गंधखुणा

गंधात अडकलेलं मन...

आज जरा जास्तच उकाडा जाणवत होता. पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा अंगाला बिलगल्याची जाणीव काही केल्या कमी होत नव्हती. उन्हं उतरणीला जायची वेळ झाली होती अन् अचानक आभाळ भरून आलं. भर उन्हाळ्यात दाटलेलं आभाळ पाहून मनात ऋतूबदलाची बरीच चक्र सुरू झाली; पण कदाचित तप्त धरणीप्रमाणेच गरमीने त्रासलेलं शरीरही त्या थेंबांसाठी आसुसलेलं होतं.

ती खिडकीपाशी बसून आकाशाच्या बदलणाऱ्या छटा, वातावरणाचे बदलणारे भाव पाहत होती. इतक्यात पावसाच्या सरींनी हजेरी लावायला सुरुवात केली. वातावरणात हळूहळू गारवा पसरताना शरीराची लाहीसुध्दा कमी होत होती. तिचं मन मात्र त्या गंधात अडकलं होतं. मातीच्या त्या गंधामुळे तिचं कोरडं झालेलं मन आज काही जुन्या आठवणींत चिंब भिजत होतं.

तिला चटकन कॉलेजमध्ये असतानाचा ॲक्टिनोमायसेट्सबद्दल समजलं तो दिवस आठवला. पावसाळा सुरू झाला होता आणि त्यातच कॉलेज लेक्चरमध्ये सरांकडून समजलं मातीच्या गंधामागचं रहस्य! रहस्य यासाठी की ती एक पाऊसवेडी, त्यातही मातीच्या गंधाची खास चाहती होती. आजपर्यंत बिचारी एका साध्याशा विचारात जगत होती की माती उन्हामुळे तापलेली असते म्हणून पाऊस पडल्यानंतर सुवास दरवळतो; परंतु त्यामागचं हे शास्त्रीय कारण ऐकून तिला काहीतरी खूप खास गवसल्यासारखं वाटत होतं. आवडत्या विषयाबद्दल आकर्षण असतंच ना! तसंच काहीसं तिचंसुद्धा झालं होतं. ॲक्टिनोमायसेट्स, जिओस्मिन, पेट्रिकोर, इ. संकल्पना आणि एकूणच प्रक्रिया समजून घेणं तिच्या मल्हारप्रेमात आणखी भर घालत होतं. निसर्गात स्वतःला हरवून बसणारी ती, आज या निसर्गाच्या लीलेने हरखून गेली होती.

लेक्चर संपलं तसं बाहेर कॉलेजच्या बागेत बसून मैत्रिणींसोबत याच विषयावर चर्चा सुरू झाली. इतक्यात अनोळखी असलेल्या त्यानेही या चर्चेत उडी घेतली. कारण पाऊस आणि मातीचा गंध म्हणजे त्याचाही जिव्हाळ्याचा विषय. तो खरंतर वाणिज्य शाखेचा विद्यार्थी, त्यामुळे खूप उत्सुकतेने आणि उत्साहाने तिचं बोलणं ऐकत होता. आणि अशाप्रकारे मातीच्या गंधामुळे त्यांची ओळख झाली. अधूनमधून बोलणं होऊन बऱ्यापैकी चांगली मैत्रीही झाली होती.

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाचा पहिला पाऊस! ती घरी जायला निघाली होती की अचानक पाऊस बरसायला सुरुवात झाली. शेजारीच असलेल्या पार्किंगच्या जागेत तिने आसरा घेतला अन् बाजूला लक्ष गेलं तसं शेजारीच उभा असलेला तो दिसला. मातीचा गंध श्वासात भरून घेत असताना दोघांनाही त्यांची ओळख झाली तो दिवस आठवला. पावसाचा जोर ओसरेपर्यंत रंगलेल्या त्यांच्या गप्पा कधी त्यांच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरून गेल्या, त्यांनाही कळलं नाही. प्रेमाची कबुलीही पावसाच्या साथीनेच दिली होती आणि प्रेमाच्या कित्येक गप्पाही त्या पावसाशीच जुळलेल्या असत. भविष्याच्या स्वप्नांमध्येही पाऊस आणि मातीच्या गंधाला खास जागा होती.

कॉलेजच्या त्या गोडगुलाबी आठवणीत रमलेली असतानाच तिच्या मनात ती कटू आठवण जागी झाली. मातीच्या गंधाने सुरू झालेल्या कहाणीचा मातीच्या गंधाच्या साक्षीनेच झालेला अंत! पदव्युत्तर शिक्षणाच्या शेवटच्या वर्षीचा तो पहिला पाऊस, आजही तिच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत होता. ती तर नेहमीसारखीच पहिल्या पावसाच्या बरसण्यात रमली होती; पण कदाचित तो, तिच्या या रमण्यापासून केव्हाच अलग झाला होता. ती अलिप्तता आज ओठांवर आली होती, बालिशपणाचं नाव देऊन! त्याचे शब्द न कळून किंवा कदाचित कळूनही न कळण्याचे भाव आणून ती अजूनही पाऊस आणि गंधाच्या गप्पा करण्याचा प्रयत्न करत होती. नशिबाने मात्र त्याचं झिडकारणंच दिलं होतं. “किती गं हा बालिशपणा करशील! असं पावसाच्या, गंधाच्या प्रेमात अन् स्वप्नात रमून आपलं आयुष्य सरणार नाहीये. आणि तू याच स्वप्नांमध्ये रमणारी वेडी आहेस! मला नाही वाटत आपलं पुढे जाऊन काही होऊ शकतं. त्यापेक्षा ही कहाणी इथेच थांबलेली बरी!” इतकं बोलून तिचं मतही न ऐकता निघून गेलेला तो, आणि नक्की काय घडलं आहे हे मनाला पटवून देत तिथेच त्या मल्हारसरींमध्ये चिंब झालेली ती! दुसऱ्याच दिवशी कोण्या मुलीला जवळ घेऊन फिरणाऱ्या त्याला पाहून जाब विचारायला जाणारच होती की, समोरच असलेल्या त्या दोघांच्या सहा महिन्यांपासून असणाऱ्या नात्याचं सत्य कानावर आलं. जी जवळीक आपुलकीची, प्रेमाची वाटत होती तिच्यावरही शंका निर्माण झाली. तिला कळून चुकलं, दुरावा कदाचित कधीच आला होता; पण ज्याच्या साक्षीने शपथा घेतल्या होत्या, त्याच्याच साक्षीने दूर होणंही नशिबाच्या पानावर लिहिलेलं होतं. आपलं नक्की काय चुकलं तिला कधीच कळालं नाही. तो बेफिकीर होता; पण ती मात्र तिथेच त्या चिंब करणाऱ्या पावसात मन जाळत होती.

तिने कपाटात ठेवलेली ती अत्तराची कुपी अलगद हातात घेतली. नाही म्हटलं तरी आठवणींचा पाऊस आज डोळ्यांवाटे बरसलाच होता. ती कुपी म्हणजे त्याने तिच्या वाढदिवसाला दिलेली खास भेट, कनौजचं प्रसिद्ध अत्तर, मिट्टी अत्तर! पावसासोबत येणारा तो मृद्गंध त्या दोघांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा भाग होता. इतर वेळीही त्या सुगंधाचा दरवळ अशा माध्यमातून अनुभवायला मिळावा, म्हणूनच त्याने ही खास भेट दिली होती. ही खास भेट कधी तिची सर्वात जवळची आवड झाली, तिचं तिलाच कळलं नव्हतं! ती कुपी फेकणं तर कधी जमलं नव्हतं; पण आज तिला त्या अत्तराची कुपी नजरेत पडणंही नकोसं वाटत होतं.

हवाहवासा तो गंध आजकाल तिला नकोसा झाला होता. कारण प्रेमाच्या गुलाबी क्षणांना उजाळा देणारा गंध तिला त्या शेवटच्या विरहात भिजलेल्या पावसानेही चिंब करायचा.

-© कामिनी खाने.