प्रीतस्पर्श: एक प्रेमकथा निराळी (भाग-०८)

Story Of Two Hearts.
स्पर्श प्रीतीची चिठ्ठी स्वतःच्या छातीशी कवटाळून घेत म्हणाला, " प्रीती, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि कायम राहणार. तुझ्यावर प्रेमावर शंका कुणीच घेणार नाही अन् तुझ्या प्रेमाचा उद्धार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. आई-वडीलांसाठी माझ्यावर असणाऱ्या प्रेमाचा त्याग करणे तुझ्यासाठीही हा निर्णय घेणे शक्य नाहीच. मला जाणीव आहे तुझ्या खचलेल्या मनाची. तू काळजी घे स्वतःची.

मला ठाऊक आहे की, तू गुंतून गेली आहेस या अवघ्या कर्तव्य आणि प्रेमाच्या जाळ्यात. म्हणून काळजी करू नकोस. आपलं प्रेम एवढं कमकुवत नाही की, मी सर्रास तुझ्या प्रेमावर संशय घ्यावा. ना मी तुझ्या निष्ठेवर आशंका घेईल, ना प्रेमावरील समर्पणावर.

आपलं प्रेम समाजापुढे आणि समाजबंधनामुळे सार्थ होऊ शकले नाही पण मला दुःख वाटत नाही कारण आपण फक्त आपल्या नात्याला विवाहबंधनात विवाहबद्ध करू शकत नाही पण आपली मने एकमेकांशी गुंफली आहेत, हे सत्य हा समाज नाकारू शकणार नाही. आपण कालही मनस्वी एकमेकांचेच होतो, आजही आहोत आणि भविष्यातही आपली शरीरे वेगळी राहिली तरी हृदय आणि आत्मा एक राहिल. म्हणून या देहात श्वास असेपर्यंत अन् जीवात जीव असेपर्यंत मी तुझाच असणार. "

काही वेळाने स्वतःच्या भावनांच्या डोहात बुडून त्याने कानात हेडफोन्स घातले व तो 'स्लॅमबुक' चित्रपटातील हृषिकेश रानडे या गायकाने गायलेले 'का हा जीव गुंततो' हे विरह गीत ऐकू लागला. खरंतर, ते गीत त्याची पहिली पसंत होते पण त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याला त्या गीतातील भावार्थ अन् वेदना उमजत होत्या. तो प्रत्यक्षात विरहाचा दाह अनुभवत होता.

एरवी ते गीत ऐकताना त्याचे मन गहिवरून येत असायचेच पण पण त्या दिवशी त्याच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी अन् 'स्लॅमबुक' चित्रपटातील नायकाने अनुभवलेल्या विरहात जराही तफावत त्याला जाणवत नव्हती. म्हणून सहजरीत्या त्याच्या हृदयाला ते गीत स्पर्शून जात होते.

गाणे सुरू झाले होते अन् तो भिंतीला रेलून बसला होता व गीत ऐकत होता. गीताचे बोल पुढीलप्रमाणे:


का हा जीव गुंततो?
का लागते ओढ मनाला?
का डाव हा मांडतो?
का मिळते वाट प्रेमाला?
का... मला सजा रे अशी ही देवा?
का क्षणांची सोबत अन् मग दुरावा?

सावर सावर रे मना
दुःख यातना...
माझ्या वाटेला का हे?
काय झाला गुन्हा?
ही रात ना सरता सरे...
हृदयी का दुःख झरे?
समजेना तुला हे,
उमजेना तुला हे...
हे प्रेम होते खरे....

का हा जीव गुंततो?
का लागते ओढ मनाला?
का डाव हा मांडतो?
का मिळते वाट प्रेमाला?
का... मला सजा रे अशी ही देवा?
का क्षणांची सोबत अन् मग दुरावा?


एकीकडे गीत संपले अन् स्पर्श पुन्हा एकदा नैराश्याने ग्रासला गेला. दुसरीकडे इस्पितळात प्रीतीलाही जाग आली अन् त्यानंतर ती काहीही न बोलता तिच्या आई-वडिलांसह कारमध्ये बसून घरी जाऊ लागली. कारमध्ये शांत बसून व कानात हेडफोन्स घालून ती देखील 'का हा जीव गुंततो' हेच गीत ऐकत होती.

काही वेळाने ते तिघेही घरी पोहोचले. सुखरुप घरी पोहोचल्यावर प्रीतीने स्पर्शसोबत झालेल्या संभाषणाचा आढावा दिला. त्यानंतर स्वतःचा निर्णय सांगताना ती म्हणाली, " बाबा, मी तुमच्या मताचा आदर केला. मी स्पर्शला संपूर्ण घडामोडीची खबर दिलेली आहे पण त्याचबरोबर मी एक निर्णय घेतला आहे. "

" कोणता निर्णय? खबरदार जर त्या मुलाची वरचेवर भेट घेत राहिलीस तर! आजपासून तुम्ही दोघे एकमेकांसाठी अनोळखी झालात असे गृहीत धरा. तो काय करतो, याबद्दल तू माहिती गोळा करायची नाही आणि तू कशी आहे याविषयी त्याला कळवायचं नाही. कळलं! " नीरज प्रीतीचा निर्णय न ऐकता स्वतःचा निर्णय ऐकवत म्हणाले.

" काळजी करू नका बाबा. तुमच्या मनाविरुद्ध वागणार नाही मी. शिवाय स्पर्शला खोटी आश्वासने मीही देणार नाही. ज्याअर्थी तुमच्या दृष्टीकोनात आमच्या नात्याचे काही अस्तित्त्वच नाहीये तर उगाच स्वप्नांचे गडकिल्ले बांधण्याचा खटाटोप मलाही करायचा नाही. आतापर्यंत स्पर्शने बरंच सहन केलंय. त्याला आणखी यातना देण्याचा मी विचारही करू शकत नाही. " प्रीती रडवेल्या स्वरात स्पर्शची आठवण काढत म्हणाली.

" अजूनही तुला त्याचीच काळजी वाटतेय? अशी काय भूरळ पाडलीय त्याने तुझ्यावर? त्याच्यापेक्षा कैक पटीने सक्षम मुलांची रांग लावू शकतो मी तुझ्यापुढे पण तू त्याच्यासाठी जीव जाळत आहेस स्वतःचा. " नीरज त्वेषाने म्हणाले.

" हे प्रेम आहे बाबा पण तुम्हाला नाही कळणार. " प्रीती निर्विकारपणे म्हणाली.

" हो का! एवढंच प्रेम आहे तर तुझा अपघात झाल्याचं कळवूनही तुझी भेट घ्यायला का पोहोचला नाही तो इस्पितळात? हेच का तुमचं अतूट प्रेम? " नीरज मत्सरयुक्त हावभाव करत म्हणाले.

" तो आला होता बाबा. मी बेशुद्ध नक्कीच झाली होती पण त्याची चाहूल लागली होती मला आणि तो बराच वेळ थांबून होता; परंतु तुम्हीच त्याला हाकलून लावले, हे ही ठाऊक आहे मला. " प्रीती बोटातल्या अंगठीकडे पाहत म्हणाली. तिचे डोळे पाणावले होते.

" त्याच्या प्रेमावर एवढा विश्वास आणि माझ्या प्रेमावर एवढा अविश्वास का? एक लक्षात ठेव. आज जरी तुला मी चुकीचा वाटत असेलही तरी कोणताच बाप स्वतःच्या लेकीचे अहित चिंतू शकत नाही. " नीरज कठोरपणे पण भावूक होत म्हणाले.

" इथे प्रश्न विश्वास आणि अविश्वासाचा नाहीच आहे. शिवाय मी तुमच्या काळजीला चुकीचं म्हणणार नाही; कारण तुम्ही तुमची मूल्ये महत्त्वाची मानत असाल, हे मी समजू शकते. असो. वादविवाद घालण्यात अथवा मतमतांतरे करण्यात तथ्य नाही. मी माझा निर्णय सांगते आणि काळजी करू नका तुमच्या निर्णयाला आव्हान देणारा माझा निर्णय नाही. माझा निर्णय जरा वेगळा आहे. " प्रीती मन खंबीर करत म्हणाली.

" बाळा, नक्की कोणता निर्णय घेतला आहेस तू? " शालिनी काळजी युक्त स्वरात गांभीर्याने विचारपूस करत म्हणाल्या.

" आई-बाबा, मी आता इथे राहणार नाही. " प्रीती दीर्घ श्वास घेत म्हणाली.

" म्हणजे? " शालिनी आणि नीरजने एक सुरात विचारले.

" अर्थात मी पूणे सोडून जाणार आहे. पुण्यात माझं बालपण गेलंय आणि स्पर्श व माझी ओळख लहानपणापासून आहे. त्याच्यासोबत घालवलेला एकेक क्षण माझ्या हृदयात साठवून आहे आणि इथे राहिली तर त्या आठवणी मला स्पर्शपासून दूर ठेवू शकणार नाहीत. मला नाही होणार सहन हा दुरावा अन् मी तुमच्या मर्जीविरुद्ध एखादा निर्णय घेऊन मोकळी होईल पण मला तुमचाही निरादर करायचा नाहीये. म्हणून मला या शहरापासून कोसो दूर जायचंय. जिथे स्पर्श मला शोधू शकणार नाही. " प्रीती हुंदका देत म्हणाली.

" काय? वेडी झाली आहेस का तू प्रीती?
काहीही काय बोलत आहेस? कोठे जायचंय तुला पूणे सोडून? ते काही नाही. मला तुझा हा निर्णय पटलेला नाही. काहीच गरज नाही या शहरापासून लांब जाण्याची. तो मुलगा तुझ्या आयुष्यात नसला तरीही तुझा श्वास थांबणार नाही. " नीरज तिटकारा करत म्हणाले.

" बाबा, प्लीज! मला असह्य आहे हे सगळं. ह्या शहरातील प्रत्येक वाट, प्रत्येक बाग, प्रत्येक गडकिल्ले अन् कित्येक मंदिरे मला स्पर्शची आठवण करून देतो. माझी मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. " प्रीती काकुळतीने म्हणाली.

नीरज ऐकायला तयार नव्हते परंतु शालिनीला प्रीतीची कीव आली आणि त्या नीरजची समजूत काढत म्हणाल्या, " प्रीती, तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. तिला तुमचा आदर आहे म्हणून तुम्हीही तिची मनस्थिती समजून घ्या आणि तिच्या या निर्णयाचा पुरस्कार करा. हळूहळू आपोआप सगळं रूळावर येईल. सध्या तिला पुरेसा वेळ द्या. "

" ह्म्म. बरं. " नीरजने नाईलाजाने होकार दिला.

" थॅंक्यू बाबा. थॅंक्यू आई. " प्रीतीने निर्विकारपणे आभार मानले व ती तिच्या खोलीत जाऊ लागली. तेवढ्यात नीरजने प्रीतीला हाक मारून थांबवले.

क्रमशः
.......

©®
सेजल पुंजे.

🎭 Series Post

View all