माझी मार्केट व्हॅल्यू..

माझी मार्केट व्हॅल्यू
गोष्ट छोटी डोंगराएवढी

माझ्या_आयूष्यातील_अविस्मरणीय_प्रसंग..

कधी कधी आपल्या आयुष्यात अशी एक घटना घडून जाते की ज्यामुळे आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. सारं आयुष्य बदलून जातं आणि मग कधी ध्येयाकडे जाणारा रस्ता स्पष्ट दिसतो तर कधी तो क्षण आपल्याला नैराश्येच्या खाईत लोटून देतो. असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला त्यामुळे माझ्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

तो क्षण मी तुमच्यासमोर घेऊन येतेय. तो अनुभव, तो प्रसंग तुमच्या सोबत वाटून घेण्यास मला नक्कीच आवडेल. ज्या क्षणांनी मला नवीन आयुष्य दिलं, जगण्याची ऊर्मी दिली त्या क्षणांना मी मनापासून वंदन करते.

मध्यमवर्गीय कुटुंबातला माझा जन्म.. कुटुंबावर जुन्या चालीरीती, जुन्या विचारांचा पगडा थोडा जास्तच होता. त्यामुळे शैक्षणिक जीवनात बरेच चढउतार आले. वाणिज्य शाखेतून बारावी झाले.

“आता पुढे काय? पुढचं शिक्षण कसं घ्यायचं?”

हा प्रश्न सतावू लागला. इतक्यात आजोबांनी बॉम्ब टाकला.

“पुरे झालं शिक्षण? आता हिच्या लग्नाचं बघा..”

आजोबांनी फर्मान सोडलं. आईने बाबांची समजूत काढली.

“चांगला मुलगा मिळेपर्यंत तिचं शिक्षण चालू ठेवू. आताच कशाला बंद करायचं?”

बाबांना आईचं म्हणणं पटलं. मला पुढे शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली.

घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. पुढील शिक्षणाचा खर्च बाबांना पेलवणारा नव्हता. कधी कधी वाटलं शिक्षण सुटेल की काय! पण जिद्द होती. शिकण्याची इच्छा होती आणि मला पक्कं माहित होतं,

“जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतोच.”

आणि म्हणून मग स्वतःच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार स्वतः उचलायचा ठरवलं. अर्धवेळ नोकरी करू लागले. घराजवळच माझ्या मैत्रिणीच्या बाबांच्या ओळखीने एका सी.ए. फर्ममध्ये अकाऊंटिंगचे काम पाहू लागले. नोकरी करता करता अकाऊंटिंग क्षेत्रांतला अनुभव मिळत होता. बघता बघता तीन वर्षे निघून गेली. मी वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले. गाठीशी तीन ते चार वर्षाचा माझ्या क्षेत्रांतला कामाचा अनुभव होता. मी खूप आनंदात होते. आणि चांगल्या नोकरीच्या शोधात बाहेरच्या विश्वात मी पहिलं पाऊल टाकलं. मी मोठ्या कंपन्यांमध्ये मुलाखतीसाठी अर्ज टाकत होते. जिथे आपल्या बौद्धिक क्षमतेला वाव मिळेल, नवीन शिकायला मिळेल, त्याच बरोबर घरची आर्थिक परिस्थिती ही सुधारेल अशा एका चांगल्या नोकरीच्या शोधात होते आणि तो योग माझ्या भाग्यात लवकरच येणार होता.

पुण्यातल्या “इन्फोसिस” या नामांकित कंपनीत "अकाउंटस एक्सक्युटिव्ह" या पदासाठी भरती सुरू होती. एक दिवस मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. मुंबईहून पुण्यात येण्याची संधी मिळणार होती. इतक्या मोठ्या नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळणार होती. मुंबई विद्यापीठातून पदवीधर झालेली आणि विशेष म्हणजे अकाउंटिंग क्षेत्रांतल्या तीन ते चार वर्षाचा अनुभव गाठीशी असल्याने निवड होण्यासाठी कंपनीने जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व नियमात मी बसत होते. त्यामुळे “माझी निवड होणारच..” हा आत्मविश्वास होता किंबहूना याचा रास्त अभिमान होता. अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाले होते असं म्हणा ना! मी प्रचंड खुश होते.

दुसऱ्या दिवशी मी मुलाखतीसाठी पूर्ण तयारीनिशी पुण्यात आले. आपल्या शहराच्या बाहेर जाऊन मुलाखत देण्याचा हा पहिलाच अनुभव होता त्यामुळे थोडी मनात भीती दाटून आली होती. साधी वेशभूषा, चेहऱ्यावर हलकासा मेकअप छान आवरून आले होते. हातात सर्टिफिकेट्सची फाईल होती. मी कंपनीच्या आवारात येऊन पोहचले. पाहते तर काय! कंपनीच्या आवारात मुलाखतीसाठी बाहेर बसलेल्यांची भली मोठी रांग! मीही त्यांच्या सोबत जाऊन बसले. एक एक मुलाखत होत होती. मुलं बाहेर येत होती.

अखेर माझा नंबर आला. आणि मुलाखतीसाठी मला आत बोलवण्यात आलं. परवानगी घेऊन मी आत गेले. माझ्या समोर चौघे वरीष्ठ अधिकारी बसले होते. त्यांना समोर पाहून आता मात्र माझी घाबरगुंडी उडाली. मी प्रचंड धास्तावले होते. त्यांनी बसायला सांगितलं. मी समोर मांडलेल्या खुर्चीत बसले आणि मुलाखत सुरू झाली. सुरुवातीला त्यांच्या जुजबी प्रश्नांना मी अचूक उत्तरे देत होते. माझ्या अर्जात चार वर्षाचा अनुभव पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसला होता म्हणजे निदान मला तरी तसं वाटलं. त्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला विचारलं,

“समजा तुमचे साहेब कामानिमित्त बाहेर गेलेत आणि तुम्हाला एका सप्लायरचे पेमेंट काढायचे आहे. तुम्ही काय कराल?”

मी त्यांना पूर्ण प्रक्रिया सांगितली.

“मी सरांना फोन करेन, मी अकाउंटचा बॅलन्स तपासून बघेन. माल आला होता का नाही हे चेक करेन. पेमेंट टर्मस पाहीन.. ”

मी बरंच सांगत राहिले पण नेमकं त्या प्रक्रियेचं नाव काय? ते लक्षात येत नव्हतं आणि मग त्या अधिकाऱ्याने मला ते नाव सांगितलं.

“मॅडम या सर्व प्रोसेससाठी एक डॉक्युमेंट असतं ज्याला ‘पर्चेस ऑर्डर’ असं म्हणतात.”

मी खजील झाले. इतकी साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नाही याचं मला खूप आश्चर्य आणि दुःखही वाटलं. मुलाखत झाली. त्या अधिकाऱ्याने माझ्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य करत म्हणाले,

“मॅडम, अजून तुम्हाला बरंच शिकायचं आहे. आजच्या घडीला तुमची मार्केट व्हॅल्यू शून्य आहे. सो बेटर लक फॉर नेक्स्ट टाईम..”

असं म्हणत त्यांनी माझी फाईल माझ्याकडे सरकवली. मी स्तंभित होऊन त्यांच्याकडे पाहत होते. काय बोलावं मला काहीच सुचेना. मी त्यांना “धन्यवाद सर..” असं म्हणून बाहेर पडले.

डोळ्यांतून पाणी झरत होतं. चार वर्षाचा अनुभव असूनही माझी मार्केट व्हॅल्यू शुन्य होती. माझं मलाच खूप आश्चर्य वाटत होतं आणि खूप अपमानास्पदही.. पहिला अनुभव, तोही इतका भयानक अपमान! सारं असहनीय होतं. विचार करून डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली होती. त्याच विचारांच्या तंद्रीत मी घरी पोहचले. आईच्या कुशीत शिरून मनसोक्त रडले.

“होतं असं.. पहिलाच तर अनुभव आहे. पुढच्या वेळीस होईल ठीक. इतकं का मनाला लावून घेतेस?”

आई समजावत राहिली आणि मी फक्त रडत राहिले.

“तुमची मार्केट व्हॅल्यू शून्य आहे..”

हे वाक्य पुन्हा पुन्हा आठवत होतं. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मी त्यांच्या बोलण्याचा विचार करत होते. पूर्णपणे नकरात्मक भूमिकेत, माझ्याच कोषात जाऊ लागले.

“ते असं का म्हणाले? काय चुकलं माझं?”

मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले. एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर गवसलं. मनाशी ठाम निर्धार केला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये गेले. पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली. प्रत्येक गोष्ट बारकाईने शिकत गेले. “ कॉस्टिंग, फायनान्स प्रोजेक्ट, बजेटिंग, कॅशफ्लो, टॅक्सेशन, एच आर लीगल कमप्ल्यायन्स, इम्पॉर्ट, एक्स्पोर्ट, एक्ससाईज अँड कस्टम्स फॉर्मॅलिटीज” या सर्व विषयात तरबेज होण्याचा प्रयत्न करत गेले. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि मग वर्षभरानंतर त्याच कंपनीत पुन्हा मुलाखतीसाठी गेले. विशेष म्हणजे तेच अधिकारी समोर होते पण त्यांनी मला ओळखलं नसावं. ते प्रश्न विचारत गेले आणि मी उत्तरं देत गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत होता. मुलाखत छान झाली आणि माझी निवड झाल्याचं तिथेच त्यांनी जाहीर केलं. मला अतिशय आनंद झाला होता. माझ्या खुर्चीतून उठत मी त्यांना हस्तांदोलन  केलं आणि शांतपणे म्हणाले,

"सर तुम्ही मला ओळखलं नाही ना! मी तीच मुलगी.. गेल्या वर्षी तुमच्याकडे मुलाखतीसाठी आले होते आणि तुम्ही म्हणाला होतात "माझी मार्केट व्हॅल्यू शून्य आहे." सर, आज मी छान इंटरव्ह्यू देऊ शकले याचं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हालाच जातं. त्यादिवशीच्या तुमच्या प्रतिक्रियेमुळे मी आज तुमच्यासमोर पुन्हा उभी राहू शकले. तुम्ही मला तुमच्या कंपनीत काम करण्याची संधी देत आहात, खरंच मनापासून खूप आभार सर.. पण सर, मला वाटतं की अजूनही खूप शिकायचं बाकी आहे. अकाउंट्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं ज्ञान मला आत्मसात करायच्या आहेत. मला माझी मार्केट व्हॅल्यू अजून छान बनवायची आहे. त्यामुळे मी माझ्या जुन्या कंपनीत राहूनच सर्व शिकेन. ज्या कंपनीने मला घडवण्यासाठी मदत केली. माझ्यावर विश्वास टाकून शिकण्याची नवीन संधी उपलब्ध करून दिली. त्या कंपनीसाठी, तिथल्या लोकांसाठी मी नवीन जोमानं काम करेन. तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार सर.. थँक्यू सो मॅच..”

असं म्हणून त्यांच्या कोणत्याही प्रतिसादाची वाट न पाहता मी कंपनीबाहेर पडले. तेही प्रचंड आनंदात.. मोकळा श्वास, मोकळं निरभ्र आकाश माझ्या स्वागतासाठी तयार होतं. कालांतराने मी माझी ती कंपनी सोडली. नोकरीच्या जागा बदलत गेले. नवीन अनुभव मिळत गेले. मी शिकत गेले आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आज मी माझ्या क्षेत्रातल्या मोठ्या हुद्यावर काम पाहते आहे.

काही प्रसंग माणसाला घडवत असतात. कधी कधी नकारात्मक प्रतिसादही आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यामुळे नकाराने खचून न जाता आपण त्यातून चांगलं काही घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण काही ना काही शिकवून जातो. आजवरच्या आयुष्यात कधीच कोणतीच गोष्ट सहज प्राप्त झाली नाही. त्यासाठी अपार परिश्रम घ्यावे लागले. अजूनही घेतेय.. पण या परिश्रमातून मिळणाऱ्या ध्येयपूर्तीचा आनंद शब्दांत वर्णिला जाऊ शकत नाही. म्हणूनच तो अवर्णनीय क्षण मला पुन्हा पुन्हा जगायचा आहे.

समाप्त..
© निशा थोरे (अनुप्रिया)