Jan 26, 2022
नारीवादी

आत्मसन्मान 40

Read Later
आत्मसन्मान 40


"स्वरा कशी आहेस बाळा?" सुमनने फोन करून स्वराची चौकशी केली.

"आई मी छान आहे, तू कशी आहेस गं?" स्वरा

"मी पण छान आहे. स्वरा तुला एक बातमी द्यायची आहे, अगं मी आज मार्केट मधून घरी येताना रस्त्याच्या कडेला कचराकुंडी जवळ एक बारा दिवसाची लहान मुलगी दिसली ग, इतके लहान मूल होते ते, मला तसेच पडलेले पहावले नाही, मी आजूबाजूला चौकशी देखील केली पण कुणालाच काहीच माहीत नव्हते, आजूबाजूला इतकी गर्दी असूनही तिकडे कोणाचे लक्ष गेले नसेल की लोक दुर्लक्ष करत असतील ग, किती वेळ झाले काय माहिती तिथे बाळाला सोडून गेले ते लोकं. पण कुणीच लक्ष दिले नाही ग. मी तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे सावंत काका होते. त्यांनी फिर्याद नोंदवून घेतली आणि या मुलीला अनाथ आश्रम मध्ये सोडणार होते ग, पण मला रहावले नाही म्हणून मी म्हणाले की माझ्या घरी घेऊन जाते." सुमनने लेकीपुढे सगळे कथन केले.

"म्हणजे आई, तू त्या मुलीला आपल्या घरी." स्वराला सुध्दा खूप आनंद झाला. आपली आई खरंच ग्रेट आहे असे म्हणून तिने आईचे कौतुक केले.

"अगं स्वरा, हो हो. ती आपल्या घरात आली आहे. मला तर तुझीच आठवण झाली. तू इवलीशी होतीस तेव्हा सुंदर होतीस अगदी तशीच आहे बघ ही. मी तर तिचे नाव परी ठेवले आहे. तुला कोणते नाव हवे आहे?" सुमन

"परी मस्त आहे. तेच असू दे. मला तर कधी एकदा तिला बघेन असे होत आहे." स्वरा

"अगं मग ये की भेटायला. तुला कोणी अडवलंय?" सुमन

"हो नक्कीच येईन. बरं आई चल ठेवते. नंतर बोलते." असे म्हणून स्वरा तिच्या कामात मग्न झाली. सुमन आता परीच्या मागे लागली. तिचे गोडकौतुक करण्यात ती गुंतली होती.
लेक असते एक विसावा
मनातलं न सांगताच ओळखणारी..
लेक असते एक आधार
प्रत्येक प्रश्नाला पर्याय शोधणारी..
लेक असते एक पणती
दोन्ही घरे उजळून काढणारी..
लेक असते एक अस्तित्व
हृदयात कायम विसावणारी..
लेक असते एक हास्य
भरल्या घरात खळखळणारी..
लेक असते घराची तुळस
अंगणाची शोभा वाढवणारी..
लेक असते काळजाचा तुकडा
आईबाबांच्या हृदयात वास करणारी..

सुमनच्या भावना जणू उफाळून येत होत्या. ती परीसाठी जणू तिची आईचं बनली होती. तिचे सारं काही ती करत होती.

स्वराला सुद्धा खूप बरे वाटले की आपली आई कशात तरी रमत आहे, नाहीतर आई एकटीने च जीवन कसे काढणार? हा प्रश्न तिच्या मनात होताच. एका अर्थी आईचा विरंगुळा होईल आणि त्या मुलीला देखील आईची माया मिळेल असे स्वराला वाटू लागले आणि ती आनंदित झाली. तो दिवस मायलेकींचा खूप चांगल्या पद्धतीने गेला.

दुसऱ्या दिवशी स्वरा आपले सगळे काही आवरून कॉलेजला जाण्याच्या तयारीला लागली, तिने ड्रायव्हरला आधीच सांगितले होते कि आज ठीक दहा वाजता तयार रहा, मला कॉलेजला सोडायचे आहे. स्वराने त्याप्रमाणे सगळी कामे केली. कामांसाठी नोकर असल्यामुळे फक्त स्वयंपाक तेवढा तिला करावा लागणार होता. त्यातही स्वयंपाक सासूबाई करत असल्यामुळे तिला फक्त थोडी मदत करावी लागत असे. तिने तिच्या वाटणीला येणारे काम अर्थातच भाजी चिरणे, कुकर लावणे ही सगळी प्राथमिक कामे केली होती. तसेच सकाळी नाष्टा केला होता, त्यामुळे दुपारचे जेवण अजून बनवून झाले नव्हते म्हणून तिने डबा घेऊन न जाता कँटीनमध्ये काहीतरी खाऊ या उद्देशाने ती बॅग घेऊन तिचे आवरून खाली आली.

स्वराला असे आवरून येताना पाहून तिच्या सासूबाई तिच्याकडेच पाहत बसल्या.
"अगं स्वरा, तू कुठे चालली आहेस का? काही काम होतं का महत्त्वाचं?" स्वराच्या सासूबाई

"हो आई, मी कॉलेजला चालली आहे. काल पाहुणे येणार होते म्हणून सुट्टी घेतली होती. म्हणून आज पासून मी कॉलेजला जायला सुरुवात केली आहे." स्वराने स्पष्टच सांगितले.

"अगं, पण आज तुला कॉलेजला जाता येणार नाही." सासूबाईंचे हे वाक्य ऐकून स्वरा थोडीशी चिडली.

"काय? आज काय आहे? काल पाहुणे येणार होते म्हणून मी सुट्टी काॅलेजला गेले नाही आणि इतके दिवस घरातच राहिले आहे ना! लग्न झाल्यापासून आता कॉलेजला चालले आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत असे आडवे लावत आहात. लग्नाआधी तर सांगितला होतात की पुढचे शिक्षण आम्ही देतो आणि आता कॉलेजला चालले तर प्रत्येक गोष्टीत अडथळा लावत आहात. नक्की तुमच्या मनात आहे तरी काय? ते स्पष्ट सांगा." स्वरा थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.

"अगं, आज यांचे मित्र येणार आहेत, लग्नामध्ये त्यांना बोलावले नव्हते, अगदी थोड्याच लोकांना घेऊन लग्न केले होते ना! मग आज भेटायला येणार आहेत, म्हणून म्हणाले ग. जर यांचे मित्र आले आणि तू घरात नसशील तर बाबा ओरडतील शिवाय ते चिडतील, त्यांच्या मित्रांपुढे त्यांचा अपमान होईल, बाबांचा अपमान त्यांच्या मित्रांपुढे झालेला पृथ्वीला अजिबात आवडणार नाही. तेव्हा जे काही ठरवायचे ते तूच ठरव." सासूबाईंचे हे वाक्य ऐकून स्वरा विचारात पडली.

"आई, फक्त आजच्या दिवसच हं. उद्यापासून मी काहीही झाले तरी काॅलेजला जाणारच. मी काहीच ऐकून घेणार नाही. काॅलेजला जाणे खूप महत्वाचे आहे." स्वरा

"हो. फक्त आजच्या दिवसच. उद्यापासून तू काॅलेजला जाऊ शकतेस." सासूबाईंचे हे बोलणे ऐकून स्वरा ला खूप आनंद झाला. ती तिची बॅग रूममध्ये ठेवून आली आणि जेवणाच्या तयारी ला लागली.

सासर्यांचे मित्र जेव्हा आले तेव्हा स्वराने त्यांचेही आदरातिथ्य खूप चांगल्या प्रकारे केले. ते मित्र सुध्दा खूप खूश झाले. स्वराने शब्दांचा मान राखला म्हणून सासूबाई सुध्दा खूप खूश झाल्या. तो दिवस सरला. पुढे सुध्दा सासूबाई काहीबाही कारण सांगून स्वराला काॅलेजला जाण्यापासून अडवू लागल्या. ते पाहून स्वराला खूपच राग आला. हे असे का करत आहेत? हा प्रश्न तिच्या मनात चालू होता, पण उत्तर काही मिळेना.

"तिने ठामपणे सासु-सासर्‍यांना विचारले की मी कॉलेज शिकावे अशी तुमची इच्छा आहे की नाही. आधी तुम्ही कॉलेजला जाऊ शकतेस असे म्हणाला होता आणि आता प्रत्येक दिवशी काही ना काही कारण पुढे करून मला कॉलेजला जाण्यापासून अडवत आहात याचा अर्थ काय?" स्वराच्या अशा ठाम बोलण्यावर सासू-सासर्‍यांनी काहीच उत्तर दिले नाही.

"अगं कामच होतं तसं म्हणून तुला नको म्हणाले ना! आता लग्न झाल्यानंतर कॉलेजचा कसला विचार करतेस? आता संसाराचा विचार कर. संसार हेच महत्त्वाचे आहे, शिक्षण घेऊन सुध्दा स्वयंपाक हा करावाच लागतो. त्यापेक्षा संसारात लक्ष घाल. तुला चार चांगल्या गोष्टी समजतील." सासूबाई.

"संसारात तर माझे लक्ष आहेच पण मला त्या सोबत शिक्षण सुध्दा घ्यायचे आहे. माझ्या आई बाबांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. माझ्या आईने इतक्या कष्टाने मला इथपर्यंत शिकवले आहे, आता पुढची दोन वर्ष तुम्हाला शिकवण्यासाठी जड जात आहेत, मग तुमच्या या श्रीमंतीपेक्षा माझी आई आणि तिची गरिबी कितीतरी पटीने चांगली.. इतक्या हालाखीच्या दिवसातही मुलीने शिकावे, मुलीने घडावे यासाठी तिने खूप प्रयत्न केले. तुमच्या विचारांपेक्षा तिचे विचार खूप चांगले आहेत." स्वरा

स्वराच्या अशा बोलण्याने तिच्या सासु-सासर्‍यांना तिचा खूप राग आला. त्या दोघांच्या बोलण्याच्या झटापटीत स्वराने आपले सगळे सामान भरले आणि ती माहेर आली.

मुलींनी शिक्षण घेऊ नये याचा अर्थ काय? एका मुलीला शिक्षणापासून वंचित करण्याचा यांना कोणी अधिकार दिला? लग्न करायचे होते तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करायचे आता इतक्या गडबडीने लग्न केले आणि आता शिक्षण नको म्हणत आहेत याचा अर्थ काय? जग एकीकडे चालले आहे आणि दुसरीकडे मात्र मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत ही कसली विचारसरणी? इतक्या खालच्या पातळीचे विचार असलेल्या घरात मला अजिबात राहायचे नाही, असा विचार करून स्वराने तिची बॅग भरली आणि ती निघाली.

स्वरा अशी अचानक घरी आलेली पाहून सुमनला खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. एकतर इतक्या दिवसांनी आपले लेक आली आहे म्हणून तिने लगेच लेकीला जाऊन मिठी मारली.

स्वराने आईला घरात जे काही घडले त्याबद्दल काहीच सांगितले नाही. ती त्या लहान बाळाच्या जवळ गेली आणि तिला मायेने कुरवाळू लागली.

"आई, किती गोड मुलगी आहे ग ही! आणि कोण असतील ते निर्णय लोक ज्यांनी हिला असे रस्त्यावर टाकले? खरंच त्यांना मुलीची काहीच किंमत नाही, मुलगी काय असते? याची संकल्पना त्यांना समजली नाही." स्वरा रागातच म्हणाली.

अशा मायलेकींच्या गप्पा सुरू असतानाच दाराची बेल वाजली..
"आता कोण आले असेल?" असे म्हणून स्वराने दार उघडले आणि पाहिले तर काय बाहेर दोन पोलीस आणि एक पुरुष व एक स्त्री असे चौघेजण आले होते. ते पाहून स्वराला धडकीच भरली. हे अचानक कसे काय आले? म्हणजे यांचे काय काम असेल? असा तिच्या मनात प्रश्न सुरू होता. इतक्यात सुमन देखील कोण आले आहेत? हे पाहण्यासाठी आली.

"अरे सावंत सर तुम्ही! या ना, काय काम काढलात?" सुमन

"सुमन ताई, ह्या दोघांचे म्हणणे आहे की त्यांच्या मुलीला तुम्ही चोरून आणले आहात, यांच्या नकळत या मुलीला तुम्ही इथे घेऊन आला आहात. असे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितले आहे." हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलीस सुमनच्या घरात का आले आहेत? ते पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक सुद्धा घरासमोर जमले होते.

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..