अल्लड हे प्रेम जरासे (भाग-६८)

Story Of A Girl Who Is Finding Her Prince Charming.
ए.के.ने केलेला खुलासा निशाच्या मनात आणखीच गोंधळ निर्माण करून गेला होता. त्यामुळे ती भांबावल्यागत त्याच्याकडे पाहू लागली व त्याची चौकशी करत म्हणाली, " हे तू काय म्हणालास ए.के.? तुला खरंच शंभर टक्के खात्री आहे की, तुला ज्या निशाचा शोध होता ती मी आहे? नक्की मीच तुझी रातराणी आहे का? आणि तू खरंच माझ्या बॅचमध्ये होता म्हणजे आपण एकत्र एकाच शाळेत व एकाच वर्गात शिकलोय? शिवार जर तू माझ्याच बॅचचा विद्यार्थी होतास तर मग तुझी नि माझी ओळख कशी नाही? तू रेग्युलर येत नसायचा का? कारण जर तू रेग्युलर आला असतास तर मला तुझ्याविषयी नक्कीच थोडीफार माहिती असती परंतु प्रत्यक्षात मला तुझ्याबद्दल फारसे काहीच माहिती नाही. माझ्याकडे बऱ्याच वर्गमित्रांचे कॉन्टॅक्ट्स आहेत पण त्यात तू नाहीस. किंवा ट्रान्सफर झालेल्या स्टुडंट्सपैकी होतास का तू? त्याचबरोबर मी खात्रीशीर सांगू शकते की, आमच्या बॅचमध्ये ए.के. नाव असणारं कुणीच नव्हतं. प्रत्येक रियुनियनच्या वेळीही तुझा उल्लेख नसतो. त्यामुळे सध्या माझा गोंधळ कमी न होता आणखी वाढत जातोय. विचारांचा आणि प्रश्नांचा गुंता कमी होण्याऐवजी वाढतोय. "  


निशाचा वैताग पाहून ए.के. गालातल्या गालात हसला व तिला शांत करत म्हणाला, " निशा, किती गोंधळ करून घेत आहेस तू? शिवाय तुला काय वाटतं माझं पाळण्यातलं नावही ए.के.च आहे. माझंही बारसं झालंय की! "


" हा गोंधळ आपोआप होतोय. बाय द वे तुझं नाव ए.के. नाहीये तर मग काय आहे? " निशा हिरमुसून प्रश्न विचारत म्हणाली.


" वेडाबाई, रिलॅक्स सगळं कळेल तुला फक्त गोंधळ करून घेऊ नको आणि वैताग तर मुळीच करू नकोस. बाय द वे ए.के. माझं नाव आहे. अर्थात ए. आणि के. हे माझ्या पूर्ण नावाचे इंग्रजी आद्याक्षरे आहेत. " ए.के. थोडक्यात उकल करत म्हणाला.

" अच्छा. " निशा आश्चर्य व्यक्त करत म्हणाली.

" हो. आता मला सांग तुला आठवतंय का काही की, अजूनही नाही कळलं तुला की, मी कोण आहे? " ए.के.ने नजर रोखून विचारले.

" नाही थांब मी आठवण्याचा प्रयत्न करते. ए. आणि के. इनिशियल्स असणारे माझ्या मते साधारण पाच विद्यार्थी होते. " निशा आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

" बरं. " ए.के. निशाचे प्रयत्न पाहून अलबत हसला.

" अरुण काळे? " निशाने लगेच एक नाव आठवत विचारले. ए.के.ने नकारार्थी मान हलवताच निशा परत विचार करू लागली.

" अमन कोठारे? " निशाने परत आशेने पाहत विचारले. ए.के.ने परत नकारार्थी मान हलवली.

निशाने परत विचार केला आणि म्हणाली, " आकाश कांबळे? "

ए.के.ने परत एकदा नकारार्थी मान हलवली. निशा कसनुसं हसली अन् परत विचार करू लागली. त्यानंतर तिला आणखी एक नाव आठवले व ती म्हणाली, " अंगद कोल्हटकर? "

ए.के.ने नकारार्थी मान हलवली. निशाचा हिरमोड झाला होता. त्यानंतर एक नाव राहिले होते. ते नाव तिला आधीपासून ठाऊक होते पण तिने उच्चारले नव्हते. अंततः कुठलाही पर्याय न राहिल्याने दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, " खरंतर, मला हा मुर्खपणा वाटतोय कारण चार नावे घेतली पण त्यापैकी एकही तू नाहीस आणि माझ्या माहितीत असणारे एक नाव जे राहिले आहे त्याविषयी मी साशंक आहे. हृदयाला सुचेनासे झाले आहे आणि बुद्धी म्हणतेय की, मी नको ती आशा ठेवतेय तरीही शेवटचा पर्याय म्हणून मी विचारतेय. तू आदित्य कुलकर्णी आहेस? "

निशाने थरथरतच विचारले अन् ए.के.ने होकारार्थी मान हलवली. त्याचे उत्तर मात्र तिला अपेक्षित नव्हते म्हणून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत पुटपुटू लागली. ती म्हणाली, " नाही, हे कसं शक्य आहे? नाही. तू मस्करी करतोय ना माझ्याशी? खरं सांग, तू आदित्य नाहीये ना? हं? "

ए.के. गालातल्या गालात हसला आणि निशाच्या कपाळावर हलकीशी टिचकी मारत बोलला, " हो, मी खरं बोलतोय. मी ए.के. अर्थात तुझा आदित्य आहे. आदित्य कुलकर्णी. " 

" काय? " निशाने आश्चर्याने विचारले अन् आपोआप तिचे हात तिच्या ओठांवर गेले. 

" हो गं वेडाबाई! मीच आहे तो ज्याच्या आठवणीत तू कविता रचत राहायचीस. मीच आहे तुझं भूतकाळातलं पहिलं प्रेम आणि वर्तमानातलं शेवटचं प्रेम. मीच होतो एवढे वर्ष तुझ्या हृदयात ठाण मांडून बसलेला आदित्य आणि मीच आहे तो ए.के. ज्याने वर्तमान स्विकारायला आणि स्वतःला संधी देत नव्याने प्रेम करायला सांगितलं. मीच आहे तो आदित्य ज्याने अल्लड वयात प्रेमाचा मतितार्थ जाणून घ्यायला तुला कळत-नकळत भाग पाडलं आणि मीच आहे ए.के. ज्याने तुझ्या तरूण मनात नव्याने प्रेमाचा बहर फुलवला. शिवाय तूच आहे माझी रातराणी. तूच आहे माझ्या हृदयाची स्वामिनी. " ए.के. अर्थात आदित्य स्वतःच्या प्रेमाची ग्वाही देत खुलासा करत म्हणाला.

" खरंच? " निशाने पाणावलेल्या डोळ्याने विचारले.

ए.के.ने अलगद तिचा चेहरा ओंजळीत घेतला व अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्या ओठांच्या स्पर्शाने तो त्याचे प्रेम व्यक्त करत होता. भोगलेल्या विरहाच्या वेदना व्यक्त करत होत्या. निशाही योग्य प्रतिसाद देत होती. ती देखील त्याच्या ओठांच्या स्पर्शाने पार न्हाऊन गेली होती. त्या स्पर्शात विरघळून गेली होती. ती ही तिच्या प्रेमाची कबुली देत होती.

थोड्या वेळाने चुंबन करून होताच आदित्यने तिचा चेहरा पुन्हा ओंजळीत घेतला व तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो म्हणाला, " आता तरी तुझ्या मनाचा सगळा गुंता सुटला ना? "

आदित्यचा मिश्किल हास्याचा स्वर ऐकताच निशाचे अंग अंग शहारले. तिच्या गालांवर लाली चढली आणि तिने होकारार्थी मान हलवत खात्री दर्शवली. शिवाय त्या क्षणी कशी प्रतिक्रिया द्यावी, ह्याविषयी देखील ती अनभिज्ञ होती. मुळात तिला तिच्या आनंदापुढे अवघे आभाळ ठेंगणे वाटत होते. कित्येक भावनांचा गदारोळ झालेला असताना तिने क्षणाचाही विलंब न करता आदित्यला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत कित्येक वर्षे भोगलेला विरह, दुरावा, आठवण, हक्क, प्रेम, ओढ अन् आपुलकी ह्या सर्व भावभावनांचे संमिश्रण होते. ते दोघेही एकमेकांना बिलगून होते पण लगेच निशाने त्याला स्वतःपासून दूर लोटले आणि एक जोरदार चापट त्याला मारली. 

निशाने का त्याला चापट मारली? हा प्रश्न त्याच्या मनात घुमत होता. तो नक्कीच आश्चर्यचकित झाला होता. त्यामुळे तो निशाकडे गोंधळून बघू लागला व भुवया आकसून घेत व स्वतःच्या गालाला झाकून घेत इशाऱ्यातच निशाला विचारपूस करू लागला.

निशाला त्याचे हावभाव कळताच ती त्याला उद्देशून म्हणाली, " तुला हेच हवं. तू ही चापट डिझर्व्ह करतो. एवढेच काय, याच्यापेक्षा जास्त फटके तुला हाणायला हवे. "

त्यानंतर निशा आणखी वेगाने पण हळूवार आदित्यच्या छातीवर आणि पोटावर फटके आणि ठोसा मारू लागली. तेवढ्यात आदित्यने तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतले आणि तिला विचारले, " पण का? काय केलंय मी? " 

" कारण काय विचारतोस? तुला साधी अक्कल नाही का? मला सांग, जर तुला सगळं माहिती होतं तर मला असं का छळत राहिलास? का अंत पाहिला माझ्या प्रेमाचा? का हे लपवून ठेवलंस? शेवटी तुला माझ्याकडूनच आधी प्रेमाची कबुली घ्यायची होती का? माझ्या डोळ्यातलं प्रेम ओळखता नाही आलं का तुला? का सगळं माहिती असूनही अनभिज्ञ असल्याप्रमाणे वागत राहिलास? एवढा उशीर का केलास? ज्या दिवशी सगळं तुला कळलं त्याच दिवशी मला सांगावंसं वाटलं नाही का तुला? की परीक्षा घ्यायची होती तुला माझी आणि माझ्य प्रेमाची? " निशा रागात धुसफूस करत बोलत होती पण त्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी प्रकर्षाने झळकत होती. आदित्यही भावूक झाला होता. ती मात्र नाराज झाली व हाताची घडी घालून पाठमोरी उभी राहिली. शिवाय डोळ्यातले पाणी एक क्षणही थांबत नव्हते.

क्रमशः
........

©®
सेजल पुंजे.


🎭 Series Post

View all