मराठी भाषा......

Marathi

आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे. 

१८ व्या शतकात, पेशवा काळात खूप मराठी साहित्य लिहिले गेले. यातील काळातील प्रसिद्ध काम म्हणजे वामन पंडित यांचे “यथार्थदीपिका”,रघुनाथ पंडित यांचे “नळदमयंती स्वयंवर”. या काळात नवीन साहित्यिक प्रकारचा प्रयोग करण्यात आला. संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांनी “ओवी” प्रकार निर्माण केला. त्यांनी महाभारत आणि रामायणाचे मराठी भाषांतर ही केले. याच काळात “पोवाडा” आणि “लावणी” प्रकारचा उगम झाला. अनंत फंदी, राम जोशी आणि होनाजी बाळा यांनी पोवाडा आणि लावणी प्रसिद्ध केले.

ब्रिटिश राज कालावधी  - १९व्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिश्चन धर्मप्रचारक विल्यम केरी यांनी मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बायबल चे मराठी भाषांतरही केले. साल १८३१ मध्ये कॅप्टन जेम्स थॉमस मॉलवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश (डिक्शनरी) संकलित केला. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वर्तमानपत्र “दर्पण”सुरु केले. याच काळात संगीत नाटक ही विकसित झाले. मराठी नाटकाच्या प्रसिद्धीमुळे मराठीचा विस्तार झाला. आधुनिक मराठी काव्याचे पिता केशवसुत यांनी आपली पहिली कविता १८८५ मध्ये प्रकाशित केली. 

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपले नियतकालिक सुरु केले. ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी “दिनबंधू” आणि “प्रभाकर” नियतकालिकांची सुरुवात केली.

          २०व्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला. मराठी साहित्य,नाटक, चित्रपट यांनी मराठी भाषा आणखी विस्तारली. एन.के. केळकर यांचे जीवनचरित्र लेखन, हरि नारायण आपटे, नारायण सीताराम फडके आणि व्ही. एस. खांडेकर यांचे कादंबरी, विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रवादी साहित्य आणि मामा वरेरकर आणि किर्लोस्कर यांची नाटके यांनी मराठी भाषा समृद्ध केली.

भारतीय स्वातंत्र्यानंतर  -     भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठीला घटना दुरुस्ती (आर्टिकल) ३४४(१) आणि ३५१ नुसार शासकीय राजभाषेचा दर्जा मिळाला. १९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता. आताच्या सुधारणेनुसार कोंकणी, मणीपुरी, सिंधी, आणि नेपाळी वगैरेंचा अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही २२ झाली. 

 1 मे १९६० मध्ये विदर्भ आणि मराठवाडा प्रदेश महाराष्ट्रात जोडण्यात आले. हे एकत्रीकरण भाषेच्या आधारावर झाले होते. राज्य आणि सांस्कृतिक संरक्षणामुळे ९० च्या दशकात मराठीभाषेची खूप प्रगती झाली. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाटक संमेलन आयोजित केले जाते. तसेच दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात जसे “सवाई गंधर्व” इत्यादी जे मराठी कला, संगीत, संस्कृती आणि भाषेचा गौरव करतात. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत उल्लेखनीय कार्ये झाली, यात प्रमुख वाटा होता तो म्हणजे खांडेकर, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर, पी.के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि आणखी खूप साहित्यिक, कलाकारांचा. 

२१ वे शतक  -   २१ व्या शतकात व्यावहारिक फायद्यांमुळे इंग्रजीला खूप महत्व प्राप्त झाले. इंग्रजी भाषा सरकार सुद्धा व्यवहारासाठी वापरते. जागतिकारणामुळे इंग्रजीची मागणी वाढली. आता असे दिसून येते कि शहरी भागातील पालक मुलांना इंग्रजी शाळेंत भरती करतात त्यामुळे हळू हळू मराठीचा ऱ्हास होऊ शकतो असे मानले जाते. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, वर्तमानपत्रे हे आजच्या पिढीला मराठीशी जोडून ठेवण्यात आपली जबाबदारी बजावत आहे.

निष्कर्ष  -  मराठी हि एक सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि आदर, प्रेम हे परस्पर असते, म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते. जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.