मराठी भाषा दिवस

About Marathi Language


मराठी भाषा दिवस


\" माझ्या मराठी मातीचा ,
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यातील शिळा.

हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात.\"

कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या या ओळी वाचल्या की एखाद्या गोष्टीचा \"अभिमान\" असणे म्हणजे काय असते , हे समजते.

मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार कथाकार, समीक्षक आणि ज्ञानपीठ मिळवणारे साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ( कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ,२७ फेब्रुवारी हा दिवस \"मराठी भाषा दिवस\" /मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

२७ फेब्रुवारी १९२२ या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला. त्यांनी विलक्षण लेखन व शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली.

कथा, कादंबऱ्या,निबंध,लघुकथा, नाटक, कविता यांचे लेखन केले. नटसम्राटासारखे अजरामर नाटक व विशाखा काव्यसंग्रहाची निर्मिती केली.
त्यांना त्यांच्या लेखनामुळे \"मानवतेचे कवी\" म्हटले जाते.

या महान साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत जी भर घातली आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांना अभिवादन म्हणून २१जानेवारी २०१३ पासून शासन निर्णयानुसार २७ फेब्रुवारी हा दिवस \"मराठी भाषा गौरव दिन\" म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

\" जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी ।
कि परिमळांमाजि कस्तुरि ।
तैसी भाषांमाजि साजिरी ।
भाषा मराठी ।। \"

किती छान शब्दांत फादर स्टीफन्स यांनी मराठी बद्दल लिहिले आहे.

महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठी.

प्राचीन संत वाड्मय आपल्या मराठी भाषेचे अनमोल लेणे आहे.

श्रवणबेळगोळ येथे इ.स. ८०० साली उभारलेल्या बाहुबलीच्या मूर्तीच्या पायाशी \" चामुंडराय करविले, गंगाराज सुताले करवियले\" असा शिलालेख आढळतो. कवी मुकुंदराज यांनी मराठी भाषेतील \"विवेकसिंधु\" हा पहिला ग्रंथ लिहिला.

\"माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिका मेळविन ।।\"

संत ज्ञानेश्वरांनी आपली मराठी अमृतालाही पैजेत जिंकेल असे म्हटले आहे.

मराठी ही इंडो- युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैंकी मराठी एक आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील १० वी व भारतातील तिसरी भाषा आहे.
मराठी बोलणाऱ्यांची संख्या जवळपास दहा कोटी आहे.
मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून तर तिचे व्याकरण आणि वाक्य रचना प्राकृत पासून तयार झाले आहे.

मराठी महाराष्ट्र व गोवा राज्याची अधिकृत भाषा आहे.

मराठी भाषा अतिशय लवचिक आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत. यामुळेच मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची एक असली तरी ती दर बारा कोसांवर बदलते. मराठी भाषेच्या इतर बोलीभाषा आहेत. जसे - अहिराणी, कोकणी,वऱ्हाडी,मालवणी, कोल्हापुरी.

कोणतीही भाषा पुढच्या पिढीत संक्रमित होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या भाषेतील साहित्य!

मराठी भाषेतील साहित्य खुप प्राचीन व मोठे आहे.
अभंग,ओवी,भारुड,भजन ,कविता, लेख,कथा, लघुकथा,कादंबऱ्या,नाटक, असे अनेक साहित्य प्रकार मराठीत लिहिले गेले आणि दिवसेंदिवस यात अजून भर पडत आहे.

काळ बदलला तसे मराठी भाषेत अनेक बदल झाले आहेत. मराठी भाषेत अरबी, फारशी,कानडी, हिंदी ,इंग्रजी अशा अनेक भाषांतील शब्द आले आहेत.

आपली राज्यकारभाराची भाषा सर्वसामान्य रयतेलाही समजावी आणि मराठीवरील इतर भाषेतील शब्दांचा वापर कमी होऊन मराठी शब्दांचा वापर वाढावा यासाठी शिवाजी महाराजांनी मराठी राज्यव्यवहार कोष तयार करून घेतला. यावरून महाराजांचे मराठी भाषेवरील आपले प्रेम दिसून येते.

सद्यस्थितीत मराठी माणसाची बोलीभाषा मराठी असली तरी वास्तविक ज्ञान हे मात्र इंग्रजीतून दिले जात आहे. शिक्षणासाठी विविध शैक्षणिक बोर्ड स्थापन केले जात आहेत ज्यात इंग्रजी ही मूळ तर इतर भाषा या भाषिक विषय म्हणून शिकवले जात आहे.

पूर्वी सर्वांचे शिक्षण हे मराठी माध्यमातूनच होत होते. पण आता बदलती विचारसरणी, परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा, राहणीमानाचा उंचावलेला दर्जा,समाजात आपली प्रतिष्ठा,पत दाखविण्यासाठी अशा अनेक कारणांमुळे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देवू जावे लागले.
घरात जरी मराठी बोलले जात असले तरी इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना मराठी व्यवस्थित लिहीता येत नाही, वाचता येत नाही. अनेक मराठी शब्द कळत नाही.
मुलांशी मराठीत बोलण्याऐवजी आता पालकही आपल्याला इंग्रजी बोलता यावे म्हणून मुलांशी इंग्रजीतूनच बोलत असतात.
मराठी त बोलणे म्हणजे कमीपणा वाटतो आणि इंग्रजीतून बोलले म्हणजे आपल्याला खुप काही ज्ञान आहे असे वाटते.

इतर भाषांचेही ज्ञान असणे गरजेचे आहे. पण उगाचचं नको तेथे ,गरज नसताना मराठी बोलण्याऐवजी इतर भाषांचा वापर का करावा?

मराठी माणूस मराठी माणसाला कोठेही भेटला तरी मराठीतच बोलले पाहिजे.
मुलांना इंग्रजी शाळेत पाठवले तरी त्यांना घरी मराठी साहित्य वाचनाची गोडी लावायला हवी.
मराठी माणूसच जेव्हा मराठी नाही बोलला तर मराठी भाषा टिकेल का ? आणि पुढच्या पिढीला मराठी भाषेचा काय वारसा मिळणार?

आता मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र अनेक कार्यक्रम,उपक्रम याद्वारे मराठी भाषेबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे. त्यानिमित्ताने तरी मराठी माणसांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण होईल आणि प्रत्येक मराठी माणसाला मराठी असल्याचा अभिमान वाटेल .