सत्यवान सावित्री आणि वटपौर्णिमा

Marathi Short Story Satyavan Savitri Aani Vat Poornima
सत्यवान सावित्री आणि वटपौर्णिमा

©® राखी भावसार भांडेकर


आज रमा च्या घरी तिच्या मैत्रिणींची किटी पार्टी होती. सगळ्या मैत्रिणी अगदी उच्चविद्याविभूषित होत्या. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी प्रोफेसर, कुणी वकील, कुणी बँकेत मॅनेजर, तर कोणी स्वतःचा स्टार्टअप बिजनेस असलेली.

नुकतीच वटपौर्णिमा झाली होती, आणि रमाने वटपौर्णिमेला अगदी पारंपारिक वेशभूषा करून वडाची पूजा आणि उपवास केला होता. आता महाराष्ट्रीय वेशभूषा आणि त्यावर साजेसे महाराष्ट्रीय दागिने म्हणजे कानातले डूल, गळ्यात चिंचपेटी, तन्मणी, बोरमाळ, चपला कंठी, छान ठसठशीत मंगळसूत्र,लक्ष्मीहार, हातात गहू तोडे, पाटल्या, बांगड्या, नाकात नथ, हाताच्या बोटात छान टपोरी अंगठी, कमरेला मेखला, केसाच्या अंबाड्यात छान जाईजुईचा माळलेला गजरा आणि कपाळाला साजेशी चंद्रकोर असा सगळा शृंगार रमाने केला होता.

मोरपंखी पैठणी आणि या सगळ्या दागिन्यान मुळे रमाचा सौंदर्य खुलून आलं होतं आणि एखाद्या खळखळत्या धबधब्या प्रमाणे ओसांडून वाहू लागलं होतं, रमाने ठरल्याप्रमाणे आपले हे सुंदर फोटो समाज माध्यमांवर टाकल्यावर त्यावर लाईक आणि कमेंटचा नुसता महापूर आला होता.

पण आज रमाच्या घरच्या किटीचा नूर आणि मूड मात्र वेगळाच होता. व्यवसायाने वकील असलेल्या रश्मीने प्रथम सुरुवात केली.

रश्मी - " एका सावित्रीने सत्यवानाला यमाकडून पाशातून सोडवले तर दुसऱ्या सावित्रीने अज्ञानाच्या. एका सावित्रीने वडाला फेर्‍या मारायचे शिकवलं तर दुसरीने आम्हाला अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर काढलं. सत्यवानाच्या सावित्री पेक्षा, फुलेंची सावित्री जर समाजाला चांगली समजली असती तर आज समाजातल्या महिलांची स्थिती फार वेगळी असती. "

रश्मीचे वाक्य ऐकून, डॉक्टर राधा लगेच तिची री ओढू लागली.

राधा - " मला तर बाई हेच कळत नाही की, अशी वडाची पूजा करून उपवास करून खरंच एखाद्याचे प्राण कसे वाचू शकतात? मला तर हे पूजा, व्रत आणि उपवास प्रकरण मनालाच काय पण बुद्धीला पण पटत नाही."

पूजा - " नाहीतर काय! वडाला दोरा गुंडाळून, नव्या साड्या, दागिने घालून खरंच का कोणी दीर्घायुषी होऊ शकले? बरं ठीक आहे वडाची एक झाड म्हणून केली पूजा! मान्य केल आपण. पण अगदी शिकलेल्या बायका, नोकरी करणार्‍या महिला जेव्हा वडाच्या पूजेकरता जाऊ शकत नाही म्हणून, मग वडाच्या फांद्या विकत आणतात किंवा मंदिराबाहेर मिळणाऱ्या पाच- दहा रुपयाच्या फोटोची पूजा करतात ना! तेव्हा मला त्यांची अक्षरशः कीव येते. " कंम्प्युटर इंजिनियर असलेली पूजा तावातावाने आपले म्हणणे मांडत होती.

मेघा - " पण मी काय म्हणते आपणच का करायचा उपवास नवरोजीं साठी? नवरा तरी करतो का एखादा उपवास किंवा व्रत, चांगली बायको मिळावी म्हणून? सात जन्म आपण आपला साथीदार तोच असू देत म्हणून वडाला दोरा गुंडाळायचा पण आपल्या जोडीदाराला कोणी दुसरी जोडीदार पाहिजे असेल तर वडाला आणि त्या देवालाही केवढा धर्मसंकट?" मेघाच्या या वाक्यावर हॉलमध्ये मैत्रिणींचा एकच हशा पिकला.

तेवढ्यात शेअर मार्केट एक्सपर्ट आणि इन्व्हेस्टर अवनी म्हणाली -

अवनी - " माझ्या मैत्रीणींनो मला सांगा झाडाला दोरा गुंडाळणे, त्याची पूजा करणे म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा नाही का? माहित नाही आपल्या भारतीय परंपरेतल्या हया अंधश्रद्धा केव्हा संपतील आणि आपण आपल्या मुलाबाळांना प्रत्येक गोष्टीत दडलेल आणि सणावारां मध्ये असलेलं विज्ञान समजून सांगू शकू?" अवनी ने तिची खंत व्यक्त केली.

मीरा - " मला तर एक गोष्ट कळत नाही की, सावित्रीने सत्यवानशी विवाह का केला? मी स्वतः अनेक ठिकाणी वाचलं होतं की, सावित्री स्वतः खूप सुंदर, हुशार आणि तल्लख बुद्धीची होती, आणि सत्यवान हा एक राजपुत्र असूनही युद्धात पराभूत झालेल्या आपल्या अंध आईवडिलांची वनात सेवा करत होता. सावित्री स्वतः एका राज्याची राजकन्या असूनही तिने पराभूत, अल्पायुषी, निर्धन सत्यवानाशी विवाह का केला? हे मला आजपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे. "

कॉलेजमध्ये,वर्गात पुढ्यात बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणारी मीरा मराठी विषयाची प्राध्यापिका होती आणि आज किटी मध्ये तिच्या मैत्रिणींना प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडत होती.

तेवढ्यात व्यवसायाने फॅशन डिझायनर असणाऱ्या मीनाने रमाला फैलावर घेतले

मीना - " रमा आपल्या सगळ्यांचे ठरले होते ना की वटपौर्णिमा, उपवास आणि पूजेचे इतर सगळे सोपस्कार,आपण त्या व्रतामागचा कार्य-कारणभाव समजून घेतल्याशिवाय करणार नाही. तरीही तू तुझ्या घरच्यांच्या दबावाला बळी पडलीस आणि गेली वडाला दोरा गुंडाळायला! अशाने खरच तुझा नवरा शतायुषी होईल काय?

आता महिला मोर्चा आपल्यावर धावून येणार हे बघून रमाने लगेच सावध पावित्रा घेतला, आणि आतल्या खोलीत आराम करत असलेल्या आपल्या आज्जे सासूबाईंना बाहेर बैठकीत घेऊन आली. आता समोर वयोवृद्ध रमाच्या आजे सासुबाई बघितल्यावर महिला मंडळ एकदम शांत झालं, तर रमा आजे सासूबाईंना म्हणाली -

रमा -" माई या माझ्या मैत्रिणी आज किटी साठी आपल्याकडे आल्या आहेत. त्यांना वटपौर्णिमा, सत्यवान, सावित्री आणि हे व्रत याची महती आणि कार्यकारणभाव जाणून घ्यायचा आहे. " आणि मग मैत्रिणींना उद्देशून म्हणाली, "मी हे वटपौर्णिमेचे व्रत का केलं ते आता तुम्हाला नक्की कळेल."

आजी - "मुलींनो आज मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या व्रत, त्यामागचा कार्यकारण भाव समजून सांगावा अशी रमा ची इच्छा आहे. तर मला एक सांगा,आजवर अनेक स्वयंवर झाल्याचे तुम्ही पुराणात वाचले असेल परंतु खरे स्वयंवर केवळ नल दमयंती आणि सत्यवान सावित्री चे झाले. स्वयंवर म्हणजे स्वतः आपल्या आवडीच्या पुरुष जोडीदाराला वरणे होय ना?

सावित्रीच्या वडिलांनी तिच्या बरोबर काही प्रतिष्ठित नागरिक देऊन तिलाच वरसंशोधन करायला पाठवले. का पाठवले असेल, तिला त्यांनी असे? कारण आहे सावित्रीची बुद्धिमत्ता. ती अतिशय बुद्धिमान स्त्री होती. आपल्याला काय हवे आहे, हे तिला नक्की माहित होते. आणि तिने सत्यवानाला निवडले. जो राजपुत्र असून वनात आपल्या अंध मातापित्यांबरोबर राहतोय, कारण त्याचे राज्य दुसऱ्याने बळकावले आहे, अशा मुलाबरोबर आपल्या कन्येने विवाह करावा, हे सावित्रीच्या वडिलांना आवडले असेल का? तिचा विवाह त्यांनी सत्यावानाशी करून दिला याचा एक अर्थ निश्चित आहे की त्यांचा आपल्या लेकीच्या बुद्धिमत्तेवर विश्वास होता.

आपण ऐकले आहे की, त्याच्या वडिलांचे राज्य हिरावून घेण्यात आले होते आणि ते अंध होते. “अंध होते” याला सांकेतिक अर्थ आहे. शत्रूने पराजित केल्यावर ते वनवासात एकांतात रहात होते. आपल्या राजधर्मापासून, कर्तव्यापासून च्युत झाले होते. म्हणजे प्रजेवर होणाऱ्या अत्याचारांकडे न पाहता, त्यांनी डोळ्यांवर कातडे ओढून घेतले होते.
सत्यवान अल्पायुषी आहे . म्हणजे काय? त्याने त्याचे आयुष्य आपल्या माता-पित्याच्या सेवेपुरते मर्यादित करून घेतले होते. एका शूर वीर राजपुत्राचे हे मर्यादित जगणे, म्हणजे त्याची मृत्यूच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल होती.
सत्यवान सावित्रीच्या या आगळ्या वेगळ्या सहजीवनाबद्दल आपली पुराणे मूक आहेत. आपल्याला एकदम सत्यवान वडाच्या झाडाखाली मृत होऊन पडला. सावित्रीने यमाशी वादविवाद केला व आपल्या पतीचे प्राण परत मागितले इतकेच माहित आहे.

यमाने सावित्रीला वर मागायला सांगितले. काय मागितले तिने? सर्वप्रथम आपल्या सासू-सासऱ्यांचे डोळे मागितले. डोळे म्हणजे काय? दृष्टी. त्यांना आधी दृष्टी मिळणे आवश्यक होते. तर त्यांचे राज्य परत मिळेल. मग मागितले १०० पुत्र! त्यासाठी सत्यवान जिवंत होणे आवश्यक होते. म्हणजे काय? शंभर पुत्र कसे होणार? हे पुत्र म्हणजे शंभर शूर वीर योद्धे, जे त्यांचेच प्रजाजन होते.

आता थोडा विचार करू. सत्यवान मृतवत झाला होता. लग्नानंतर वर्षभरात सावित्रीने जे काही व्रत केले ते हे होते. त्याला तो कोण आहे याची जाणीव करून दिली. संघटन करायला लावले. लोक एकत्र केले. जनजागृती केली. आणि आपल्या श्वशुरांचे गेलेले राज्य परत मिळवले, फक्त मृतवत झालेला आपला पतीच नाही तर सर्व प्रजेमध्ये प्राण फुंकले. म्हणू तिची आठवण करायची. वडाचे झाड हे सुद्धा प्रतीकच. त्याचे बीज पाहिले आहे? सूक्ष्म बीजातून इतका प्रचंड मोठा वृक्ष निर्माण होतो. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचतात, जमिनीत जातात आणि त्यातून नवीन वृक्ष निर्माण होतो, पण तोही आधीच्या मूळ वृक्षाला धरूनच. भारतीय संस्कृतीचे इतके चांगले प्रतिक कुठे सापडेल? पिढ्यानपिढ्या एकमेकांना धरून राहणारी माणसे इथेच आहेत. म्हणून त्या वटवृक्षाची पूजा पूजा करायची.”

मुळात वडाची झाडे लाऊन प्राणवायूचा पुरवठा जपणे हा उद्देश होता.


वादळवाऱ्याला तोंड देत ठामपणे उभे राहणे हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. वटवृक्ष हे त्याचे प्रतिक. या सांस्कृतिक वारशाची आठवण म्हणून विविध व्रतवैकल्ये. अंध, मृतवत कुटुंबाला समर्थपणे उभे करायचे काम सत्यवानाच्या सावित्रीने केले. आज कोरोनारूपी वादळाचा सामना आपल्याला करायचा आहे. माझा नवरा, माझे कुटुंब, माझा समाज, माझे राष्ट्र येथून माझी वसुंधरा येथपर्यंत आपल्याला पोचायचे आहे. हे सगळे, माझे, माझे म्हणजे विश्वरूपी वटवृक्षाच्या पारंब्या आहेत. त्यांचे जतन करायचे म्हणजेच वटसावित्रीचे व्रत करायचे. "

जगात सर्वात दाट सावली असते वडाची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे, ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले.

त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे.

ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा.

सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही . हा जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे .
जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.
संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या.
१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह.

असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत .

शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे . वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला.
आपण ‘वट ’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा'. "