प्रीतस्पर्श: एक प्रेमकथा निराळी (भाग-०४)

Story Of Pure Hearts.
स्पर्श पेशाने फोटोग्राफर होता परंतु फोटोग्राफीपेक्षा त्याला पेंटिंग करण्यात रस होता; म्हणून तो फोटोग्राफीमधूून फारसे उत्पन्न कमवत नसायचा. जास्तीत जास्त वेळ तो पेंटिंग करायचा. खरंतर, तो एक दर्जेदार अन् उत्कृष्ट पेंटर होता. अतिशय सुंदर अन् वेगवेगळ्या विषयांना अनुसरून पेंटिंग करायचा तो! त्याची पेंटिंग करण्याची शैली एवढी वास्तविक अन् दिलखेचक होती की, त्याची प्रत्येक पेंटिंग दर्शकाच्या मनात घर करून जायची.

पेंटिंगच्या क्षेत्रात बराच नावाजलेला होता तो; परंतु त्याला प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती. तो प्रकाशझोतापासून कायम अलिप्तच राहायचा. स्वतःचा साधेपणा त्याने सोडला नव्हता अन् त्याचा हाच गुण प्रीतीला जास्त भावत होता. अशाप्रकारे पेशा आणि छंद जोपासताना स्पर्श प्रीतीसाठी अगत्य वेळ काढायचा.

प्रीती सहसा तिच्या नोकरीमुळे व्यस्त राहायची; पण स्पर्श सगळ्याच बाबतीत तिला समजून घ्यायचा. ठराविक दिवशी भेटगाठ झाली नाही तरीही त्याचा तो कधीच बाऊ करत नसायचा, याचे तिला विशेष कौतुक वाटायचे. तिला स्वतःच्या नशिबाचा हेवा देखील वाटायचा; पण ती देखील तिच्यापरीने स्पर्शला समजून घ्यायची अन् त्याच्यावर निस्सीम प्रेम करायची.

         आय.टी. सेक्टरमध्ये नोकरीला असल्याने दर शनिवार-रविवार प्रीतीला सुट्टी असायची त्यामुळे त्या दोन दिवसांच्या सुट्टीचा ती स्पर्शसोबत आस्वाद घ्यायची. स्पर्शला प्रीतीचा सहवास लाभल्याचे समाधान होते. ते दोघेही दर शनिवार-रविवार नवीन उपक्रम करायचे व फिरायलाही जायचे. कधी टेकडीवर, कधी शॉपिंग मॉल, कधी चित्रपटगृह, कधी नाट्यगृह, कधी काव्य संमेलन, कधी गीत गायन कार्यक्रमात जायचे. कधीकधी कुठेही न जाता स्पर्शच्या घरी एकांत अनुभवायचे. घरबसल्या गप्पा आणि संवाद साधायचे. एकांतात एकमेकांची सोबत अनुभवताना त्यांनी त्यांच्या प्रेमात व त्यांच्या नात्यात मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कधीच केला नव्हता.

ते दोघेही एकमेकांचे मन जपत होते अन् असेच पाहता पाहता एकमेकांच्या सहवासात त्यांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिकाधिक बहरत जात होतं. थोडक्यात, सर्वकाही सुरळीत सुरू होतं. दरम्यान एके दिवशी स्पर्शचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रीतीने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. तिनेही स्पर्शसाठी 'सरप्राईज डेट' नियोजित केली होती. सरप्राईज डेट झाल्यावर आणि त्याचा वाढदिवस साजरा करून झाल्यावर ते दोघेही एका लहानशा बागेत गेले. तिथे शतपावली करताना ते दोघेही मावळणाऱ्या सूर्याच्या छटा अनुभवत होते.


त्यानंतर साधारण सहा वाजताच तो तिला घरी सोडायला गेला. दोघेही त्याच्या बाईकवर जात होते. ती त्याच्या कंबरेला हाताचा विळखा घालून अगदी चिकटून बसली होती. तो ही अधुनमधून गाडी चालवताना तिच्या हातांना स्पर्श करत होता. दरम्यान काही वेळाने तिच्या घरापाशी बाईक थांबवली परंतु थोडे अंतर शेष होते.

तिच्या घराजवळ असलेल्या मंदिराजवळ त्याने गाडी थांबवली. ती ही लगेच उतरली. त्यानंतर स्पर्शच्या गालावर हळूच ओठ टेकवून ती दूर झाली आणि कानामागे केसांची बट सावरत घराच्या दिशेने पळत जाऊ लागली. उलटपक्षी तिच्या ओठांचा स्पर्श होताच अन् प्रीतीचे लाजून घरी निघून जाणे अनुभवताच स्पर्शच्या अंगावर ही लाजेचा शहारा बहरला होता. म्हणून त्यानेही लाजून केसांतून हात फिरवला अन् प्रीतीचा निरोप घेत स्वतःचे घर गाठले.

घरी पोहोचल्यावर घरातील बारीकसारीक कामे आटोपून झाल्यानंतर तो प्रीतीच्या मॅसेजची वाट पाहत होता. वाट पाहता पाहता तो दिवसभरात घडलेल्या अनेक आठवणी आठवत होता आणि त्या आठवणींचे स्मरण करताना त्याला झोप लागली व तो निद्रेच्या स्वाधीन झाला.
..........

स्थळ: प्रीतीचे घर
वेळ: सहा वाजून पंचेचाळीस मिनिट

        स्पर्शचा निरोप घेऊन प्रीती लगेच तिच्या घरी गेली. घरात शिरताच तिला तिच्या नजरेपुढे हॉलमध्ये तिची आत्या बसलेली दिसली. तिच्या आत्याचा स्वभाव तिच्या बुद्धीला कधीच पटत नसायचा त्यामुळे त्या दिवशीही ती काहीच न बोलता मुकाट्याने तिच्या खोलीमध्ये जाऊ लागली पण तत्पूर्वी तिच्या वडीलांनी तिला थांबवले.

वडीलांची हाक ऐकताच प्रीती जागीच थबकली व वडीलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. त्याउलट तिचे वडील तिच्याकडे जळजळीत कटाक्षाने पाहून विचारणा करत म्हणाले, " आतापर्यंत कुठे होतीस तू प्रीती? "

" बाबा, मी घरून बाहेर जाण्याआधी तुम्हाला कळवलं होतं ना! मग तरीही तुम्ही हा प्रश्न का विचारत आहात? " प्रीती भुवया उंचावत म्हणाली.


" हो, तू सांगितलं होतं पण तरीही मला जाणून घ्यायचंय. म्हणून सांग एवढा वेळ कुठे होतीस? " प्रीतीचे बाबा गंभीर स्वरात विचारपूस करत म्हणाले.

प्रीतीने वैतागून दीर्घ श्वास घेतला आणि उत्तरली, " आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता म्हणून तिच्यासोबत तिच्याच घरी बर्थडे पार्टी इंजॉय करत होती. "

उत्तर दिल्यानंतर प्रीती स्वतःच्या खोलीत जायला वळली. तेवढ्यात प्रीतीचे बाबा आवाज चढवत म्हणाले, " कुठे चाललीस तू? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. "

" बरं. " प्रीतीने सुस्कारा घेतला व तिथेच उभी राहिली.

त्यानंतर प्रीतीचे बाबा धारदार नजरेचा कटाक्ष टाकत तिला उद्देशून म्हणाले, " प्रीती, जर तू खरं बोलतेय तर तुझी आत्या खोटं बोलतेय का? कारण तिच्याकडून तर मला वेगळीच माहिती मिळालीय. "

तिच्या वडिलांनी आत्याचा उल्लेख करताच प्रीती थोडी वैतागली अन् त्रागा व्यक्त करत व धुसफूस करत म्हणाली, " बाबा, तुमच्या बहिणीकडून तुम्ही काय ऐकलंय ते मला कसं माहिती असणार आहे? शिवाय आत्याने एखादी माहिती दिलीय म्हणजे तर काही सांगायलाच नको. थोडक्यात, माझ्यासाठी हा विषय इथेच संपला. "

" बघितलंस नीरज दादा (प्रीतीचे वडील) कशी बोलतेय प्रीती! तुझी मुलगी कायमच अशी तुसडेपणाने वागत असते माझ्याशी पण माझ्या मनात काहीच वैर नसतं. मी तर हिच्या हिताचाच विचार करत असते. " प्रीतीची आत्या रागाने धुसफूस करत म्हणाल्या.

" माझ्याकडून प्रेम आणि आपुलकीची अपेक्षा करण्याआधी तुम्ही त्यासाठी पात्र आहात का? हे आधी सांगा मला. " प्रीती रागीट स्वरात उत्तरली.

" बाप रे! किती उद्धटपणे बोलतेस तू माझ्याशी. चोर ती चोर वर शिरजोरी करतेस. " प्रीतीची आत्या टोमणा मारत म्हणाली.

" कसली चोरी आणि कसली शिरजोरी केली मी? " प्रीती जाब विचारत म्हणाली.

" व्वा रे व्वा! हिच्या भोळेपणाचा आव तर पाहा. " प्रीतीची आत्या तुसडेपणाने म्हणाली.

" आत्या, तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला. अंधारात तीर मारून ना तुमचा फायदा आहे, ना माझा. " प्रीती हाताची घडी घालत म्हणाली.

" हो का! स्पष्टच बोलते मग. तू तुला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करतेय. घरी खोटं बोलून बाहेर परपुरुषाच्या गाडीवर चिपकून बसत हिंडण्यात तुला हल्ली मजा वाटते. स्वतःच्या वागण्यावर तर तुला अंकुश नाहीच पण घरच्यांच्या आब्रूचाही तू विचार करत नाहीस. स्वतः असा आतेताईपणा करत फिरतेस आणि वर तोंड करून मलाच खोटं सिद्ध करतेय. " प्रीतीची आत्या रागीट स्वरात उत्तरली.

आत्याचे शब्द ऐकून प्रीती मात्र चमकून पाहू लागली. तेवढ्यात प्रीतीचे वडील अर्थात नीरज गांभीर्याने म्हणाले, " कामिनी, सध्या शांत हो आणि तू गप्प बस जरा. मी बोलतोय ना! "

" बरं. " कामिनी (प्रीतीची आत्या) नाराजी युक्त स्वरात उत्तरली.

" प्रीती, मला सांग कोण होता तो? कुणाबरोबर फिरत होतीस तू आणि तो मुलगा होता तर खरं सांगून का नाही गेलीस त्याचा वाढदिवस साजरा करायला? त्याच्यासाठी तू आमच्याशी का खोटं बोललीस तू? " नीरज गंभीर स्वरात चौकशी करत म्हणाले.

" बाबा... मी... ते... " प्रीती शब्दांची जुळवाजुळव करत बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ती सुन्न झाली होती.

सत्य बोलण्याचे धाडस तिच्यात नव्हते आणि खोटे बोलून तिला आणखी संकट ओढवून घ्यायचे नव्हते. त्यामुळे ती फार गोंधळून गेली होती परंतु सरतेशेवटी तिने मनाचा हिय्या केला. तथापि, ती तिच्या प्रेमाची आईवडीलांपुढे कबुली देण्यास सज्ज झाली होती पण त्याच दरम्यान कामिनीने संवादात उडी घेतली व ती स्वतःच्या पद्धतीने स्पर्शच्या त्रुटी सांगण्यास सज्ज झाली.

क्रमशः
.........
©®
सेजल पुंजे.


🎭 Series Post

View all