Login

रहस्य स्यमंतकाचे.. भाग ३

कथा स्यमंतकाची
रहस्य स्यमंतकाचे.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभला नवीन नोकरीच्या कामासाठी हंपीला जावे लागणार आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" स्वामी स्यमंतकमणी घेऊन नक्की लवकर परत येतील असा माझा विश्वास आहे." मोहिमेसाठी निघणाऱ्या कृष्णाला औक्षण करत रुक्मिणी म्हणाली.

" केवढा तो विश्वास आपल्या पतीवर. " खेळकर हसत कृष्ण म्हणाला.

" माझे स्वामी आहेतच तसे. ते यशस्वी होणारच." रुक्मिणीही ठामपणे म्हणाली.

"बघ हं.. आता म्हणते आहेस. पण ते मणिरत्न आहे. येताना त्याच्यासोबत एखादं संकटही घेऊन येईल."

" स्वामी सोबत असतील तर कोणत्याही संकटाला मी हसत सामोरी जाईन." रुक्मिणीच्या नजरेत कृष्णाविषयी फक्त आणि फक्त प्रेम होते. ते बघून कृष्णही भारावला.

" प्रिये, तुझी आणि मात्यापित्यांची काळजी घे. येतो मी." निरंजनाला नमस्कार करून कृष्ण निघाला.


***************


" आजोबा, काय चालू आहे तुमचे?" आजोबांनी काढलेला पसारा बघून कौस्तुभ वैतागला होता.

" काय चालू आहे म्हणजे? तुझ्यासोबत यायची तयारी करतो आहे." आजोबा बॅगेतले कपडे परत काढत म्हणाले.

" अहो पण. तिथे जाऊन मी काय करणार आहे, हे मलाच माहित नाही. तुम्ही तिथे येऊन काय करणार?"

" काय करणार म्हणजे? तुझ्यावर लक्ष ठेवणार. आणि तू तिथे गेल्यावर मी एकटा इथे काय करणार?"

" पण इथे तुमचा मित्रपरिवार आहे. तिथे मी कामाला गेल्यावर तुम्ही एकटे काय करणार?" कौस्तुभला आजोबांबद्दल वाटणारी काळजी जाणवत होती.

" मी ही तुझ्यासोबत हंपी बघणार. तू विसरतो आहेस. तू पुरात्तवज्ञ असलास तरी मी ही इतिहासाचा प्राध्यापक आहे. निवृत्त असलो म्हणून काय झाले. खरं सांगायचं तर त्या घटनेनंतर मी हंपीला गेलोच नाहीये." आजोबांचा आवाज गहिवरला होता.

"त्या घटनेनंतर, म्हणजे आईबाबांच्या अपघातानंतरच ना?" कौस्तुभने विचारले.

" हो.. तिथे परत जावेसे वाटलेच नाही रे."

" आजोबा, मला माहिती आहे तुम्हाला तो विषय काढला की दुःख होते. पण आता विषय निघाला आहे तर सांगा ना, नक्की काय झाले होते त्या दिवशी. मी खूप आठवायचा प्रयत्न करतो. पण मला आठवतच नाही."

" तुला आठवत नाही.. आणि मी विसरायचा प्रयत्न करतो तर ते विसरता येत नाही. तुझी आई तुझ्यासारखीच पुरातत्त्व खात्यात काम करत होती आणि तुझा बाबा माझ्यासारखा इतिहासप्रेमी. तो इतिहास संशोधक म्हणून नावारूपाला येत होता. दोघांनाही कसलातरी शोध लागला होता. त्याचसाठी ते दोघे हम्पीला जाणार होते. खरंतर आम्ही सगळेच जाणार होतो. पण तुझी तब्येत अचानक बिघडली. साधा तापच होता म्हणून मी म्हटलं की मी सांभाळीन तुला. तुझ्या आजीलाही म्हटलं तू थांब माझ्यासोबत. इतर वेळेस माझ्या शब्दाबाहेर नसणारी ती त्यावेळेस मात्र काहीच ऐकायला तयार नव्हती. तिला बनशंकरीला जाऊन देवीची ओटी भरायची होती म्हणे. दोन दिवसात येतो म्हणून सांगून गेलेले ते परत आलेच नाहीत. आली ती बातमी. त्यांच्या अपघाती मृत्यूची." आजोबा डोळे पुसत म्हणाले.

" पण आजोबा, आईबाबा अश्या कोणत्या कामासाठी हम्पीला गेले होते?"

" ते नाही समजलं कधीच. तसंही तुझ्या बापाला सगळंच गुपीत ठेवायची सवय होती. त्यावेळेस तर दोघांची गुप्तता खूपच वाढली होती. मी ही माझ्या कामांमध्ये गुंतलो होतो. त्यामुळे मी ही जास्त चौकशी केली नव्हती. वाटलं होतं की काम पूर्ण झाल्यानंतर तो सांगेल नेहमीप्रमाणे. पण ती वेळच आली नाही परत."

" पण आजोबा, काही कागदपत्रं तर असतील ना? ते जर संशोधन करत असतील तर त्याचे रिसर्चपेपर्स असायला हवे ना?" कौस्तुभने विचारले.

" हो.. पण झालं असं की ती अपघाताची बातमी आल्या आल्या मी तुला घेऊन तिथे जायला निघालो. तुझ्या दुसर्‍या आजीआजोबांना कसेतरी कळवलं. पण त्यांना इथे यायलाही वेळ लागणार होता. घरी परत आलो तर आपल्या घरात चोरी झाली होती. पूर्ण घर अस्ताव्यस्त झाले होते. पण मी कोणताच विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हतो. सोबत होते तीन जवळच्या माणसांचे मृतदेह आणि रडणारा तू. तुझे आजीआजोबा आल्यावर तुला त्यांच्याकडे सोडून मग मी स्मशानात गेलो. पण तू काही त्या आजीकडे रहायला तयार नव्हतास. या घटनेने विषण्ण झालेला मी, मग नंतर कशात मन रमलंच नाही. कॉलेजच्या उरल्यासुरल्या नोकरीचा राजीनामा देऊन मी तुला सांभाळले. आधी मनस्थिती नव्हती आणि नंतर तिकडे बघायची इच्छाच नव्हती. घरात कामाला येणाऱ्या माणसांकडून घर कसंतरी लावून घेतलं. पण त्या दोन खोल्यांमध्ये परत जावंसं वाटलच नाही बघ."

" आजोबा, तुमची हरकत नसेल तर मी बघू बाबांचे काही कागदपत्र मिळतात का?"

" बघायचे तर बघ. पण मला जेवढं आठवतं त्याप्रमाणे कोणीतरी सगळ्या कागदाच्या चिंध्या केल्या होत्या. त्याचा कम्प्युटर फेकला होता. काही विचारू नकोस." आजोबांना जणू ते सगळं आठवत होतं.

" आजोबा, मी आलोच." कौस्तुभ त्याच्या आईवडिलांच्या खोलीत गेला. ते दोघेही या खोलीत यायचे टाळत असले तरीही ती खोली रोज स्वच्छ केली जायची. समोरच्या भिंतीवरच त्या दोघांचा लग्नातला हसरा फोटो होता. कौस्तुभने क्षणभर तिकडे बघितले. डोळ्यातले पाणी न पुसता तो बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या कम्प्युटरकडे वळला. वस्तू वापरात असो वा नसो तरिही त्या सुस्थितीत असाव्यात या आजोबांच्या सवयीमुळे तो संगणक चालू होता.


कौस्तुभला मिळेल का काही दुवा आईवडिलांच्या मृत्युचा? काही असेल का त्या संगणकात? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all