Feb 24, 2024
वैचारिक

बाप नावाचा माणूस

Read Later
बाप नावाचा माणूस

नुकताच सर्वांनी फादर्स डे साजरा केला. तसं तर आईबाबांच्या कौतुकासाठी कोणता तरी एक दिवस नक्कीच कमी ठरेल; पण इतर दिवशी मनात असलेल्या गोष्टी, या एका दिवशी ओठांवर आल्या तर छानच वाटेल नाही का!

आई नावाच्या हिऱ्याची चमक पाहताना जबाबदारी नामक शिंपल्यात दडलेला बाबा नावाचा अमूल्य मोती बरेचदा दुर्लक्षितच राहतो.

बाबा या शब्दासोबतच मनाला एक आदरयुक्त भीती वाटते. ही भीती तसं पाहायला गेलं तर योग्यच नाही का? भले बाबांसोबत अगदी मित्रासारखं नातं का असेना; पण आपलं आयुष्य घडण्यात, त्याला योग्य आकार देण्यात कुठेतरी ही आदरयुक्त भीतीसुद्धा कारणीभूत ठरते. म्हणूनच या स्पर्धेच्या युगात तग धरून राहण्यासाठी आपण तितके सक्षम असतो. कारण हा बाबा नावाचा माणूस स्वप्न पाहण्याची नजर, ती स्वप्नं पूर्ण करण्याचं बळ देत असतो. पिल्लांना ठेच लागायला नको म्हणून बाबा स्वतः खस्ता खात असतात. प्रसंगी भरकटलेल्या पिल्लांना योग्य वाट दाखवण्याचं कामही बाबा करतात.

घरी आल्यावर आईची शोधाशोध होते हे तर खरंच आहे; परंतु संध्याकाळी दमून भागून घरी आलेल्या बाबांना बघण्यातही एक वेगळंच सुख असतं. रागावले, ओरडले, तरी घरासाठी आभाळरूपी असणारे बाबा हवेहवेसेच वाटतात. कविता, लेख ,.. मधून आईचं अस्तित्व नेहमीच ओसंडून वाहत असतं. अर्थात ते तिच्या हक्काचं आहेच; पण बाबांना मात्र काही मोजक्या वैचारिक ओळींमध्ये समाधान मानावं लागतं. कधीतरी असं वाटतं की बाबांच्या लपून राहिलेल्या प्रेमासाठी जणू शब्दही लपून राहतात.

दिवसभराची कष्ट करणारी आई बघताना, पडद्यामागचा राबणारा  बाबा कित्येकदा अलिप्तच असतो.

शिस्त लावणारे तरीही प्रसंगी हळवे होणारे, चुकल्यावर ओरडणारे; पण कौतुकाच्या वेळी अभिमानाने छाती फुलून मिरवणारे, मुलांना घडवणारे आणि प्रसंगी स्वतः झिजणारे, स्वप्न पाहायला लावून ती पूर्ण करण्यासाठी बळ देणारे अन् हे करताना स्वतः कष्ट उपसणारे, मुलांची हौसमौज करणारे; पण स्वतः मात्र जबाबदाऱ्यांचं ओझं पेलणारे,‌.. बाबाच असतात.

हक्काचा बोलबाला न करता बाबांना कर्तव्य मात्र सगळीच पार पाडायची असतात. कौतुकाची थाप मिळविण्यापेक्षा सुखदुःखाच्या प्रसंगी मुलांची कणखर पाठ होणारे बाबाच असतात. आपल्या जीवनाचा एक भरभक्कम कणा असलेल्या बाबांबद्दल जितकं बोलू तितकं कमीच! हा कणा आयुष्यात असणं हेसुद्धा नशीबच!
या मौल्यवान रत्नाचा सहवास असाच लाभो, हीच इच्छा.
-© कामिनी खाने.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//