Feb 26, 2024
वैचारिक

मराठी : माझी मायबोली

Read Later
मराठी : माझी मायबोली

नुकताच मराठी भाषा दिन झाला, त्याच्या अनुषंगाने थोडे लिहावेसे वाटले. मी जे काही लिहिले आहे ते माझे वयैक्तित मत आहे आणि माझा कोणाचेही मन दुखावण्याचा हेतु नाही.

२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन असतो. सगळ्यांनी समाजमाध्यमांवर (social media) मराठी भाषेचा खूप प्रचार केला. खूप छान वाटले की आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे, पण फक्त एकच दिवस मी मराठी असल्याचा अभिमान आणि मराठी भाषेविषयी असलेले प्रेम आपण दाखवतो असे नाही वाटत का?

आपल्या मराठी भाषेला १५०० वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे, परंतु आजची परिस्थिती बघता मराठी भाषेबद्दल थोडे वाईट वाटते. माझे स्वतःचेच उदाहरण देते, हा लेख लिहायला घेतला आणि खूप इंग्लिश शब्दच येत होते मनात. खूप खंत वाटली, पण करणार तरी काय? आज आपण ज्या वातावरणात वाढतोय त्या वातावरणात मराठी भाषेचा वापर खूप कमी झालाय. पुर्णपणे मराठीच बोला असे मी म्हणणार पण नाही कारण ते खूप अवघड आहे. आपल्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या बऱ्याच गोष्टींना मराठी शब्द आपल्याला माहितही नाही, पण जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण मराठी भाषेचे प्रेम दाखवू शकतो.

आजकाल बऱ्याच लोकांना मराठी बोलण्याचा कमीपणा वाटतो. एक प्रसंग सांगते, आमच्या शेजारचे काका बँकेत गेले होते. तिथे गेल्यावर तेथील अधिकारी त्यांच्याशी इंग्लिश मध्ये बोलायला लागला आणि जेव्हा त्या काकांनी त्याला मराठी बोलायची विनंती केली, तेव्हा तो अधिकारी नाराजीने मराठीत बोलला. त्या अधिकाऱ्याला मराठी चांगली बोलता येत होती. मग आता मला सांगा तुम्ही मराठी राज्यात राहताय, दोघांनाही मराठी येतेय मग असे असतांना दुसऱ्या भाषेत बोलायचा अट्टाहास का असायला हवा? का कमीपणा वाटतो आपल्यालाच आपली मातृभाषा बोलायचा?

जिथे खरंच गरज आहे तिथे तुम्ही दुसरी भाषा बोलु शकता. आपल्या राज्यात आपल्याच लोकांशी आपण मराठीत बोलु शकतो ना? मराठीच बोला अशी सक्ती नाही, पण त्यावरुन कोणाची प्रतिमा तरी ठरवु नका. खूपदा मी बघितले आहे की आपली मराठी लोकच कोणी मराठी बोलले की त्या लोकांना कमी लेखतात. अजुन एक प्रसंग. माझ्या एका मैत्रिणीचे लग्न होते आणि सध्याच्या परिस्थितीमुळे घरच्याच लोकांना व्हाट्सअप आमंत्रण द्यायचे होते. तिने मला इंग्लिश पत्रिका पाठविली. मैत्रीण जवळची होती म्हणुन मी तिला मराठीत पत्रिका नाही का विचारले असता ती मला म्हणाली की मराठीत इतके कोण लिहिणार आणि आजकाल कोण मराठीत आमंत्रण देते. हे ऐकुन वाईट वाटले. आपणच आपल्या मातृभाषेचा मान ठेवत नाही मग दुसरे लोक कसा मान ठेवणार? आपणच आपल्या लोकांबद्दल भाषेवरुन मत ठरवितो. कोणी इंग्लिश बोलले कि खूप भारी... कोणी इंग्लिश कविता म्हणुन दाखविली की खूप शाबासकी मिळते... कोणी  इंग्लिश गाणे ऐकत असेल तर खूप भारी समजले जाते... मग लोकांनी काय करायचे? आजच्या स्पर्धा युगात टिकुन राहायचे असेल तर ज्याला लोक चांगले म्हणतात तशीच वर्तवणुक लोकांना करावी लागते.

मान्य आहे सध्या पुढे जायचे असेल तर इंग्लिश भाषा येणे गरजेचे आहे, मला इंग्लिश आणि मराठी या वादात नाही पडायचे. लहान मुलांना इंग्लिश माध्यमात घालण्यावरुन पण वाद आहेत, मला वाटते की मुलांना कोणत्या माध्यमात घालावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. भाषा हे एकमेकांचे भावना समजण्याचे माध्यम आहे. त्यात कुठली भारी कुठली हलकी असे काही नाहीये. पण जिथे गरज आहे तिथे त्या त्या भाषेचा वापर करावा. फक्त आपली प्रतिमा उंचावण्यासाठी आपली मातृभाषा सोडुन दुसऱ्या भाषेची मदत घेऊ नये. दोन मराठी माणसे एकत्र आली तर त्यांच्यामध्ये दुसरी भाषा येऊ नये असे मला वाटते.

ज्या मातीत आपला जन्म झाला त्याचा आपल्याला अभिमान हवा आणि ती भाषा जपण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. स्थानिक व्यवहारांमध्ये आपण मराठी बोलु आणि लिहु शकतो. मराठी वाचवण्यासाठी मोर्चे, मराठी सक्ती न करता मुळापासुन सुरुवात करण्याची गरज आहे. सगळ्यात आधी मराठीत बोलणे कमीपणाचे आहे हा विचार सगळ्यांनी मनातून काढुन टाकायला हवा. कोणी मराठीत बोलले तर त्याचा अभिमान वाटायला हवा. आपलेच मराठी लोक कोणी मराठीत बोलले कि हसताना मी खूपदा बघते. जिथे गरज आहे तिथे तुमचे दुसऱ्या भाषेचे कौशल्य जरुर दाखवा पण गरज नसतांना देखावा नको. खूप सुंदर परंपरा असलेल्या आपल्या मराठी सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी दुसऱ्या भाषेची मदत का घ्यावी लागते?

हे सगळे असेच चालु राहिले तर लवकरच आपली मराठी फक्त जुन्या ग्रंथांमध्येच बघायला मिळेल असे वाटते, म्हणुन आपली भाषा वाचविण्यासाठी नक्की काहीतरी करायला हवे. आपण स्वतःपासुनच सुरुवात करु शकतो. सगळ्यात आधी तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीवर मराठी भाषेचे संस्कार करायला हवे. त्यांच्या मनात आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान निर्माण करायला हवा. इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जरी शिकविले तरी घरी आपण त्यांना मराठी शिकवु शकतो. आपले मराठी सण, महिने, तिथी, विविध परंपरा, अभंग, मराठी साहित्य यांची त्यांना ओळख करुन देऊ शकतो. जशी त्यांची इंग्लिश चांगली व्हावी म्हणुन प्रयत्न करता तसेच त्यांना नीट मराठी बोलता यावी यासाठी आपण प्रयत्न करावा. पुढच्या पिढीला आपण जसे घडवतो तसे ती घडते. या पिढीला जर आपण आपल्या भाषेचे संस्कार दिले तर नक्कीच आपल्या मराठीला चांगले दिवस येतील. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे नक्कीच मराठीचा प्रचार करा. आपल्या मराठी कार्यक्रमांना दुसऱ्या भाषेचा वापर करणे आपण टाळू शकतो. नुसते मराठीसाठी भांडुन किंवा लिहुन काही होणार नाही तर प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपली भाषा बोलायला प्राधान्य दिले पाहिजे. मराठी साहित्य तर खूप अनमोल आहे, त्याचा नक्की आस्वाद घ्या. चला तर मग मराठी जपण्यासाठी स्वतःपासुनच सुरुवात करूया.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ,जात एक मानतो मराठी,एवढ्या जगात माय मानतो मराठी.  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//