अबोली.. भाग ३

कथा एका अबोलीची
अबोली.. भाग ३


" अच्छा तूच आहेस का तो? मला वाटले आता तरी सुधारला असशील, पण दुसऱ्यांना त्रास देण्याची तुझी सवय अजून गेली नाही का? एखादी मुलगी नाही म्हटली म्हणून त्याचा राग असा व्यावसायिक पातळीवर काढायचा? व्वा... आणि मला काही पसंत , नापसंत असू शकते हे तरी तुला समजले पाहिजे."

" पण माझे प्रेम होते तुझ्यावर."
आवाजातली मगरूरी कमी झाली नव्हती.

" हो पण माझे नव्हते ना. आणि आता तुझे वागणे पाहून तर त्या निर्णयाचा अभिमान वाटतो. भिडेपोटी किंवा भितीपोटी जरी मी ती फुले स्विकारली असती तर माफ करू शकले नसते स्वतःला."

" हा माज? बघतोच तुझे लेख, कविता कसे छापून येतात इथे?"

" ह्याला माज नाही स्वाभिमान म्हणतात. जो तुला माहित आहे की नाही शंकाच आहे. आणि अजून एक गोष्ट ज्याच्याकडे कर्तृत्व असते ना त्याला कोणत्या कुबड्यांची गरज लागत नाही. इथे नाहीतर कुठेतरी मी यशस्वी होईनच."

अबोली तिथून निघाली. बाहेर आल्यावर मात्र तिचा बांध फुटला. तिने सुबोधला फोन लावला. रडतरडतच झालेल्या गोष्टी सांगितल्या.

"मी येऊ का तिथे?" त्याने काळजीने विचारले.

" नको, मी निघाले इथून. माझा ना विश्वासच बसत नाहिये कि जगात अशी माणसे असू शकतात." डोळे पुसत अबोली म्हणाली.

" तू शांत हो.. आणि आरामात ठरव काय करायचे. तू एकदा सरांशी बोलून घेतेस का?"

" हो बोलले तर पाहिजेच. आपण घरी आल्यावर बोलू. मग ठरवते. मी ठेवते फोन."

घरी येऊन अबोली थोडी शांत झाली. मनाशी थोडा विचार करून तिने सरांना मोबाईलवर कॉल केला.

" सर अबोली बोलतेय. आपण बोलू शकतो का?"

" काही महत्वाचे आहे का? कारण तुम्ही कधी फोन केला नाही. आणि गेले काही दिवस तुम्ही काही लिखाण देत नाही का? आपल्या पेपरमध्ये येत नाही आजकाल?"

" सर, मी मागच्याच आठवड्यात नेऊन दिले होते. पण ते मला साभार परत आले. बहुतेक उपसंपादकांची इच्छा नसावी ते छापण्याची." अबोलीने धीर करुन सांगितले.

" सुरेश? पण तो असे का करेल?"

संपादकांना आश्चर्य वाटले. नाईलाजाने अबोलीने कॉलेजचा प्रसंग सांगितला.

" असे होय, सुरेशना थोडा बालिशच आहे. तुम्ही एक करू शकाल का? थोडे दिवस टोपण नावाने लिखाण द्या मी बघतो काय करायचे ते."
" सर, मला वाटले होते कि तुम्ही निष्पक्षपातीपणे वागाल. असो ते तुमचे नातेवाईक आहेत. त्यांच्या समाधानासाठी मी माझे नाव बदलून काम करणार नाही. तुम्ही आलात कि मला सांगा. माझे अप्रकाशित लेखन परत घ्यायला आवडेल."

अबोलीने फोन ठेवला आणि तिने प्रवेश केला आपल्या लिखाणाच्या जगात. या निश्चयाने कि जर माझे लिखाण चांगले होत असेल तर अशी कोणीही व्यक्ती मला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही.


"डॉक्टर, अबोली होईल ना बरी?"

" मि. सुबोध त्यांना तीव्र नैराश्याचा घटका आला आहे. भरपूर कौतुक आणि त्यानंतर घडलेल्या घटना त्यांच्या हळव्या मनाला झेपल्या नाहीत. काळजी करू नका. आपण करू प्रयत्न त्यांना यातून बाहेर काढण्याचा."


हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all