मिठास

मिठी दिवसाची मिठास...

मिठास

काहीतरी टाइमपास करावा म्हणून तिने मोबाईलमध्ये डोकं खुपसलं होतं. मात्र या गोष्टीने टाइमपास तर दूरच राहिला; पण जुन्या आठवणींना जाग जरूर आली होती. त्या जुन्या आठवणी... ज्या चेहऱ्यावर हसू तर आणायच्याच; पण त्याहून जास्त प्रमाणात वेदनाही हमखास द्यायच्या. आज सोशल मीडियावर मिठी दिवसाची मिठास पसरलेली पाहून तिलाही आपल्या आयुष्यातील महुरता आठवली आणि त्याच नादात ती कधी त्या माधुर्यात हरवून गेली हे तिलाही समजलं नव्हतं.


‘मिठी दिवस! आजच्या दिवशी त्याची आठवण न येणं तर शक्यच नाहीये. तो, माझ्या आयुष्यातली खरी मिठास... मागच्या दोन वर्षांमध्ये त्याच्या असण्याने आयुष्य गोडच तर झालं होतं; पण आज... आज माझी परिस्थिती डायबिटीस असल्यासारखी झाली आहे. हवाहवासा वाटणारा तो गोडवा आज मला मनाविरुद्ध बाजूला सारून ठेवावा लागलाय. शेवटी नाइलाजच ना! पण म्हणून तो जुना गोडवा विसरूही शकत नाही ना. कदाचित आयुष्यभर तो गोडवा असाच आयुष्यात रेंगाळत राहील.

त्याचं माझ्या आयुष्यात असणंच मुळात माझ्या आयुष्यात गोडवा पसरवत होतं. त्यातही एक खास गोष्ट मात्र कधीच विसरता येणार नाही, ती म्हणजे एकेकाळची माझी हक्काची जागा... त्याची मिठी! खरंच, आजचा दिवस म्हणूनच तर त्याची आठवण करून देतोय. गेल्या काही महिन्यांत अंतराची सवय झाली आहे किंबहुना मी ती करून घेतली आहे; पण' मिठी' हा शब्द समोर आल्यावर ते अंतर राखणं खरंच मला जमेल? कदाचित कधीच नाही!

तो आयुष्यात आला आणि मनाला एक हक्काचा आधार मिळाल्याची जाणीव झाली. मनातल्या प्रत्येक भावनेचा आसरा तोच तर होता. तोपर्यंत मिठीत शिरण्यासारखे स्पर्श तर कधी झालेच नव्हते. मनं जुळली होती तरी स्पर्शांमध्ये अंतर कायम होतं. सोबत असतानाच्या पहिल्यावहिल्या डे'जच्या निमित्ताने त्याने पाठवलेला तो मेसेज वाचल्यावर माझ्या मनात मात्र नकळतच गुलाब उमलले होते. काय तर म्हणे 'मिठी या शब्दातच किती मिठास आहे. नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे.' एका अर्थाने खरंच होतं ना... शब्द उच्चारताच मनावर मोरपीस फिरल्याची जाणीव झाली होती आणि तिथून सुरुवात झाली होती, काही हळुवार भावना मनात उमलायला! लाजेपोटी मिठी मारायची हिंमत मात्र तरीही कधी केलीच नव्हती; पण वेळेसोबत मला मिठीचा खरा अर्थ त्यानेच तर शिकवलेला. एकदा घरातल्या काही कारणांमुळे भावनांचा बांध फुटून स्वतःच्याही नकळत त्याच्या मिठीत शिरले होते आणि भावनांचा आवेग ओसरल्यावर लक्षात आलं की प्रियकर अन् प्रेयसीतली मिठी ही काही निव्वळ स्पर्शाचा मेळ नसतो. ही प्रेमळ मिठी कधी मायेची ऊब अन् खचलेल्या मनाला उभारी देणारा हक्काचा किनाराही असते. त्या पहिल्यावहिल्या मिठीत प्रेम तर होतंच; पण त्या आश्वासक मिठीत जो आधार वाटत होता, तो काही औरच होता! त्यानंतर जेव्हा जेव्हा मी मनाने खचले होते, प्रत्येक वेळी त्याच्या मिठीत शिरताच मन आपोआप शांत व्हायचे. त्याच्या मिठीत शिरून आयुष्यातला कल्लोळ व्यक्त करताना जेव्हा तो डोक्यावर हलकेच हात फिरवून मायेने थोपटायचा, त्यावेळेस काय वाटायचं ही भावना शब्दांत सांगणं जरा कठीणच असेल; पण ती जी काही भावना होती, ती मनात मात्र अजूनही तशीच जिवंत आहे आणि कदाचित त्या भावनेला कधी मरण येणारही नाही!

या गोडव्याची हळूहळू सवयच होत गेलेली. माझं आयुष्य मला इतर सगळ्या चवींचे अनुभव देत असताना, तो मात्र सतत माझ्यासाठी गोडवा घेऊन उभा असायचा. त्यामुळे मलाही मिश्र चवींच्या जेवणानंतर या डेझर्टची सवय जडली होती. डेझर्टची गोड चव जशी हळूहळू जिभेवर रेंगाळत मन, शरीरावर स्वतःचा परिणाम दाखवते, तसंच या मिठी नावाच्या डेझर्टच्या मधुरतेमुळे माझं मन समाधानी व्हायचं. त्याच्या हृदयाचे ठोके ऐकताना प्रेमाचा अर्थ कळायचा. त्याच्या हातांचा विळखा मला मी एकटी नाहीये हे जाणवून द्यायचा. कोरडेपणा वाढलेल्या माझ्या आयुष्यात नवीन पालवी फुटण्याची जाणीव करून द्यायची ती मिठी! थकल्या भागल्या जीवाने विसावा घेण्यासाठीची जागा, बरेचदा माझ्या मुक्या कहाणीला समजून घेणारी जागा म्हणजे ती मिठी होती. इथे आयुष्यभर आनंदच मिळेल असं वाटण्यासारखी सुरक्षित जागा म्हणजे ती मिठी होती. खरंच, दोन वर्षांच्या कालावधीत बरंच काही दिलं होतं या मिठीच्या माधुर्याने.

पण म्हणतात ना, जास्त गोड पण बरं नाही! कदाचित म्हणूनच त्या गोडव्यापासून कायमचं अंतर राखण्याची वेळ आली असावी. असो! विचारातही फार गोडपणा आठवायला नको. काय सांगावं, तिथेही कधीतरी आस्वाद घ्यायला मिळणारी ही मिठास अचानक माझ्यावर रुसून बसली तर!'
समाप्त
© कामिनी खाने

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास ईराकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.