला,  - \"कोंबड्या , कोंबड्या काहीही कर पण ही आग विझवून माझी राजधानी आणि प्रजा यांना वाचवं\". 

कोंबडा राजाला म्हणाला  -\"मी जर ही आग विझवली तर तुला तुझ्या मुलीचं लग्न माझ्याशी करून द्यावं लागेल!\". 

                राजा ने आपल्या प्रजेचे प्राण वाचविण्याकरिता कोंबड्याची ही अट मान्य केली.

कोंबडा  म्हणाला,  -\"सऽरऽ सपाटा रऽरऽ रपाटा पाहू दे पाणी तुझा झपाटा!\". 

        कोंबड्याच्या पंखातून तो पाण्याचा थेंब बाहेर पडला आणि नदीचा एक मोठा लोट राजधानीत सर्वत्र पसरला आणि सगळी आग विझली.

         ठरल्याप्रमाणे  लग्न मंडपात कोंबडा नवरदेव बनवून उभा होता. राजाची कन्या या विवाहाला तयार नव्हती, परंतु प्रजेच्या सुखाकरिता ती  विवाह मंडपात वरमाला घेऊन आली . ज्याक्षणी  राजकन्येने कोंबड्याच्या गळ्यात वरमाला टाकली त्याच क्षणी, त्या कोंबड्याचं एका सुंदर राजकुमारात रूपांतर झालं. आणि त्या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं.

      राजाने, त्या राजकुमाराला आपल्या राज्याचा वारस म्हणून घोषित केलं आणि  राजकुमार , राजकन्या आणि ती म्हातारी सुखाने राहू लागले.

   

फोटो - साभार गुगल      (ही कथा स्थानिक लोक कथांवर आधारित आहे)

         (  काय छोट्या दोस्तांनो! आवडली ना ही कथा! मग लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका , आणि तुम्हाला माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा)


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//