Login

समाजाचं देणं भाग ४ अंतिम

समाजाचं देणं...

जलद कथामालिका लेखन - नोव्हेंबर २०२३

समाजाचं देणं - भाग ४ अंतिम

यशवंतराव आणि राधिकाताई कपाटातील सर्व पुस्तकांवर नजर फिरवत होते. पहिलाच दिवस असल्याने फार गडबड नव्हती. सेवानिवृत्तीच्या काही पैशांमधून या खोल्यांमध्ये पुस्तकांसाठी कपाटं, टेबल, खुर्च्या, कामकाजासाठी गरजेचं स्टेशनरी सामान, लहान मुलांना आवडतील अशा गोष्टीच्या पुस्तकांपासून ते कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, इ. प्रकारची खूप सारी पुस्तके खरेदी केली होती. सोबतच अभ्यासासाठी उपयुक्त अशी पुस्तकंही होतीच.

“खूप छान वाटतंय नाही का?” राधिकाताई म्हणाल्या.

“हो. अखेर आपलं लहानसं स्वप्न साकार झालं, या गोष्टीचं समाधान वाटतंय.” यशवंतराव म्हणाले.

दुसऱ्याच दिवशी परिसरातील एक शाळेत जाणारी मुलगी लहानसं गोष्टींचं पुस्तक घ्यायला म्हणून आली आणि वाचनालयाचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आठवडाभरात आसपासच्या बऱ्याच जणांनी वाचनालयाचा लाभ घ्यायला सुरुवात केली होती. हळूहळू माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासिकेत येऊन अभ्यास करू लागले होते. त्या परिसरात अगदीच काही उच्चभ्रू वर्ग राहत नव्हता. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना या वाचनालय, अभ्यासिकेचा खूप फायदा होत होता.

यशवंतराव आणि राधिकाताई त्यांना त्यांना जमणाऱ्या विषयांमध्ये मुलांना मदतही करायचे. भरीस भर म्हणून बाजूलाच असलेल्या एका लहानशा कामगार वस्तीतल्या मुलांनाही इथे प्रवेश दिला होता. त्यामुळे त्यांनाही आपल्या अभ्यासात बरीच मदत व्हायची. प्रतापरावसुद्धा त्यांना शक्य तितका वेळ मुलांना मदत करण्यात घालवत असत. एकूणच काय, तर यशवंतराव आणि राधिकाताईंनी सुरू केलेल्या या कार्याचा उद्देश सफल होण्याकडे वाटचाल करत होता.

वर्ष पूर्ण होईपर्यंत अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकाल जाहीर झाले. त्यांनी 'यशवंत व्हा!' वाचनालय आणि अभ्यासिकेला उत्तम निकालांसाठी दिलेलं श्रेय पाहून यशवंतराव आणि राधिकाताई मनोमन सुखावले होते.

'यशवंत व्हा!'ची वाटचाल उत्तमरीत्या सुरू होती. यशवंतराव आणि राधिकाताईंना एकटेपणा अजिबातच जाणवत नव्हता. सकाळपासून ते अगदी रात्री आठपर्यंत दिवस कसा सरायचा कळायचंही नाही. मुलंही जवळच अभ्यासासाठी आणि अवांतर वाचनासाठी सोय उपलब्ध झाल्याने खूश होती.


आता अवघ्या तीन वर्षांत 'यशवंत व्हा'चं नाव बरंच मोठं झालेलं. कालच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्या व्यक्तींचा सन्मान करणाऱ्या एका मोठ्या संस्थेचं पत्र मिळालं होतं. 'यशवंत व्हा'च्या खारीच्या वाट्याची दखल घेतली गेलेली आणि पुढच्याच आठवड्यात होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रण मिळालं होतं. ही बातमी ऐकून 'यशवंत व्हा' सोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला खूप आनंद झालेला.

अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडला आणि यशवंतराव, राधिकाताईंसह 'यशवंत व्हा!'ची इतरही काही मंडळी कार्यक्रम स्थळी पोहोचली.

कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि काही व्यक्तींचा सन्मान करून झाल्यावर 'यशवंत व्हा'चं नाव पुकारलं गेलं.

“तुम्ही मुलांना अभ्यासात मदत करून, वाचनाच्या आणि इतरही संधी उपलब्ध करून देऊन त्यांना उत्तम दिशा दिलीत, त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक वाटतं. मुख्य म्हणजे हे सर्व तुम्ही स्वखर्चाने आणि स्वतःच्या मर्जीने करून दाखवलंत. या गोष्टीचा कुठे गाजावाजा नाही की काही नाही. असा निःस्वार्थीपणा हल्ली दुर्मीळच झालाय; पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टी लपत नाहीत. तुमच्या कामाची जाणीव ठेवून विद्यार्थी स्वतःहून तुम्हाला तुमचं श्रेय देतायत. अवघ्या तीन वर्षांत तुम्ही या मुलांच्या प्रगतीसाठी जो हातभार लावला आहे, त्यासाठी तुमचा हा छोटासा सन्मान करणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तरी श्री. यशवंतराव सावंत आणि सौ. राधिकाताई सावंत यांनी मंचावर येऊन या सन्मानाचा स्वीकार करावा, अशी मी विनंती करतो.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणाले.

यशवंतराव आणि राधिकाताई मंचावर गेले आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालकाने त्यांना बोलण्याची विनंती केली.

“नमस्कार! खरं सांगायचं तर 'यशवंत व्हा!'ची सुरुवात करताना अगदी शुद्ध हेतू मनात होता किंबहुना अजूनही आहे की, समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजासाठी काहीतरी करायला मिळणंही मला भाग्याचंच वाटतं. शेवटी आपणही समाजाचं काही देणं लागतो ना! तेव्हा अजिबात माहीत नव्हतं की पुढे जाऊन आपला असा काही सत्कार वगैरे केला जाईल; पण तुम्ही आज मला तो मानसुद्धा दिलात. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो.” यशवंतराव म्हणाले.

“समाजासाठी काहीतरी करताना फक्त दानधर्म करून समाजकार्य केल्याची पावती घेणं मला फारसं रुचणारं नव्हतं. असंही सेवानिवृत्त होण्याची वेळ जवळ आलीच होती. मग विचार केला की आपण वय सांभाळून स्वतः काहीतरी करू शकतो, आपल्याला स्वतःला निखळ आनंद मिळेल आणि अर्थातच कोणाचं तरी आयुष्य आपल्यामुळे एक टक्क्याने का होईना भलं होईल, असंच समाजकार्य करायचं. आधीपासून स्वतःचं एक वाचनालय असावं अशी इच्छा होती. कारण मी स्वतः वाचनवेडा आहे. माझ्या पत्नीलाही वाचनाची गोडी आहे. म्हणून वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यात अभ्यासासाठी मदत होईल अशी अभ्यासिका सुरू करणंही ठरवलं. कारण काहींना घरात अभ्यासासाठी हवी तशी शांतता मिळत नाही, तर काहींकडे अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकांची किंवा इतर गोष्टींची कमी असते. काही मुलांना घरात कोणी अभ्यासात मदत करणारे नसतात. मग अशा सर्वांना मदत होईल या दृष्टीने 'यशवंत व्हा'ची सुरुवात झाली. होतकरू विद्यार्थ्यांना मदत होतेय हे पाहून आम्हाला पण समाधान मिळतं. उतारवयात काय करायचं हा एक मोठा प्रश्नच असतो नाही का! पण या कामामुळे उतारवयातील एकटेपणा, थकवा अजिबात जाणवत नाहीये. उलट मन आणि शरीर दोन्हीही प्रसन्न राहतात. मी आणि माझी पत्नीच नाही, तर आमच्या परिसरातील आपल्या देशाचे सेवानिवृत्त जवान प्रतापरावसुद्धा या कार्यात मोलाचं योगदान देत आहेत. मी तर म्हणेन की 'यशवंत व्हा' मधील प्रत्येक व्यक्ती या सन्मानाची वाटेकरी आहे. कारण आजकालची मुलं मनापासून या वाचनालय आणि अभ्यासिकेचा वापर करून घेत आहेत, हीच एक मोठी बाब आहे. मला खरंच खूप आनंद होतोय की आज कितीतरी मुलं इथे स्वतःहून मनापासून येत आहेत. हे जे 'यशवंत व्हा' नाव आहे ना, हे नाव माझ्या पत्नीने, राधिकाने ठरवलं होतं. आजच्या या दिवशी एक गोष्ट आवर्जून बोलावीशी वाटतेय की आमच्या त्या वास्तूत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाला ती वास्तू 'यशवंत व्हा' बोलून आशीर्वाद देत राहो. बाकी, आमचे प्रयत्न आणि आशीर्वाद नेहमी पाठीशी असतीलच म्हणा.” यशवंतरावांनी आणखी काही वाक्यं बोलून आपलं मनोगत संपवलं तसा टाळ्यांचा कडकडाट झाला.

पुढेही बराच वेळ कार्यक्रमाच्या औपचारिकता पूर्ण होत होत्या. आतापर्यंत ज्या समाजात राहिलो त्या समाजाचं देणं काही अंशी तरी फेडता येईल या भावनेने उचललेल्या या पावलाची‌ कुठेतरी दखल घेतली गेली होती. यशवंतराव आणि राधिकाताईंच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. मुलांच्या नकारघंटेचा विचार न करता उचललेल्या या पावलाबद्दल त्यांना मनोमन आनंद झाला होता. कारण दोन मुलं मनाने दुरावली असली, तरी आजच्या घडीला शेकडो मुलांच्या यशस्वी वाटचालीत त्यांचा खारीचा वाटा होता.

कार्यक्रम आटपून पुन्हा एकदा त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला. त्यांची कोणीतरी वाट पाहत होतं. कोण? अर्थात 'यशवंत व्हा!'

समाप्त
© कामिनी खाने

यशवंतराव आणि राधिकाताईंचा हा 'यशवंत व्हा' प्रवास कसा वाटला नक्की कळवा. समाजाचं देणं, याबाबतीत या जोडीने मांडलेला विचार तुम्हाला कसा वाटला हेही सांगा.

कशाला हव्यात नको त्या उठाठेवी असं बोलून बरेचदा चांगले विचार मागेच राहतात. स्वतःच्या उतारवयासाठी एक अशीही सोय ज्यांना शक्य असेल त्या व्यक्ती कदाचित करूच शकतात. समाजात राहताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्याची परतफेड या ना त्या मार्गाने करण्याचा विचार आपण करूच शकतो. वास्तविकतेला काहीशी काल्पनिकतेची झालर लावण्याचा प्रयत्न केलेली ही कथा कशी वाटली नक्की कळवा.

"सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून youtube चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास ईराकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी."
 

🎭 Series Post

View all