रहस्य स्यमंतकाचे.. भाग ६

कथा स्यमंतकाची
रहस्य स्यमंतकाचे.. भाग ६


मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभला स्वतःच्या खेळण्यात एक किल्ली आणि नकाशा सापडतो. आता बघू पुढे काय होते ते.


" तात, चिंतेत आहात का?" सत्यभामेने सत्राजिताच्या दालनात प्रवेश करत विचारले.

" चिंता??" सत्राजित खिन्नपणे हसला. "बघ ना. प्रसेनाचा मृत्यू झाल्याची वार्ता आली आहे. स्यमंतकाचा काही ठाव लागत नाही. आणि तो कृष्ण वल्गना तर करून गेला, की मी स्यमंतकरत्न परत आणून देईन. पण आज दहा दिवस झाले तरी त्याच्याकडूनही काहीच समजले नाही. आणि तू विचारतेस मी चिंतेत आहे का? तर हो.. आहे मी चिंतेत. खूप चिंतेत." सत्राजिताच्या चेहर्‍यावर दुःखाचे सावट पसरलेले बघून सत्यभामेला गलबलले. पण मनात असलेली गोष्ट आज विचारायचीच असे ठरवूनच ती आली होती.

"तात, तुम्हाला अजूनही असे वाटते की द्वारकाधीशांनीच मण्याची चोरी केली असेल?" श्रीकृष्णाच्या उल्लेखानेही सत्यभामेच्या चेहरा लाल झाला होता.

" ते मला माहित नाही. जोपर्यंत तो मणी हातात येत नाही तोपर्यंत कोणावरच विश्वास ठेवावासा वाटत नाही. इतक्या तपश्चर्येने मिळवलेले ते रत्न.." सत्राजिताचा आवाज बोलता बोलता कापू लागला. सत्यभामा विचारात पडली, खरंच कृष्णाने प्रसेनाला मारून रत्न चोरले असेल?

***************


" आजोबा, तुम्ही दूधवाल्याला येऊ नको असे नाही का सांगितले?" सकाळी सकाळी बेलचा आवाज ऐकून कौस्तुभ वैतागला होता.

" सांगितले होते.. कालच त्याचा हिशोब करून झाला होता. तरिही आज कसा आला? बघतो थांब." आजोबा उठायला गेले.

" तुम्ही नका उठू. मीच उघडतो दरवाजा." अंगावरचे पांघरूण नाईलाजाने फेकत कौस्तुभ उठला. रात्रभर दोघे मिळून पॅकिंग करत होते. महिना दोन महिने तरी तिथे काम चालणार होते. त्यामुळे स्वयंपाकघरातल्या सगळ्या खाण्याच्या वस्तू कामवाल्या मावशींना देण्यापासून पेपर बंद, दूध बंद अशी कामे दोघे करत होते. काम करून दमलेले दोघे रात्री खूप उशीरा झोपले होते. साहजिकच कौस्तुभ वैतागला होता. कारण एकदा काम सुरू झाल्यानंतर विश्रांती अशी मिळणारच नव्हती.

" काय राव तुम्ही पण? आजोबांनी येऊ नको सांगितले होते ना?" दरवाजा उघडत कौस्तुभ म्हणाला.

" आजोबा? कोणते आजोबा? तुम्ही कौस्तुभच आहात ना?" समोरून मधुर अश्या आवाजात आलेला प्रश्न ऐकून कौस्तुभची झोप उडाली.

" तुम्ही? तुम्ही कोण? आणि इथे काय हवं आहे?" आपल्या अंगावरील अपुऱ्या कपड्यांची लाज वाटत कौस्तुभने दारामागे लपत विचारले.

" मी काव्या.. बाबांनी.. म्हणजे आदित्यनाथांनी मला पाठवले आहे, तुम्हाला मदत करायला." कौस्तुभची अवस्था बघून येत असलेलं हसू आवरत ती म्हणाली.

"ते सर म्हणत होते तो सहकारी तुम्ही आहात?" आश्चर्यचकित होत दरवाजाच्या पुढे येत कौस्तुभने विचारले.

" हो.. तो सहकारी ती असू शकत नाही का?" ती ठसक्यात म्हणाली आणि परत कौस्तुभच्या कार्टुनच्या हाफपँटकडे बघत हसू लागली. ते बघून तो परत दरवाज्यामागे लपला. उसन्या अवसानाने बोलू लागला.

"असू कोणीही असतो. पण एखाद्या परपुरूषाकडे अश्या अवेळी जाणे योग्य आहे का?"

" अवेळी? सकाळचे दहा वाजले आहेत." काव्या घड्याळ दाखवत म्हणाली.

" काय?? दहा वाजले?" कौस्तुभ नकळत परत दरवाज्याबाहेर आला. कपड्यांची जाणीव होऊन परत आत गेला. "पण तरिही कोणाकडेही जायच्या आधी फोन नको का करायला?"

" केलेले फोन उचलायला नको का? आणि तुमच्याकडे घरी आलेल्या पाहुण्याला असं दरवाजात उभं करतात का?" काव्याने टोमणा दिला. काल रात्री झोपताना आपण मोबाईल सायलेंटवर ठेवलेला कौस्तुभला आठवला. त्याने डोक्यावर हात मारून घेतला. त्याला खरंतर अजिबात वाटलं नव्हतं की सोबत येणारा सहकारी म्हणजे एक मुलगी असेल, ती ही तरूण, सुंदर आणि आगाऊ. आगाऊ म्हणजे इतकी की सकाळी दरवाजात येऊन उभी. तेही तो अर्धवट कपड्यात असताना. हे वाक्य मनात आल्यावर त्याला आपण न घातलेल्या शर्टची आठवण झाली. त्याने पटकन वर बघितले. काव्या अनिमिष नजरेने त्याच्याकडेच बघत होती.

" तुम्ही जरा बाहेरच थांबा. मी कपडे घालून येतो." कौस्तुभ आत जायला वळला.

" अरे कौस्तुभ, दूधवाल्याला चहाच करायला बसवलंस की काय?" आतून आजोबा ओरडत आले. दरवाजात काव्याला बघून ते ही सदरा घालायला आत वळले. दोघांचीही तिला बघून उडालेली घाबरगुंडी बघून तिला हसू आले. काव्या आत आली. सोफ्यावर बसली. समोरच कौस्तुभने ठेवलेला टेडी होता.

" सो क्युट." म्हणत ती त्याला हात लावणार तोच कौस्तुभ ओरडला,

" त्याला हात लावायचा नाही." काव्याने करंट लागल्यासारखा हात मागे घेतला. कौस्तुभ शर्ट घालून आला होता. त्याने पटकन तो टेडी उचलला.

" टेडी तर आहे.. हात लावला असता तर काय झालं असतं?" काव्या पुटपुटली.

" तो त्याचा आवडता टेडी आहे. म्हणून तो कोणाला हात लावू देत नाही." आजोबाही सदरा घालून आले होते. बोलता बोलता आजोबांनी कौस्तुभला खुणावले. त्याने तो टेडी जपून उचलला आणि आत सामानात नेऊन ठेवला. काल रात्री कॉफी पिताना दोघेही त्या नकाशाबद्दल आणि चावीबद्दल बोलत होते. त्या चावीवरील खुणा बघण्यासाठी दोघांनी तो टेडी बाहेर आणला होता. तो चुकून बाहेरच राहिला होता. त्यावर इतर कोणाची नजर पडू द्यायची नाही. हे दोघांनीही आधीच ठरवले होते. म्हणून कौस्तुभ लगेचच ते घेऊन आत गेला. ते बघून काव्याने नाक मुरडले.

" तर, तू ही येणार आहेस आमच्यासोबत?" आजोबांनी तिला विचारले.


काव्याच्या येण्याने कौस्तुभ आणि आजोबांना मदत होईल की त्रास? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all