माणुसकीचं वाण (भाग ४)

कथा माणुसकीच्या वाणाची



अष्टपैलू लेखक महासंग्राम
कथामालिका लेखन (पहिली फेरी)
माणुसकीचं वाण (भाग ४)

शैलेशच्या अशा अचानक जाण्याने सगळ्यांच्याच आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. वृषालीच्या अवस्थेची तर कोणी कल्पना करू शकणार नव्हतं.

दिवस कसेबसे पुढे सरकत होते. आता मात्र वृषालीने मनाशी ठरवलं, आपलं दुःख विसरून शैलीसाठी, शैलेशच्या आई-बाबांसाठी खंबीरपणे उभं राहायचं. वृषालीने परत ऑफिसला जाणं सुरू केलं. घरातली सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. शैलेश गेल्यापासून मंदाताईंनी मात्र वृषालीसोबत बोलणं टाकलं.


"आपला मुलगा देवाघरी गेलाय. म्हातारपणी यापेक्षा भयानक दुःख कोणतं नसेल ना." मंदाताईंच्या अबोल्यावर वृषाली स्वतःचीच समजूत काढायची. शैलीचा पहिला वाढदिवसही नुसता नावाला होऊन गेला. शैलेशच्या आठवणीत वृषाली एक एक दिवस पुढे ढकलत होती. कॅलेंडरवरचे महिने तसेच पुढे जात होते. पुन्हा संक्रांतीचा सण आला. वृषालीच्या जखमा पुन्हा भळभळायला लागल्या. ऑफिसमध्ये, शेजारी, जिकडेतिकडे हळदी कुंकवाची रेलचेल सुरू झाली होती. सगळ्या बायका रोज मस्त नटून थटून, मैत्रिणींच्या घोळक्यात हिंडताना वृषाली बघत होती, यासगळ्यात वृषालीकडे मात्र सगळ्याजणी पाठ फिरवायच्या. वृषाली दिसली की बायका तिच्याविषयी कुजबुज करायच्या. आपल्याला मात्र असं फिक्या रंगांच्या कपड्यात वावरावं लागतं, सणा-समारंभात आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला टाकलं जातंय हे सगळं बघून वृषाली स्वतःच्याच नशिबाला दोष देत होती.


रथसप्तमीचा दिवस होता. वृषाली नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेली होती. संध्याकाळी ऑफिस संपवून ती घरी आली. दाराला कडी लावलेली होती. शैली त्रास देत असेल म्हणून सासूबाई तिला बाहेर घेऊन गेल्या असतील असं तिला वाटलं. ती दरवाजा उघडून आत गेली. फ्रेश झाली. चहा बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. तिला ओट्यावर सगळा धिंगाणा पसरलेला दिसला. ओट्यावर तीळ गूळ सांडलेलं होतं, त्याला मुंग्या लागल्या होत्या. चहाची कपं तशीच पडलेली होती. वृषालीने सगळं आवरायला घेतलं. सासूबाई कुठे गेल्या असतील याचा विचार ती करत होती. विचारातच तिने स्वतःसाठी चहा केला आणि चहाचा कप घेऊन ती हॉलमध्ये येऊन बसली. तेवढ्यात शेजारच्या काकू घरी आल्या.


"वृषाली, तुझ्या सासूने वाण द्यायला त्या वाट्या आणल्यात त्या दे बरं जरा. तिकडे कोपऱ्यात आहेत बघ. आज ना आमच्या घरी आम्ही शैलीचं बोरणहान केलं बघ. काय बाई पोरीने मजा घेतली सगळ्या गोष्टींची…" शेजारच्या काकू अनावधानाने सगळं बोलून गेल्या. वृषालीच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. तिने त्या वाट्या काकूंना दिल्या आणि ती स्तब्ध होऊन तशीच बसून होती. थोड्यावेळाने मंदाताई शैलीला घेऊन परत आल्या.


"एक विधवा म्हणून समाजाने झिडकारलं, खरं सांगू मला त्याचं काहीच वाटलं नाही. पण माझ्या घरच्यांनीही माझ्या भावनांची किंमत करू नये… सवाष्ण म्हणून जगायचा अधिकार नसेलही पण एक आई म्हणून तर जगण्याचा अधिकार आहे ना? आई, तुम्ही माझ्या अपोरक्ष शैलीचं बोरणहान केलंत, तुम्हाला एक शब्दही मला विचारावं वाटलं नाही. मी आई आहे ना तिची… " वृषाली बोलत होती. बोलताना तिच्या शब्दांनाही कंप सुटत होता.


"तू विधवा झालीस म्हणून मी सवाष्ण आहे हे विसरून जाऊ म्हणतेस होय… पांढऱ्या पायाची कुठली… माझ्या मुलाला तर गिळून आता पांढरं कपाळ घेऊन बसली आणि आता आमच्या कपाळावरची कुंकवाची बोटं तुला खुपताय होय… तू शैलीची आई म्हणून या घरात आहेस. कळलं? शैली नसती तर कदाचित आज तू इथे नसती…" मंदाताई वाटेल तसं बोलत होत्या. त्यांचे एक एक शब्द वृषालीच्या मनावर आघात करत होते.


"तुम्ही शैलेशचे आई बाबा म्हणून मी तुमची एवढी काळजी होते. खरं तर हे घर मी कधीच सोडून गेले असते पण शैलेशला तुमची काळजी होती याची जाण मला होती. पण ज्यांच्या मनात माझ्याबद्दल जराशीही सहानुभूती नाहीये, ज्यांच्याजवळ माणुसकीचा लवलेशही नाही अशा ठिकाणी मला राहायचं नाहीये…" वृषाली शैलीला घेऊन तिथून निघाली.

"थांब वृषाली. तू शैलीला सोबत नेऊ शकत नाही. शैलीत आमच्या शैलेशचा अंश आहे." मंदाताई


"तुमच्याच भाषेत सांगायचं तर मी विधवा आहे आणि नवरा मेल्यावर बाळाचा सर्व हक्क त्याच्या आईकडेच असतो. तुम्ही कायद्यानेही मला शैलीपासून वेगळं करू शकणार नाही." वृषालीही चांगलीच चिडली होती. ती शैलीला घेऊन घर सोडून निघाली. वृषाली तिच्या माहेरी गेली. आपली आई आपल्या भावना समजून घेईल ही एक वेडी आशा तिला होती पण तिथेही तिच्या पदरी निराशाच पडली. आईने तिला तिच्या सासूबाई कशा बरोबर तेच पटवायचा प्रयत्न केला. आपलं कोणी नाही याची जाणीव वृषालीला झाली. वृषालीने माहेरही सोडलं ते कायमचंच.


ऑफिसमधल्या एका मैत्रिणीच्या मदतीने तिने एक रूम भाड्याने घेतली आणि तिथे राहायला लागली. ऑफिसमध्ये तिने बदलीसाठी अर्ज टाकला. तिची विनंती बदली मान्य झाली आणि वृषाली ते शहर सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेली. तीन वर्षं तिने त्या कंपनीत काम केलं. दुसऱ्या कंपनीने अजून चांगली ऑफर दिली म्हणून काही महिन्यांपूर्वी वृषाली या नव्या कंपनीत जॉईन झाली होती. जीवाला जीव देऊन राहणाऱ्या नीताची मैत्री तिला इथे मिळाली होती.

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all