अल्लड हे प्रेम जरासे पर्व-२ (भाग-०१)

Story Of Two Hearts And Their Journey Of Marriage.
फार खूष होते ते दोघे अर्थात आदित्य आणि निशा कारण कित्येक लहान-मोठ्या अडचणी पार करत अंततः त्यांचे लग्न झाले होते आणि ती रात्र ही उगवली होती अर्थात लग्नानंतरची पहिली मिलन रात्र. लग्नापूर्वी त्या दोघांनी प्रियकर-प्रेयसीच्या नात्याचा अनुभव घेतला होता पण यापुढे त्यांना एकमेकांचा वैवाहिक सहवास अनुभवायचा होता.

तथापि, निकिताने रोहिणी काकूंच्या मदतीने आदित्य आणि निशाची खोली आकर्षक पद्धतीने सुशोभित केली होती. चोहीकडे गुलाब, मोगरा आणि निशिगंधाच्या फुलांची सजावट केली होती. संपूर्ण खोलीत सुगंधित मेणबत्तीचा सुवास दरवळत होता. अगदी मनाला उत्तेजित करणारे खोलीचे वातावरण होते.

निकिता आणि वैष्णवीने मिळून निशाचा साज-श्रृंगार केला होता. साधीशी काठापदराची साडी निशाने नेसली होती. हलकासा मेकअप आणि केसांचा जुडा पाडून मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला होता. साधा साज-श्रृंगारही तिचे सौंदर्य आणखीच खुलवत होता.

तथापि, निशाचा साज-श्रृंगार करून दिल्यावर निकिता आणि वैष्णवी तिला आदित्यच्या खोलीत घेऊन गेल्या. तिथे सोफ्यावर त्यांनी तिला बसवले आणि नंतर त्या दोघींनीही खोलीचे दार आतून बंद केले. लगेच निकिताने अमेयला मॅसेज पाठवला आणि त्यानंतर आदित्यच्या आगमनाची अर्थात त्याच्या हातांची दारावर थाप पडण्याची निकिता व वैष्णवी वाट पाहू लागल्या.

दुसरीकडे पहिल्या रात्रीचा क्षुल्लक मात्र अनुभव नसणारे अमेय आणि नील आदित्यला पहिल्या रात्री संदर्भात सूचना देत होते अन् त्यांच्या सूचना ऐकून आदित्यला खूप हसू येत होते पण त्यानेही त्याच्या हसण्यावर बराच ताबा ठेवला होता व तो निमूट त्या दोघांचा प्रत्येक शब्द ऐकून घेत होता.

थोड्याच वेळाने अमेयला निकिताचा मॅसेज आला. मॅसेज वाचताच अमेय आणि नीलने एकमेकांना नजरेनेच इशारे केले व लगेच आदित्यला त्याच्या खोली जवळ घेऊन गेले. खोली जवळ पोहोचताच दीर्घ श्वास घेत आणि गालातल्या गालात मंद हसत व उत्साहाला नियंत्रणात ठेवून आदित्यने दार ठोठावले.

दारावरची थाप ऐकताच निशा एकाएकी सोफ्यावरून उठून स्थिर उभी राहिली. त्या क्षणी तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. ती दार उघडायला जाणार होती पण जागीच थांबली कारण निकिता आणि वैष्णवीने तिला जागीच स्तब्ध राहण्याचा इशारा केला. तिनेही माघार घेतली व ती स्थिर उभी राहिली.

त्यानंतर हसतच वैष्णवी आणि निकिताने दार उघडले. दारात आदित्यला पाहून त्यांचे चेहरे खुलले होते पण आदित्य मात्र अचंबित होऊन त्या दोघींना पाहत होता. तेवढ्यात त्या दोघींनी एकमेकींना इशारा केला.

इशारे कळताच वैष्णवी बोलायला सरसावली आणि ती भोळा चेहरा करून निरागस हावभाव करत आदित्यला म्हणाली, " जिजू, आज तुमचं या खोलीत काही काम आहे का? "

" अं... मी... ते... " आदित्य थोडा गोंधळून गेला होता म्हणून त्याला शब्द सुचेनासे झाले होते.

त्याला बोलताना अडखळलेले पाहून निकिता हळूच गालातल्या गालात हसली आणि वैष्णवीला हळूच कोपर मारत म्हणाली, " वैशू, किती भोळी आहेस तू राणी! आज तर खास काम आहे ना त्यांचे या खोलीत. "

" कोणतं गं? " वैष्णवीने भोळेपणाने विचारले.

" अगं, निशा आणि आदित्य आज रोमॅण्टिक गाण्यांचा रियाज करणार आहेत ना! " निकिता हसू आवरत म्हणाली.

" ओह अच्छा! आता मला कळलं. " वैष्णवी निरागसपणे म्हणाली पण प्रत्यक्षात ती देखील हसू आवरण्याचा प्रयत्न करत होती.

तेवढ्यात निकिता नीलला उद्देशून म्हणाली, " असं कसं रे नील? तू काहीच कसं नाही शिकवलंस आमच्या वैशूला? तू तिला पूर्व खबर दिली असतीस तर तिचा ह्या क्षणाला गोंधळ उडाला नसता ना. "

" ओह सॉरी सॉरी पण डोन्ट वरी आमच्या वेळी तुम्ही असणारंच आहात ना आम्हाला मार्गदर्शन करायला. शिवाय तोपर्यंत ती ही ट्रेन होऊन जाईलच कारण सीनिअर्सच्या सानिध्यात ज्यूनियर टीम आपोआप हळूहळू सारं काही शिकून घेते ना! " नील केसांत हात फिरवून म्हणाला आणि त्याच्या शब्दांचा संदर्भ लागताच वैष्णवीसह निकिता ही गोड लाजली.

दुसरीकडे त्यांचा संवाद ऐकून आदित्य अमेयकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागला. त्याचे केविलवाणे हावभाव लक्षात घेत अमेय संभाषणात मध्यस्थी करत म्हणाला, " बाय द वे, तुम्ही दोघी इथे काय करत आहात? "

" आमचं कर्तव्य पार पाडत आहोत. " निकिता आणि वैष्णवी एक स्वरात म्हणाल्या.

" कोणतं कर्तव्य? " अमेयने नजर रोखून विचारले.

" जी मैफिल आज या खोलीत रंगणार आहे त्यासाठी सर्व तयारी आम्हीच केली ना! अर्थात खोलीचं सुशोभीकरण आणि आदित्य जिजूला डुएट गाणे गाण्यासाठी साथ देणाऱ्या निशुड्याला सुरांचे ज्ञान आम्हीच तर दिले. हो ना निक्की दी? " वैष्णवी गूढ हसत म्हणाली.

" हो ना! " वैष्णवीच्या हातावर टाळी देत अन् तिच्या शब्दांना दुजोरा देत निकिता उत्तरली.

" हो का? मस्त! दोघींचंही विशेष कौतुक आता आपण जाऊया. त्यांची त्यांची मैफिल ते दोघे भरवत बसतील. " अमेय निकिता आणि वैष्णवीचा हात पकडून त्यांना खोलीबाहेर काढण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

" हो ते ठीक आहे पण त्याआधी आम्हाला आमचा शकुन हवा. " वैष्णवी अमेयचा हात झटकून म्हणाली.

" आता हे काय मध्येच? " अमेयने गोंधळून विचारले.

" अमेय सर, तुम्ही गप्प बसा ओ! तुम्हाला काहीच ठाऊक नसतं म्हणून निदान आम्हाला तरी ही रिच्युअल पूर्ण करू द्या. " निकिता अमेयला म्हणाली आणि तिचा आवाज ऐकताच अमेय ही क्षणात चिडीचूप झाला.

अमेयने माघार घेतलेली पाहून निकिता आणि वैष्णवी सुखावल्या. त्यानंतर वैष्णवी म्हणाली, " जिजू, तुम्ही आम्हाला आमचा शकुन दिला तरच या खोलीत तुम्हाला एंट्री मिळेल अदरवाईज नो एंट्री. "

" बरं. राहिलं. नो एंट्री तर नो एंट्री. चल आदी ब्रो! जाऊ आपण. " नील हसू आवरत उगाच आदित्यची छेड काढत म्हणाला.

" ठीक आहे. काही हरकत नाही. " नीलचे शब्द ऐकताच निकिता आणि वैष्णवी परत एकमेकींना इशारा करत एक सुरात म्हणाल्या. दुसरीकडे त्यांचे संभाषण ऐकून निशाही बेचैन होत होती.

दरम्यान लगेच त्या दोघी अर्थात निकिता आणि वैष्णवी खोलीचे दार बंद करू लागल्या पण तेवढ्यात आदित्य नीलला ओरडून म्हणाला, " नील, तू कशाला शहाणपण करतोय. त्या माझ्याकडे शकुन मागत आहेत ना मग माझं मी बघून घेईल. तू बंद पड. "

" अरे आदी पण काय गरज आहे ना ह्या शकुन वगैरेची! " अमेयही हसू आवरत म्हणाला.

" हो ना. " नील दुजोरा देत म्हणाला.

" तुम्ही दोघे गप्प बसा रे! काहीही बोलत आहात. " आदित्य वैतागून अमेय आणि नीलवर बरसला.

निकिता आणि वैष्णवी हसू आवरून गांभीर्याने विचारपूस करत म्हणाल्या, " मग काय ठरलं? एंट्री हवी की नको? "

" नको. " अमेय आणि नील आदित्यची टर उडवत म्हणाले.

त्यांचा नकार ऐकून त्या दोघी परत दार लावण्याचा प्रयत्न करू लागल्या तेवढ्यात पुढाकार घेत आदित्य म्हणाला, " ह्या दोघांचं ऐकू नका. मला हवीये एंट्री. हे घ्या माझं कार्ड जेवढा शकुन हवा तेवढ्याची बिनधास्त शॉपिंग करा. ठीक आहे. बाय. "

आदित्य लगबगीने बोलला आणि खोलीच्या आत शिरला. तसेच काहीही कळायच्या आत त्याने निकिता आणि वैष्णवीला बाहेर काढले व खोलीचे दार लावून घेत सुटकेचा श्वास घेतला. त्याने क्षणार्धात केलेली हालचाल पाहून खोलीबाहेर अमेय, नील, निकिता आणि वैष्णवी खळखळून हसू लागले.

दुसरीकडे खोलीत गेल्यावर डोळ्यासमोर निशा दिसताच स्वतःच्याच अगतिक वागणुकीवर आदित्यला हसू आले आणि तो ओशाळून केसांत हात फिरवू लागला. निशाही त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात मंद हसत होती.

काही वेळाने आदित्य निशाजवळ जाऊ लागला पण तेवढ्यात खोलीबाहेर त्या चौघांनीही एकमेकांना टाळी दिली आणि जोरजोरात हसू लागले. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकताच आदित्य आणखीच ओशाळून गेला. तेवढ्यात स्वतःचे हसू आवरून वैष्णवीने सगळ्यांना शांत व्हायला सांगितले आणि तिने दारावर हळूच थाप दिली.

क्रमशः
........

©®
सेजल पुंजे.
२२/०५/२०२३.


🎭 Series Post

View all