तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 2

एक गडद अंधार आणि त्याला भेदणारे सहा प्रकाशकिरण



तमाच्या तळाशी दिवे पेटलेले 2

मागील भागात आपण काही पात्रांचा परिचय घेतला. शाल्मली आणि समीर देशमुख यांच्या आयुष्यात पूर्वा आणि तिच्या मित्रांचा प्रवेश कसा होईल? एवढी काय घटना घडली ज्याने समीर आणि शाल्मली पार्टी सोडून निघाले. चला ह्या रहस्याचा माग घेऊ.


अशोकने पूर्वाला फोन लावला.

"बातमी पक्की आहे का? मुख्यमंत्री आणि समीर देशमुख दोघांची मुले सुरक्षित आहेत का?" अशोकने विचारले.

"अशोक,तुला एकही शब्द मी सांगणार नाही. कशाला वेळ घालवतो. लोकेशनवर पोहोच सगळी माहिती मिळेल."
पूर्वाने अत्यंत रुक्षपणे फोन कट केला.

"क्रूएला!" अशोक फोन ठेवताना ओरडला.

शाल्मली आणि मिसेस मुख्यमंत्री आत आल्या. चिंटू आणि सुपर्णा अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत बसले होते.

"मॉम,मॉम ही टेक स्नेहा अँड मयूर अवे. प्लीज सेव देम." सुपर्णा आईला बिलगत किंचाळली.


तेवढ्यात समीर आणि मुख्यमंत्री येऊन पोहोचले.

"मुलांना घरी न्यायला हवे." मुख्यमंत्री त्यांच्या बायकोकडे पाहून बोलले.

त्याच क्षणी शाल्मली आणि मिसेस मुख्यमंत्री बाहेर पडल्या. इकडे सगळा मीडिया मुंबई शहरातील सर्वात प्रतिष्ठित शाळेच्या बाहेर जमा होता. शाळेतील दोन मुले गायब झाली होती. मुंबई नगरीतील अत्यंत श्रीमंत आणि वरच्या स्तरातील पालकांची मुले इथे शिकत. शाळेकडून काहीही माहिती दिली जात नव्हती.


शाल्मली आणि मिसेस मुख्यमंत्री बाहेर पडल्या. इतक्यात समोरून इन्स्पेक्टर पूर्वा चालत येत होती. चिंटू आणि सुपर्णा आपल्या आईला बिलगुन उभे होते.

"मॅडम,मुलांनी त्या लोकांना पाहिले आहे. मला मुलांशी बोलायचे आहे." पुर्वाने दोघींना थांबवले.

"हाऊ डेअर यु? मुले पोलिसांशी बोलणार नाहीत." शाल्मलीने उत्तर दिले.


"माझ्याकडे परवानगी आहे. आज त्या दोन मुलांच्या जागी तुमची मुले असू शकली असती." पूर्वाने चेहऱ्यावरील एकही रेषा न हलवता उत्तर दिले.

"ओके, क्विक." मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या.

"सॉरी,आय वॉन्ट टू टॉक देम अलोन." पूर्वा शांतपणे उत्तरली.


"यू बिच. एक कॉल आणि गडचिरोली पहावी लागेल तुला."शाल्मली ओरडली.

"चिल,मला मुंबई आणि गडचिरोली दोन्ही सारखेच." पूर्वा शाल्मलीच्या डोळ्यात पाहून बोलली.

त्यानंतर दोन्ही मुले पूर्वासोबत आत गेली.


"पाणी! पाणी! प्लीज पाणी द्या ना. खूप तहान लागली आहे."अत्यंत क्षीण आवाजात स्नेहा ओरडली.


"स्नेहा! कुठेयस तू?" मयुरने आवाज दिला.


स्नेहाने आवाजाच्या दिशेने चाचपडले. तिने मयुरच्या हाताला हात लावला. इतक्यात दार उघडायचा आवाज झाला.


"ममा! प्लीज आम्हाला जाऊ द्या. कुठे आणले आहे आम्हाला?" मयूर ओरडू लागला.

दोघांचेही डोळे बांधलेले असल्याने त्यांना काहीच दिसत नव्हते. टक! टक! टक! बुटाचा आवाज जवळ आला. मयुरच्या कोवळया गालावरून एक केसाळ रखरखीत हात फिरला.

"हित गप बसून रायच. जास ओरडला तर जीभ कापून टाकीन." त्याबरोबर मयूर आणि स्नेहा दोघेही गप्प झाले.


"मुन्नी,ह्या दोघांना खायला दे. दोन तीन दिस हित सांभाळायला लागल ह्यांना." त्याने एका पोरीला आवाज दिला.

"ह्यांना नको ना विकू. किती लहान आहेत." मुन्नी हात जोडत म्हणाली.

त्याने मुन्नीचे केस ओढले."धंदेवालीची पोरगी तू. तुला बाकी काय कळणार. ह्यांना विकायला नाय आणला. डिलिव्हरी हाय. खायला घाल त्यांना." बुटांचा आवाज लांब गेला.


मुन्नी हळूच बाहेर डोकावली. तो गेल्याची खात्री होताच तिने त्या अंधाऱ्या खोलीत असलेला बल्ब लावला.


समोर असलेले सहा, सात वर्षांचे स्नेहा आणि मयूर प्रचंड घाबरले होते. मुन्नीने त्यांच्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी सोडली. साधारण दहा वर्षे वयाची,धुळीने भरलेले केस,मळकट फ्रॉक पण चेहऱ्यावर असलेले हसू. मुन्नीला पाहून मयूर रडायला लागला.

"मला घरी जायचं आहे. मला इथे नाही राहायचे." मुन्नी गप्प होती.

तिने दोन वडापाव काढले.

" खाऊन घ्या. हित हेच खायला मिळलं."मुन्नी दोघांना समजावत होती.

मयूर आणि स्नेहा घाबरत नाईलाजाने तो वडापाव खाऊ लागले.


"इन्स्पेक्टर पूर्वा, खाडीजवळ एका लहान मुलाचा मृतदेह सापडला आहे." खबऱ्याने बातमी देऊन फोन ठेवला.

रात्रीचे अकरा वाजले होते. चिंटू आणि सुपर्णा दोघांनी सगळे वर्णन तिला सांगितले. शाल्मली आणि मिसेस मुख्यमंत्री अस्वस्थ होत्या. जवळपास दोन तासांनी पूर्वा मुलांना घेऊन बाहेर आली.

"उद्या सकाळी स्केच आर्टिस्ट येईल. डोन्ट सेंड देम टू स्कूल फॉर सम डेज." पूर्वा सूचना देऊन बाहेर पडली.


जवळपास तासाभराने पूर्वा क्राईम सीनवर पोहोचली. सहा ते सात वर्षांचा अतिशय गोंडस मुलगा. गळ्याची नस कापण्यात आली होती. तसेच शरीरावर अनेक खुणा होत्या. कधीही चेहऱ्यावर भावना न दाखवणाऱ्या पूर्वाला प्रचंड अस्वस्थ वाटत होते. सगळे सोपस्कार आवरायची सूचना देऊन पूर्वा निघाली.


अशोक सगळे काम आवरून निघाला. रात्रीच्या सुमारास रस्ते मोकळे होते. तेवढयात त्याला एक मुलगी पिझ्झा घेऊन जाताना दिसली. साधारण दहा वर्षांची आणि प्रचंड गरीब वस्तीतील वाटणारी मुलगी इतक्या रात्री पिझ्झा घेऊन चालली होती. त्याला थोडे विचित्र जाणवले. इतक्यात पुढे सिग्नल आला. गाडी थांबली तोपर्यंत मुलगी गायब झाली होती.


पूर्वा रात्री दोन वाजता घरी पोहोचली. तोवर दिव्या जागीच होती.

"दिव्या,कशाला जागी राहिलीस तू? तुला कितीदा सांगितले." पूर्वा चिडली.

"सवय जात नाही ना! तुला आठवते ना आपण कसे जगलो फुटपाथवर. काय काय भोगले त्या दिवसात!" दिव्याच्या डोळ्यात पाणी आले.

"दिव्या,काय हे? असे सारखे रडू नकोस." पूर्वा तिला हलकेच थोपटत म्हणाली.


"पार्सल तयार आहे. दोन दिवसात डिलिव्हरी होईल." मोबाईलवर मॅसेज झळकला आणि त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य आले.

"पार्सल मिळताच पैसे पोहोच होतील." त्याने रिप्लाय पाठवला.


शाल्मली प्रचंड अस्वस्थ झाली होती. खरच मयूर आणि स्नेहाच्या जागी माझा श्लोक असता तर? ह्या भयंकर विचाराने तिला रात्रभर झोप आली नव्हती. सकाळी सगळीकडे मिदियात बातमी पोहोचणार होती. चिंटूला ह्या सगळ्यापासून लांब ठेवायला हवे. त्या इस्पेक्टरचा बंदोबस्त करायला हवा. शाल्मली मधली मिसेस देशमुख जागी झाली.


"पॅक अप! व्हॉट अ सीन रागिणी! लवकरच तुझे सिनेमात जायचे स्वप्न पूर्ण होणार." दिग्दर्शन मयांक ओरडला.

मालिकेचे शूट संपायला पहाटेचे तीन वाजले होते. रागिणी गाडीत बसली. तिने मोबाईल हातात घेतला. आपले फोटो बघत असताना तिला त्या फोटोमागे लहानगी निरागस रज्जो दिसत होती. रागिणीने डोळे मिटून घेतले आणि अश्रू मनसोक्त वाहू लागले.


मयूर आणि स्नेहा वाचतील का? ह्यामागे सिरीयल किलरचा हात असेल? पूर्वा आणि तिचे मित्र यांची भूमिका काय असेल?

वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all