माणुसकीचं वाण (भाग ५) अंतिम

कथा माणुसकीच्या वाणाची




अष्टपैलू लेखक महासंग्राम
कथामालिका लेखन (पहिली फेरी)
माणुसकीच वाण (भाग ५) अंतिम


वृषाली स्वतःच्याच विचारात होती. नीता तिला घेऊन कॅन्टीनमध्ये आली. तिथे सगळ्याजणी गप्पांमध्ये रंगल्या होत्या. वृषालीला बघून सगळ्याजणी एकदम शांत झाल्या आणि एक एक करत तिथून सगळ्याजणी निघून गेल्या.


"वृषाली, रविवारी आपल्या ऑफिसच्याच वरच्या हॉलमध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे. तू नक्की येशील बरं." सुरेखा तिथून जाता जाता म्हणाली.


"सुरेखा, तुला माहितीये ना? मग तरी मुद्दाम का करतेय असं?" वृषाली


"हो… सगळं माहितीये आणि तरी पण तू येणार आहेस. कोण काय म्हणेल ते मी बघून घेईल… नीता, हिला रविवारी कार्यक्रमाला आणायची जबाबदारी तुझी." सुरेखा एवढं बोलून निघून गेली. रविवारी जावं की नाही हा मोठा पेचप्रसंग वृषालीसमोर उभा होता. 


रविवारचा दिवस उजाडला. दुपारी नीता वृषालीला घ्यायला आली. हो-नाही करत वृषाली शैलीला सोबत घेऊन कार्यक्रमाला गेली. तिथे खूप साऱ्या बायका जमलेल्या होत्या. बायकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ सुरू होते. नीताही या खेळात सामील झाली होती. शैलीला घेऊन वृषाली मात्र एका कोपऱ्यात अवघडून उभं राहून बघत जोती.


"उगीच आले ना मी इथे? कोणी काही बोललं तर? नीता पण ऐकत नाही माझं…" वृषालीच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. तेवढ्यात सुरेखा स्टेजवर गेली. माईक हातात घेऊन तिने बोलायला सुरुवात केली.


"मैत्रिणींनो, आज संक्रांत… नवीन वर्षाचं कॅलेंडर आणलं की आधी आपण बघतो संक्रांत कधी आलीये… हळदी कुंकू कधी करायचं, कसं करायचं, कोणती साडी नेसायची, कोणते दागिने घालायचे, वाण काय द्यायचं? आपण आधीपासूनच या गोष्टी ठरवून घेत असतो. खरं तर आधीच्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर पडायला, एकमेकींचे सुख-दुःख वाटून घ्यायला हे निमित्त असायचं. पुढे स्त्री शिकत गेली, स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली आणि त्यासाठी ती घराच्या बाहेर पडली. सुख-दुःख वाटून घेण्यासाठी सुरू झालेलं हे हळदी कुंकू मात्र कालांतराने बदलत गेलं. जी स्त्री सवाष्ण तिलाच यात मान, नाही का? पण ज्या स्त्रीचा नवरा गेलाय तिने काय गुन्हा केलेला असतो. उलट ती स्त्री नवरा नसताना खंबीरपणे उभं राहून आपलं घरदार सांभाळते, कष्टाने आपल्या मुलांना मोठं करते त्या स्त्रीची एक स्त्री म्हणून आपणही किंमत करू नये का?

म्हणूनच गेल्या पाच वर्षांपासून आपण आपण हा उपक्रम घेतोय. हळदी-कुंकवाच्या वाणाच्या सामानाचे आणि नाश्त्याचे पैसे गोळा करून आपण गरजू महिलांना मदत करतोय… खरंतर माणुसकीचं वाण आपण पुढे देतोय. अशीच एक आपली नवीन मैत्रीण वृषाली हिच्या हाताने आपण हे माणुसकीचं वाण आज अशाच गरजू महिलांना देतोय. मी वृषालीला विनंती करते की तिने मंचावर यावं आणि या महिलांना हे वाण, आपली खारूताईची मदत तिच्या हाताने द्यावी." सुरेखाच बोलणं ऐकून वृषालीला गहिवरून आलं. ती मंचावर गेली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तिथे उभ्या असलेल्या स्त्रीला तिने हळदी-कुंकवाची बोटं लावली, त्या स्त्रीनेही वृषालीला हळदी कुंकू लावलं. कितीतरी वर्षांनंतर वृषालीच्या कपाळावर हळदी कुंकू लागलं होतं. वृषालीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.

"समाज बदलत नाही, समाज सुधारत नाही, असं आपण नेहमीच ओरडत राहतो पण परिवर्तनाकडे सकारात्मक पाऊल आपण स्वतःच टाकत नाही. नव्या नांदीची ही सुरुवात या माणुसकीच्या वाणाने झालीये... हे वाण आपण असंच पुढे देत राहू..." वृषालीच्या या वाक्यावर सर्व बायकांनी अगदी टाळ्यांचा कडकडाट केला. कितीतरी दिवसांनी वृषाली मनापासून आनंदी झाली होती.

समाप्त
© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all