प्रेमऋतू: द स्प्रिंग ऑफ लव्ह (भाग-सहा)

Unique Story Of Two Different Personalities. Story Of Confusion Between Them
सेजलचा आनंदी चेहरा पाहून ओवी एकटीच पुटपुटत हसून म्हणाली, " कशी आहे ही? क्षणात रूसते अन् क्षणात हसते. हिला समजून घेणं खरंच अवघड वाटतं कधीकधी. "

ओवी सभोवती नजर फिरवत असताना अचानक तिचे मुख्य रस्त्याकडे नजर गेली. त्या वाटेवर एक कार थांबून होती आणि त्या कारजवळ दोन तरूण उभे होते. त्या दोन तरुणांपैकी एका तरुणाची नजर धबधब्याजवळ निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींकडे होती अन् दुसरा तरूण मात्र पाठमोरा उभा होता. अनायासे त्या तरुणाला पाहण्याची ओढ ओवीला होत होती. त्यामुळे ती त्या पाठमोरे उभे असणाऱ्या तरुणाकडे एकटक पाहत होती.

तेवढ्यात दबक्या पावलांनी सेजल ओवीच्या पाठीमागे उभी राहिली आणि तिने मग्न असलेल्या ओवीच्या खांद्यावर एकाएकी हात ठेवत म्हणाली, " डिंग डॉंग, मी आली. "

अचानक हाताचा स्पर्श जाणवल्याने आणि सेजलचा आवाज ऐकल्याने ओवी घाबरून म्हणाली, " आई शप्पथ. एक दिवस जीव घेशील तू माझा. "

" का? काय झालं? " सेजलने केविलवाण्या स्वरात विचारले.

" काय झालं म्हणजे? तू अशी चाहूल न लागू देता दबक्या पावलांनी येशील आणि माझ्या पाठीमागे उभी राहून एकाएकी खांद्यावर स्पर्श करून बोलशील तर घाबरेल नाही का मी? " ओवी जाब विचारत म्हणाली.

" ते होय. असं तर मी नेहमीच करते. सवय आहे ना तुला ह्याची मग आज दचकायला काय झालं? " सेजलने चूक मान्य करता लगेच ओवीलाच प्रतिप्रश्न केला.

" धन्य हो माते! माझंच चुकलं. मीच सभोवतीचा परिसर पाहण्यात एवढी मग्न झाली होती की, तू माझ्या पाठीमागून कधीही एकाएकी येशील, ह्याची जाणीव राहिली नाही. " ओवी दंडवत नमस्कार करत म्हणाली.

" ह्म्म. तू तुझी चूक मान्य केलीस याचा मला आनंद आहे. हरकत नाही. यापुढे असा बेजबाबदार करू नकोस. बरं का! " सेजल ओठातलं हसू दाबत म्हणाली.

" हो का? " ओवी रागीट कटाक्षाने पाहत म्हणाली.

" अगं, एवढं रुसायला काय झालं? मस्करीच करतेय की मी! असो. सॉरी! यापुढे मी थोडं सांभाळून घाबरवणार तुला. " सेजलने चूक मान्य करत खळखळून हसत म्हणाली.

" तू ना अशक्यच आहेस. " ओवी ही नकारात्मक मान हलवून निवांतपणे हसली.

" ह्म्म. बाय द वे काय झालं? एवढं आश्चर्याने काय बघतेय त्या दोघांकडे? कोण आहेत ते दोघे? तू ओळखतेस का त्यांना? " सेजलने आश्चर्याने महामार्गावर कार थांबवून उभी विश्रांती घेणाऱ्या दोन तरुणांकडे पाहत विचारले.

" नाही गं. मी नाही ओळखत त्यांना आणि सहज पाहत होती मी त्यांच्याकडे. " ओवीने स्पष्टीकरण दिले.

" अच्छा. बाय द वे, त्या मुलाकडे बघ. तो किती बेभान होऊन धबधब्याजवळ असणाऱ्या मुलींकडे बघतोय! " सेजल त्या तरुणाकडे रागाने पाहत म्हणाली.

" ह्म्म. " ओवी त्या तरुणाचे निरीक्षण करत म्हणाली.

" ह्या अशा मुलांना काही कामे नसतील का? अशा ठिकाणी ही लोकं नैसर्गिक सौंदर्य पाहायला नव्हे तरुणींचे सौंदर्य पाहायलाच येतात वाटतं. " सेजल जळजळीत कटाक्षाने पाहत म्हणाली.

" ह्म्म. असो. तू कशाला त्रागा करून घेतेय. आपल्याला काय करायचंय? जाऊ दे. तू शांत हो. " ओवी सेजलचा राग शमविण्याचा प्रयत्न करत बोलली.

" बघ. बघ. कसा बघतोय तो त्या मुलींकडे आणि किती शाईन मारतोय. ठरकी कुठला! " सेजल त्रागा व्यक्त करत म्हणाली.

" अगं पण त्या मुलींनाही बघ ना. त्या सुद्धा इंजॉय करत आहेत की! त्यांना आवडतंय ना त्याचं डेस्परेकट होऊन त्यांच्याकडे बघणं. " ओवी महाविद्यालयीन तरुणींच्या समूहाकडे बोट दाखवत म्हणाली.

ओवीने उल्लेख केल्याप्रमाणे सेजलने त्या तरुणींकडेही एकवेळा पाहिले आणि ती आणखीच वैतागली व म्हणाली, " हो गं. त्या मुलींनाही फार आवडतंय. "

" ह्म्म. म्हणून म्हणतेय की, तू त्रागा करून घेऊ नकोस. प्रत्येकाला डोळे आहेत. त्यांचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाला ठरवता येतं. शिवाय आपण कोण कुणाला उपदेश करणारे? आपण फार फार तर स्वतःच्या हालचालींवर संयम साधू शकतो आणि तेच पुरेसे आहे. " ओवी सेजलची समजूत काढत म्हणाली.

" ह्म्म. तू देखील बरोबर बोलतेय. जेवढा तो मुलगा जबाबदार आहे तेवढ्याच त्या तरुणीही! म्हणून मी फक्त ठराविक पुरुषांवरच विश्वास करते. असो. कदाचित मीच उगाच त्रागा करून घेतेय. त्यापेक्षा आपण जाऊया. उशीर होतोय आपल्यालाही. वातावरणात बिघाड झाला तर प्रवास करताना आणखी त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणून निघायला हवं आपण. " सेजल सुस्कारा घेत म्हणाली.

" हो. तू कार घे. मी तिथे उभी राहते. " ओवी मुख्य रस्त्याकडे इशारा करत म्हणाली.

" हो, चालेल. " सेजल उत्तरली आणि कारच्या दिशेने गेली.

दुसरीकडे महाविद्यालयीन तरुणींचे निरीक्षण करणारा तरुण त्याच्या मित्राकडे न बघता म्हणाला, " तक्ष, यार कसली हिरवळ आहे रे इथे! आहाहा! डोळ्यांना मंत्रमुग्ध करणारी मेजवानीच जणू! "

" सम्या, किती रे छंद तुला मुलींना न्याहाळण्याचा! कधीतरी त्या तुझ्या डोळ्यांना विश्रांती मिळू दे ना. " तक्ष त्याच्या मित्राला उद्देशून म्हणाला.

" माझ्या डोळ्यांसाठी ही एक प्रकारची विश्रांतीच आहे. " तक्षचा मित्र म्हणाला.

" ह्म्म. काय फायदा एवढं मुलींना ढापण्याचा? गर्लफ्रेंड तर एक आठवड्याहून जास्त टिकत नाही तुझी. कपडे बदलाव्या तशा तू गर्लफ्रेंड्स बदलतोस. खरंच, त्या मुली सुद्धा का म्हणून तुला भाव देतात कळत नाही. " तक्ष रागीट कटाक्षाने पाहत म्हणाला.

" ह्म्म. काय करणार त्या मुलीही ज्याअर्थी मी आहेच एवढा चार्मिंग की, मुली प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत. " तक्षचा मित्र फुशारकी मारत म्हणाला.

" मिस्टर समीर जाधव, तुमच्या माहितीसाठी सांगतोय की, तुम्ही ज्याला प्रेम समजत आहात ते प्रेम नाही अल्लडपणा आहे. तू फार फार तर फ्लर्टींग करतोस कारण कोणत्याही एका मुलीशी कमिटमेंट करता येत नाही तुला. मुळात तू स्टेबल नाहीयेस. तू कोणत्याही मुलीशी अटॅच होण्याचा प्रयत्न करत नाहीस. " तक्ष समीरला वास्तविकतेची जाणीव करून देत बोलला.

" मिस्टर तक्ष केतकर, तुमच्या माहितीसाठी मी ही तुम्हाला कळवू इच्छितो की, चुकी नेहमी माझीच नसते. मी फ्लर्ट करत असेलही पण त्या तरुणी ही स्वेच्छेने प्रतिसाद देतात. राहिली गोष्ट खरं प्रेम वगैरे तर मला प्रेमावर विश्वास नाहीये. म्हणजे मला तरी असं वाटतं की, मुलींना मुळात फ्लर्टींग जास्त आवडते. प्रेमाला त्या स्वतःच दुय्यम प्राधान्य देतात. महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या प्रायोरिटीजचं आकलन केलं तर माझ्या मते मी पूर्णतः स्टेबल आहे आणि मला खरंच नाही वाटत की, अटॅचमेंटने प्रेम हृदयात रुंजी घालत असेल वगैरे. थोडक्यात, कमिटमेंट वगैरे निव्वळ थापा वाटतात मला. " समीरने थोडक्यात स्वतःचे प्रेमाबद्दल मत मांडले.

" तुझा प्रेमावर विश्वास नाहीये तर का मग तू माझं ज्या मुलीवर प्रेम आहे तिचा शोध घेण्यासाठी तत्पर आहेस? शिवाय जेव्हा तुझ्या गर्लफ्रेंड्स तुझ्यापेक्षा तुझ्या संपत्तीला महत्त्व देतात तेव्हा तुला हर्ट का होतं? " तक्षने भुवई उंचावून धारदार नजरेने पाहत विचारले.

" दुःख वगैरे होतं असं काहीही नाहीये. उलट माझ्या गर्लफ्रेंड्समुळेच मला कळलंय की, प्रेमाची परिभाषा केवळ तत्त्वज्ञानीय आहे. प्रत्यक्षात त्या परिभाषेला काहीच महत्त्व नाहीये. व्यक्तीची संपत्ती, ऐश्वर्य, सामाजिक दर्जाच पुरेसा असतो मुलींना त्यांचा जोडीदार निवडण्यासाठी आणि त्यासाठी मुली काहीही करू शकतात. " समीर सुस्कारा घेत म्हणाला.

" ह्म्म. कदाचित तुझ्या पूर्व अनुभवांमुळे तू स्वतःची मनधरणी करून घेतलेली आहेस पण तरीही मला वाटतं की, जेव्हा तुला खरं प्रेम होईल तेव्हा तू स्वतःच तुझ्या या मताचे संदर्भासहित खंडन करशील. " तक्ष मंद हसत म्हणाला.

" ह्म्म. बघू. मला तरी वाटतं की, तू म्हणालास तो दिवस कधी उगवणारच नाही कारण माझ्या संपत्तीपेक्षा मला महत्त्व देणारी मुलगी, माझ्यावर जीवापाड निर्व्याज नि निस्वार्थ प्रेम करणारी आणि माझ्यातल्या मला समजून घेणारी मुलगी अद्याप माझ्या आयुष्यात आलेली नाहीये आणि भविष्यात असं काही होईल, अशीही शाश्वती नाहीये. " समीर निराशायुक्त स्वरात म्हणाला.

" ठीक आहे मग आता आपण वेळेवर सोडून देऊ हा मुद्दा. " तक्ष समीरच्या पाठीवर थोपटून गूढ हसत म्हणाला व परत पाठमोरा उभा राहिला.

(पात्र ओळख:

१) तक्ष केतकर, समीरचा जिवलग मित्र, वय वर्षे पंचवीस. जन्मभूमी रत्नागिरी आणि कर्मभूमी मुंबई. मुंबई येथे वास्तव्य. दिसायला अगदीच रुबाबदार. गोरा वर्ण, नीटनेटके व आकर्षक केस, घायाळ करणारे नयनचक्षू. आकर्षक दाढी-मिशी त्याचे सुबक व्यक्तिचित्र रेखाटणारी. पाच फूट नऊ इंच उंची आणि पिळदार शरीरयष्टी. स्वभावाने थोडा कठोर. कामसू अन् कामाप्रती कर्तव्यदक्ष.

२) समीर जाधव, वय वर्षे पंचवीस. जन्मभूमी कोंकण आणि कर्मभूमी मुंबई. अर्थातच मुंबई येथे वास्तव्य. गोरा वर्ण, आकर्षक आणि पिळदार शरीरयष्टी. लोभस डोळे, घायाळ करणारे आणि गालावर खळी पडणारे स्मितहास्य. पाच फूट नऊ इंच उंची. दाढी-मिशी असो वा नसो कोणत्याही लूकमध्ये परफेक्ट दिसणारा. मिश्किल स्वभाव, खेळीमेळीने राहणारा. तरुणींशी सहज मैत्री करणारा अन् सहज वावरणारा. त्याच्या कामात हलगर्जीपणाचा आविर्भाव आढळून येत असला तरी जबाबदारी चोख निभावून विश्वास बळकट करणारा.

थोडक्यात, वरील दोन पात्रे या कथेतील मुख्य पात्रे आहेत. त्यांची व्यावसायिक भूमिका कालांतराने कथानकाच्या प्रवाहासह कळेल.)


क्रमशः
........

©®
सेजल पुंजे.
१४/०५/२०२३.

🎭 Series Post

View all