लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

How Could Marathi Language Can Be Saved And Developed In This Modern Era Of Computer And Internet

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी



   लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

   जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

    धर्म पंथ जात एक जाणतो मराठी

   एवढ्या जगात माय मानतो मराठी

      

                                  -सुरेश भट



     लिहावे तेवढे थोडेच अशी माझी मराठी भाषा, लिपी आणि मायबोली आहे. जवळजवळ पंधराशे वर्षाचा इतिहास मराठी भाषेने जपला आहे. ९ कोटी लोक मराठीभाषक आहेत. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातली दहावी व भारतातील ही तिसरी भाषा आहे.


    उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा पासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला आहे.


              माझ्या मराठी मातीचा

              लावा ललाटास टिळा

               हिच्या संगे जागतील

              मायदेशांतील शिळा


                                  - कवी कुसुमाग्रज

   


   मराठीचे सौंदर्य हे शब्दांच्या पलीकडले आहे .आपली मराठी मायबोली मुळातच खूप समृद्ध आणि वैभवसंपन्न आहे.



          जैसे हरळां माजीं रत्नकिळा

          की रत्नां माजी हिरा निळा

         तैसे भाषा माझी चोखळा

             भाषा मराठी


                              -फादर स्टीफन्स



        कुसुमाग्रज एकदा म्हणाले होते, \"समाजाच्या राहणीमानाचा स्तर जसा जसा उंचावत जातो, तसा तसा साहित्याचा, साहित्य मूल्याचा दर्जा खालावत जातो. याला इतिहास साक्ष आहे\". मराठीचे आज हेच वास्तव आहे.


       आता मागच्याच रविवारची गोष्ट घ्या ना! शेजारच्या देशमुखांची गौरी संकष्ट चतुर्थी करता आमच्या अंगणात दुर्वा घ्यायला आली होती. छोट्या सात वर्षाच्या गौरीने माझ्या सासूबाईंना म्हटले, \"आजी आज बाप्पाचा सण आहे ना, म्हणून मम्मी म्हणाली ट्वेंटी वन दूर्वा घेऊन ये.\" छोट्या गौरीच्या या वाक्यावर सासूबाईंना हसावं की रडावं हेच कळेना. गौरीची मम्मी मराठीची प्राध्यापिका आहे हे विशेष!


      आणखी एक प्रसंग, त्यादिवशी मी चक्कीवर दळण आणायला गेले. चक्कीवाला भाऊ काही वैद्यकीय कारणामुळे डॉक्टरकडे गेला होता. गल्ल्यावर त्याची कन्या विराजमान होती. मी तिथल्या मदतनीसाला विचारलं, "दळणाचे पैसे किती झाले?" तो म्हणाला,\"पंचावन्न\". तर गल्ल्यावर ची सुपुत्री म्हणाली, \"काका इंग्रजीत सांगा , मला पंच्चावन्न, चौऱ्यांशी, छप्पन मराठीत समजत नाही\". तो मदतनीस म्हणाला, \"अगं पंचावन्न म्हणजे फिफ्टी फाईव.\"


        तीन वर्षापूर्वी पुण्यातील एका संस्थेने सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा दहा घरांमध्ये जाऊन शिवाजी सावंत, खलील जिब्रान, जी. ए. कुलकर्णी , वामन चोरघडे, पंडित महादेवी वर्मा या व्यक्तींविषयी काही प्रश्न विचारले. दहापैकी सात घरांमध्ये आई-वडील अथवा पालक यांना कोणालाही या नावांची फारशी माहिती नव्हती. ही परिस्थिती तथाकथित अशा शहरी सुशिक्षितांबाबत आहे तर भारताची 70 टक्के जनता खेडोपाडी राहते त्यांची काय अवस्था आपल्याला अपेक्षित आहे?


        माझे म्हणणे एवढेच आहे की, मराठी मातृभाषा असणाऱ्या अनेक लोकांनी आजपर्यंत कोणते योगदान मराठीला दिले आहे ? याचे थोडे आत्मपरीक्षण करावे. आपण आपल्या मुलांना इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आणि तीच भाषा घरातही बोलण्यासाठी नुसते प्रोत्साहनच देत नाही तर, त्या लहानग्यांवर जबरदस्ती ही करतो. या ठिकाणी मला एवढेच सांगायचे आहे की, जे ज्ञान लहान मूल स्वतःच्या मातृभाषेतून शिकतो ते ज्ञान त्याला लवकर तर कळतंच पण त्याचे आकलन आणि उपयोजन ही ते मूल पुढील भविष्यात चिरंतन काळापर्यंत करू शकतं. परंतु आम्हास आज भौतिक संपन्नतेची एवढी क्षुधा निर्माण झाली आहे की , आम्ही आमच्या मुलांना केवळ इंग्रजी भाषा शिकण्यासाठी बाध्य करतो आहोत.



         कुठलीही भाषा तेव्हाच संपन्न आणि चिरंतन चिरंजीवी होते जेव्हा तिचा व्यवहारातला वापर वाढतो. आजचा जगाचा व्यवहार हा अनेक यंत्र आणि संगणकांच्या माध्यमातून होत आहे . त्यासोबतच त्याला इंटरनेटची जोड मिळाली आहे. त्यामुळे मायबोलीचा हट्ट धरतानाच माझी भाषातज्ञांना आणि भाषांतर करणाऱ्यांना ही कळकळीची विनंती आहे की, त्यांनी प्रचलित इंग्रजी शब्दांसाठी मराठीत समजतील आणि व्यवहारात उपयोगी आणि सोपे असतील असे प्रतिशब्द शोधावे.


     शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,


       देववाणीतले ओज

       शीतळे माझ्या ओठी

        वाल्मीकींच्या भास्कराचे

         झाले चांदणे मराठी

   

                               - ग. दि. माडगूळकर


       

संदर्भ 

१. प्राध्यापक डॉक्टर वंदना भानप (मराठी वेबदुनिया वरून साभार)

२. सुहास मुळे यांचा दिनांक 26 फेब्रुवारी 2022 चा लोकमत नागपूर वृत्तपत्रातील लेख.

३. इतर माहिती व फोटो साभार गुगल.

🎭 Series Post

View all