माणुसकी अजूनही जिवंत आहे- भाग १

माणुसकी अजूनही जिवंत आहे

   भाग - १

*माणुसकी अजूनही जिवंत आहे*


       पहाटेच्या वेळी तांबडं फुटलं की पाखरांची किलबिल सुरु होते अन् मधूर आवाजाचा नाद आसमंतात घुमू लागतो. त्यामुळे सकाळचं वातावरण अगदी प्रफुल्लित होऊन जातं. अशा वातावरणाचा आस्वाद घेताना मन प्रसन्न होतं. दिवसाची सुरुवात चांगली होते.

         सकासकाळी रस्त्यांवर लोकांची गर्दी खूप असतेच पण त्याबरोबरच गोंगाट अन् वाहनांचा कर्कश आवाजही असतो. जो तो आपापल्या कामाच्या गडबडीत असतो. या गर्दीतून धक्के खात वाट काढत वेळेवर पोहचण्याच्या प्रयत्नात असतो.

       तसं पाहिलं तर इतरांना देण्यासाठी कुणाजवळ तितकासा वेळही नसतो.

         जसजसा दिवस माथ्यावर येईल तसतशी रस्त्यावरील लोकांची सगळी रहदारी मंदावते अन् वाहनांचा गोंगाटही कमी होऊन एक निरव शांतता पसरु लागते.

           नेहमीप्रमाणेच आजही संजय आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडला. दुपारच्या एक च्या सुमारास रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. सुर्याची किरणे माथ्यावर आलेली, उन्हाच्या तिरपीमुळे जीवाची नुसती घालमेल होत होती. तरीही तसाच संजय रस्ता पार करत पुढे चालत होता.

          काही अंतर चालत जाताच अचानक त्याला समोर लोकांचा जमाव दिसला. संजय थबकला, त्याला वाटलं की यावेळेत रस्त्यावर सहसा गर्दी नसते तर मग "आता काय झालं असावं बरं? का झाली असेल गर्दी?"

त्याच्या मनात प्रश्नाचा गोंधळ चालूच होता.

        'काय झालंय', हे पाहणे या मानवी स्वभावानुसार एक उत्सुकता म्हणून संजय त्या गर्दीकडे ओढला गेला. हळूहळू पुढे गेला पण समोर जे पाहिलं ते दृश्य पाहून तो निशब्दच झाला. लोकांच्या जमावातील सगळेजण जसे अवाक नजरेने पाहात होते तसाच संजयही अवाक होऊन पाहातच राहिला. कारणही तसंच होतं.

            तिथे एक बाई रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर बेशुध्द अवस्थेत निपचिप पडलेली होती. तिच्या बाजूला एक दुचाकी गाडी (स्कुटी) मोडक्या तोडक्या अवस्थेत पडलेली.

            तिथल्या जमावातील एकाला संजयने विचारले, "दादा, काय झालं! हा अपघात कसा झाला?" तेव्हा तो बोलला की, "काय नाय ओ, ही बाई स्कुटीवरुन जाताना एका चार चाकी गाडीने तिला जोरात धक्का मारलाय". त्यामुळे तिची ही अवस्था झाली.

           या दुनियेत माणुसकी जपणारी माणसं असली आणि अडचणीच्या प्रसंगात ती मदतीला देवासारखी धावून आलीत तर कुणीही व्यक्ती कोणत्याही संकटाचा सामना करु शकते हे एक वास्तविक सत्य आहे.

           ती बाई तशीच पडून होती. तिच्या अवतीभोवती बघ्यांची गर्दी होती. जो तो फक्त येवून तटस्थपणे बघून जायचा, पण संकटाच्या वेळी दुसऱ्याला मदत करण्याची माणुसकी जपणारं कुणी पुढं येतच नव्हतं. त्या बाईची खूपच दयनिय अवस्था होती तरीही कुणाला पाझर फुटला नाही.

       संजय मात्र खूपच हळव्या मनाचा माणूस. त्याला तिची ती अवस्था पाहून शांत राहावलंच नाही. कारण संजयच्या रक्तातच परोपकारी वृत्ती भिनलेली होती.


          संजय हा एक प्रेमळ, सुशिल आणि सुस्वभावी असा उमद्या छातीचा,धाडसी तरुण होता. त्यातच तो पेशाने एक आदर्श शिक्षकही होता त्यामुळे त्याचा बोलका स्वभाव होता. एखाद्याला नि:स्वार्थीपणे मदत करुन तो एक प्रकारे समाजसेवेचेही काम करत असे. असा हा सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व असलेला माणूस म्हणजे संजय. म्हणून शेवटी तोच त्या बाईच्या मदतीला पुढे सरसावला.

कोण असेल ती? काय होईल तिचं ?

क्रमश:

सौ. वनिता गणेश शिंदे ©®

🎭 Series Post

View all