अल्लड हे प्रेम जरासे (भाग-६३)

Story Of Nisha Who Is Stuck In Her Past. Who Hasn't Moved On Yet.
                  ए.के.चा समजूतदारपणा पाहता त्या क्षणी निशा निशब्द झाली होती. आनंद अन् समाधानयुक्त भाव तिच्या चेहऱ्यावर अगत्य झळकत होते. ए.के. समंजस असल्याची खात्री तिला निःसंशय होती पण तो एवढ्या प्रमाणात सखोल विचार करू शकतो, याची प्रचिती तिला त्यावेळी पहिल्यांदाच आली होती. शिवाय तिचा भूतकाळ जाणून घेतल्यावर त्याने घेतलेली भूमिका वाखाणण्याजोगी होतीच परंतु त्याची निराळी प्रतिक्रिया पाहता निशाचे मन फारच सुखावले होते अन् म्हणूनच तिने त्याच्या प्रेमाचा स्विकार करत त्याला घट्ट मिठी मारली.


                       तिचं मन अक्षरशः गहिवरून आलं होतं. अंततः तिला तिचे आनंदाश्रू लपविता आले नाही अन् तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली; कारण तिला तिच्या भूतकाळासह स्विकारणारा, तिच्यावर हक्काने हक्क गाजविणारा, अतोनात निस्वार्थ प्रेम करणारा अन् नवीन सुरुवात करण्यासाठी संधी देणारा तिचा विधिलिखित जोडीदार तिला लाभला होता. 


 
बराच वेळ ती ए.के.ला बिलगून उभी होती पण तेवढ्यात त्याने दीर्घ श्वास घेत मिठी सैल केली व तिला मिठीतून बाहेर काढले. त्यानंतर तो थोडा गंभीरतेने निशाकडे पाहू लागला. निशा देखील त्याच्या डोळ्यांचे निरीक्षण करत होती.

तथापि, जड आवाजात निशाच्या डोळ्यात आरपार बघत ए.के. तिला म्हणाला, " निशा, मलाही तुला काहीतरी सांगायचंय. खरंतर, तू तुझा भूतकाळ सांगून रिक्त झाली. त्यामुळे मीही तुझ्या-माझ्यात कुठलेही रहस्य ठेवणार नाही. अंततः आपल्या नात्यात प्रत्येक बाबतीत पारदर्शकता असायलाच हवी. म्हणून आता मलाही एकदाचे व्यक्त होऊन जाऊ दे. "
 

" ह्म्म. बोल ना! ऐकतेय मी. " ती त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून अन् हलकेच स्मित करून हुंकार भरत म्हणाली.

" निशा, खरं सांगायचं तर, आज मी तुझा भूतकाळ एवढ्या सहज समजून घेऊ शकलो कारण तुझी जी परिस्थिती आहे ती काहीशी माझ्याप्रमाणेच आहे. " ए.के. दिरंगाई करत अन् अडखळत एकेक शब्द बोलत होता.

" ह्म्म. बरं. " निशाने दुजोरा देत ए.के.ला बोलण्यास उद्युक्त केले.

" म्हणजे... असं वाटतं की, आपली मनस्थिती भिन्न नाही. आपण दोघेही एकाच होडीतील दोन प्रवासी आहोत असंही म्हणता येईल. सॉरी. सध्या मी काय बोलतोय, याबद्दल मीही अनभिज्ञ आहे. थोडा गोंधळ झालाय माझा. " ए.के. ततपप करत म्हणाला.  


" ए.के. रिलॅक्स. शांत हो आधी. खोल श्वास घे. एवढा घाम का फुटलाय तुला? तू ठीक आहेस ना? काय झालंय एवढं? तू शांतपणे अथवा अगदी निवांत होऊन सांग सगळं मला सविस्तर. कसलीही घाई नाहीये. शिवाय तू जे सांगशील त्यामुळे मी तुझ्याबद्दल नकारार्थी विचार करणार नाही. म्हणून हवा तेवढा वेळ घे. मी आहे इथेच तुझं ऐकून घ्यायला. तू सांग बिनदिक्कत. मनमोकळेपणाने! " निशा ए.के.ला विश्वासात घेत म्हणाली. 

" ह्म्म. ठीक आहे. " ए.के.ने निशाच्या डोळ्यात पाहत हुंकार भरला. 

" बरं वाटतंय आता? कसलंही बर्डन नाहीये ना? " निशाने ए.के.च्या गालावर हलकेच थोपटून विचारले.

" ह्म्म. थॅंक्स कम्फर्टेबल फील करवून दिल्याबद्दल. " ए.के. हलकेच स्मित करून हुंकार भरत म्हणाला. 

" ह्म्म. बोल आता. कसलीही पर्वा न करता बिनदिक्कतपणे कर तुझं मन व्यक्त. " निशा ए.के.ला निश्चिंत करत म्हणाली. 

ए.के.ने त्याच्या गालावर असलेला निशाचा हात त्याच्या हातात घेतला आणि तो तिच्याकडे पाहत बोलू लागला. तो निशाला म्हणाला, " निशा, माझाही एक भूतकाळ आहे आणि तो भूतकाळ सांगितल्याखेरीज मी सुद्धा पुढचं पाऊल नाही उचलू शकणार. शिवाय मलाही तुला अंधारात नाही ठेवायचं आहे अन् भूतकाळाची जाणीव करून न देता वर्तमानात नवी सुरुवात करायची नाहीये म्हणून तू ऐकून घेशील ना माझं? "

ए.के.चा प्रश्न ऐकताच निशा मंद हसली व प्रतिसाद देण्याखातर तिने पापण्यांची उघडझाप केली. तसेच त्याच्या हातात तिचा दुसरा हात दिला व त्याला आश्वस्त केले. तथापि, त्याक्षणी ए.के.ला थोडे धैर्य लाभले. त्यानंतर ए.के.ने पुढे बोलायला सुरुवात केली.

" निशा, आज तुला कळून चुकले आहे की, कशाप्रकारे तुला पाहताक्षणीच मी तुझ्यात गुंतत गेलो आणि कशाप्रकारे तू माझ्यासाठी माझं सर्वस्व झाली वगैरे... पण मुळात मी इथे का आलो? ते अद्याप कुणालाच माहिती नाही आणि मीही याविषयी कुणाशीही कधीच चर्चा केली नाही. अगदी तुझ्याशी असो वा अमेयशी पण आता ह्या क्षणी त्याविषयीच मला तुला तुझ्याशी बोलायचं आहे. " ए.के. गूढ अन् गंभीर स्वरात म्हणाला व निशाकडे पाहू लागला.

निशा त्याक्षणी ए.के.कडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. दुसऱ्याच क्षणी त्याने दीर्घ श्वास घेतला व तो पुढे बोलू लागला. तो म्हणाला, " इथे येण्यामागील कारण म्हणजे ती. मी इथे आलो होतो ते फक्त तिच्यासाठी. ती काय करते? कुठे आहे? कशी आहे? यांसारख्या कित्येक अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात होतो मी. ती अर्थात माझी रातराणी!

मला खूप आवडायची ती. अतिशय निरागस होती ती. आम्ही दोघेही वर्गमित्र होतो. तिच्या नकळत तिच्या हर एक वस्तूंचा संग्रह मी करून ठेवत असायचो. एकदा खेळता खेळता तिने रुमाल हरवला होता पण मला दिसताच मी माझ्याजवळ तिच्या आठवणी स्वरूप जपून ठेवला. एकदा गजरा माळला होता तिने. दिवस मावळताच फुले कोमेजली अन् तिने गजरा एका झाडाजवळ ठेवलेला मी सगळ्यांच्या गैरहजेरीत तो गजरा उचलला व त्याची जपणूक केली.

एकदा तिची रिबीन डेस्कवर राहिलेली मी ती सुद्धा सांभाळून ठेवली. तिच्या वाढदिवसाला तिने वितरित केलेले चॉकलेट असो वा कळत-नकळत तिने हरवलेला खोडरबर अन् पेन्सिल. सगळं आजही आहे माझ्याकडे. किंबहुना, अशा कित्येक तिच्या वस्तू आजही माझ्याकडे आहेत; पण मी हेच करू शकलो. कधी तिचा सामना करण्याचं धाडस एकवटण्याचा प्रयत्नच केला नाही. शिवाय खूप लाजरा होतो मी म्हणून तिला कधी नजर वर करून पाहण्याची कुरघोडी ही मी केली नाही.

कायमच चोरून-लपून बघायचो मी तिला आणि यदाकदाचित तिची नि माझी नजरानजर झालीच तर अगदी तोंड फिरवून घ्यायचो. नंतर पश्चात्ताप ही करायचो पण त्यावेळी वातावरणच असे असायचे की, भिन्नलिंगीयांना एकमेकांशी मैत्री करण्याची देखील मुभा नसायची पण आता खरंच वाईट वाटतं की, मी का तिच्यापुढे व्यक्त नाही झालो? व्यक्त होणे कोसो दूर राहिले पण मी तिच्याशी साधी मैत्री करणेही टाळले होते. कळायचेच नाही तिच्या सहवासात का माझं हृदय धडधडायचं? का तिला पाहण्यासाठी जीव कासावीस व्हायचा? का तिला बरं नसलं की, माझा जीव टांगणीला लागून असायचा? परंतु जे काहीही होते ते कायम हवेहवेसे वाटायचे.

त्या अव्यक्त नजरेच्या लपंडावातही आत्मिक सुख दडलेले होते, असे नेहमीच वाटते. हो, प्रत्येक वेळी तिला टाळत राहिलो. कळत-नकळत तिचं मन दुखवत राहिलो अन् हे करताना मी स्वतःच्याच भावनांचा स्वतःपुढे स्विकार करणे टाळत राहिलो. माझ्या प्रेमाला अबोल करणारा मीच होतो! त्या अल्लड वयातल्या प्रेमाला कमी लेखणारा मी स्वतः होतो. अल्लड वयातले प्रेम शाश्वत नसते, कदाचित हा न्युनगंड मी स्वतःच स्वतःच्या मनात निर्माण केला होता.

शिवाय तिच्या डोळ्यातही मला माझ्यासाठी तेच भाव दिसायचे आणि कुठे ना कुठे खात्री सुद्धा होती मला की, नक्कीच आमच्या दोघांचं नातं आकर्षणापलिकडचं असावं पण तरीही मी अव्यक्त राहिलो कारण खरं सांगायचं तर होती माझ्या मनात भीती! मला भीती वाटायची की, कदाचित आम्ही भावनांच्या जाळ्यात फसून स्वतःचे भविष्य निर्माण करू शकणार नाही. शिवाय ती माझ्याबद्दल काय विचार करणार? जर तिच्या मनात माझ्याप्रती कोणतेही भाव नसतील अन् मी उगाच तिच्यापुढे व्यक्त होऊन चुकी केली तर?


ह्यांसारखे कित्येक प्रश्न माझ्या मनाला पोखरत असायचे पण जसजसा मी तारुण्यात शिरत गेलो तसतशी मॅच्युरिटी मला शिवू लागली. तथापि, आता मला वाटतं की, त्यावेळी मी उगाच नकारात्मक विचार करण्याची चुकी केली. कदाचित मी अति विचार करून स्वतःलाच यातना देण्याशिवाय काहीच केले नाही. त्यावेळी तिने जास्तीत जास्त मला नापसंत करत नकार दिला असता अन् हे सारे काही काळाच्या ओघात सहन करणे लाख पटीने योग्य पण मनातील प्रेमळ भाव व्यक्त न करणे, मलाच कालांतराने छळतील हे त्या बालवयात सुचले नव्हते.


               खरंच नाही झाली माझी हिंमत त्यावेळी म्हणूनच मी तिच्यापासून दूर गेलो. दुरावा कायम ठेवला पण माझं मन मात्र तिच्यातंच गुंतून राहिलं आयुष्यभरासाठी. तिचं ते निखळ हसू अजूनही आठवतं मला! तिचा तो लाघवी आवाज कानात गुंजतो माझ्या अजूनही. तिच्यापासून अंतराने लांब राहताना कधीच तिच्या सहवासाला मुकलो नाहीच मी.


              तिच्या सहवासात, तिच्या प्रिय वस्तूंच्या सानिध्यात अन् त्या बालवयातल्या आठवणींच्या छत्रछायेखाली जगतच मी तारुण्यात पदार्पण केलं पण वाढत्या वयाबरोबर अव्यक्त राहिल्याची सल एका जखमेप्रमाणे माझ्या हृदयावर खोलवर परिणाम करून गेली. " गतकाळाची पाने चाळत अंततः ए.के.ने त्याचे मन रिक्त केले.


क्रमशः
.........

©®
सेजल पुंजे.


🎭 Series Post

View all