द डी.एन्.ए. पर्व २ (भाग -४)

Marathi Story About Dinosaur
द डी.एन्.ए. पर्व दोन (भाग -४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुयश सरांना आलेला एम.एम.एस. ते बघत होते. तो व्हिडिओ सुरू झाल्यापासून ते शेवट होईपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळेच भाव बदलले होते.

"सर काय झालं?" नियतीने त्यांना काळजीत पाहून विचारलं.

"आपली टीम.." सुयश सर बोलता बोलता थांबले आणि त्यांनी तो व्हिडिओ नियतीला दाखवला.

सी.आय.डी. टीमला जंगलातच एका झाडाला बांधून ठेवून व्हिडिओ काढण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये डायनासोरची शेपूट स्पष्ट दिसेल याची काळजी देखील घेण्यात आली होती. नियती आणि अभिषेक व्हिडिओ बघत होते. संपूर्ण जंगल परिसराचा देखील व्यवस्थित व्हिडिओ शूट करण्यात आला होता.

"सर हे खूप भयंकर आहे. आपण जाऊया का तिथे?" अभिषेक म्हणाला.

"नाही अभिषेक. हा व्हिडिओ आपण रागात काहीतरी करून बसू म्हणूनच पाठवलेला आहे. अरे ज्या लोकांनी एवढी काळजी घेतली ते लोक अशी सहजासहजी सगळी जागा दाखवून व्हिडिओ पाठवतील का?" सुयश सर म्हणाले.

"हो अभिषेक! सर बरोबर बोलतायत. नक्कीच आपल्या टीमच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना हल्ला करायचा आहे. काहीतरी सापळा नक्कीच आहे यात." नियती म्हणाली.

थोडावेळ जरा विचार करण्यात गेला. सुयश सरांना एकदम काहीतरी सुचलं. ते नियतीच्या डेस्कजवळ गेले.

"नियती! हा व्हिडिओ नक्की खराच आहे का याची खात्री करून घ्यायला हवी. जरा चेक कर." ते म्हणाले.

नियतीने लगेच एका सॉफ्टवेअरमध्ये ती क्लिप घालून व्हिडिओ चेक केला.

"सर व्हिडिओ खराच आहे. आपण नक्की आता काय करायचं आहे?" नियतीने विचारलं.

"तोच विचार करतोय. आपल्या टीमलासुद्धा काही व्हायला नकोय आणि त्या लोकांचा उद्देश पण साध्य होता कामा नये." सुयश सर म्हणाले.

"सर मी शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करते. आजची रात्र मी इथेच काम करणार आहे." नियती म्हणाली.

"ठीक आहे. आम्ही दोघं ब्यूरोमध्ये आहोत काही गरज पडली तर फोन कर." सुयश सर म्हणाले.

दोघंही ब्यूरोमध्ये जायला निघाले.
********************************
इथे जंगलात सी.आय.डी. टीमला बांधून आपापसात ती लोकं बोलत होती मात्र यावेळी त्यांच्यात इंग्लिशमध्ये बोलणं होत होतं. त्यांच्यात थोडं अंतर देखील होतं पण सी.आय.डी.ला व्यवस्थित ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने ते बोलत होते.

"सर हे मुद्दाम चालू आहे. एवढा वेळ जेव्हा हे लोक बोलत होते तेव्हा काहीही ऐकू येत नव्हतं आणि आलं तरीही वेगळ्याच भाषेत बोलत होते." ईशा हळूच म्हणाली.

"हम्म. या लोकांना वाटतंय त्यांच्या प्लॅनप्रमाणे सगळं होतंय पण त्यांना कुठे माहितेय सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे सुरू आहे ते." विक्रम म्हणाला.

"हो ना! यांना कुठे माहीत आहे यांचा प्लॅन यांच्याच अंगलट कसा येणार आहे ते." डॉ. विजय हसत हसत म्हणाले.

"शूऽ" विक्रमने देखील हसत त्यांना गप्प केलं.

'सगळं ठरल्याप्रमाणे होतंय पण निनाद तिथून ब्यूरोमध्ये वेळेवर पोहोचायला हवा. सरांना यातलं काहीच माहीत नाहीये जर त्यांनी काळजीत काही धडक पाऊल उचलण्याचा विचार केला तर सगळं हातचं जायचं.' विक्रम मनातच म्हणाला.

त्याला असं विचारात गढलेलं ईशाने बघितलं आणि बांधलेल्या हातानेच मागच्या मागे हळूच त्याच्या हातावर हात ठेवून त्याला धीर दिला. तिला विक्रमच्या मनातली घालमेल समजत होती. तिच्या स्पर्शाने तो भानावर आला आणि दोघांमध्ये डोळ्यांनीच बोलणं झालं.

"थोडी तरी नाटकं करा आता." विक्रम अचानक हळू आवाजात घसा खाखरून बोलला. त्याने बघितलं होतं सोनाली त्या दोघांकडे बघत होती.

"हो सर." सोनाली हसू दाबत म्हणाली.

सी.आय.डी.ला एवढं बांधून ठेवलं आहे, त्यांच्यासमोर हे लोक प्लॅन करतायत तरीही सी.आय.डी. काहीच बोलत नाहीये किंवा काहीच प्रयत्न करत नाहीये म्हणून त्या लोकांना आश्चर्य वाटत होतं पण लगेचच त्यांचं हे आश्चर्य धुळीला मिळालं. विक्रम त्यांना इंग्लिशमध्ये ते लोक किती चुकीचं करतायत आणि कशी त्यांना याची किंमत मोजावी लागेल हे रागात सांगत होता आणि त्याची अशी अवस्था बघून ते लोक असुरी हसत होते. त्यातला एक माणूस कसा त्या लोकांचा एकदम परफेक्ट प्लॅन कामी येतोय आणि कसा तुमचा देश दुबळा ठरणार आहे हे चित्र सी.आय.डी.ला रंगवून रंगवून सांगत होता.

'आमच्या देशाबद्दल एवढं वाईट बोलतोयस काय? थांब दाखवतो.' विक्रम मनातच म्हणाला त्याचे स्वतःला सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले पण काहीही उपयोग झाला नाही.

स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय आणि देशाला वाचवायला चालले आहेत या आविर्भावात त्या लोकांनी विक्रमला एक लहान दगड उचलून मारला आणि तिथून डायनासोरला घेऊन जाऊ लागले. त्यातला एक माणूस मात्र मागे आला.

"जस्ट वेट अँड वॉच. यू अल्सो गेट अ चान्स टू सी युअर कंट्री गेटींग डीस्ट्रोय." तो म्हणाला आणि हसत हसत निघून गेला.

"अरे तुमच्यासारखे बरेच येऊन गेले पण आमच्या या मायभूमीचे कोणीही वाकडे करू शकला नाही." विक्रम रागाने ओरडून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाला.

ते लोक जाताच सी.आय.डी. स्वतःला सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागले. कसेबसे थोडे प्रयत्न करून सगळे सुटले. त्या लोकांना चांगलाच विश्वास होता की, सी.आय.डी. जरी सुटली तरीही आता काहीच करू शकणार नाही म्हणूनच ते तिथून निघून गेले होते.

"विक्रम आपल्याला असं सोडून का गेले असतील हे लोक? त्यांना चांगलंच माहीत असणार आपण इथून सुटण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरणार. मग असं का केलं असेल? त्यात त्या लोकांनी इतक्या सहज सोडवता येतील अश्या दोऱ्या कश्या बांधल्या असतील?" डॉ. विजयंनी विचारलं.

"सर ते बघा आपल्याला इथे गुंतवून त्या लोकांनी पोर्टेबल लेझर सिक्युरिटी आपल्या चारही बाजूंनी लावली आहे. आपण आपले हात पाय सोडवले तरीही इथून निघू शकणार नाही किंवा कोणी आपल्याला इथे वाचवायला आलं तर त्यांनाही ते शक्य होणार नाही हे त्या लोकांना माहीत आहे." विक्रम छोटे छोटे लेझर सिक्युरिटीचे क्यूब दाखवत म्हणाला.

"आता इथून बाहेर कसं पडायचं? आणि सर तुम्हाला हे सगळं कसं माहिती?" ईशाने विचारलं.

"मला हे माहिती होतं म्हणजे जेव्हा रॉबर्ट सोबत हे लोक बोलत होते तेव्हा मी हिअरिंग मशीन घालून त्यांचं बोलणं ऐकलं. नंतर जेव्हा ते लोक त्यांच्या भाषेत बोलत होते तेव्हा मला इंडिया, डीस्ट्रोय, लेझर एवढे शब्द कळले. ते लोक चायनीज भाषेत बोलत होते. नक्कीच हा डाव त्यांचाच आहे." विक्रम म्हणाला.

"विक्रम अरे आपल्यात आणि त्यांच्यात बरंच अंतर होतं तू हिअरींग मशीन घातलं तर सांगायचं होतं ना! आधी मला तुझा कान चेक करू दे." डॉ. विजय काळजीने म्हणाले आणि विक्रमचा कान तपासू लागले.

विक्रम मात्र "काहीही झालं नाही." म्हणत होता तरीही त्याचं ऐकून न घेता त्यांनी कान तपासला. विक्रमने डाव्या कानात मशीन घातलं होतं. त्याच्या जवळचा आवाज मोठ्याने आल्याने त्या कानातून थोडा रक्तस्त्राव झाला होता पण एवढ्या वेळात आता ते रक्त सुकलं होतं. डॉ. विजयनी प्राथमिक तपासणी करून त्याच्या कानाला काही जास्त इजा झालेली नाहीये ना? हे तपासलं.

"विक्रम सुदैवाने जास्त काही झालं असेल असं वाटत नाहीये पण तू आधी इथून ई. एन. टी. स्पेशालिस्टकडे जायचं आहेस. अरे कान आपल्या शरीराचा खूप नाजूक अवयव आहे रे." डॉ. विजय काळजीने म्हणाले.

"हो सर जाणार आहे. आधी आपला देश मग बाकी सगळं." विक्रम म्हणाला.

"सर आम्ही सगळे आहोत इथे. इथून निघायचा मार्ग सापडला की तुम्ही आधी डॉक्टरकडे जाऊन या." ईशा काळजीने म्हणाली.

विक्रम काही बोलायला जाणार तर डॉ. विजय त्याला अडवत बोलू लागले; "विक्रम आता ही वेळ चर्चा करण्याची नाहीये. आता पहाट व्हायला लागली आहे. सुयश सरांना कळवायला आपल्याकडे आता आपले मोबाईल पण नाहीयेत. नक्कीच त्या लोकांनी व्हिडिओ काढला तो सुयश सरांकडे गेला असणार. आपल्यापैकी कोणीतरी त्यांना भेटणं गरजेचं आहे. तूच जायचं आहेस."

"ते नंतर बघू. सरांना जे कळायचं असेल ते बरोबर समजेल. निनाद ब्यूरोमध्ये पोहोचला असेल." विक्रम म्हणाला.

कोणाचंही पुढे काहीही ऐकून न घेता त्याने मगाशी त्या लोकांनी त्याला जो दगड मारला होता तो उचलला आणि समोरच्या दिशेने भिरकावला. त्या दगडाने लेझरला स्पर्श झाल्याने लेझरच्या रेषा आता स्पष्ट दिसू लागल्या.

"आपल्या कोणालाही जिमनॅस्टिक येत नाही. त्यामुळे या लहान लहान जागेतून बाहेर पडणं शक्य नाहीये." विक्रम म्हणाला.

सगळे आपल्याला कुठून बाहेर पडता येईल याचा विचार करत होते.

"सर आपल्याला ते लेझरचे क्यूब आहेत तेच बाजूला सारता येणार नाहीत का?" सोनालीने विचारलं.

"नाही. खरंतर आपल्यावर एकाच वेळी दोन संकटं आहेत. आपण लेझरमधून बाहेर पडताना आपल्याला काहीतरी होऊ शकतं किंवा तो क्यूब हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यात एक वेगळंच तंत्र आहे ज्यामुळे आपण त्याला हात लावला तर ते तिथल्या तिथे ब्लास्ट होईल." विक्रम म्हणाला.

"पण सर कशावरून? तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती?" सोनालीने विचारलं.

"हळूहळू सांगेन." विक्रम म्हणाला.

क्रमशः......
*******************************
विक्रमला एवढं सगळं कसं माहिती असेल? सी.आय.डी. टीम आता तिथून कशी बाहेर पडेल? ते लोक ऋषभला घेऊन कुठे गेले असतील? काय होईल पुढे? ऋषभ पुन्हा त्याच्या मूळ रूपात येऊ शकेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all