गुंतता हृदय हे..! - भाग ४ (अंतिम भाग)

Guntata Hruday he!

गुंतता हृदय हे..- भाग ४ 

तेवढ्यात  दरवाजा वाजला. "आई ते आले वाटतं. काय नाव म्हणालीस त्या मुलाचं?" म्हणून निशा दरवाजा उघडायला गेली. तिने दरवाजा उघडायला आणि आशाताईंनी उत्तर द्यायला एकच वेळ आली, " एडव्होकेट निशांत अष्टेकर नाव आहे मुलाचं." 

ती धडधडत्या अंतःकरणाने तिच्या समोर उभ्या असलेल्या त्याला पाहात होती!

पुढे..

दारात निशांत त्याच्या आई वडिलांबरोबर उभा होता. आशाताई त्यांना आत घेऊन आल्या. निशा मात्र तशीच दारात उभी होती. त्याच्या पहिल्याच नजरेत काहीतरी होतं जे तिला अस्वस्थ करून गेलं. पण काय ते तिलाही कळत नव्हतं. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. निशांतचे आई वडील आपल्या मुलाचं कौतुक सांगत होते. माणसं साधीच होती. आपल्या एकुलत्या लेकाच्या लग्नाची स्वप्न डोळ्यांत घेऊन इथवर आली होती. पण तो? तो मात्र तिथे असूनही कुठेतरी हरवला होता. काहीतरी गमावल्याचं दुःख त्याच्या डोळ्यांत दिसत होतं. पण चेहऱ्यावर खोटं हसू आणून त्याने निशाकडे बघितलं. आपुलकीने तिची चौकशी केली. चहा पोह्याचा कार्यक्रम झाल्यावर काही क्षण शांततेत गेले. 

"तुमची हरकत नसेल तर मला निशाशी एकांतात बोलायचं आहे." निशांत उभा रहात म्हणाला. त्याच्या आई वडिलांनी चिंतातूर नजरांनी एकमेकांकडे बघितलं आणि नजरेनंच परवानगी दिली. आशाताईंची अवस्थाही वेगळी नव्हती. आत्तापर्यन्त सगळं सुरळीत चालू होतं पण आता त्यांना सत्य सांगायची वेळ आली होती. ते दोघं त्यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडले.

चौकातल्या एक इराणी कॅफेमध्ये दोघं चहा पित बसले होते. तो त्याच्या समोरच्या चहाच्या कपाकडे पाहात होता. पण निशा? तिची नजर मात्र राहून राहून त्याच्या चेहऱ्याकडे जात होती. इतका जवळचा का वाटत होत तो? त्याच्याशी खूप बोलायचं होतं पण एक अनामिक हुरहूर जाणवत होती.

"निशा.. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो. माझाही आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलीवर जीवापाड प्रेम केलं मी. लग्न करणार होतो मी तिच्याशी. पण.. काही घटना घडल्या आणि.. ती..आता..नाहीये!" शेवटचे तीन शब्द बोलताना तो काही महिन्यांपूर्वीच दुःख पुन्हा जगला.

"ती पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही. पण आपला भूतकाळ असा पुसून टाकता येत नाही. आणि मला तो पुसून टाकायचाही नाही. खूप सुंदर आठवणी आहेत. पण त्या आठवणीच राहतील. मी अजूनही सावरतो आहे त्यातून. लग्नाचं वय निघून चाललंय म्हणून आई बाबांचा अट्टाहास आहे मी लग्न करावं हा. आपलं लग्न झालं तर नवरा म्हणून मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. पण मला थोडा वेळ लागेल. माझ्या आयुष्यातली तिची जागा पुसून ती दुसऱ्या कोणाला तरी द्यायला." तो अडखळत म्हणाला. ती डोळ्यांत पाणी आणून त्याच्याकडे पाहात होती. गालांवर ओघळलेल्या अश्रूंचं तिलाही नवल वाटलं. एवढी भावुक का झालेय मी? तो तिच्याकडे तिच्या उत्तराची वाट पाहात बघत होता. 

"निशांत.. मला इथे आणल्याबद्दल थँक यु. मलाही तुमच्याशी थोडं बोलायचं  होत होतं." ती चाचरत म्हणाली. "ते माझ्या आईने.. म्हणजे आम्ही. तुम्हाला सगळं सत्य नाही सांगितलंय. माझ्याबद्दल.." ती नजर चोरत म्हणाली. निशांतने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.

"काही महिन्यांपूर्वी कॉलेजमधून घरी येत असताना मला रस्त्यात दरदरून घाम फुटला आणि मी बाजूच्याच फुटपाथवर आधारासाठी बसले. लोकांनी मदतीसाठी माझ्या भोवती घोळका केला. पण माझी दृष्टी.. हळूहळू धूसर होत होती. काही क्षणांतच माझी शुद्ध हरपली. त्यानंतर मी दोन दिवसांनी शुद्धीवर आले. हॉस्पिटलच्या कार्डिओ केअर वॉर्डमध्ये. माझं एमरजेंसी हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं. माझं हार्ट अचानक फेल झालं होतं. का आणि कसं ते डॉक्टर्सही सांगू शकले नाहीत. माझं आयुष्य संपल्यातच जमा होतं. पण त्याच दिवशी माझ्या सुदैवाने आणि तिच्या दुर्दैवाने त्या हॉस्पिटलमधल्या एका पेशंटने शेवटचा श्वास घेतला. इतक्या शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीचं हार्ट अजून कुठे पाठवणं शक्य नव्हतं. म्हणून मला ते हार्ट मिळालं आणि माझा जीव वाचला." निशा बोलायची थांबली. 

"हे सगळं ऐकल्यावर तुम्ही मला लग्नाला नकार दिलात तरी मी समजू शकते. सॉरी.. आम्ही हे आधीच तुम्हाला सांगायला हवं होतं." निशा ओशाळून म्हणाली. निशांत तिच्या बोलण्याचा विचार करत होता. त्याने एव्हाना नकार दिला नाहीये हे बघून निशाला पण आश्चर्य वाटत  होतं.

"निशा, जे झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. सगळ्यांनाच दुसरा चान्स मिळतो असं नाही. शरीर काय, आज धडधाकट आहे, उद्या नाही. मन जुळणं महत्वाचं." बोलताना तो कुठेतरी हरवला होता. "असो, निघूया आपण? मी आई बाबांशी बोलतो, तू ही विचार कर. आणि मग बोलूच आपण." चहाचं बिल भरून ते दोघं निघाले. निशा अजूनही त्याच्या बोलण्याचा विचार करत तंद्रीत चालली होती. आणि अचानक एका कारच्या हॉर्नच्या आवाजाने ती भानावर आली. निशांतने तिला हाताला धरून मागे ओढलं होतं. तिच्यासमोरून भरधाव वेगाने ती गाडी निघून गेली. तिने घाबरून समोर बघितलं. तिचं हृदय शंभरच्या स्पीडने धावत होतं. तिने ओशाळून निशांतकडे बघितलं, "सॉरी, माझं लक्ष नव्हतं."

पण तो? तो अविश्वासाने त्याच्या हातात असलेल्या तिच्या हाताकडे पाहात होता. तिच्या थरथणाऱ्या हातातून त्याला जाणवणारे तिच्या हृदयाचे वाढलेले ठोके अनुभवत होता तो.. डोळ्यांतून एक अश्रू ओघळून तिच्या हातावर पडला. 

"निशांत.. तुम्ही ठीक आहात ना." निशाने गोंधळून विचारलं. 

"निशा, तू.. तुझं.. हार्ट ट्रान्सप्लांट कधी आणि कुठे झालं?" त्याने थरथरत्या आवाजात विचारलं.

"सिटी हॉस्पिटल.. १ जून." ती बोलली आणि त्याच्या पायातलं त्राणच गेलं. १ जूनला तोही तिथेच होता. आणि 'ती'ही.. म्हणजे हे तिचं.. त्याने भरल्या डोळ्यांनी निशाकडे बघितलं.

काहीवेळ दोघं काहीच न बोलता बाईकवरून घराकडे जात होते. गल्लीच्या तोंडाशी बाईक थांबवून निशा खाली उतरली. "इथून पुढचा रस्ता खराब आहे, मी जाईन चालत." 

"निशा, माझा ह्या लग्नाला होकार आहे. तू करशील लग्न माझ्याशी?" घराकडे निघालेली तिची पाऊलं थबकली. तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला. त्याच्या डोळ्यांतला आनंद उगाच आधी बघितल्यासारखं वाटून गेलं तिला. एवढी मोठी गोष्ट समजूनही तिच्याशी लग्नाला तयार झालेला तो. पण कुठेरी मनात तिला आधीच माहिती होता का त्याचा निर्णय? गोड हसून तिने मान हलवली.

"उशीर झालाय, निघते मी." म्हणून ती घराकडे चालायला लागली. गल्लीच्या तोंडाशी पोहोचल्यावर तिने मागे वळून बघितलं. पण तो तिथे नव्हता. तिने कावरीबावरी होत आजूबाजूला बघितलं. तेवढ्यात तिच्या हाताच्या बोटांत त्याची बोटं गुंफली गेली. तिचा हात पकडून तिच्या बाजूला उभा होता तो. 

"बाईक नाही येऊ शकत पण मी येऊच शकतो की. इतक्या रात्री तू एकटीने जाणं नाही पटत मला."  तो हसून म्हणाला. अचानक मनावरचं ओझं दूर झालं तिच्या. दोघं हातात हातात घालून तिच्या घराखाली आले.

"गुड नाईट निशांत." म्हणून ती निघाली. तो काहीतरी आठवून गालात हसला आणि त्याचवेळी त्याच्या गालावर तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श झाला. त्याने चमकून तिच्याकडे बघितलं.

"गुड नाईट किस! माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी." ती हसून म्हणाली.  खरंच पुन्हा नव्याने जन्मली होती ती..त्याच्यासाठी..तिच्यासाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी..

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा,

भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता!

ना बंधने व नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी!

एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी! 

समाप्त!

© मृण्मयी कुलकर्णी 

🎭 Series Post

View all