माणुसकीचं वाण (भाग २)

कथा माणुसकीच्या वाणाची


अष्टपैलू लेखक महासंग्राम
कथामालिका लेखन (पहिली फेरी)

माणुसकीचं वाण (भाग २)

कॅन्टीनमध्ये सर्व बायकांचा हळदी कुंकवाचा विषय सुरू होता म्हणून वृषालीला कॅन्टीनमध्ये जायचं नव्हतं. वृषाली आपल्या डेस्कवर बसून होती. नीता तिथे आली आणि तिने वृषालीला अक्षरशः ओढतच कॅन्टीनमध्ये नेलं.


भूतकाळ वृषालीच्या डोळ्यासमोरून झरझर जात होता.


वृषाली एम.सी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होती तेव्हा तिला शैलेशचं स्थळ सांगून आलं होतं. शैलेश एका आय.टी. कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याच्या घरची परिस्थितीही अगदी चांगली होती. त्यातल्या त्यात शैलेश एकुलता एक मुलगा होता आणि त्याच शहरात राहणारा होता. त्यामुळे वृषालीच्या घराच्या लोकांनी चांगलं स्थळ हातचं सुटू नये म्हणून लगेचच मुलाला होकार दिला. तसा शैलेश दिसायला साधारण होता; पण वृषाली मात्र दिसायला अतिशय सुंदर होती. वृषालीच्या पाठीवर दोन बहिणी आणि एक भाऊ होता. त्यामुळे तिच्या घरच्या लोकांना वृषालीच्या लग्नाची घाई होतीच. त्यातच एका नातेवाईकाने शैलेशचं हे स्थळ सुचवलं आणि वृषाली आणि शैलेशच्या लग्नाचा बार उडाला.


उंबरठ्यावर ठेवलेल्या तांदुळाच्या मापट्याला पाय लावून वृषालीचा गृहप्रवेश झाला. वृषालीच्या सासरी तिच्या सासूबाई मंदाताई, सासरे मुकुंदराव आणि शैलेश एवढाच परिवार होता. मंदाताई थोड्या कडक स्वभावाच्या आणि जुन्या विचारांच्या होत्या. मुकुंदराव घरात जास्त काही बोलत नसत. शैलेशही मितभाषी होता. आपल्या आईवर शैलेशचा खूप जीव होता. शैलेश मंदाताईंच्या म्हणण्याबाहेर जात नव्हता. वृषालीही घरच्या या नवीन वातावरणात जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होती आणि बऱ्यापैकी त्यात यशस्वी होत होती.


लग्नानंतर काही महिन्यातच वृषालीला एका कंपनीत नोकरी लागली.


"घरातल्या सर्व गोष्टी सांभाळून नोकरी करायला माझी ना नाहीये; पण आधी प्राधान्य कुटुंबाला द्यायचं." मंदाताईंनी घातलेली ही अट मानूनच वृषालीची नोकरी सुरू झाली होती. घर आणि नोकरी सांभाळताना वृषालीची तारांबळ उडत होती. वृषाली मात्र सगळं अगदी नीट सांभाळत होती. एकंदरीत सगळं सुरळीत सुरू होतं. कुणाला कुठे नावं ठेवायला जागा नव्हती. बघता बघता शैलेश-वृषालीच्या लग्नाला एक वर्ष झालं आणि वृषालीने एक गोड बातमी सगळ्यांना सांगितली. लवकरच वृषाली आणि शैलेशच्या संसारवेलीवर एक नवीन फूल फुलणार होतं.


वृषालीच्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे अगदी आनंदाचं वातावरण होतं. मंदाताईदेखील आपल्या सुनेची आता जास्त काळजी घेऊ लागल्या होत्या. तिच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष देऊ लागल्या होत्या. त्यांनी सातव्या महिन्यात वृषालीचं डोहाळजेवण अगदी दणक्यात केलं. वृषालीच्या चेहऱ्यावरही गर्भारपणाचं चांगलंच तेज आलं होतं. बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि वृषालीने एका गोंडस परीला जन्म दिला.

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all