प्रीतस्पर्श: एक प्रेमकथा निराळी (अंतिम भाग) (भाग-१३)

Story Of Two Hearts. Story Of Oath And Promise. Story Of Pure Love. Story Of Purest Sacrifice.
स्पर्शला प्रीतीची भेट घेण्यापासून नीरजने थांबविले होते पण त्यांचे मन अस्थिर होते. वेगळेच द्वंद्व सुरू होते अन् दरम्यान विचारात हरवलेले असताना त्यांना झोप लागली होती आणि तेव्हाच त्यांनी प्रीतीच्या भविष्यकालीन आयुष्याची काळजी करत ते स्वप्न पाहिले होते. खरंतर, ते स्वप्न होते. अद्याप प्रीतीने कोणताच निर्णय घेतलेला नव्हता. ना ती बॅंगलोरला स्थलांतरित झाली होती, ना आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता पण नीरजच्या मनात धास्ती भरली होती.

ते रात्रभर जागरण करत प्रीतीला शुद्ध येण्याची वाट पाहत होते. त्या वाईट स्वप्नाचा विचार करता त्यांनी स्वतःच्याच निर्णयावर विचारमंथन करण्याचे ठरवले. बराच विचार केल्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला आणि स्पर्शची भेट घेण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी स्पर्श आणि नीरजने एकमेकांची भेट घेतली. त्या दोघांनी संभाषण केले.

नीरजने स्पर्शच्या प्रेमाची परीक्षाही घेतली अन् त्यानंतर एक निर्णय घेतला व त्यांचा निर्णय ते प्रीतीपुढे सांगतील, असे म्हणाले. स्पर्शने मतमतांतरे न करता होकारार्थी मान डोलावली. सुदैवाने काही वेळाने प्रीतीला जाग आली. प्रीतीला शुद्ध आल्याचे पाहून शालिनीच्या जीवात जीव आला आणि त्या प्रीतीला बिलगून ढसाढसा रडू लागल्या.

मायलेकीचे प्रेम पाहून स्पर्शचे मनही भारावले. तो भावूक होऊन मायलेकींचा मिलाप पाहत होता. तेवढ्यात प्रीतीची नजर नीरजकडे गेली. दरम्यान शालिनीनेही नीरजकडे पाहिले आणि म्हणाली, " बघितला तुमच्या अट्टाहासाचा परिणाम. आज माझ्या लेकीचं काही बरं-वाईट झालं असतं तर मी तुम्हांला कधीच माफ केलं नसतं. चुकी केली मी, तुमच्या मताला दुजोरा देऊन. "

" आई, शांत हो. बाबांना काही बोलू नकोस. " प्रीती निर्विकारपणे म्हणाली.

" नाही. बोलू दे तिला. बरोबर बोलतेय ती. फार मोठी चूक केली मी. " नीरज भावूक होत म्हणाले.

नीरजचा पश्चात्ताप युक्त स्वर ऐकताच सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. नीरजने दीर्घ श्वास घेतला व ते म्हणाले, " हो, चुकी केली मी. मी तुम्हा दोघांचं प्रेम नाकारलं समाजाच्या अनैतिक नीतिमूल्यांचा कांगावा करत पण ह्यामुळे मी माझ्या लेकीला यातना देतोय, ह्याचा विसर पडला होता; परंतु मी माझ्या चुकीला खतपाणी घालणार नाही. मी माझी चूक दुरुस्त करणार. स्पर्श आणि प्रीती तुम्हा दोघांना एकमेकांपासून वेगळे नाही करणार.

मला माफ करा. मी तुमच्या प्रेमापेक्षा इतर दुय्यम तत्त्वांना प्राधान्य दिले पण मला माझी चूक कळली आहे. प्रीती, भाग्यवान आहेस तू. स्पर्शचं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मला खात्रीशीर विश्वास आहे की, तो तुला सुखात ठेवणार. तो कधीच तुझ्या अश्रूचं कारण होणार नाही. राजा-राणीचा संसार करत सुखाने नांदाल तुम्ही दोघे, हे पटलंय मला आणि तुम्हाला विलग करून मी महापाप करणार नाही. तुम्ही दोघे एकमेकांसाठीच आहात. "

नीरजचे शब्द ऐकून शालिनी, प्रीती आणि स्पर्श आश्चर्याने पाहू लागले. सर्व गोंधळून गेले होते. तेवढ्यात नीरज स्पर्शला उद्देशून म्हणाले, " अरे, तिथे का उभा आहेस तू? प्रीतीजवळ जा नि बस. तिला तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांग. "

" अं. हो. " स्पर्श गोंधळून उत्तरला व प्रीतीच्या कॉटजवळील खुर्चीवर बसला.

त्या खोलीत शुकशुकाट पसरलेला असताना शालिनी मध्यस्थी करत म्हणाल्या, " अहो, तुमच्यात जो हा बदल झालाय तो उल्लेखनीय आहे आणि आम्हाला आनंद आहेच पण नेमका हा बदल झाला कसा? "

शालिनीचा प्रश्न ऐकताच नीरज हसले. त्याउलट शालिनी, प्रीती आणि स्पर्श मात्र नीरजकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागले. त्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहताच नीरजने दीर्घ श्वास घेतला आणि त्यांना पडलेल्या स्वप्नाचा खुलासा केला.

सर्व ऐकून घेतल्यावर शालिनी म्हणाली, " अर्थात देवानेच साक्षात्कार केला म्हणायचा. "

" म्हणजे? " नीरजने गोंधळून विचारले.

" अहो, तुमच्या स्वप्नाद्वारे खुद्द परमेश्वरानेच तुम्हाला सावधानतेचा इशारा दिला, असं म्हणायचंय मला. अन्यथा तुम्ही जातीची कास सोडलीच नसती. " शालिनी खुलासा करत म्हणाली.

" हो, कदाचित तू बरोबर बोलतेयस. " नीरज दुजोरा देत म्हणाले.

" असो. जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. लेकही खूष आणि पिताही खूष आणखी काय हवं! " शालिनी आनंदात म्हणाल्या.

" ह्म्म पण काहीतरी मिसिंग आहे. " नीरज सूचकपणे म्हणाले.

" काय? " शालिनीसह प्रीती आणि स्पर्शने गोंधळून विचारले.

" जावईबापू, माझ्या लेकीचा हात मागायला केव्हा येत आहात? केवळ माझ्या मुलीच्या बोटात अंगठी घातल्याने माझी मुलगी तुमची बायको होईल, असं नाही हं. " नीरज आवाजात जरब ठेवत म्हणाले.

" मग? " स्पर्शने आश्चर्याने नाराजी व्यक्त घाबरून करत विचारले.

" अर्थात ऑफिशियली कांदेपोह्याचा कार्यक्रम व्हायलाच हवा. त्यामुळे योग्य मुहूर्त पाहून घरी या. " नीरज मिश्किल हसत म्हणाले.

नीरजच्या शब्दांचा संदर्भ लागताच स्पर्श ओशाळला. प्रीती ही लाजली. शालिनी आणि नीरज मात्र खळखळून हसू लागले. कालांतराने दुसऱ्या दिवशी प्रीतीला डिस्चार्ज मिळाला. प्रीतीची प्रकृती पूर्ववत होताच एक ठराविक दिवस निवडून स्पर्श प्रीतीच्या घरी तिला लग्नाची मागणी घालायला गेला. शालिनी अन् नीरजने अर्थातच लग्नाला मागणी दिली होती. ते दोघेही स्पर्श आणि प्रीतीच्या आनंदात सामील झाले होते. फार खूष होते ते दोघे. कालांतराने मुहूर्त काढून साखरपुडा झाला. शिवाय दोन महिन्यांनंतर सर्वांसमक्ष व सगळ्यांच्या साक्षीने प्रीती आणि स्पर्शचा विवाहसोहळा पार पडला व ते दोघे एकमेकांच्या सहवासात वैवाहिक आयुष्य जगू लागले.

अशाप्रकारे प्रीती आणि स्पर्शच्या प्रेमाला योग्य न्याय मिळाला. अनेक अडथळे पार करत त्यांनी प्रेमाची परीक्षा दिली व उत्तीर्ण ही केली. नियती अन् समाजाने अनेकदा त्यांना विलग करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांच्या निर्व्याज प्रेमावर विश्वास ठेवला. प्रसंगी त्यांनी वडीलधाऱ्यांचा मान राखत त्याग करण्याची ही तयारी दर्शविली. म्हणूनच त्यांचे प्रेम सार्थ झाले. प्रीती आणि स्पर्श विलग न होता 'प्रीतस्पर्श' होऊन एकरूप झाले व एका निराळ्या प्रेमकथेची निर्मिती झाली.

समाप्त.

©®
सेजल पुंजे.
१०/०५/२०२३.

🎭 Series Post

View all