मानवत हत्याकांड (दत्ता जोशी) भाग एक

एकेकाळी सगळ्या महाराष्ट्राची झोप उडवणाऱ्या हत्याकांडाची थरारक कहाणी


मानवत हत्याकांड (भाग पहिला)

परवा किनवट वरून औरंगाबादला ट्रेनने येता येता अचानक मानवत नावाचं स्टेशन लागलं आणि मनाला जोरात झटका बसला. हेचं ते गावं होतं ज्यानं एकेकाळी पुऱ्या महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची झोप उडवली होती. माणुसकीच्या सगळ्या संकल्पनांना काळीमा लावला होता.

आज त्या स्टेशनवर ट्रेन उभी होती. पण मन जवळ जवळ पन्नास वर्ष मागे भूतकाळात गेलं होतं. त्या वेळी आजच्या सारखे मोबाईल किंवा कोणताही सोशल मीडिया नव्हता. बातम्यांसाठी एकमेव साधन म्हणजे वर्तमानपत्र होती. प्रत्येक वर्तमान पत्रातून फक्त एकाचं गावाची बातमी कित्येक दिवस येत होती. ते म्हणजे मानवत गावं.

कोणत्या गोष्टीशी कोणतं तरी नावं कायमचं जोडलं जातं आणि ते काही केल्या पुसल जातच नाही. जसं किल्लारी गावं म्हटलं की भूकंप आठवतो तस मानवत म्हटलं की हत्याकांड हाच शब्द आठवतो. उभ्या देशाचा थरकाप उडवणार , क्रूरपणाचा कळस गाठणार, कल्पनेच्या पलीकडे मानवतेची हत्या करणार हत्याकांड या गावानं दाखवलं. मानवत हत्याकांड हे त्या वेळी सगळ्यात भयानक हत्याकांड मानलं गेलं.

या हत्याकांडाची दखल खुद्द गृहराज्य मंत्र्याना या गोष्टीची दखल घ्यावी लागली. आणि ईतिहासात पहिल्यांदाच मुंबईच्या सीआयडी.ना मुंबई बाहेरची केस हाताळण्या साठी बोलावल गेलं.

असं हे हत्याकांड होतं तरी काय आणि कोणी केलं होतं. याची माहिती नवीन पिढीला व्हावी या साठी हा लेखन प्रपंच.

आज मानवत हे शांततेसाठी प्रसिद्ध आहे. अनेक वेगवगळ्या जातीधर्माचे लोक तिथं गुण्या गोविंदाने राहतात. आता त्याला तालुक्याचा दर्जा मिळाला आहे.

त्या काळी मानवत हे एक छोटस गाव होतं. हे गाव गुप्त खजिन्यासाठी प्रसिध्द होतं. सोळाव्या सतराव्या शतकात या गावात अनेक श्रीमंत लोकं राहात होते. जेंव्हा निजामाने आक्रमण केलं तेंव्हा गावातल्या लोकांनी आपल्या जवळची संपत्ती जमिनीखाली पुरून पळ काढला. त्यातले काही लोकं काही दिवसांनी परत आले तर काही लोकं परत आलेच नाहीत. त्या मुळे ती संपत्ती जमिनीखाली तशीच पडून राहीली. या संपत्तीचा शोध लावून देण्यासाठी आता त्या ठिकाणी अनेक तांत्रिक, मांत्रिक आणि भोंदू बाबांचा डेरा पडला होता.

या लोकांच्या नादी लागल्यानं किती नुकसान होतं, किती निष्पाप जीवांची हत्या केली जाते याचं हे हत्याकांड म्हणजे एक जिवंत उदाहरण आहे.

( लेखक: दत्ता जोशी )

🎭 Series Post

View all