रहस्य स्यमंतकाचे.. भाग १

कथा स्यमंतकाची
रहस्य स्यमंतकाचे..


" कृष्णापर्णमस्तू" अक्रूराने स्यमंतक मणी डोळे भरून पाहिला. शिसमी पेटीत तो मणी विसावला होता. तोच त्याला काहीतरी आठवले. त्याने सकाळी आणलेले टपोरे मोरपीस त्या मण्याशेजारी ठेवले. मोरपीसाच्या निळसर छटा त्या मण्यावरून परावर्तित होत होत्या. अक्रूराने परत एकदा हात जोडले. ती पेटी बंद केली आणि आपला हात उंचावला.

***********


" नाही.. हे शक्य नाही.. आजोबा." कौस्तुभ जोरात ओरडला.

" कौस्तुभ, कौस्तुभ जागा हो. काय झाले स्वप्न पडले का? घामाने भिजला आहेस. उठतोस ना?" आजोबा कौस्तुभला उठवत म्हणाले.

" आजोबा.. आजोबा.." कौस्तुभ हाताने आजोबांना चाचपडून बघत होता. "तुम्ही जिवंत आहात.. तुम्ही जिवंत आहात."

" अजूनतरी आहे. पण तू रोज असाच ओरडत उठलास मग माझे काही खरे नाही." आजोबा हसत म्हणाले.

" आजोबा.. नका ना अशी मस्करी करू. मी आत्ता स्वप्नात तुम्हाला निश्चेष्ट बघून एवढं घाबरलो. मी तर कल्पनाही करू शकत नाही तुम्हाला काही झाले तर माझे काय होईल याची." कौस्तुभ गंभीरपणे बोलत होता.

" काही होत नाही मला. उठ तू. मस्त पोहे केले आहेत. गार झाले तर माहित नाही." आजोबा हसत म्हणाले.

" तुम्ही का केलेत? मी उठायची वाट बघायची ना?" कौस्तुभ वैतागत म्हणाला. तो झटकन उठला आणि आवरायला गेला. तो गेला हे बघून आजोबा गंभीर झाले. "या स्वप्नांचा खेळ परत सुरू झाला तर. देवा विठ्ठला.. अजून किती बळी घेणार तू आमच्या घरातले? तुला काय हवे ते ही समजत नाही. मी माझ्या बायकोला, मुलाला, सुनेला गमावले आहे. आता फक्त हा नातू उरला आहे. हवं तर माझा जीव घे. पण याला काही होऊ देऊ नकोस." त्यांनी मनोमन देवाला हात जोडले.

" आजोबा, बाहेर येताय की मी येऊ आत?" कौस्तुभचा आवाज आला.

" आलोच.." डोळ्यातलं पाणी टिपत आजोबा बाहेर गेले.

" आजोबा, आज इंटरव्ह्यूला जाऊ ना?" पोह्याचा घास घेत कौस्तुभने विचारले.

" तुला मनापासून कंपनी बदलावीशी वाटते आहे?"

" असं नाही.. पण ते खूपच आग्रह करत आहेत."

" तुला आश्चर्य नाही वाटत याचे? तू आहेस एक पुरात्तवज्ञ. मग ते तुझ्या एवढे का पाठी लागले आहेत?" आजोबांनी मनातला प्रश्न विचारला.

" आजोबा, मलाही हा प्रश्न पडला. पण त्यांचे असे म्हणणे आहे की माझ्यामध्ये त्यांना हवा तो स्पार्क दिसला आहे. ही मुलाखत म्हणजे एक नाटकच आहे. त्यांनी तर माझी नोकरी पक्की केली आहे. पण का?" कौस्तुभ विचारात पडला होता.

" पण का?" आजोबा विचारात पडले होते. "कौस्तुभ तू ये जाऊन तिथे. त्याशिवाय आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. पण सतत सावध रहा. जायच्या आधी देवाला नमस्कार करायला विसरू नकोस."

" आजोबा, मला परत ती गोष्ट सांगा ना?" कौस्तुभ लाडाने म्हणाला.

" कोणती गोष्ट?"

" तीच आपल्या घरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची."

" ती कथा? कितीवेळा ऐकली आहेस तू."

" तरिही.. परत एकदा ऐकायची आहे मला. प्लिज ना." कौस्तुभने हट्ट केला.

" बरं ऐक.. असं म्हणतात की कृष्णाने द्वारकानगरी बुडवली. पण भक्तांच्या आग्रहाखातर प्रती द्वारका वसवली. ती मात्र भीमेतीरी. म्हणजेच पंढरपूरला. मुचकुंद राजा आठवतो ना?" आजोबांनी बोलता बोलता विचारले.

" आजोबा, मला सगळे आठवते. पण तुम्ही पूर्ण गोष्ट सांगा." कौस्तुभ परत म्हणाला.

" बरं बाबा.." आजोबा हसले. "तर या मुचकुंद राजाने कृष्णाला वरदान मागितले. तू सतत समोर रहा म्हणून. पण त्या जन्मात तर ते शक्य नव्हते. राजा मुचकुंद आला पुनर्जन्म घेऊन पुंडलिकाच्या रूपात. हे रूप सतत डोळ्यासमोर रहावे म्हणून त्याने प्राणत्याग केला. मग तो विठ्ठल उभा राहिला गेले अठ्ठावीस युगे विटेवर. याच विठ्ठलाच्या सावळ्या रूपाच्या प्रेमात पडला दक्षिणेचा राजा कृष्णदेवराय. त्याने तिथे मोठे मंदिर बांधले. ते सोन्यामोत्याने सजवले. आणि गेला या पंढरीच्या विठ्ठलाला घेऊन कर्नाटकी. पण त्याच्याशिवाय इकडच्या भक्तांना चैन पडेना. ते दुःखी झाले. त्यांनी विठ्ठलाला विनवले. ते ऐकून तो दुःखी कष्टी झाला. विठूरायाला करमते का भक्तांशिवाय? मग तो गेला भानुदासांच्या स्वप्नात. आता हे भानुदास कोण?" आजोबांनी मध्येच विचारले.

" एकनाथांचे आजोबा."

" बरोबर.. तर विठोबाने त्यांना दृष्टांत देऊन आपल्याला पंढरपुरात परत नेण्यास सांगितले. तसेच कृष्णदेवरायालाही दृष्टांत दिला, की मला परत घेऊन जाऊ देत. तर मग ही मूर्ती आणायला भानुदासांसोबत जे कोणी गेले त्यात एक होते आपले पूर्वज. त्यांनी त्यावेळेस बनवून घेतलेली आणि भानुदासांकडून प्रतिष्ठापना करून घेतलेली ही मूर्ती आहे. समजलं?" आजोबा कौस्तुभला टपली मारत म्हणाले.

" हो आजोबा.. ही गोष्ट ऐकली. आता माझा आजचा दिवस छानच जाणार. आशीर्वाद द्या मला." कौस्तुभ खाली वाकला.

" यशस्वी हो.. खूप खूप मोठा हो." आजोबांनी आशीर्वाद दिला.


उत्साहाने कौस्तुभ निघाला. सकाळी पडलेल्या स्वप्नाचे निशाणही आता त्याच्या चेहर्‍यावर नव्हते.


जाईल का खरंच कौस्तुभचा दिवस चांगला? का पडत असतील त्याला ही स्वप्ने? आहे का काही संबंध त्याच्या स्वप्नांचा आणि विठ्ठलाचा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सदर कथा काल्पनिक असून काही लोककथांवर तसेच काही पौराणिक कथांवर आधारित आहे. कथा मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात आली आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all