अबोली.. भाग १

कथा एका अबोलीची
अबोली...


अबोली, नावासारखीच अबोल होती. नुकतीच लग्न करून शहरात आली होती. घरी नवरा सुबोध आणि ती दोघेच. सासूसासरे गावी , त्यामुळे इथे फक्त राजाराणीचाच संसार. सुबोध सकाळी लवकर कामाला गेला कि अख्खा दिवस तिच्यासमोर पडलेला असे. काय करायचे हा विचार करून ती थकली होती.. एका रविवार पुरवणीमध्ये तिने काव्यस्पर्धेबद्दल वाचले आणि जणू तिचा प्रश्नच सुटला. अबोलीने मराठी हा विषय घेऊन एम.ए. केले होते. तिला पुढे अजून शिकायचे होते. एका बाजूला तिला लग्नासाठी स्थळे यायला लागली तर दुसरीकडे तिची आई आजारी पडली. त्यामुळे इच्छा असूनही तिचे शिक्षण थांबले. आई बरी होईपर्यंत भावाची बारावी आणि बहिणीची दहावी एकाच वर्षी आले मग त्यांचा अभ्यास घ्यायचा म्हणून आणि मग नंतर लग्न झाले म्हणून तिचे शिक्षण थांबले ते थांबलेच. पण कॉलेज मध्ये असताना ती कविता करायची, कॉलेजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी लेखन करायची. कॉलेजमध्ये तर काव्यस्पर्धा म्हणजे अबोलीचा प्रथम क्रमांक हे ठरलेच होते. अनेक परिक्षकांनी तिच्या कवितेला नावाजले होते. फक्त कॉलेज सुटल्यावर तिचा हा छंद कमी झाला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण परत तेवढ्याच चांगल्या कविता करतो का हे आपल्याला बघता येईल असे ठरवून तिने सुरुवात केली.
कविता लिहून झाल्यावर तिने सुबोधला त्या कविता दाखवल्या. त्याची पसंतीची मोहर उमटताच तिने थोडेसे घाबरतच त्या दोन, तीन कविता स्पर्धेसाठी पाठवून दिल्या ..निकालाला जरी वेळ होता, तरी तिने आता रोज नवीन विषयावर काहीतरी लिहायला सुरुवात केली. एक दिवस अचानक तिला त्या वर्तमानपत्राच्या ऑफिसमधून एक फोन आला आणि तिला त्यांनी त्यांच्या कचेरीत बोलावले. आश्चर्यचकित झालेली अबोली त्या कचेरीत गेली. तिने तिथे स्वतःचे नाव सांगितल्यावर तिला थेट संपादकांच्या केबीनमध्ये नेण्यात आले.

" या बसा, मॅडम.." संपादकांनी खुर्चीकडे इशारा केला.

" माझे काही चुकले का? तुम्ही इथे बोलावून घेतले म्हणून विचारते." अबोलीने विचारले.

" चुकले काहीच नाही. उलट तुमच्या कविता इतक्या सुंदर आहेत की कोणत्या कविता निवडाव्यात हेच कळेना. म्हणून म्हटले एकदा तुमच्याशी बोलूयात." संपादकांचा मनमोकळा स्वभाव पाहून अबोलीहि थोडी रिलॅक्स झाली.

" तुम्ही आधीपासूनच कविता करता की हा पहिलाच प्रयत्न?"

" कॉलेजमध्ये असताना करायचे , पण आता थोडे कमी झाले आहे."

" अच्छा , शिक्षण किती झाले आहे?"

" मी एम.ए. मराठीतून केले आहे." अचानक अबोलीला आपली मुलाखत चालू असल्यासारखे वाटले.

" सध्या कुठे कामाला आहात का?"

" मी नुकतीच या शहरात आले आहे. अजूनतरी तसा विचार केला नाही."
" माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रस्ताव आहे. तुम्ही स्विकारावाच अशी जबरदस्ती नाही. नाही म्हणालात तरी स्पर्धा तुम्हीच जिंकणार याची खात्री बाळगा."

" तुम्ही सांगा सर, विचार नक्की करेन."

" आमचे हे वृत्तपत्र नवीन आहे. त्याचा खप वाढावा म्हणून खरेतर आम्ही अशा स्पर्धा आयोजित करतो. त्यातून अजून एक हेतू साध्य होतो की कोणीतरी नवोदित लेखक, लेखिका या स्पर्धेतून नजरेस पडतात. मग काही चौकटी किंवा काही स्तंभलेखन ते आरामात करू शकतात. त्यांना नाव मिळते, थोडेफार पैसे मिळतात. आमचेही काम होते. बघा तुम्हाला आवडत असेल तर."

हे ऐकून अबोली खूप खुश झाली. आवडीचे काम आणि तेही समोरून विचारणा केलेली.

" सर, मला नक्की आवडेल हे काम करायला. पण तरिही एकदा घरी विचारून सांगू?"
" नक्की."
" कामाच्या वेळा वगैरे काही असतील?"
" नाही. तुम्ही सध्या तरी घरून काम केले तरी चालेल.तुम्ही तुमचे लिखाण इथे आणून देत जा..योग्य वाटेल ते लिखाण आम्ही प्रकाशित करू.. पण जे असेल ते तुम्हाला सांगूच .सध्या आमचे उपसंपादक सुट्टीवर आहेत तेच खरेतर हे सगळे निवडतात. ते नाहीत तर तुम्ही थेट माझ्याकडे आणून दिलेत तरी चालेल. म्हणजे तुम्ही पाकिटावर 'पुरवणी' असे लिहित जा."

"मी दोन दिवसात नक्की सांगते सर."

"तुम्ही सकारात्मक निर्णय घ्याल अशी आशा करतो. तुमचा फोननंबर आणि पत्ता आहेच आमच्याकडे. पुढच्या वेळेस जर आलात तर तुमचा एक बायोडेटा करून आणा. म्हणजे बरे पडेल."
"नक्की सर.. थँक यू वेरी मच."
असे म्हणून अबोली तिथून निघाली. लगेच तिने सुबोधला फोन लावला..
"हाय.. तुला माहित आहे का आत्ता काय झाले?"
" तू सांगितल्याशिवाय कसे कळणार? थोडं पटकन सांगशील समोर सर बसले आहेत."
" अरे, मला त्या वर्तमानपत्रात छोटेमोठे लिहिण्याची ऑफर आली आहे."
" मस्त बातमी. आल्यावर साजरी करू. पण आता फोन ठेवू? "
" हो...."
त्याच आनंदात तिने आईला आणि सासूबाईंनाहि फोन करुन ही बातमी सांगितली. तिला तिचे आवडीचे काम करायला मिळाले याचा सगळ्यांनाच आनंद झाला. तिने तर घरी आल्या आल्या आपले सगळे लिखाण काढले आणि ठरवायला लागली काय काय आधी द्यायचे. संध्याकाळी कामावरून येताना सुबोध तिला आवडणारी रसमलाई आणि कचोरी घेऊन आला होता.
" हवा तसा जॉब मिळाला आता खुश?"
" हो.. मी सांगू शकत नाही एवढा आनंद झाला आहे मला. आधीपासूनच मला लिहायला आवडत होते. तेच काम करायला मिळेल असा मी विचारही केला नव्हता."
"आता नवीन कामात मला विसरू नकोस म्हणजे झालं."
" काहिही हा.."


अबोलीला हवा असलेला आनंद मिळेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला, ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई


🎭 Series Post

View all