अल्लड हे प्रेम जरासे (भाग-६६)

Story Of Past And Present. Story Of A Girl Who Is Carrying Her Past On Her Palm And Desiring To Live Happily The Present.
                ए.के.चे घडीघडीला बदलणारे हावभाव पाहता निशाला वाटत होतं की, कदाचित तिच्या आगमनाने ए.के. आणि त्याचं पहिलं प्रेम असणाऱ्या रातराणीमध्ये बाधा निर्माण झाली असून प्रेम त्रिकोण निर्माण झाला आहे. तिला त्या दोघांच्या आयुष्यात ना ढवळाढवळ करायची होती, ना त्यांच्या प्रेमतपस्येचा भंग करायचा होता. त्यामुळे कळत-नकळत तिला स्वतःची भूमिका एखाद्या खलनायिकेहून कमी भासत नव्हती. शिवाय ए.के. तिच्यापासून दूर जाऊ शकतो, ही भीती तिच्या मनाला पोखरत होती. एका क्षणाला ती उदार होऊ पाहत होती अन् दुसऱ्याच क्षणाला स्वार्थी! विचित्र द्विधा मनस्थितीत होती ती.

निशाने बरेच प्रश्न विचारले होते जे बराच वेळ अनुत्तरित होते. ए.के.देखील मौन बाळगून होता. त्याचे मौन तिच्या काळजावर प्रहार करत होते म्हणून ती शांतता भेदून विचारपूस करत म्हणाली, " ए.के. मी एवढे प्रश्न विचारले पण तू एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. "

" उत्तर देण्यासाठी निदान प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचं मन एकाग्र अन् शांत असायला नको का? शिवाय कसा सांगू मी? कारण तू बोलायला संधीच देत नाहीस. " ए.के. तक्रार करत मिश्किल हसत म्हणाला.

ए.के.च्या शब्दांचा संदर्भ लागताच निशा तिची चूक स्विकारत म्हणाली, " सॉरी. सगळं काही जाणून घेण्याच्या नादात मी तुला बोलायला ना पुरेसा वेळ दिला, ना संधी. असो. मी शांत बसते आता. तू बोल. "

" ह्म्म. आता ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर. मी भेटलो तिला आणि बोललो तिच्याशी! माझा भूतकाळ आणि वर्तमानकाळ अगदी उकलून तिला सविस्तर माझ्या भावना कबूल केल्या. तिचं माझ्या आयुष्यातलं महत्त्व, तिच्या आठवणी इत्यादी प्रत्येक गोष्टीची जाणीव तिला करून दिली. बालपणी अल्लड वयात मी केलेल्या चुका तिच्यापुढे स्विकारल्या, तिची टाळाटाळ केल्याचा मला झालेला पश्चात्ताप व्यक्त केला.

थोडक्यात, मी माझं अल्लड प्रेम व्यक्त केलं पण थोड्या वेळानंतर मी तिच्या निर्णयाबद्दल विचारपूस केली. तिला मी तुझ्याबद्दल सुद्धा सांगितलं. त्यामुळे सगळं जाणून घेतल्यावर तिच्या निर्मळ भावनांची कबुली तुझ्यासमक्ष देण्याची तिची इच्छा होती; कारण तुला वास्तवाची अन् तिच्या निर्णयाची जाणीव असावी, असे तिला प्रकर्षाने वाटत होते. शिवाय कुठल्याही प्रकारे तिला तुझ्या भावनांना हानी पोहचवायची नव्हती. म्हणून ती तिचा निर्णय आपल्या दोघांपुढे देणार आहे.

हा तिचा स्वतःचा निर्णय होता म्हणून मी तिच्या निर्णयाला दुजोरा दिला पण कळत-नकळत तुझ्या भावनांचा चुराडा होऊ नये, असं मलाही वाटतं. तिचा निर्णय काय असेल मला ठाऊक नाही पण जर तिचा निर्णय तुझ्या हिताचा नसला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही म्हणून आताच माफी मागतो. सॉरी निशा. " ए.के. थोडा चाचरत अन् नजर चोरत दिलगिरी व्यक्त करत बोलला कारण त्यांच्या नात्याचं भविष्य त्याच्या रातराणीचा निर्णय ठरवणार होता. त्यामुळे तिचा निर्णय निशाकरिता त्रासदायक असण्याची भीती त्याच्या शब्दातून झळकत होती.

" माफी मागण्याची काही गरज नाही कारण मला तिच्या निर्णयाचा आदर आहे आणि चांगलं आहे. आपल्या या नात्यात स्पष्टपणा असायलाच हवा अन्यथा उगाच भावनांचा गुंता निर्माण व्हायचा. तिचा निर्णय आपलं भविष्य ठरवणार असला तरी जे शाश्वत प्रेम मला तुझ्यामुळे लाभले ते ही नसे थोडके. " निशा मंद हसत म्हणाली. 

" हो. ते ही आहेच. तुझ्यामुळे मलाही माझ्या पूर्व चुकांची जाणीव झाली. माझ्या कृतीतून मी वर्तमान जगायला शिकलो. हे ही नसे थोडके. शिवाय तिने मला सांगितले की, आतापर्यंत ती देखील माझ्या प्रतिक्षेत होती पण नुकताच तिच्या आयुष्यातही एक व्यक्तीचे आगमन झाले आहे. ज्या व्यक्तीने तिला पुन्हा प्रेम करायला शिकवलं. स्वतःला संधी द्यायला शिकवलं. त्यामुळे तिलाही वेळ हवा होता योग्य निर्णय घेण्यासाठी. बघू! आता ती काय निर्णय घेते? ती वर्तमानाची निवड करणार की भूतकाळ! "

" काय? याचा अर्थ ती तुझी प्रतिक्षा करत आतापर्यंत एकाकी आयुष्य जगत होती पण ती ही आता वर्तमानाला संधी देऊ पाहतेय. " निशा विचारात हरवून म्हणाली.

" ह्म्म. " ए.के.ने हुंकार भरला.

" अरे बापरे! तिने भूतकाळ निवडला तर तिच्या वर्तमानातील प्रियकराच्या भावना दुखावल्या जातील. बाप रे! कसलं विलक्षण आहे हे. प्रेमाचा त्रिकोण म्हणता म्हणता चौकोन तयार झाला. तिच्या निर्णयावर सगळं अवलंबून आहे. आशा करते की, तिचा निर्णय वर्तमानाची हेळसांड करणारा नसावा. " निशा काळजी युक्त स्वरात म्हणाली.

" ह्म्म. काळजी करू नको. कदाचित तिचा निर्णय ना वर्तमानाची हेळसांड करेल, ना भूतकाळाचा त्याग. " ए.के. आशावादी स्वरात म्हणाला परंतु त्याच्या शब्दांना गूढतेची झालर होती.

" म्हणजे? " निशाने गोंधळून विचारले.

" काही नाही. तू काळजी करू नकोस आणि अति विचार ही करू नकोस. बाय द वे, मी तिला इथेच यायला सांगितलंय. ती तिचा निर्णय आजच सांगणार आहे. याच निमित्ताने तुमची भेट ही घडेल. " ए.के. मंद हसत बोलला. 

" बरं. ठीक आहे पण ती आहे कुठे? कधीपर्यंत येणार आहे ती? " निशाला ए.के.च्या रातराणीचा निर्णय जाणून घ्यायचा होता पण तिच्या मनात भीती देखील होती. अघटीत निर्णयाचा सामना करण्याइतपत बळ तिच्यात नव्हते पण तिच्या सहनशक्तीचा बांध मात्र अटळ होता. तथापि, भीती व्यक्त न करता कापऱ्या आवाजात शून्यात नजर घालून तिने विचारले. 

ए.के. प्रतिसाद देणार होता पण दरम्यान त्याचा फोन खणाणला. त्याने लगेच फोन उचलला व तो कॉलवर बोलू लागला. साधारण दोन मिनिट कॉलवर बोलल्यावर त्याने कॉल ठेवला.

त्यानंतर निशाकडे पाहून अगदी उत्साहात तो म्हणाला, " निशा, ती पोहोचलीय इथे. तू थांब हं. मी येतो तिला घेऊन लगेच. " 

" बरं. " निशा उत्तरली.

               ए.के. उत्साहातच त्याच्या रातराणीकडे निघून गेला अन् क्षणात त्याची प्रतिकृती निशाला दिसेनाशी झाली. त्या प्रतिकृतीप्रमाणे ए.के.ही तिच्या आयुष्यातून दिसेनासा होईल, असेही एका क्षणाला तिला वाटून गेले. त्यामुळे त्या समुद्रतटावर उभी राहून ती दूर क्षितिजापल्याड शून्यात नजर घालून पाहत होती.

तेवढ्यात तिला ए.के.च्या पावलांची चाहूल लागली. तिची नजर मात्र समुद्राकडे अन् मावळणाऱ्या सूर्याकडे होती. भाव-भावनांचे वादळ तिच्या हृदयात थैमान घालून होतं. तो आला हे माहिती असूनही ती माघारी वळली नव्हती कारण त्या सत्याचा सामना करण्याचे त्राण तिच्यात नव्हते. दुसरीकडे ए.के. निशाच्या मनस्थितीपासून अनभिज्ञ होता.

तथापि, त्याने निशाला हाक मारली. तिनेही हुंकार भरून प्रतिसाद दिला परंतु ती पाठमोरे वळून पाहिले नाही. ए.के.ने मात्र तिला परत हाक मारली व तो तिला उद्देशून म्हणाला, " निशा, इकडे बघ ना. ती आली आहे माझ्यासोबत. " 

                     मन नसतानाही तिने स्वतःच्या वाढलेल्या स्पंदनांवर आवर घातला. मन खंबीर केले व ती वळली. त्यानंतर झुकलेली नजर ती हळूहळू वर करू लागली. श्वास वाढले होते. हृदयाचे ठोके तिच्या कानात निनादत होते. तिने मुठी आवळून घेतल्या होत्या. त्यानंतर धीर एकवटून रडका झालेला चेहरा हास्याच्या पालवीने झाकण्याचा ती ओढूनताणून प्रयत्न करू लागली. 

                    खंबीरपणा तिच्या रक्तात सळसळत असायचा त्यामुळे त्या दिवशीही ती तिच्या खंबीरपणाची एका प्रकारे परीक्षा देत होती. माघार घेणे तिला कधी जमलेच नव्हते म्हणून तेवढ्या बिकट क्षणी ही तिने स्वतःला सावरून घेत मनाला शांत केलं होतं. हृदयाच्या स्पंदनांचा वेग मर्यादित होताच तिने दीर्घ श्वास घेत सावकाश घट्ट मिटून घेतलेले डोळे उघडले.

पहिल्यांदा तिची नजर ए.के.कडे गेली त्यानंतर अनावधानाने तिने पुढे बघितले अन् ती पाहतच राहिली कारण त्याक्षणी ए.के. त्याच्या हातात आरसा पकडून होता आणि त्यात तिला स्वतःचेच प्रतिबिंब दिसत होते. ती त्या क्षणाला पूर्णतः भांबावून गेली होती. त्यामुळे अगदी अचंबित होऊन ती पापण्यांची उघडझाप करत आळीपाळीने आरशातील स्वतःच्या प्रतिबिंबाला आणि ए.के.ला एकटक पाहत होती. तिच्या कपाळावर आठ्या एकवटल्या होत्या अन् त्या आठ्या तिच्या मनाचा गोंधळ व्यक्त करत होत्या. एकीकडे ती आश्चर्य व्यक्त करत ए.के.कडे पाहत होती परंतु आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहून तिला आनंद झाला होता, हे ही तेवढेच खरे होते अन् म्हणून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. ए.के. मात्र निशाकडे पाहून मंद हसत होता.

 
क्रमशः
............... 

©®
सेजल पुंजे.

🎭 Series Post

View all