नकळत धागे जुळती
भाग - दोन
भाग - दोन
मागील भागात आपण पाहिले. विभाचे लग्न होऊन ती सासरी गेली आणि वसुंधरा तिच्या भूतकाळातील आठवणीत रममाण झाली.
"मी काय म्हणतेय पोरगी अठराची झालीय ना तवा तिचं लगीन कराया पाहिजे नं." गंगा आजी पानाचा विडा बनवत होती.
" पाहतोय मी चांगलं स्थळ, आलं की उरकून टाकू." रामाराव म्हणाले.
" होय."
"अरे राम्या एक स्थळ आहे म्हणजे माझ्या दूरच्या नात्यातील आहे. मुलगा सरकारी नोकरीवर आहे. त्याचं नाव सतीश,चांगला पगार पण आहे, दिसायला ही आणि काडीचही व्यसन नाहीये पोराला, मग बोलवू का?" सदानंदने सुचवले.
"हो निरोप धाडा भावजी." रमा (वसुंधराची आई) लगेच म्हणाली.
सदाने निरोप पाठवला आणि लगेच मुलाकडचा निरोपही आला.
"पुढच्या इतवारी येणार हायेत ते ."सदानंद
" व्हय." गंगा आजी
"पाहुणे येण्याआधी तयारी केली पाहीजे."
रविवारचा दिवस उजाडला. वसुंधराने आधीच तयारी करून ठेवली होती. मुलाकडचे पाहुणे आले.. सावळी तपकिरी डोळ्यांची वसुंधरा आकाशी रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज होते.. अभ्यासात अतिशय हुशार होती पण गरिबी परिस्थिती आणि मुलगी वयात आली की लगेच लग्न लावून मोकळे होत होते. तरीही तिच्या बाबांनी तिला दहावीपर्यंत शिकवले होते. तिचीही इच्छा होती पण आजी या वर्षी तिचं लग्न करून द्यायला सांगत होती. तिच्या लग्नाच्या मागे लागली होती.
सतीशच्या बाबांनी वसुंधराला प्रश्न विचारले. तिनेही उत्तर दिली. आईने प्रश्न विचारले." तुला स्वयंपाक येतो का? पुरणपोळी येते का? … ."
सतीशच्या बाबांनी वसुंधराला प्रश्न विचारले. तिनेही उत्तर दिली. आईने प्रश्न विचारले." तुला स्वयंपाक येतो का? पुरणपोळी येते का? … ."
"हो सर्व येतं मला .. " वसुंधराने खाली मान घालून सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मुलगी सर्वांनाच पसंत पडली. सतीशची नजर तर तिच्यावरून हटत नव्हती. त्यानेही तिथेच होकार दिला. सतीशमध्येही नाव ठेवण्यासारखं काहीही नव्हते. मुलाकडच्या लोकांनी घरदार पाहायला बोलावून घेतले आणि एक रविवार साधून वसुंधराचे आई वडिल, आजी, काका काकू सर्व मुलाकडे म्हणजे सतीशकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांना सर्व पसंतीस पडले आणि तिथेच त्यांनी लग्नाची बोलणी केली. लग्नाची तारीख, बस्ता, साखरपुडा याविषयी बोलून ते आपआपल्या घरी निघाले.
घरी आल्यावर त्यांनी वसुंधराला लग्नाची तारीख सांगितली ती ऐकून छान लाजली देखील. आधी साखरपुडा करण्यात आला. त्यानंतर, महिन्याने लग्न होते. लग्न झालं अन् ती शहरात गेली. पहिल्यांदा शहरात आलेली वसुंधरा घाबरली आणि हळूहळू ती त्या वातावरणात रमू लागली. सतीशने तिला पुढील शिक्षणासाठी आग्रह धरला.
"वसु, तू तुझं पुढील शिक्षण पूर्ण करावं असं मला वाटतयं." त्याने तिचा हात हातात घेत म्हणाला. त्याचवेळी ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
"अग हो मी खरंच बोलतोय." तिच्या नजरेतील त्याने अचूक हेरला होता.
"पण माझ्याकडून होईल का? म्हणजे घर संसार, अभ्यास?" ती विचार करत म्हणाली.
"मी आहे ना … होईल सर्व." त्याने आश्वासक होऊन तिच्या हातावर हात ठेवले आणि ती त्याच्या मिठीत शिरली. सतीशने म्हटल्याप्रमाणे वसुंधराचा बाहेरून फॉर्म भरला. तिला परिक्षाच्यावेळी पेपरला जायचे होते. तिचा संसार, अभ्यास छान चालू होता.
काही दिवसांनी कळले की, ते दोघं आईबाबा होणार आहेत. आता तर सतीशची जबाबदारी आणखीनच वाढली. सतीश तिला हर प्रकारे तिच्या कामात मदत करत होता. ती मन लावून अभ्यास करत होती. नऊ महिने झाले आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.सर्वच खूप आनंदी होते. तिचे नाव विभा ठेवण्यात आले. एक्झामचे वेळापत्रक आले.. विभाला सांभाळून तिला अभ्यास करावा लागत होता. तिला फार कमी वेळ मिळत होता. अभ्यासावेळी सतीश विभाला सांभाळून घेत होता. परिक्षा सुरु झाली. परिक्षा हॉलच्या बाहेर सतीश तीन महिन्याची छोटी विभाला घेऊन हाताचा झोका करून झोपवत होता तर आत मध्ये वसुंधरा पेपर लिहत होती. मध्येच विभा रडत होती. तेव्हा त्याची विभाला शांत करण्याची तारांबळ उडत होती. पेपर लिहून झाला तशी तिने धावत बाहेर येऊन बाळाला घेतले. सगळ्यांनाच तिचं कौतुक वाटत होतं. वसुंधरा छान मार्कांनी पास झाली. तिने पुढे जाऊन ग्रॅज्युएशन पूर्ण करून पास झाली आणि पुन्हा तिला आई होण्याची चाहूल लागली. दूसरी ही तिला मुलगी झाली. बाकीचे नातेवाईक जरा नाराज होते पण त्या दोघांना त्याचा काहीही फरक पडला नाही.
"सतीश दूसरा मुलगा पाहिजे होता रे. मुली लग्न करून निघून जातात. आपला वंश वाढवायला मुलगाचा पाहिजे, तोच म्हातारपणाचा आधार असतो." त्याची आई म्हणाली.
"आई असं काही नाही असत. मुलीही आईवडिलांचा आधार होतात. मुलीचा अंशही आपलाच वंश असतो ना आई. माझ्या मुली माझा व वसुचा आधार बनतील." सतीश विभा विहाच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणाला.
"तुम्ही आज कालची शिकलेली पोर आम्हाला शिकवता बाबा. काय बोलणार तुम्हाला."
विभा विहा याच्यांमध्येच तिचा दिवस कसा जात होता तिलाच समजत नव्हते.
विभा विहा हळूहळू मोठ मोठ्या होत्या. विभा दहा वर्षाची आणि विहा सात वर्षाची झाली. दोघही फार हुशार होत्या पण विहा थोडी तापट डोक्याची आणि हट्टी होती. सर्व छान सुरळीत चालू होतं आणि एकदिवस घरी येताना बाईक वरून सतीशचा अपघात झाला तो तिथेच गतप्राण झाला.
सतीश गेल्याचा धक्का पचवू शकेल का वसुंधरा? बघूया पुढच्या भागात.
क्रमश ..
©® धनदिपा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा