गुंतता हृदय हे..! - भाग ३

Guntata Hruday he!

गुंतता हृदय हे..- भाग ३ 

आयुष्यभर प्रेम करण्याच्या आणाभाका घेणं आणि प्रत्यक्षात अशा कठीण परिस्थितीतून त्या निभावणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. शरीराप्रमाणेच मनही हळू हळू शिथिल होत चाललं होतं. आणि एक दिवस.. अचानक तो पुन्हा समोर आला!

पुढे..

"प्रिया, तुला सांगितलं होतं ना मी. त्यांना शिक्षा होणार. त्यांना शिक्षा झाली प्रिया. वीस वर्ष कारावासाची. माझ्या हातात असतं फाशीच दिली असती त्यांना. पण ती खूपच साधी शिक्षा झाली असती त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी. दे शुड सफर.. लाईक यु." म्हणून त्याने माझ्या कपाळावर ओठ टेकवले.

"सॉरी, इतके दिवस तुला भेटायला नाही येऊ शकलो. तुझ्याशी नजर मिळवायची हिम्मतच होत नव्हती. तुझ्या अपराध्यांना शिक्षा द्यायची शप्पथ घेतली होती मी. पण काहीच यश मिळत नव्हतं. खचत चाललो होतो मी. तुझ्या रिकाम्या डोळ्यांत बघताना कायम तुझ्यावर झालेल्या अन्यायाची छटा दिसायची. नव्हतं सहन होत मला. चिडली नाहीयेस ना माझ्यावर? तुला असं नाही वाटलं ना की  मी विसरलो तुला? ए बाळा, खरंच सॉरी ना. प्लिज आतातरी बोल ना माझ्याशी. खूप दिवसांपासून आस लावून बसलो आहे गं तुझ्या परत येण्याची. सगळे सांगतात तू नाही येणार पण मला माहितीये आपल्या प्रेमासाठी तू येशील. येशील ना? एकदा तुझ्या डोळ्यांत प्रेम बघण्यासाठी तळमळतोय गं मी. जे झालं ते झालं. पण मी आहे ना तुझ्याबरोबर. मी सगळं नीट करेन. भूतकाळातल्या त्या भयानक प्रसंगाची सावलीही नाही पडू देणार मी पुन्हा तुझ्यावर, आपल्या भविष्यावर.. फक्त तू एकदा ये ना परत माझ्याकडे. तुझ्याशिवाय नाही गं जगू शकत. तू परत येशील या आशेवर आला दिवस पुढे ढकलतोय मी. पण आता नाही सहन होत.. नाही सहन होत!" त्याने रडत माझ्या हातावर डोकं टेकवलं. 

आणि त्या क्षणात मला जाणीव झाली. किती चुकीची होते मी. फक्त मी नव्हते अडकले ह्या जीवन मृत्यूच्या फेऱ्यात. माझ्याबरोबर तो ही अडकला होता. जोपर्यंत मी होते तोपर्यँत तो कधीच पुढे जाणार नव्हता. प्रेमही किती वेडं असतं ना. सोबत जगता येत नसूनही सोडूनही जाववत नाही. माझं आयुष्य तर संपलंच आहे. त्याला ते समजत नसलं तरी मला जाणवतंय ना.. मग इथे असं घुटमळून काय फायदा? ज्या संसाराची, प्रेमाची, आयुष्याची मी स्वप्न बघितली होती ती आता दुरापास्तच आहेत. पण त्याच्याकडे अजूनही संधी आहे.. पुन्हा प्रेमात पडायची.. संसार थाटायची.. चिमुकल्या पिल्लांकडून 'बाबा' ही हाक ऐकायची.. मी त्याच्यापासून हे कसं हिरावून घेऊ.. त्याच्यासमोर त्याचं अख्ख आयुष्य आहे. ते समृद्ध व्हावं म्हणून मला आता जावंच लागेल. "निशांत, मला माफ कर. माझ्यासारखी अभागी मीच आहे. इतकं सोन्यासारखं प्रेम असूनही त्याला सोडून जातेय. पण हे तुझ्यासाठीच आहे रे राजा. ह्या आयुष्यात तुला द्यायला काहीच नाहीये माझ्याकडे. शरीर.. मन.. सगळंच रितं. पण पुन्हा येईन मी, तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी.. पुन्हा जन्म घेईन! आपलं प्रेमच घेऊन येईल मला." मी मनातच त्याची माफी मागितली. माझ्या हातातून त्याला जाणवणारी स्पंदनं हळू हळू कमी होत गेली. त्याचा बावरलेला चेहरा समोर दिसत होता, थरथरणारा आवाज कानावर पडत होता. पाठोपाठ डॉक्टर्स आणि नर्सेसची धावपळ जाणवत होती. पण मी हळू हळू ह्या सगळ्या पलीकडे जात होते. वेदनेतून, ह्या उद्विग्न शरीराच्या पाशातून, त्याच्या प्रेमातून.. मुक्त होत होते. आजूबाजूला चालू असणारे मशीन्सचे, माणसांचे आवाज हळूहळू थांबले.. त्याचा पिळवटलेला चेहरा हळूहळू धूसर होत गेला.. आणि जवळपास वर्षभराने पहिल्यांदा मी समाधानाने डोळे मिटले.. कायमचे! 

____****____

"निशा, उठलीस का बाळा? उठ आवर लवकर. आज पाहुणे येणार आहेत ना तुला बघायला." आशाताईंनी आवाज दिला तशी निशा डोळे चोळत उठली. सूर्याच्या किरणांची तिरीप तिच्या डोळ्यांवर आली. ओठ नकळत रुंदावले. हात नकळत छातीकडे गेला आणि हृदयाची ती स्पंदनं जाणवून तिचं मन कृतज्ञतेने भरून आलं.

निशा आवरून खाली आली तेव्हा घरात पोह्यांचा आणि आल्याच्या चहाचा घमघमाट सुटलेला. "आई, एवढं सगळं कुठे करत बसलीस. काहीतरी बाहेरून घेऊन आले असते मी." 

"असं कसं चालेल. पहिल्यांदा स्थळ सांगून आलंय. त्यात आपली जरा पडती बाजू." त्या काळजीने म्हणाल्या.

"आई, ते मला बघायला तयार कसे झाले? त्यांना सांगितलं आहेस ना तू?" निशाने संशयाने विचारलं. 

"मी सांगणारच होते. पण म्हंटलं पहिली भेट होऊन जाऊ दे. नाहीतर लोकं काही न बघताच, समजून न घेताच निर्णय ऐकवतात." आशाताई जरा चाचरतच म्हणाल्या. निशाने नाईलाजाने मान हलवली.

"काय फायदा आहे आई ह्या खोट्या अपेक्षांचा? त्यापेक्षा सुरवातीलाच नकार आलेला चांगला नाही का? उगाच त्यांचा आणि आपलाही वेळ वाया जाणार." ती निराश होऊन म्हणाली. आशाताईंनी आपल्या लेकीकडे पाहिलं. तिच्या शांत चेहऱ्याचं आणि संयमी स्वभावाचं त्यांना अप्रूप वाटत होतं. आठ महिन्यांपूर्वीच्या आततायी, चिडचिड्या निशाची झलकही नव्हती तिच्यात. 'त्या' एका घटनेनंतर सगळंच बदललं होतं.  

आशाताईंच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना बघून निशाला वाईट वाटलं,"असो, आता बोलावलं आहेस ना तू त्यांना. मग भेटू आपण. तुझा अपेक्षाभंग होऊ नये एवढंच वाटतं मला." 

तेवढ्यात  दरवाजा वाजला. "आई ते आले वाटतं. काय नाव म्हणालीस त्या मुलाचं?" म्हणून निशा दरवाजा उघडायला गेली. तिने दरवाजा उघडायला आणि आशाताईंनी उत्तर द्यायला एकच वेळ आली, " एडव्होकेट निशांत अष्टेकर नाव आहे मुलाचं." 

ती धडधडत्या अंतःकरणाने तिच्या समोर उभ्या असलेल्या त्याला पाहात होती!

क्रमशः!

© मृण्मयी कुलकर्णी 

🎭 Series Post

View all